शनिवार, ८ डिसेंबर, २०१८

अभि‘नेते’



अफवा आणि सोशल मीडियावर काहीतरी व्हायरल करून चर्चेत राहण्याचे तंत्र फारच विकसित झाले आहे. त्याचा वापर अन्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी ढालीसारखा होतो, हे राज्यकर्ते आणि राजकारणी यांना चांगलेच माहिती असते. भारतीय जनता पक्षाने याचा वापर चांगल्याप्रकारे केला असावा. अशीच एक गेल्या चार दिवसांमधली बातमी म्हणजे माधुरी दीक्षित पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून निवडणूक लढवणार.. त्यामुळे अभिनेते जेव्हा नेते होतात, त्यावर नजर गेल्याशिवाय राहात नाही..सध्या आपल्या विरोधात थोडे वातावरण असल्यामुळे भाजपच्या छातीत कदाचित धडधड होत असावी. या धडधडीवर रामबाण उपाय म्हणून धकधक गर्ल माधुरीच्या नावाची चर्चा सुरू केली असण्याची शक्यता आहे. अर्थात माधुरीने या बातमीला फारसा प्रतिसाद दिला नसला तरी प्रसारमाध्यमांनी मात्र ही बातमी चांगलीच रंगवली. म्हणजे रात्रीच्या वेळी अंधारात कसला तरी संशय आल्यामुळे एखादे कुत्रे जोरात भुंकते. जागते रहो.. भो भो भो.. चोर आला वाटतं.. भो भो भो.. ही एक आरोळी एखाद्या कुत्र्याने दिली की तिथून पुढे १५ मैलांपर्यंत फुटाफुटांवरची कुत्री चोर चोर, भू भू भू, चोर चोर, भो भो भो, सावधान भो भो भो असा आवाज काढत न पाहिलेल्या चोराची चर्चा करत राहतात. सगळीकडून येणा-या त्या बुभुत्कारामुळे अख्खे गाव जागे होते. तसाच प्रकार माध्यम आणि समाजमाध्यम जगतात या माधुरीच्या बातमीमुळे झाला. पण चित्रपटातील एखादी नामांकित व्यक्ती राजकारणात येणार म्हटल्यावर अनेकांना चर्चेसाठी चांगलेच खाद्य मिळते. अर्थात प्रसिद्धीच्या शिखरावर गेलेल्या कलाकाराचे राजकारणात आगमन होते तेव्हा रुपेरी पडद्यावर कितीही यशस्वी असला तरी या राजकारणाच्या पटलावर किंवा अभिनेता ‘नेता’ बनतो तेव्हा त्याची कामगिरी सुमारच झाल्याचे दिसून आले आहे. त्याला एखाद् दुसरा अपवाद असू शकतो.इंदिरा गांधींच्या हत्येनंतर गांधी घराण्याचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे, ..कालांतराने ते तुटले हा भाग वेगळा, पण राजीव गांधींच्या मैत्रीखातर तत्कालीन सुपरस्टार अमिताभ बच्चन राजकारणात आला. १९८४ च्या निवडणुकीत अलाहाबाद मतदारसंघातून मातब्बर अशा हेमवतीनंदन बहुगुणा यांच्या विरोधात हा छोरा गंगा किनारेवाला लढला आणि चांगल्या मताधिक्क्याने विजयीही झाला. पण संसदेत जाऊन अमिताभ काही करू शकला नाही की, आपल्या खासदारकीची टर्मही त्याने पूर्ण केली नाही. कुठल्याशा स्वीस बँक घोटाळ्याशी बीग बीचे बंधू अजिताभ याचे नाव जोडले गेले, त्याचा परिणाम म्हणून अमिताभने खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस आणि राजकारणापासून शक्य तितके दूर राहात पुन्हा रुपेरी पडद्यावर ‘शराबी’ बनून मोठा झाला. त्यामुळे कितीही सुपरस्टार असला तरी त्याला राजकारणात काही स्टारडम मिळाले नाही. सुपरस्टार अभिनेत्याला ज्या आत्मीयतेने दक्षिणेत जवळ केले जाते, तेवढे उत्तर भारतात जवळ केले जात नाही, हे अमिताभवरून दिसून येते. त्यामुळे माधुरी राजकारणात आलीच, तर तिला याचा विचार करावा लागेल.आपला पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनाही काँग्रेसने जवळ केले होते. भारतीय जनता पक्षाने राम मंदिराची लाट निर्माण केल्यानंतर १९९१ च्या निवडणुकीत राजीव गांधींनी राजेश खन्नाला दिल्लीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. साक्षात लालकृष्ण अडवाणींच्या विरोधात राजेश खन्नाला उभे केले. या निवडणुकीत अत्यंत कमी फरकाने राजेश खन्ना पराभूत झाला होता. अडवाणींनी दोन ठिकाणांहून निवडणूक लढवली होती. त्यामुळे दिल्लीचा त्यांनी राजीनामा दिला. त्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने पुन्हा राजेश खन्नाला उमेदवारी दिली. त्यावेळी भाजपचे उमेदवार होते अभिनेते शत्रुघ्न सिन्हा. यावेळी राजेश खन्नानी भाजपच्या शत्रुघ्न सिन्हा यांचा २५ हजार मतांनी पराभव केला. १९९२ ते १९९६ अशी चार वर्षे राजेश खन्ना खासदार होता. काँग्रेस सत्तेत होती, पण कोणतीही प्रभावी कामगिरी त्याला करता आलेली नव्हती. त्यामुळे पडद्यावरचा सुपरस्टार मतांसाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा तो फ्लॉप होतो हे भारतीय लोकशाहीने पुन्हा एकदा पाहिले. ना अमिताभ यशस्वी झाला, ना राजेश खन्ना. दोन सुपरस्टारची ही गत माहिती असलेली माधुरी भाजपची धाकधूक कमी करण्यासाठी धकधक करायला येईल, असे वाटत नाही.सुपरस्टार नसला तरी करमणुकीचा बादशाह म्हणून गोविंदाकडे सगळेजण पाहतात. हमखास करमणूक, विनोद आणि निखळ आनंद देणारा गोविंदा.. कुणी त्याच्यात दादा कोंडकेंना शोधत असले तरी प्रेक्षक त्याला पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी करत होते. पण काँग्रेसची वक्रदृष्टी गोविंदावर पडली आणि तो नंतर राजकारणातही फ्लॉप झाला आणि रुपेरी पडद्यानेही त्याला नंतर स्वीकारले नाही. गंगा किनारीचा छोरा राजकारण सोडल्यानंतर सावरला, पण विरारचा छोरा मात्र लांब फेकला गेला.२००४ च्या निवडणुकीत गोविंदाने भारतीय जनता पक्षाचे मातब्बर नेते राम नाईक यांचा पराभव केला, लोकसभेत गेला. पण ना त्याची चांगली उपस्थिती होती, ना मतदारसंघासाठी त्याने काही विशेष केले. पडद्यावर किमान दिसत तरी होता, पण राजकारणात गेल्यानंतर ना पडद्यावर, ना संसदेत, ना मतदारसंघात, कुठेच दिसत नव्हता. त्यामुळे छोटे मियाँही बडे मियाँप्रमाणेच राजकारणात फ्लॉप ठरले. अभिनेता म्हणून गाजलेली त्याची कारकीर्द, नेता म्हणून पुसली गेली. काँग्रेसच्या राजकारणात गेलेले अभिनेते नेते म्हणून यशस्वी होत नाहीत हे इथे दिसून आले. कधी सुपरस्टार नसलेला पण ही मॅन म्हणून दीर्घकाळ कारकीर्द गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेद्र. राजस्थानातील बिकानेर मतदारसंघातून धर्मेद्रने २००४ ते २००९ या काळात भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधित्व केले. पण धर्मेद्रच्या स्टाईलने ना संसदेत, ना फ्री स्टाईल, ना फारसे काही करण्याची संधी, पण ज्याप्रमाणे मल्टिस्टार कास्ट चित्रपटात आपले अस्तित्व असेल तेवढय़ा दृष्यावर कसब दाखवण्याचे काम धर्मेद्रने इमाने इतबारे केले होते, तसे ते भाजपच्या मल्टिस्टार कास्टमध्ये दाखवले इतकेच त्याचे कर्तृत्व.शॉटगन म्हणून कडक डायलॉक फेकणारा शत्रुघ्न सिन्हा भाजपच्या राजकारणात चांगलाच गाजतो आहे. ना कोणती जबाबदारी, ना पद या घुसमटीत सध्या विरोधकांची भूमिका करत असला आणि चर्चेत असला तरी भाजपने त्याला प्रचारकापलीकडे काहीच दिलेले नाही. त्यामुळे ‘खामोश’ असे म्हणता येत नसल्यामुळे त्याची पंचाईत झालेली दिसते. तसे भाजपने त्याला भरपूर दिले होते. २००९ आणि २०१४ या दोन लोकसभा निवडणुकीत भाजपचा खासदार म्हणून पाटणासाहीब मतदारसंघातून तो विजयीही झाला. त्यापूर्वी वाजपेयी सरकारनेही त्याला अल्पकाळासाठी केंद्रीय मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाची जबाबदारी दिली. भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक खात्याची जबाबदारी दिली. तरीही बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागल्याने शत्रुघ्न सिन्हा कायम अस्वस्थच राहिला. अभिनेता म्हणून जशी सरासरी कामगिरी आहे, तशीच नेता म्हणूनही सरासरीपेक्षा कमी कामगिरी त्याची राहिली आहे. पण सतत आणि दीर्घकाळ या मैदानात टिकून आहे हे मात्र निश्चित. कदाचित आता पडद्याची दारे बंद झाल्यामुळे राजकीय मंच हीच कारकीर्द करण्याचे त्यांचे धोरण असावे.आवाजात मार खाल्लेला, पण संन्यास घेतला नसता, तर अमिताभ बच्चन यांच्या सुपरस्टारपदाला आव्हान उभे करू शकेल, असा अभिनेता म्हणजे विनोद खन्ना. भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ४ वेळा खासदार झाला. १९९८, १९९९, २००४ आणि २०१४ या चार निवडणुकीत गुरुदासपूरमधून विनोद खन्ना विजयी झाले. २००२ मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये पर्यटन आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री अशी दोन खातीही सांभाळली. २००९ ला मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. रुपेरी पडद्यावर जसे माफक यश आले, तसेच राजकारणात त्यांना सरासरी यश मिळाले.अभिनेते जेव्हा नेते बनले त्यामध्ये काँग्रेसमधून खासदार आणि मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्या सुनील दत्त वगळता अन्य कोणी खास कामगिरी केलेली नाही. राज बब्बर, नितीश भारद्वाज अशा अनेकांनी वेळोवेळी बाजी मारून नेली, पण त्यांची खास उल्लेखनीय अशी कामगिरी नाही. त्याचप्रमाणे अभिनेत्रींमध्येही शबाना आझमी वगळता कोणीही राजकारणाचा मनापासून आनंद घेतलेला दिसत नाही. भारतीय जनता पक्षातून हेमामालिनी राज्यसभेवर गेली. नंतर २०१४ च्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला, तर पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या. रुपेरी पडद्यावर ड्रीम गर्ल असलेली बसंती पडद्यावर गीता होती, तर राजकारणात मात्र सीताच राहिली. राज्यसभेवर गेलेल्या अभिनेत्रींमध्ये रेखा, जया बच्चन, जयाप्रदा या सगळ्या बीग बीच्या पडद्यावरील आणि पडद्यामागील नायिका होत्या. पण त्यांची कामगिरी काही खास म्हणून गौरवता येणारी नाही. अनेक अभिनेते नेते बनायला आले, पण पडद्यावरची त्यांची हुकमत वास्तवात कुठेच चालली नाही.त्यामुळे सर्वोच्च पदावर गेलेली माधुरी राजकारणात नशीब आजमावायला आली तरी फारसा फरक पडेल असे नाही. राजकारणात येण्याची तिची बकेट लिस्ट असली तरी पुण्यात तिला फारसा प्रतिसाद मिळणार नाही, हे तितकेच खरे. माधुरी पुण्यातून भाजपकडून लढणार, हे सांगितले गेले त्याला काहीही तसा अर्थ नाही. एकतर मागच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार येथून चांगल्या फरकाने विजयी झाला होता. दुसरी गोष्ट आयात केलेला कोणताही बाहेरचा उमेदवार पुण्यात विजयी झालेला नाही. मग ते जगन्नाथराव जोशी असोत वा विश्वजित कदम. अशा परिस्थितीत माधुरीने धकधक केले असले, तरी त्याचा फारसा फरक पडणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: