- अमेरिकेहून परतल्यावर छगन भुजबळ यांनी आपले शक्तीप्रदर्शन करण्याचा विमानतळावरच प्रयत्न केला. यावेळी सत्य समोर येईलच अशी भाषा भुजबळांनी केली असली, तरी त्यातले नेमके सत्य काय याची उत्सुकता आता आहे. कारण शरद पवार नेहमी आपल्या भाषणात म्हणत की कॉंग्रेसचा पराभव कॉंग्रेसच करू शकतो बाकी कोणी नाही. कॉंग्रेसला, कॉंग्रेस नेत्यांना खरे शत्रू अंतर्गतच असतात. त्यामुळे कॉंग्रेसच्याच पोटी जन्माला आलेल्या राष्ट्रवादीचे स्वरूप फारसे वेगळे नाही. गेल्यावर्षी चिक्की प्रकरण गाजत असताना त्यावर चर्चा करताना जितेंद्र आव्हाडांनी तेलगीचा विषय उकरून काढला होता. राष्ट्रवादीचा नवा चेहरा म्हणजे जीतेंद्र आव्हाड आहेत. त्यामुळे भुजबळांना विरोधक किंवा भाजपवाले अडचणीत आणत नाहीत तर राष्ट्रवादीचेच लोक अडचणीत आणत आहेत.
- े भुजबळांना कोण अडचणीत आणतोय, याचा उलगडा आव्हाडांच्या कृतीवरून होऊ शकतो. आज आपल्या पाठीशी शरद पवार खंबीरपणे उभे असल्याचा हवाला भुजबळ देत आहेत. पण चौकशीचे शुक्लकाष्ट पाठीशी कोणी लावले, त्या नेत्याचे नाव घ्यायला कोणीच तयार नाही हे गौडबंगाल आहे. कितीही झटकले तरी भुजबळांच्या मागे लागलेले हे प्रकरण सोपे नाही. ते सहजपणे बिल्कूल संपणारे नाही. विधानसभा निवडणुकीत गाजलेल्या अन्य प्रकरणांकडे दुर्लक्ष होत असताना, भुजबळ कुटुंबियांवरच्या कारवाईला मात्र आता गती मिळालेली आहे. त्यांच्या पुतण्याला अटकही झाली. कोठडीतही डांबले गेले आहे.
- हे पाहिल्यावर लक्षात येते की राजकीय सूडबुद्धीची भाषा त्यांना आज सुचते आहे. पण सत्तेत असताना घेतलेल्या अनेक निर्णयांची फ़ेरतपासणी त्यांनीही करायला हरकत नाही. भुजबळ यांनी गृहमंत्री होताच कोणत्या न्यायबुद्धीने बाळासाहेब ठाकरे यांना न्यायालयात आणण्याचा निर्णय घेतला होता? अर्थात
- कायद्याच्या अंमलाचे नाटक करणार्या भुजबळांचे नाक तेव्हा कोर्टातच कापले गेले होते ते वेगळे. शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे यांना हात लावण्याची हिंमत अन्य कोणाला झाली नाही, ते धाडस आपण गृहमंत्री होताच करून दाखवले, अशी फुशारकी दाखवण्याच्या नादात भुजबळांनी अटकेचे सत्र काढले होते. भुजबळांनी आटापिटा करूनही बाळासाहेबांवरचा खटला न्यायाधीशांनी विनाविलंब काढून टाकला. त्यामुळे केवळ छगन भुजबळच नव्हे तर तेव्हाच्या आघाडी सरकारचे नाक कापले गेले होते. भुजबळांच्या या कारवाईला कोर्टानेच राजकीय सुडबुद्धीची कारवाई ठरवले होते. त्यामुळे अशा अनुभवातून गेलेल्या भुजबळांच्या तोंडी आता तेच शब्द बिल्कूल शोभत नाहीत. ज्याचा अवलंब आपणच यापुर्वी केला आहे, त्याला आज सुडबुद्धी ठरवणे कितपत योग्य आहे? भुजबळांनी तसे वागले तर योग्य आणि तोच प्रकार त्यांच्याबाबत झाल्यावर ती सूडबुद्धी कशी?
- विशेष म्हणजे भुजबळ यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातल्या तटकरे, अजित पवार अशा अन्य सहकार्यांवर यापेक्षाही गंभीर आरोप असताना ते मुक्त आहेत. पण भुजबळ कुटुंबिय पोलिसांच्या कचाट्यात सापडण्याचे धागेदोरे शोधले तर, यातून सहीसलामत निसटण्याचा मार्ग निघू शकेल.मग भुजबळ यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? आदर्श वा सिंचन घोटाळ्यातून अन्य नेते निसटले. कारण त्यांना विश्वासू साथीदारांनी दगा दिलेला नाही. भुजबळांनी आपल्या गोटातील कोणा विश्वासू व्यक्तींनी आपल्याला चव्हाट्यावर आणले याचा शोध घेतला पाहिजे.
- काही वर्षापूर्वी छगन भुजबळ यांच्या बांद्रा पश्चिम येथील शिक्षण संस्थेचा व्यवहार व व्यवस्था यांच्या संबंधात धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी गेल्या होत्या. एका सार्वजनिक संस्थेची मालमत्ता व साधने भुजबळ कुटुंबिय खाजगी लाभासाठी वापरतात, अशी तक्रार होती. त्यावेळी त्यांचेच सरकार असताना हे घडले होते. याचा नेमका अर्थ भुजबळांनी समजून घेतला पाहिजे. संस्थेच्या विश्वासू व्यक्तिनेच ती तक्रार केलेली होती. त्याला प्रोत्साहन नेमके कोणाचे होते याचा शोध भुजबळांनी घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. भुजबळ हे कुठल्याही सभेत बाजी मारू शकतील. त्यांच्या वाकचातुर्याने उपस्थितांची मत परिवर्तन करणे त्यांना शक्य आहे. पण कायदा आणि कोर्टाच्या कामात भुरळ घालणारी त्यांची वक्तव्ये उपयोगाची नाहीत. त्यात कुठेही गफ़लत झाली, तर उलटणार्या शस्त्राप्रमाणे तेच शब्द आपल्यालाच घायाळ करतात, हे भुजबळ यांनी ध्यानात घेतले पाहिजे. भुजबळांची अडचण ही आहे की त्यांच्याच सीएने त्यांच्या विरोधात मत नोंदवले आहे. ज्यांच्यावर आजतागायत घोटाळ्याचे अनेक आरोप झालेत त्यांच्या कुणा सीएने कधी विरोधातली माहिती दिलेली नाही, की पुढे आणलेली नाही. पण भुजबळांचे गणित इथे चुकले आहे. आज भुजबळांची गोची अशी आहे, की त्यांनाही आपल्या आर्थिक व्यवहारात कुठे खाचाखोचा आहेत, याची माहिती नाही. कुठून पैसे आले व त्यांना कोणते नाव देवून कुठे गुंतवले वा फ़िरवले, त्याच्या जंत्रीचा हा मामला आहे. विविध तपास यंत्रणा एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहेत, तो प्रश्न आहे कुठल्या मार्गाने पैसा आला व कुठून कुठे कसा फ़िरत गेला. भुजबळांना स्वत:ची माणसे सांभाळता आली नाहीत त्याचा हा फटका आहे.
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१६
आपले कोण भुजबळांना समजले नाही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा