गुरुवार, ५ मार्च, २०२०

पण... पूर्ण केला..


इतिहासात लहानपणी एक वाक्य चांगलेच लक्षात राहिले होते. नंदकुळाचा नाश केल्याशिवाय मी शेंडीला गाठ मारणार नाही असा पण आर्य चाणक्यांनी केला होता. तो पण त्यांनी पूर्ण केला होता. तसाच पण महाराष्ट्रात नुकताच पूर्ण झाला. तो पण चाणक्यांचा नाही, तर डॉक्टर अमोल कोल्हे यांचा होता. जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन, हा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत केलेला पण रविवारी धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून पूर्ण केला. राजकारणात अनेकजण आपले विचार, वक्तव्ये पणाला लावतात. काही पूर्ण होतात, तर काही होत नाहीत.वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा असाच एक पण गाजला होता. शिवसेनाप्रमुख नेहमी दाढी करायचे. क्लीन शेव अशीच त्यांची प्रतिमा होती, पण छगन भुजबळ यांचा पराभव झाला नाही तर मी दाढी करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. येवल्यातून भुजबळ निवडून आले आणि बाळासाहेबांनी आपला पण पूर्ण केला. शेवटपर्यंत त्यांनी दाढी राखली होती. असे अनेक पण राजकारणात होताना दिसतात. कोणी चपला सोडतो आणि अनवाणी चालतो. कोणी दाढी राखतो आणि आपल्या नेत्यांप्रती सद्भावना प्रकट करतो, पण राजकारणात पण हे आवश्यक असतात.पण केल्याशिवाय यश मिळत नाही. जोपर्यंत दुर्योधन, दु:शासनाचा नाश केला जाणार नाही तोपर्यंत मी केस मोकळे सोडेन, असा पण द्रौपदीने केला होता. त्या मोकळ्या केसांकडे पाहूनच पांडवांना जिंकण्याची प्रेरणा मिळत होती. त्यामुळे विजय मिळवण्यासाठी पण हे करावेच लागतात. महाभारतातील पण हे एक वेगळे प्रकरण होऊ शकते. कारण त्यातील प्रत्येक पात्र हे पणानेच जन्माला आलेले आहे. तीच परंपरा या भारतातही आज घडताना दिसते आहे. अर्जुनाने सूर्यास्ताच्या आत जयद्रथाचा वध केला नाही, तर अग्निकाष्ठ भक्षण करण्याचा पण केला होता. त्यामुळे कृष्णालाच चमत्कार करून हा सूर्य आणि हा जयद्रथ असे दाखवावे लागले होते. त्यामुळे खासदार अमोल कोल्हेंच्या पणाच्या मदतीसाठी धनंजय मुंडे विजयी होण्यासाठी असेच काही कृष्णकृत्य झाले नाही ना ही शंकाही येऊ शकते, पण त्यांनी पण पूर्ण केला आहे. भीमाने महाभारतात दु:शासनाच्या छातीतील रक्त पिण्याचे आणि ते पांचालीच्या केसाला लावण्याचा पण केला होता. तो त्याने पूर्णही केला, पण हा महाभारतातील अत्यंत रौद्र आणि बीभत्स रस प्रकट करणारा पण होता. परंतु कोणताही पण हा दुसºयाचा, प्रतिस्पर्ध्याचा विनाश आणि स्वत:चे यश यासाठीच असतो. त्यासाठी काय वाटेल ते केले जाते. साक्षात कृष्णाने न धरी शस्त्र करी मी असा पण केला होता, पण तो पण मोडायला साक्षात भिष्माचार्यांनी भाग पाडले होते. भिष्माचार्य महाभारत युद्धात पहिले नऊ दिवस सुसाट होते आणि त्यांचा बंदोबस्त करणे शक्य नव्हते, तेव्हा एका मोक्याच्या क्षणी कृष्णाने सुदर्शन चक्र प्रकट केले आणि त्याचा धाक दाखवला होता, पण कृष्णाला हातात शस्त्र घ्यायला लावेन हा भिष्मांनी पण पूर्ण केला होता. त्यानंतरच त्यांच्या नाशासाठी जन्म घेतलेल्या शिखंडीचा पण पुढे आला. राजकारणात समोरच्या बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला संपवण्यासाठी असे अनेक शिखंडी उभे केले जातात. कधी त्यांनी बी टीम म्हटले जाते, कधी डमी उमेदवार म्हटले जाते, कधी मते विभाजनासाठी उभे केले जातात, पण ते सारे अशा पणातूनच पुढे आलेले असतात. त्यामुळे पण हा भारतीय संस्कृतीचाच, इतिहासाचाच राजकीय अविभाज्य भाग आहे. म्हणूनच ऐतिहासिक भूमिका करून शूर नेता अशी ख्याती प्राप्त केलेल्या खासदार डॉक्टर अभिनेते अमोल कोल्हे यांनी केलेल्या पणामध्येही नाट्यमयता होती.म्हणजे गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ खासदार अमोल कोल्हे यांनी फेटा बांधला नव्हता. छत्रपती शिवराय व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आपल्या अभिनयातून देशाच्या घराघरात पोचवलेल्या खासदार अमोल कोल्हे यांना फेटा शोभून दिसतो. त्यामुळेच हा पण पूर्ण केल्यानंतर धनंजय मुंडे यांनीही आपल्या भावना स्पष्ट शब्दांत व्यक्त केल्या. ते म्हणाले की, आज फेटा बांधताना मित्र कसा असावा याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे होय, मी आपणा सर्वांच्या साक्षीने सांगतो. त्यांना फेटा बांधून त्यांचा पण आज पूर्ण केला व त्यांचे व मला निवडून दिलेल्या तमाम परळीकरांचे आभार मानतो. अशा शब्दांत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने परळीत आल्यावर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी धनंजय मुंडे निवडून आल्याशिवाय फेटा बांधणार नाहीत असा पण केला होता. शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या निमित्ताने रविवारी हा पण पूर्ण झाला. आपला पण पूर्ण झाल्याने खासदार अमोल कोल्हेही आनंदी झाले आहेत. त्यांनीही आपल्या भावना विजयी मुद्रेने व्यक्त केल्या. ते म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी परळीत आलो, आपणाला आवाहन केले, धनंजय मुंडे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा पण मी केला, माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक कर्तबगार मंत्री आपण निवडून दिलात, त्यांच्या कर्तबगारीवर आम्हाला अभिमान आहे, असेही यावेळी बोलताना डॉ. अमोल कोल्हे म्हणाले. राजकारणात पण हे लागतातच, पण आजवर कोणी शेतकºयांच्या आत्महत्या येत्या पाच वर्षांत थांबवल्या नाहीत, तर राजकारण संन्यास घेईन, महागाई नियंत्रणात आणता आली नाही, तर राजीनामा देईन, सामान्यांच्या कोणत्याही प्रश्नासाठी कोणी पण केलेला नाही हे विसरून चालणार नाही. पण हे जिंकण्यासाठी आणि स्वत:साठी असतात. त्यात बºयाच वेळा अहंकार डोकावतो. आज गरज आहे ती समाजहितासाठी पण करण्याची. असे पण करणारे या देशात कोणी आहेत का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: