संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना दुष्काळी उपाययोजना करण्याऐवजी सरकारमधील मंत्री बेताल वक्तव्ये करत आहेत. शेतकरी आणि दुष्काळग्रस्त भागातील जनतेची क्रूर थट्टा केली जात आहे. दुष्काळी भागांचा दौरा करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकालाही जनतेने अडवले. त्यात थोडीफार विरोधकांची राजकीय ताकद असली, तरी जनतेच्या रोषाची धार याने कमी होत नाही. कारण दुष्काळाकडे पाहण्याची सरकारची एकूणच दृष्टी अत्यंत नकारात्मक आहे. दुष्काळी जनतेला मदत उभी करून देणे, त्यांना सहानुभूतीने वागवणे बाजूला राहिले, पण सरकारमधील मंत्री आणि नेते बेताल वक्तव्ये करून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. त्यामुळे मदतीपेक्षा ही होणारी थट्टा पाहून ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी अवस्था आज दुष्काळग्रस्तांची झालेली आहे. आज फक्त मराठवाडाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. लोकांना प्यायला पाणी नाही. डिसेंबर महिना उजाडला नाही तोच पाणी कपातीला सुरुवात झाली आहे.ग्रामीण भागांत जनावरांना चारा नाही. अनेक भागांत रब्बीची पेरणीच झाली नाही. त्यामुळे वर्ष कसे काढायचे, पशुधन कसे जगवायचे या विवंचनेत असलेले राज्यभरातले शेतकरी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करत आहेत. त्यांच्या मागण्या मान्य करून दुष्काळी जनतेला दिलासा देण्याऐवजी मंत्री राम शिंदे चारा नसेल, तर जनावरे नातेवाइकांकडे नेऊन सोडा, असे शेतक-यांना सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. सत्तेची मस्ती डोक्यात गेल्यामुळे भाजप नेते, अशी उद्दामपणाची भाषा बोलत आहेत. हे वक्तव्य म्हणजे फ्रान्सच्या राज्य क्रांतीच्या वेळी तेथील राणीने खायला पाव नसेल, तर केक खा किंवा भाकरी मिळत नाही, तर शिरा-पुरी खा, असे सांगण्यातलाच हा प्रकार आहे. दोनशे वर्षापूर्वी जुलमी सत्ताधीश जसे वागत होते तसे हे लोकशाहीतील राजे वागू लागले आहेत. राज्यकर्ते आणि त्यांचे प्रतिनिधी असे बेताल वक्तव्य करत असल्यामुळे त्याचे पडसाद उमटले नाहीत तरच नवल म्हणावे लागेल.याचा परिणाम केंद्रीय दुष्काळी पथकाच्या दौ-यातून रद्द केलेल्या परभणी तालुक्यातील पेडगाव येथील संतप्त शेतक-यांनी मानवत तालुक्यातील रूडी फाटय़ावर पथकातील या अधिका-यांच्या गाडय़ा आडवल्या. या गाडय़ा अडवल्यानंतर या भागात ‘ह’ अधिकारी गेले. म्हणजे शेतक-यांच्या झटक्यापुढे अधिकारी नमल्यानेच पथकाने पेडगावात येऊन पाहणी केली. त्यानंतर मानवत तालुक्यातील रूडी आणि सेलू तालुक्यातील गणेशपूर गावाची पाहणी केली. यातून स्पष्ट होते की, जेव्हा शेतक-यांचे पंचनामे, दुष्काळी भागाची पाहणी करायची वेळ येते तेव्हा फक्त हे अधिकारी दिखाऊपणाची कामे करतात. प्रामाणिकपणे सगळी पाहणी करत नाहीत. खोटे अहवाल सादर करतात. यात ‘बळी तो कानपिळी’ असा प्रकार होतो. ज्याचा वशिला आहे, ताकद आहे तो आपल्या भागातील पाहणी करून घेतो. ज्यांना शक्य नाही ते दुष्काळात, आसमानी संकटात, नैसर्गिक आपत्तीत होरपळत राहतात. ना त्यांच्या दु:खाची कल्पना शासनाला असते ना प्रशासनाला. कोणालाही काहीही पडलेली नसते. दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक नेमलेले असताना दुष्काळी भागाकडे पाठ फिरवून हे पथक जाते, ही केवढी चिंतेची आणि नामुष्कीची बाब आहे. प्रत्यक्ष पाहणी न करता खोटे अहवाल देण्याचीच ही कामगिरी होणार होती, पण मानवत आणि सेलू तालुक्यात अडवल्यामुळे त्यांना पाहणी करणे भाग पडले. असा या राज्यात कितीतरी भाग असेल.त्यामुळे ही खरी माहिती पुढे कशी येणार हा खरा प्रश्न आहे. प्रशासनाला वाटेल ते प्रशासन करते आहे आणि शासनाला पाहिजे ते शासन करते आहे. दोघांमध्ये कसलाही मेळ राहिलेला नाही. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. म्हणजे जर शेतकरी आक्रमक झाले नसते, तर या पथकाने दुष्काळी भागांची पाहणी केलीच नसती. जवळपास शंभरहून अधिक शेतकरी रस्त्यावर थांबले होते. हे दृश्य पाहून पथकाला धडकी भरली आणि त्यांनी लागलीच गाडय़ा वळवून पाहणी केली. दुसरीकडे दुष्काळग्रस्त भागांत पाणीच नाही, तर चा-याअभावी जनावरे तडफडत आहेत. यावर चारा नसेल, तर जनावरे नातेवाइकांकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी शेतक-यांना दिला आहे. बेताल वक्तव्य करणारे मंत्री आणि ढिसाळ प्रशासनाच्या जोरावर आज राज्यातील देवेंद्र फडणवीस यांचे सरकार काम करत आहे. अशा बेताल वक्तव्य करणा-या मंत्र्यांकडून बळीराजाचा जो अपमान केला गेला आहे, त्याबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी अशा मंत्र्यांची कानउघाडणी करणे गरजेचे आहे. राम शिंदे यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून शेतक-यांमधून तीव्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबत कसलीही दखल घेतलेली नाही, याचे वाईट वाटते.केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक नगर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राम शिंदे हे पाथर्डी येथे आले होते. त्यावेळी एक शेतकरी शिंदे यांना भेटायला आला व दुष्काळी स्थितीमुळे चारा उपलब्ध नाही, त्यामुळे जनावरांची चा-याअभावी उपासमार होत असल्याचे शेतकरी मंत्री शिंदे यांना सांगत होता. यावर त्या शेतक-याला सल्ला देताना राम शिंदे यांनी त्या शेतक-याला चारा नसेल, तर आपली जनावरे पाहुण्याकडे नेऊन बांधा, असा अजब सल्ला त्यांनी दिला. हा प्रकार अत्यंत हिडीस आणि संतापजनक असाच आहे. शेतक-यांची थट्टा करण्यासाठी हे सरकार आहे काय? अशी चेष्टा फक्त बेजबाबदार असलेले सरकारच करू शकते किंवा जे आपले नाहीत तेच असे करू शकते. स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सत्तेत असताना दुष्काळग्रस्त भागांतील जनतेची छळवणूक करण्यासाठी असले प्रकार करत असत. तोच प्रकार आपलेच लोक करतात यासारखे दुर्दैव ते काय? दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची ही चाललेली क्रूर थट्टा सरकारने तातडीने थांबवली पाहिजे.
शनिवार, ८ डिसेंबर, २०१८
दुष्काळग्रस्तांची क्रूर चेष्टा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा