गुरुवार, ५ मार्च, २०२०

पेपरफुटीचा फायदा खरंच होतो का?



महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता दहावीच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. राज्यभरातून १७ लाख ६५ हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत, मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दहावीचा मराठी विषयाचा पेपर फुटल्याची घटना घडली आहे. जळगावमधील मुक्ताई नगर तालुक्यातील कुºहाकाकोडा परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले. विशेष म्हणजे हा पेपर कॉपीबहाद्दरांच्या व्हॉट्सअपवरदेखील पोहचल्या असल्याचेही समोर आले आहे, पण तरीही एक प्रश्न आहे की पेपर फुटला तर त्याचा खरंच फायदा होतो का? पेपर फुटला तरी अभ्यासच नसेल तर तिथे काय लिहिणार आहे हे समजले पाहिजे ना? अगदी शंभरपैकी शंभर मार्कांचा पेपर काही तास किंवा काही मिनिटे अगोदर फुटल्याने त्यामुळे त्याचा फायदा कोण उठवू शकणार आहे?मुळातच ज्यांचा अभ्यास आहे त्यांना पेपर फुटण्याची गरज नाही. ज्यांचा अभ्यासच नाही ते पेपर फुटला तरी अचूक उत्तरे कशी लिहू शकतील? त्यामुळे पेपर फुटला म्हणून तो ज्याच्यापर्यंत गेला त्याला शंभरपैकी शंभर मार्क मिळतील असे समजणेच चुकीचे आहे.या धक्कादायक प्रकारामुळे शिक्षण विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, तर शिक्षण मंडळच्या सचिवांनी परीक्षेसंबंधी दिलेल्या आदेशांकडे केंद्र प्रमुखांनी सर्रास दुर्लक्ष केल्याचे यातून दिसून आले आहे. हा कारभार अंदाधुंद आहेच, पण त्यामुळे कुणाचा गुणात्मक विकास होऊन फायदा होईल असे समजण्याचे कारण नाही.मागील वर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या ६५ हजार ८५ ने वाढली आहे. गेल्या वर्षी दहावीचा निकाल घटल्याने यंदापासून पुन्हा विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात येणार आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ११ वाजेपर्यंत परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा केंद्रावर वेळेच्या अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याचेही सांगण्यात आले होते. राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत परीक्षेसंबंधीची माहिती दिली होती. मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यावेळी उपस्थित होते. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून ही परीक्षा घेतली जात आहे. इतका सगळा चोख बंदोबस्त असताना पेपर फुटला म्हणून कांगावा करणे हे बावळटपणाचे आहे. तसेच कोणाला तो व्हॉट्सअ‍ॅपवर आला म्हणजे लगेच तो त्याचा लाभ उठवेल, असेही समजण्याची गरज नाही. सर्व परीक्षा केंद्रांवरील तयारी सोमवारीच पूर्ण झाली होती, शिवाय परीक्षा केंद्रांवर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी एकूण २७३ भरारी पथकांसह बैठे पथकाची आणि विशेष महिला भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच २५ प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्र लाखबंद पाकीट पर्यवेक्षक परीक्षा कक्षातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊन उघडतील, असेही सांगितले गेले होते. असे असूनही पेपर फुटला हे आश्चर्य आहे. तथापि, त्याचा खरोखरच फायदा झाला का? जो पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला तोच पेपर विद्यार्थ्यांना मिळाला असेल असे नाही. पेपरचे तीन-तीन सेट असतात. त्यामुळे पेपर फुटलाच तरी त्यामुळे फार काही घडेल असे वाटत नाही.खरं तर जे असे उद्योग करतात त्यांनाच एक आव्हान दिले पाहिजे की, तुम्हाला अगोदर पेपर देतो, तो पुस्तकात बघून सोडवा. पुस्तकाबाहेरचा अभ्यासक्रम तर येणार नाही. तरीही पुस्तकातून उत्तरे शोधून लिहिण्याची परवानगी दिली तरी या लोकांना चांगले मार्क पडणार नाहीत. याचे कारण नेमके काय उत्तर कुठल्या धड्यातील आहे हे तरी त्यांना माहिती असले पाहिजे. आढातच नसेल तर पोहºयात कुठून येणार? दुसरी गोष्ट, हा पेपर फुटला तो मराठीचा होता. यात निबंध, पत्र आणि तत्सम असे अनेक विषय प्रश्न असतात. ते फुटल्याने काय फरक पडणार आहे? त्याचा अभ्यासच नसेल, तर पेपर फुटून तरी काय फायदा होणार? ज्याचा अभ्यास आहे तो कोणताही प्रश्न सोडवण्यास तयार आहे. त्यामुळे याचा जास्त विचार करण्याची गरज आहे असे वाटत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: