- छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची आज जयंती. हा दिवस तमाम मराठी माणसाला अंगात चैतन्य निर्माण करणारा असा दिवस. छत्रपती शिवाजी महाराज असे म्हटले तरी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात एवढी ताकद या व्यक्तिमत्वात आहे. त्यांचे स्मरण आपल्याला रोजच होत असले तरी आजच्या दिवशी ते होणे हा वेगळा अनुभव असतो.
- १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या सर्वाच्च उत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्या मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले. भारताच्या या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजी महाराजांनी उभे केले. मगच १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
- महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा शिवजयंती म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
- शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले होते. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिकेसारख्या सैन्याला व्हीएतनामने जेरीस आणले. छत्रपतींचे हे तंत्र अभ्यासून महासत्तेला वाकवण्याचे काम व्हीएतनामने केले होते. ही गोष्ट आजच्या राज्यकर्त्यांनी लक्षात घेतली पाहिजेत. छत्रपतींच्या कार्याचा थोडा जरी अभ्यास आजच्या राज्यकर्त्यांनी केला तरी ते उत्तम राज्यकर्ते म्हणून नावलौकीक मिळवतील. भारतावर होणारे २६/११ सारखे हल्ले थांबवण्यासाठी सरकारने छत्रपती शिवरायांची कार्यप्रणाली अभ्यासणे गरजेचे आहे.
- पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना जिजाबाईंनी स्फूर्ति दिली.
- युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन शिवाजी महाराजांना शहाजीराजांकडून मिळाले होते. दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून मिळाले होते. तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले होते. उत्तम राजाला, महान व्यक्तिंना एकच गुरू कधीच नसतो. त्याप्रमाणे अनेक चांगल्या गुरूंकडून महाराजांनी विविध तंत्र आत्मसात केली म्हणून ते महान झाले. जिजाबाई यांनी बाल शिवाजीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण दिले. शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूड इत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते. छत्रपती शिवाजी राजांच्या सैन्यातील मावळ्यांनी राजांच्या सोबत स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोर्याला मावळ आणि तिथल्या सैनिकांना मावळे म्हणतात. कान्होजी जेधे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, नेताजी पालकर ,बाजी पासलकर
- जिवा महाला, तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते हे महाराजांचे प्रमुख मावळे होते. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणागड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले. प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ही राजमुद्रा महाराजांनी निर्माण केली. ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि सार्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. ते महाराजांनी खरे करून दाखवले. म्हणूनच आजच्या राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच मार्गदर्शक असे आहे.
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६
छत्रपती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा