शनिवार, २१ मार्च, २०२०

फासावर लटकवले, पण कायद्याचा दुरुपयोग करणाºयांनाही समज द्या



२० मार्चचा दिवस उगवला, तो निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी दिल्याची बातमी घेऊन. फाशी दिली हे छानच झाले, उशीरच झाला त्याला. तरीही त्यावर समाधान व्यक्त करण्याइतकी परिस्थिती बिल्कूल नाही. याचे कारण समाधान, आनंद यशाचा व्यक्त करायचा असतो. निर्भयावर अत्याचार झाला, तिला आपण वाचवू शकलो नाही, समाजाला त्यामुळे खूप त्रास सोसावा लागला, पण याही परिस्थितीत त्या गुन्हेगारांना फासावर जाण्यापासून वाचवण्यासाठी १९ मार्चच्या रात्री १२ पर्यंत म्हणजे फासावर जाण्यापूर्वी पाच तासांपर्यंत वकील प्रयत्न करत होते. अशा प्रकारे कायद्याचा दुरुपयोग करणाºयांना समज देण्याची गरज आहे. गुन्हेगारांपेक्षा गुन्हेगारांना पाठीशी घालणारे घातक असतात. त्यांच्यावर कारवाई झाली, तरच समाधान व्यक्त करता येईल, नाही तर असे वकील आहेत, म्हणून त्यांच्या जीवावर गुन्हे करणाºयांची प्रवृत्ती वाढत जाईल. कायदा सांगतो की, शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध्याला फाशी होता कामा नये, पण यातील निरपराध्याला शिक्षा होऊ नये यासाठी प्रयत्न करणारे वकील या देशात नाहीत. गुन्हेगारांना वाचवणारे वकील जास्त आहेत, हेच या देशाचे दु:ख आहे. हे काही आज घडते आहे असे नाही. ४० वर्षांपूर्वी पुण्यात जोशी-अभ्यंकर खून खटला झाला होता. त्यात दहा जणांचे खून करणाºयांपैकी चांडाळ चौकडीतील एक जण होता, तो जक्कल. त्या जक्कलचे वकील होते, कोळसे पाटील. तेच नंतर न्यायाधीश झाले आणि आताही सामाजिक कार्यकर्ते म्हणून मिरवतात. अशा लोकांकडून न्यायाची अपेक्षा करता येईल का? म्हणूनच कायद्याचा दुरुपयोग करणाºयांना समज दिली, तर खºया अर्थाने निर्भयाचा न्याय पूर्ण झाला असे म्हणता येईल.सात वर्षांनंतर अखेर निर्भयाला न्याय मिळाला असे म्हणावे लागेल. २० मार्च २०२०, सकाळी साडेपाच वाजता ठरलेल्या वेळेवर चारही दोषींना फासावर लटकवण्यात आले. फाशीच्या आधीचा अर्धा तास महत्त्वाचा होता. अखेरच्या तीस मिनिटांतही दोषींनी स्वत:च्या बचावाचा बराच प्रयत्न केला. फाशी घरात पोहोचल्यावर चारही दोषींनी रडारड केली, बचावासाठी फाशी घरातील लादीवर लोळण्याचाही प्रयत्न केला, पण अखेर सात वर्षांनंतर निर्भयाला न्याय मिळाला आणि मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या चारही आरोपींना फासावर लटकवण्यात आले. गडाबडा लोळणाºयांना समजायला हवे होते की, सात वर्षांपूर्वी अशीच ती निर्भया दयेची याचना करत होती. अत्यंत निर्दयपणे तुम्ही तिचे लचके तोडलेत. तिचा निर्दयपणे खून केलात. तिचा सहकारी असाच दयेसाठी तडफडत होता, पण त्यालाही मारहाण केलीत. तेव्हा जराही माणुसकीची जाणीव न होणाºयांना दयेची याचना करण्याचा काय हक्क आहे?            तिहार तुरुंगात एकाच वेळी चार जणांना फासावर चढविण्याची ही पहिलीच घटना ठरली. चारही दोषींना एकाच वेळी फासावर लटकवण्यात आले. त्यासाठी तिहारच्या तुरुंगाच्या क्रमांक तीनच्या फाशी घरात चार हँगर बनवण्यात आले होते. यातील एक खटका (लिवर) मेरठहून आलेल्या जल्लाद पवनने खेचला, तर दुसरा जेलच्या स्टाफने. त्यापूर्वी पहाटे ३.१५ वाजता चौघांना उठवण्यात आले, पण त्यांच्यातील कोणीही झोपलं नव्हतं. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना आंघोळ करण्यास सांगण्यात आले. नंतर चहा मागवण्यात आला आणि अखेरची इच्छा विचारली. सेलच्या बाहेर आणण्याआधी चौघांनाही पांढरे कपडे घालण्यात आले. चौघांचे हात मागे बांधण्यात आले होते, यावेळी दोघा दोषींनी हात बांधण्यास विरोध करण्याचाही प्रयत्न केला. फाशी घरात घेऊन जात असताना एक दोषी प्रचंड घाबरला आणि तिथेच लादीवर लोळून राहिला. त्याने पुढे जाण्यास नकार दिला. अखेर बºयाच प्रयत्नांनंतर त्याला नेण्यात आले. नंतर चौघांचेही चेहरे काळ्या कपड्याने झाकण्यात आले. थोड्या वेळात जेल प्रशासनाकडून इशारा मिळताच पवन जल्लादने खटका खेचला आणि चारही दोषींच्या गळ्याभोवतीचा फास आवळला. हे वर्णन इथे मुद्दमा केले जात आहे. कारण कोणालाही अशा प्रकारचा गुन्हा करण्याचा विचार सुचता कामा नये. उशिरा मिळालेल्या या न्यायाने इथल्या न्यायव्यवस्थेची लक्तरे काढली असली, तरी न्याय मिळाला आहे. फक्त ज्यांच्यामुळे हा विलंब झाला, त्या वकिलांची सनद रद्द होणे गरजेचे आहे. जोपर्यंत गुन्हा सिद्ध झालेला नव्हता, तोपर्यंत वकिलांनी बचाव करणे मान्य करता येईल, पण गुन्हा सिद्ध झाला, गुन्हेगारांनी कबूल केला, सर्व पुरावे मिळाले, फास्ट ट्रॅक कोर्ट, हायकोर्ट, सर्वोच्च न्यायालय या सर्वांनी फाशी दिल्यानंतरही वकिलांनी या गुन्हेगारांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणे हे अक्षम्यच म्हणावे लागेल. हा कायद्याचा दुरुपयोग आहे.गुरुवारी रात्री उशिराही दोषींची फाशी टळावी यासाठी प्रयत्न झाले. ही या वकिलांची अक्षम्य चूक म्हणावी लागेल. संताप याच गोष्टीचा होता. म्हणजे बलात्काºयांपेक्षा अशा वकिलांनी कायद्याचा दुरुपयोग केलेला मानसिक बलात्कार भयानक आहे, असे म्हणावे लागेल, मात्र सुप्रीम कोर्टाने सगळ्या याचिका फेटाळून लावत फाशीचा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर ७ वर्षे, ३ महिने आणि ३ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ही फाशी दिली गेली.हे सगळे काल घडले आहे, असेच वाटते. १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील मुनीरका भागात ६ जणांनी एका पॅरामेडिकलला शिकणाºया विद्यार्थिनीवर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. निर्भयासोबत तिचा मित्रही होता, मात्र या दोघांनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही चालत्या बसमधून बाहेर फेकण्यात आलं. केवढं हे क्रौर्य होतं? १८ डिसेंबर २०१२ दिल्ली पोलिसांनी राम सिंह, मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ताला सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक केली. २१ डिसेंबर २०१२ रोजी दिल्ली पोलिसांनी एका अल्पवयीन आरोपीसह सहावा दोषी अक्षय याला अटक केली.२९ डिसेंबर २०१२ रोजी निर्भयावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र तिच्या प्रकृतीत काहीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे तिला सिंगापूरला पाठवण्यात आले. सिंगापूरला उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. देशभर संतापाची लाट उसळली होती. ३ जानेवारी २०१३ रोजी पोलिसांनी पाच जणांविरोधात सामूहिक बलात्कार, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि लूटमार या प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल केला.१७ जानेवारी २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने पाचही दोषींवर आरोप निश्चित केले, पण फास्ट ट्रॅकचा फारसा उपयोग झालाच नाही. विशेष म्हणजे ११ मार्च २०१३ रोजी तिहार तुरुंगात या प्रकरणातला आरोपी राम सिंह याने आत्महत्या केली. इतके महत्त्वाचे गुन्हेगार असताना जेलमध्ये तो आत्महत्या कसा काय करू शकतो? हेही एक गूढच होते. ३१ आॅक्टोबर २०१३ या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल बोर्डाने दोषी ठरवलं आणि त्याची रवानगी तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात करण्यात आली. ज्याला बलात्कार करायचे सुचते, तो कसला अल्पवयीन? पण कायदा आहे, त्याच्याविरोधात कोण बोलणार? कायद्याचा फक्त दुरुपयोग करायचा एवढेच.१० सप्टेंबर २०१३ रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने मुकेश, विनय, पवन आणि अक्षयला दोषी ठरवलं. त्यानंतर सात वर्षांनी फाशीची प्रक्रिया पूर्ण झाली. निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात आता चारही आरोपींना पहाटे साडेपाच वाजता फासावर लटकवण्यात येण्याआधी रात्रभर नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. फाशी टळावी म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत आरोपींनी प्रयत्न केले, अर्थात, हे त्यांचे डोके नव्हते. वकिलांनी त्यांचे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास दोषींची याचिका फेटाळून लावली. या निकालानंतर निर्भयाच्या दोषींना काही तासांतच फाशी देण्यात आली, मात्र हा निकाल लागल्यानंतर निर्भयाच्या आईने आनंद व्यक्त केला. यापुढे आपण देशातील इतर मुलींसाठी आपला संघर्ष कायम ठेवणार आहोत, असे निर्भयाच्या आईने स्पष्ट केले. यापेक्षा तिच्या हातात तरी काय आहे? आपल्या नशिबी जे दु:ख आले, ते इतरांच्या नशिबी येऊ नये, हीच अपेक्षा करणार, पण या दु:खाला ठळक करणारी प्रवृत्ती म्हणजे गुन्हेगारांना वाचवणाºया वकिलांची आहे. त्यांना समज देण्याची गरज आहे.अर्थात, गुरुवारी मध्यरात्री आरोपींचे वकील ए. पी. सिंग यांनाही न्यायालयाने झापलं आहे. तुम्ही जे काही दावे करत आहात आणि जी याचिका दाखल केली आहे, त्याला काहीही अर्थ नाही, असे न्यायालयाने म्हटले, तसेच आम्ही रात्रीचे १० वाजून गेले आहेत, तरी इथे बसलो आहोत. आता तुम्हाला आणखी काय सांगायचं आहे, ते सांगा, मात्र त्यात काही तरी तथ्य हवं, असं म्हणत न्यायालयाने याचिका करणाºया सिंग यांच्यावर ताशेरे ओढले, पण या सिंग वकिलाचे एवढे धाडस कसे काय असू शकते? गुन्हा सिद्ध झाला आहे, शिक्षा सुनावली आहे, तरीही ती टाळण्यासाठी प्रयत्न करणारी ही वृत्ती म्हणजेच दहशतवादाला जन्म देणारे आहेत. हेच देशद्रोही आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: