भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. यानिमित्ताने देशभर त्यांना अभिवादन होत आहे. चैत्यभूमीकडे जनसागर मानवंदनेसाठी लोटला आहे. संपूर्ण जगाला झपाटून टाकणारे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. समानतेसाठी त्यांनी संपूर्ण जगाचा अभ्यास केला. त्यांनी केवळ भारत असा विचार न करता अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार करून कार्य केले होते. त्यामुळे त्यांना ख-या अर्थाने माणूस कळला होता. त्यांना साक्षात गौतम बुद्धांप्रमाणेच ज्ञानप्राप्ती झालेली होती. देशातल्या इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) प्रश्न सोडवण्यासाठी लोकसंख्येची गणना गरजेची आहे, ही मागणी पहिल्यांदा डॉ. आंबेडकर यांनी १९४६ मध्ये केली होती. देशभरातल्या ओबीसी लोकसंख्येची जनगणना व्हावी, अशी मागणी खासदारांकडून झाल्यावर केंद्र सरकारने २ ऑक्टोबर २०११ मध्ये ती सुरू केली. पण हा विचार कित्येक दशके अगोदर बाबासाहेबांनी मांडला होता. इतर मागासवर्गाला घटनात्मक संरक्षण देण्याची मागणीदेखील डॉ. आंबेडकरांनीच पहिल्यांदा केली होती. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीयांना घटनात्मक संरक्षण दिले गेले पाहिजे, अशी आग्रही सूचना डॉ. आंबेडकरांनी केली होती.त्याचप्रमाणे देशाच्या राज्यघटनेची निर्मिती करताना ३४०व्या कलमान्वये ओबीसी वर्गाला संरक्षण देण्याची तरतूद केली गेली. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ती तरतूद पुरेशी वाटत नव्हती. डॉ. आंबेडकर हे काळाच्या फार पुढे होते. हिंदू कोड विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ १९५१मध्ये डॉ. आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. पण या राजीनाम्याचे दुसरे कारण ओबीसींच्या प्रश्नावर सरकारचे दुर्लक्ष झाले, हेदेखील त्यांनी या राजीनामापत्रात स्पष्टपणे मांडले होते. देशातल्या सर्व दीनदुबळ्या समाजाच्या पाठीशी डॉ. आंबेडकर उभे राहिले. म्हणूनच डॉ. बाबासाहेबांच्या विचारसरणीचा सखोल अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजे. सर्व विषयांचा अभ्यास करून त्यांनी आपल्या लेखणीचा वापर केलेला दिसून येतो. राजकीय विषयावरच्या लेखनाचा उल्लेख करायचा, तर ‘व्हॉट गांधी अँड काँग्रेस हॅव डन टू द अनटचेबल्स’ या पुस्तकात त्यांनी अत्यंत कठोर शब्दांत टीकेचे आसूड ओढले आहेत. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ किंवा ‘पार्टिशन ऑफ इंडिया’ या पुस्तकात त्यांनी फाळणीच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. फाळणीच्या वेळी डॉ. आंबेडकरांनी लोकसंख्येच्या अदलाबदलीचा मुद्दा मांडला होता. पण ते न झाल्याने लाखो लोक दंगलीत मारले गेले. जातिव्यवस्थेवर बोलण्यात बाबासाहेबांनी पुढाकार घेतला होता. त्यांनी केवळ हिंदूंमधील जातीधर्मावरच भाष्य केले नाही, तर मुस्लिमांमधल्या जातिव्यवस्थेवरही डॉ. आंबेडकरांनी नेमकेपणाने बोट ठेवले होते.आज तिहेरी तलाक, बुरखा हे विषय गाजत असले आणि मुस्लीम महिलांच्या हक्काबाबत चर्चा होत असली तरी, मुस्लीम महिलांच्या असुरक्षित आयुष्याबद्दल डॉ. आंबेडकरांनी चिंता व्यक्त केली होती. या देशाला एका छत्राखाली, एका विचाराखाली आणि समतेच्या छायेत आणण्यासाठी बाबासाहेबांचा विचार उपयुक्त आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केवळ भारतरत्न असे संबोधून चालणार नाही, तर त्यांची भूमिका एकूणच विश्वव्यापी होती. मानव कल्याणाची त्यांची भूमिका होती. नमुन्यासाठी केवळ त्यांनी भारताची बाजू मांडली असली तरी जगातील प्रत्येक घटकाला, सामान्य माणसाला, पीडित, शोषित आणि मागासलेल्यांसाठी त्यांची शिकवण मार्गदर्शक आहे. खरे तर जागतिक पातळीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना या अभ्यासासाठी, अर्थशास्त्रातील त्यांच्या भूमिकेसाठी नोबेल मिळणे आवश्यक होते. कोणत्याही विषयावर खोलवर जाऊन ते संशोधन करत असत. मुंबई विधिमंडळ, घटना परिषद, संसदेतले डॉ. आंबेडकर यांचे गाजलेल्या भाषणांचे इतिवृत्तान्त पाहायला मिळतात, त्यावरून ते किती अभ्यास करून बोलत असत, आपले मुद्दे कसे मांडत होते हे आजच्या सर्वाना मार्गदर्शक आहे.पत्रकार म्हणून असलेली त्यांची जबाबदारी, तर ते अत्यंत वेगळेपणाने मांडतात. डोळे, बुद्धी, मन आणि विवेकावर आधारित त्यांचे लेखन होते. महाडमधल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी जेधे-जवळकर हे सत्यशोधक कार्यकर्ते डॉ. आंबेडकरांना म्हणाले होते की, या सत्याग्रहात ब्राह्मणांना सोबत घेऊ नका; परंतु ही मागणी बाबासाहेबांनी फेटाळली होती. त्यानंतर १ जुलै १९२७च्या ‘बहिष्कृत भारत’च्या अग्रलेखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ब्राह्मण्य ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती सर्वच जातींमध्ये आहे. ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण मला हवेत. मात्र ब्राह्मण्यवृत्तीने ग्रासलेल्या ब्राह्मणेतर व्यक्तींनाही मी जवळ करणार नाही. यातून डॉ. आंबेडकर यांनी अतिशय व्यापक आणि वैचारिकदृष्टय़ा परिपक्व असा संदेश देऊन ठेवलेला आहे. आज कारण नसताना, जातीयवाद मांडला जात असताना आणि एका विशिष्ट जातीवर विनाकारण टीका करण्याची प्रवृत्ती फोफावत असताना यातून डॉ. बाबासाहेब आंबडेकरांचे विचारच सर्वच समाजांना बाहेर काढू शकतात, हे निश्चित आहे. याशिवाय अर्थशास्त्रीय लेखन त्यांनी मोठय़ा प्रमाणावर केलेले दिसून येते. धर्म आणि धर्मग्रंथ हे माणसा-माणसांमध्ये भेद निर्माण करताना दिसत होते.त्यामुळे त्यांनी धर्मशास्त्रीय चिकित्सा व तत्कालीन राजकीय प्रश्नांची उकल आपल्या विविध ग्रंथांमधून केलेली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या समाजशास्त्रीय लेखनात महत्त्वपूर्ण असलेल्या ‘कास्ट इन इंडिया अँड देअर रेमिडीज’ आणि ‘अनहिलेशन ऑफ कास्ट’ हे दोन ग्रंथ म्हणजे केवळ भारतालाच नाही, तर संपूर्ण जगाला अभ्यासासाठी मिळालेले फार मोठे भांडार आहे. त्यांचा हा लेखनाचा विचार जगाच्या कल्याणाचा, विश्वबंधुत्वाचा विचार प्रकट करणारा असाच आहे. सामाजिक पक्षपात आणि शोषण यांचे चार आधार त्यांनी यातून दाखवून दिलेले आहेत. आपल्याकडे वेगवेगळ्या कारणांनी भेदभाव होता. यात लिंगभेद, गरीब-श्रीमंत भेद, जातींची श्रेणीबद्ध विषमता आणि धर्म भेद असे प्रकार होते. याचा ऊहापोह बाबासाहेबांनी आपल्या लेखनातून केलेला दिसून येतो. जगामध्ये कोणतेही काम करण्याचे स्वातंत्र्य असले, तरी ते भारतात नसल्याने भारतीय समाजाचे मोठे नुकसान झाले होते, हे बाबासाहेबांनी अत्यंत स्पष्टपणे मांडले होते. हा विचार प्रकट होणे हीच विकासाची पहिली पायरी होती. सामाजिक समतोल, समताधिष्ठित राष्ट्राच्या निर्मितीचा हा पाया होता.