मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसी

 आज गणेश जयंती. माघ महिन्यातील गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. बर्‍याचवेळा गणेश जयंती आणि गणेशोत्सव यात गफलत केली जाते. आजकाल कोकणात, मुंबई, ठाणा आणि उपनगरात पार्थिव अशा गणेशाची स्थापना करून भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे मोठा उत्सव साजरा केला जातो. अर्थात याला शास्त्रीय आधार कितपत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे. पण गणेशाचे तत्व नेमके समजून घेणे महत्वाचे आहे.   मूलाधार चक्र आणि गणपती यांचं नातं पुराण काळापासून वेद आणि शास्त्रांनी कथन केलं आहे. आज श्री गणेश जयंती. माघ महिन्यातील विनायक शुद्ध चतुर्थी. श्रींच्या जन्माची कथा ही तशी सर्वश्रुत आहे. आज त्यांचं कार्य आणि एकंदर स्थान आणि वैश्विक महानता समजून घेणे आवश्यक आहे ‘ग’ हा बुद्धीचा ध्वनी आणि ‘ण’ हे विज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणजेच गणांचा अधिपती तो गणपती असे म्हणतात. नुसतंच विज्ञान कामास येत नाही. फक्त बुद्धी असूनही चालत नाही. तर प्रत्येक वेळी संस्करण करणारी शक्ती विज्ञानावर अंकुश ठेवून विज्ञान शक्तीला योग्य दिशा देणारी ती ‘बुद्धी’ असली पाहिजे. आपल्या संस्कृतीप्रमाणे जी मूळ देवता ती म्हणजे गणेश. मुळात प्रत्येक कार्यामध्ये जर या दोन वृत्ती किंवा गुणांचं नीट व्यवस्थापन केलं तर विघ्न येतच नाही. अशा रीतीने आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आद्यपूजेचा मान असलेली गणेश ही एक प्रभावी देवता आहे. यामुळेच गणेश देवताही समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक बनली आहे. साहजिकच याच्या सहचर जीवनसाथी पत्नीपदाला जाणा-या देवता या रिद्धी, सिद्धी आणि भारती अशा आहेत.   आपल्या अंत:करणातच वैश्विक ऊर्जा आहे, याचं स्मरण सदैव मानवाला राहावं हे गणेश उपासनेमधील गुपित आहे. अथर्वशीर्षात म्हटले आहे की, त्वमेव प्रत्यक्षम् तत्त्वम् असि.. म्हणजे, तेच आहे. परमब्रह्म हे साक्षात तुम्हीच आहात, अशी एक ओळ आपल्याला गणपती अथर्वशीर्षामध्ये आढळते. अखिल जीवनाच्या उगमाचा आद्य ध्वनी जो ओम् त्याच्या उगमाचा प्रतिनिधी म्हणजे भगवान गणेश. सर्व सामर्थ्यमंत्र, स्तोत्र-मंत्राची निर्मिती ही या ओम् ध्वनीतूनच होते.  सामर्थ्य आणि क्षमाशीलता, सामर्थ्य आणि सौंदर्य याचं संतुलन आपल्याला श्री गणेशांच्या ठायी आढळतं. म्हणूनच गणपती ‘अथर्वशीर्ष’मध्ये रचनाकारांनी त्वमेव सर्वम् खल्विदम् ब्रह्म असि असं वर्णन करून श्री गणेशाचं साक्षात ब्रह्म असणं, परमात्मा असणं अधोरेखित केलं आहे.   आपल्या या सूक्ष्म देहामध्ये ऊर्जा केंद्रं असतात. त्यांना हिदू आणि बौद्ध धर्मातील तंत्र आणि योग परंपरेमध्ये ‘चक्र’ ही संज्ञा आहे. अशा या सात चक्रांमधील सर्वात महत्त्वाचं चक्र म्हणजे मूलाधार चक्र. नावाप्रमाणेच हे चक्र म्हणजे शरीराचा मूळ आधार असते. मणक्यांच्या मुळाशी हे चक्र असतं. भगवान सूर्यनारायणाकडून या चक्राला ऊर्जा मिळते आणि याचा रंग लाल असतो. इडा, पिंगला आणि सुषुम्ना या तीन नाडयांच्या उत्पत्तीचं मूलाधार चक्र हे मूळ आहे. भगवान गणेश ही या मूलाधार चक्राची अधिष्ठात्री देवता आहे, असे शास्त्र सांगते. मूलाधार चक्राच्या चार लाल पाकळ्यांवर स्वर्णाक्षरांमध्ये ‘व’,‘श’,‘ष’,‘स’ हे चार संस्कृत ध्वनी लिहिलेले असतात. धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार पुरुषार्थाचंदेखील त्या प्रतिनिधित्व करतात. चारच पाकळ्यांनी युक्त हे कमळ म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे.  परमात्म्याची प्रधान शक्ती ही आदिशक्ती आहे. या आदिशक्तीची निर्मिती म्हणजे भगवान श्री गणेश. स्त्री-पुरुष तत्त्वाच्या पलीकडे ही आद्यनिर्मिती आहे. या प्रधान शक्तीची निर्मिती असल्यामुळे त्या आदिमातेबरोबर तो सदैव आहे. आणि त्यामुळेच मानवाच्या प्रत्येक चक्रामध्ये त्याचं वास्तव्य आहे. निर्मितीतील पावित्र्य, निरागसता, निष्पाप वृत्ती आणि शुद्धता यांचं तो प्रतीक आहे. गौरी प्रणयाय, गौरी प्रवणाय, गौर भावाय धिमही.. असं म्हणून आपण त्या आद्य दैवताचं आवाहन करतो. तोच आपणा सर्वाचा आद्यपूजेचा मानधारी परमप्रिय श्रीगणेश आहे. भगवान शंकर हे साक्षात परमेश्वर तर श्रीगणेश हा त्यांचा पुत्र. स्वत: देवत्वाला जाण्यासाठी आतुर असलेल्या जीवाचं ते प्रतीक आहेत. भगवान गणेशांच्या अंग-प्रत्यंगांमध्ये ही प्रतीकात्मकता दडलेली आहे. हत्तीचं मोठं शीर  व्यापक विचार करावा यासाठी आहे. मोठे कान हे जास्त ऐकावं यासाठी आहेत. बारीक डोळे हे एकाग्रता साधण्यासाठी आहेत. छोटं तोंड हे कमी बोलण्याचा सल्ला देते. वरद हस्त म्हणजे आध्यात्मिक मार्गावर पुढे जाण्यासाठी दिलेलं अभय आणि आश्वासन आहे. सोंड ही श्वासावाटे येणार्‍या प्राणशक्तीचा प्रभावी वापर करण्यासाठी आहे. एकच सुळा दात म्हणजे चांगलं ठेवा, आणि वाईट त्या सर्वाचा त्याग करा हे सांगतो आहे. मोदक हे साधनेचं फलित आहे.विशाल पोट हे जगातील सगळं भलं-बुरं पचवण्याची क्षमता तुमच्यात आहे हे सांगते. वाहन उंदीर म्हणजे लालसा, अभिलाषा यांचं प्रतीक आहे. लालसा, अभिलाषा यांच्यावर स्वार होऊन ताबा ठेवला तरच तुम्ही जीवनाचा प्रवास करू शकता. जीवनाच्या सर्वच परिघांना निकटपणे स्पर्श करणारा असा हा देवाधिदेव श्रीगणपती.. म्हणूनच सर्व धर्माच्या परिसीमा पार करून हे दैवत आज जागतिक बनलं आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: