मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६

व्हॅलेंटाईन रूजला या देशात

  •   आज बहुचर्चित व्हॅलेंटाइन डे आहे. आता हा सण रूळला आपल्यात. सुरवातीला विरोध झाला, टिका झाला पण हळूहळू तो अंगवळणी पडला. चायनीज पदार्थांना नावे ठेवणारे आणि नूडल्सना दानवी म्हणून किळसवाणी तोंडे करणारी जशी चायनीज डीशवर ताव मारू लागले आहेत. तसाच आता व्हॅलेंटाईन डे अंगवळणी पडला आहे.
  •  या दिवसाची तयारी आठवडा-दहा दिवस आधीपासूनच सुरू होते. तशी ती यंदाही झाली. दुकानाच्या शोकेसेसमध्ये लाल, गुलाबी रंगाची फुग्याची हृदये झळकू लागली आहेत. मोठमोठे आणि आकर्षक ग्रीटिंग कार्डस्ही लक्ष वेधून घेत आहेत. वेगवेगळ्या उंची हॉटेलांच्या तितक्याच फॅन्सी रेस्तरॉंमध्ये जागांचे बुकिंग केले जात आहे. 
  •     आता तर व्हॅलेंटाईन डे ची सुरूवात आठवडाभर अगोदर वेगवेगळे सण साजरे करून केली जाते. म्हणजे नवरात्रात जसे नउ रंगाचे कपडे साड्या घातल्या जातात तसे अगोदर आठवडाभर हे दिवस साजरे होत आहेत. कधी चॉकलेट डे, कधी रोझ डे, कधी हग डे वगैरे. या हग डे दिवशी शाळा कॉलेजातून मुले मुली हागत असतात ( मिठ्या मारत असतात) तेव्हा गम्मत वाटते. म्हणजे हस्तांदोलनापासून सुरू झालेली विलायती संस्कृती मिठ्या मारेपर्यं पोहोचली आहे. 
  •    या दरम्यान गेल्या आठवड्यात तरुणींच्या नव्या आकर्षक डिझाईन्सच्या कपड्यांची रेलचेल आहे. मुंबई सारख्या महानगरात तर हा सण म्हणजे पर्वणीच असते. तिथले डिस्को थेकचे बुकिंगही दोन तीन दिवसांपूर्वीच संपले आले. म्हणजे आजच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या स्वागतासाठी सगळेजण किती सज्ज झालेले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. 
  •     त्यामुळे अशा उत्साहात मिठाचा खडा टाकून सारे दूधच नासवण्यात कमालीचा आंबट आनंद घेण्याची सवय काही मंडळींना जात्याच असते. ते लोक याला विरोध केल्याशिवाय रहात नाहीत. होवू देत ना आमची संस्कृती नष्ट, कोणाला काय पडले आहे? कोणीतरी चावटपणे सांगतो की आजचा दिवस  म्हणे मातृदिन म्हणून साजरा करा. काही रसिकता, प्रेम आहे की नाही? आणि आईबापाचे प्रेम हे काय एक दिवस गौरवण्याइतके कमी आहे काय?       ‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेमिकांचा दिवस आहे. आपले प्रेम व्यक्त करून ते साजरे करण्याची ही एक अधिकृत आणि आधुनीक प्रकारची संधी आहे. त्यामुळेच जगभरच लैला-मजनू, रोमियो-ज्युलिएट आणि बाजीराव-मस्तानी आजच्या दिवशी जर आपले प्रेम व्यक्त करू इच्छित असतील तर कुणाला पोटशूळ जडण्याची खरे तर काही गरज नाही. पण तरीही काही स्वयंघोषित संस्कृतीरक्षकांना अचानक हा विकार जडतोच आणि खोकल्याची उबळ जितकी दाबावी तितकीच अधिक उफाळून वर येते तसा प्रकार घडतो. काही वषार्र्ंपूर्वी शिवसेनेला आपले हिंदुत्व आठवायचे आणि आर्चिजसारख्या शोरूमवर हल्ले करायचे प्रकार व्हायचे. पण आता त्यांचा उत्साह थंडावला आहे. त्यांना बहुदा भाजपशी प्रेमविवाह आणि राष्ट्रवादीबरोबर लफडे केल्यामुळे हा दिवस आवडू लागला असावा.
  •  पण काही असो, या संस्कृतीरक्षकांचे म्हणणे असे की, ‘व्हॅलेंटाईन डे’ हा काही भारतीय संस्कृतीचा सण नाही. मग तो आपण का व कसा साजरा करायचा? युरोपातल्या कुणा एका सेंट ‘व्हॅलेंटाईन’च्या स्मृत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. हा संत म्हणे प्रेमवेड्यांची व ‘चुपके चुपके’ प्रेम करून नंतर विरहाचे उष्म उसासे टाकणार्‍यांचे विवाह लावून देई. भारतात असा कुणी ‘व्हॅलेंटाईन’ जन्माला आला नाही. त्यामुळे त्याचे स्मरण करण्याचे आपल्याला काय कारण?
  • मग तसा विचार केला तर येशू ख्रिस्त कुठे भारतात जन्माला आला? त्याच्या धर्माचा प्रसार भारतात सुरू झाला तो पंधराव्या शतकात वास्को द गामा भारतात आला त्यानंतरच. त्याला सुळावर चढवण्याचे पापकृत्यही कुणा भारतीयाने केले नाही. हे जर खरे असेल तर दर २५ डिसेंबरला आपण ख्रिसमस म्हणजेच नाताळ का साजरा करावा? १ जानेवारी हे भारतीय संस्कृतीचे नववर्ष नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर हा दिवस वर्षाखेरचा नाही. तरीही आपण ३१ डिसेंबरला ‘न्यू इयर पार्टी’ न चुकता का साजरी करतो?
  •  आपल्याला ‘व्हॅलेंटाईन डे’ला नक्की कोणते रूप अभिप्रेत आहे? प्रेमाचे एक रूप म्हणजे माया. दुसरे ममता आणि आणखी एक रूप म्हणजे वासना. यातील वासनेमध्येही प्रेमाचा एक अंश दडलेला असतोच. पण ‘व्हॅलेंटाईन डे’ला तो अभिप्रेत नाही. प्रेम ही अत्यंत तरल आणि शब्दांच्या तुरुंगात बंदी न होऊ शकणारी संकल्पना आहे. तरुणीचे तरुणावर वा तरुणाचे तरुणीवर खरेच प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी हा एकच दिवस कशासाठी? ते सदैव व्यक्त होतच राहायला हवे. सच्चे प्रेम हे असे स्थळ, काळाची वाट न पाहता व भीती न बाळगता समुद्राच्या भेटीसाठी डोंगर कड्यांतून नदी सुसाट वाहत सुटावी व समुद्राच्या विशाल जलाशयात तिने आपले अस्तित्वही मिटवून टाकावे तसे असते. त्याला कोणतेही बंधारे फार काळ अडवू शकत नाहीत. ‘व्हॅलेंटाईन डे’ला अपेक्षित प्रेम हे असे अनावर असावे. ‘व्हॅलेंटाईन डे’ असो वा नसो, त्यासाठी कुणी नाके मुरडो वा कुणी प्रेमाची आलिंगने देवोत, एक नक्की ‘प्रेम’ अमर असते. कारण प्रेम भावना शाश्‍वत व अमरही आहे. प्रेमानेच जग जिंकता येते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: