गुरुवार, ५ मार्च, २०२०

विद्या चव्हाण यांना ललिता पवार कोण बनवतेय?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या यांच्याविरुद्ध सुनेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्थात विद्या चव्हाण यांनी तो नाकारला आहे, पण महिलांच्या हक्कासाठी लढणाºया एका नेतृत्वाविरोधात असा गुन्हा नोंदवला जाणे हे धक्कादायकच आहे. विद्या चव्हाण यांच्यासह त्यांचे पती अभिजीत, मुलगा अजित, दुसरा मुलगा आनंद आणि आनंद यांची पत्नी शीतल, अशा एकूण पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पीडितेच्या तक्रारीनुसार, दुसºयांदाही मुलगीच झाल्याने तिचा छळ करण्यात येत होता. ही फारच गंभीर बाब आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या आमदार महिलेबाबत असा गुन्हा नोंद होणे ही चिंतेची बाब आहे. यातील खरे-खोटे नंतर पुढे येईलच, पण धूर असतो तिथे आग नाही, किमान ठिणगी तरी असू शकते. म्हणजे विद्या चव्हाण यांनी अगदी ललिता पवारस्टाइने छळ केला नसेलही, पण कुठे तरी भांड्याला भांडे हे लागले असणारच, त्याचा हा स्फोट झालेला आहे.यातील आमदार विद्याताई यांच्या सुनेने विलेपार्ले पोलीस ठाण्यात छळाबाबत तक्रार दिली होती. त्याआधारे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सुनेचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ४९८ अ, ३५४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही बाब राजकारण्यांचा बुरखा फाडणारी आहे की त्यांना बदनाम करण्यासाठी केलेले षडयंत्र आहे, हे तपासून पाहावे लागेल. दुसरी मुलगी झाल्याने चव्हाण कुटुंब पीडितेचा छळ करत होतं. पीडितेला आधीची मुलगी होती. त्यात दुसरीही मुलगीच झाली. मुदतीआधीच प्रसूती होऊन हे बाळ दगावलं. या प्रकारानंतर घरच्यांकडून माझा अधिकच छळ होऊ लागला, असे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर विद्या चव्हाण व कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून, त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.याबाबत खुलासा करताना विद्या चव्हाण म्हणतात की, ‘माझ्या सुनेचे विवाहबाह्य संबंध आहेत, हे कळल्यानंतर माझ्या मुलानं घटस्फोट घेण्याची तयारी सुरू करताच सुनेनं आरोप केले आहेत. कुणाच्या तरी चुकीच्या सल्ल्यामुळं ती असं वागत असून, न्यायालयात खरं-खोटं सिद्ध होईल,’ असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. हे फार भयानक आहे. म्हणजे विद्या चव्हाण या टीव्हीवरील विविध चर्चा, महाचर्चा, टॉक शो यावर तावातावाने भांडत असतात. आपला मुद्दा खरा ठरवण्यासाठी त्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करतात. महिलांच्या हक्काबाबत सजग असतात. असे असताना त्यांनी केवळ या चर्चेत आपण जिंकण्यासाठी सुनेला बदनाम करण्यासाठी विवाहबाह्य संबंध असल्याचे म्हटले नाही ना, याचाही विचार करावा लागेल.याबाबत आमदार चव्हाण म्हणाल्या, ‘१० डिसेंबर रोजी माझा मुलगा कामानिमित्तानं डेन्मार्कला कंपनीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होता. त्याच्या काही दिवसआधी त्याला सुनेच्या मोबाइलवर काही आक्षेपार्ह मेसेज आढळले. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचं त्यातून समोर आलं. त्याला धक्का बसला. त्यानं त्याबाबत आम्हाला सांगितलं. नंतर गौरीशी म्हणजे सुनेशी बोलून वेगळं होण्याचा त्याचा निर्णय सांगितला. आपल्या सगळ्या गोष्टी उघड झाल्याचं लक्षात येताच तिनं वकिलांचा सल्ला घेतला आणि आरोप सुरू केले. तिनं आमच्याविरोधात ३ कोटींचा दावाही केला आहे. अर्थात, ती खोटं बोलते आहे हे यथावकाश समोर येईल. प्रकरण न्यायालयात असल्यानं मी त्यावर अधिक बोलू शकत नाही.’‘गेली अनेक वर्षे विद्याताई महिलांसाठी काम करत आहेत. मुलगा-मुलगी असा भेद त्या करतील असे वाटत नाही. त्यामुळं मुलासाठी छळ होतोय हे आरोप न्यायालयात कितपत टिकतील हा प्रश्नच आहे, पण महिलांसाठी आंदोलने छेडणाºया एका नेतृत्वाविरोधात असा गुन्हा नोंदवला जाणे हे फारच विचित्र आहे.’साधारण २० वर्षांपूर्वी निरूपा रॉय या हिंदीतील अभिनेत्रीबाबत अशी बातमी आली होती. म्हणजे निरूपा रॉय ही आदर्श आई, सहनशील, अत्याचार सहन करणारी आई, सासू, सोशिक अशा भूमिका करणारी होती. अमिताभची आई आणि सात्विक रडत रडत लढणारी, संघर्ष करणारी आई तिने कायम रंगवली होती, पण तिच्यावर असेच आरोप आले होते की, ती सुनेचा छळ करते. त्यावेळी निरूपा रॉय की ललिता पवार असा प्रश्न निर्माण झाला होता. आजही पुन्हा तोच प्रश्न यातून विचारावासा वाटतो, पण विद्या चव्हाण यांना ललिता पवार बनवण्यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का, हेही पाहावे लागेल. ते विरोधकांचे आहे की स्वकियांचे हेही तपासावे लागेल, कारण गृह खाते हे त्यांच्याच पक्षाकडे असताना हा प्रकार होणे अपेक्षित नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: