- हा आठवडा गाजला तो तुलसी रामायणानं. अर्थात स्मृती इराणी यांच्या संसदेतील जोरदार भाषणानं. पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदींनी स्मृती इराणी यांना पराभव पत्करावा लागला असला तरी मंत्रिपद का दिलं होतं याचं उत्तर सर्वांना दीड वर्षांनी मिळाले. मोदी सरकारवर विनाकारण वार करणार्यांचा वार परतवणारी ढाल बनण्याचे आणि दुसर्या हाताने जीभेची तलवार चालवून विरोधकांना गार करण्याचे काम या तुलसी रामायणात बुधवारी घडले.
- तसं पाहीलं तर राजकारणाची खरी शक्ती ही जनमानसातील प्रतिमांमध्ये सामावलेली असते. मोदींचा दीड वर्षांपूर्वीचा देदिप्यमान विजय हा जनमानसातील प्रतिमेमुळे मिळाला होता. भाजपमध्ये एवढी जोरदार प्रतिमा निर्माण करण्याचे आजवर कोणाला जमले नाही. त्यामुळेच वाजपेयींना काठावर पास व्हावे लागले तर अडवाणींना सत्तेपासून लांब रहावे लागले. पण जिंकण्यासाठी निवडणुकीत उतरायचं असतं आणि वारही जोरदार करायचा असतो हे मोदींनी शिकवलं. त्यामुळे त्यांनी आपल्या टीममध्येही चांगले वारकरी घेतले. त्यापैकी एक वारकरी म्हणजे स्मृती इराणी आहेत हे त्यांनी दाखवून दिले.
- सामान्य माणसाच्या मनात ज्या प्रतिमा किंवा समजुती ठसवलेल्या असतात, त्यावर काही लोक आपले हेतू साध्य करून घेतात, त्याला राजकारण म्हणतात. म्हणूनच आपल्या विरोधकाला खलनायक म्हणून पेश करायचे व त्याचाशी झुंजणारा म्हणून आपण नायक असल्याचे लोकांना पटवायचे. बुधवारी संसदेत मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी कशी काय बाजी मारली, ती यावरून सहज लक्षात येऊ शकेल. तसेच स्मृती इराणींना एवढे बोलायला, त्यांना तशी संधी देण्यातला विरोधकांचा मूर्खपणा लक्षात येऊ शकेल.
- वीस महिन्यांपुर्वी सत्तांतर होऊन मोदी सरकारचा शपथविधी पार पडला. त्यात पहिल्या दिवसापासून विरोधक व टिकाकारांचे लक्ष्य झालेला एकच मंत्री व्यक्ती होती. ती म्हणजे स्मृती इराणी. देशातील शिक्षण व बुद्धीमत्तेचा विकास करण्याचे काम ज्याच्या हाती आहे, त्याचे स्वत:चे शिक्षण किती, लायकी काय, असे प्रश्न विचारले गेले. इराणी यांचे शिक्षण त्यातली पात्रता किंवा प्रमाणपत्रे यांचीही छाननी करण्यात आली. एकूणच कोणा बुद्दू व्यक्तीला महत्वाचे खाते दिले गेले आणि देशातील शिक्षणाची मोदींनी वाट लावली असे चित्र विरोधकांनी उभे करण्याचा प्रयत्न केला. अर्थात त्यात अनेक भाजपचे असंतुष्टही असतील यात शंकाच नाही. पण संसदेत स्मृती इराणींना बदनाम करण्याची एकही संधी सोडली जात नव्हती. त्यांची प्रतिमा अधिकच मलिन करण्याचा सपाटा लावला गेला होता.
- प्रत्येकवेळी अभिनय सोडून नेता झालेली अभिनेत्री, असा त्यांचा हेटाळणीयुक्त उल्लेख माध्यमातून जाणिवपूर्वक चालला होता. सोनिया गांधी राजकारणात येण्यापुर्वी गृहीणी होत्या आणि पुर्वायुष्यात बारगर्ल म्हणून त्यांनी काम केलेले होते. पण त्यांचा तसा उल्लेख कधी झाला नाही. मात्र स्मृतीच्या बाबतीत अभिनेत्री ही बिरूदावली कायम होती. त्याचे कारण नामोहरम करणे हेच होते.
- मोदी इराणींना डिवचण्यासाठी राहुल गांधी यांनी नेहमीप्रमाणे संघाचा अजेंडा विद्यापीठात लादला जातोय, अशी शेरेबाजी राजरोस करत होते. यावर स्मृती इराणी आणि मोदी सरकार खुलासे देऊ शकत होते. पण त्याला प्रसिद्धीच द्यायची नाही, असा पुरोगामी म्हणवणार्या माध्यमांचा प्रयत्न होता. त्यामुळे स्मृती वा मोदी सरकार यांना बदनाम करण्यात विरोधक यशस्वी झालेले होते. सत्य लोकांसमोर आल्यास हेच आरोप टिकणारे नाहीत, हे विरोधकांना माहिती नसावे. त्यामुळेच संसदीय चर्चेतून तसेच थेट प्रक्षेपणातून स्मृती इराणींनी सत्य जगापुढे मांडण्यात विरोधकांच्या तंगड्या गळ्यात अडकवल्या आणि फार मोठा धक्का दिला.
- वास्तविक पाहता सरकारची कोंडी करण्यासाठी अन्य बरेच विषय होते. पण त्याचे तारतम्य विरोधकांना राहिले नाही, अत्यंत अपरिपक्व आणि कमजोर असलेला विरोधी पक्ष आपली लायकी दाखवून बसला. परंतु आपल्यावरचे सर्व आरोप धुवून काढण्याची फार मोठी संधी स्मृती इराणी यांना यामुळे बुधवारी मिळाली होती. त्या भूमिकेचे त्यांनी सोने केले.
- संसदेच्या पहिल्याच बैठकीत विद्यापीठाच्या विषयावर चर्चेचा आग्रह धरला गेला आणि स्मृती इराणींना वीस महिन्यांचा हिशोब चुकता करण्याची संधी मिळाली. आपल्यावरचे किंवा सरकारवर झालेले सर्व आरोप नुसते बिनबुडाचे नाहीत, तर ते आधीच्या कॉग्रेस सरकारचीच पापे असल्याचे पितळ उघडे पाडण्याची ही संधी स्मृतीनी पुरेपुर साधली आणि कॉग्रेसला सभागृहातून पळ काढण्याची वेळ आली. सतत मोदींना सवाल करणारे राहुल गांधी आणि कॉग्रेसला आपलीच पापे ऐकून घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. स्वत: चर्चा मागितलेली असूनही सभात्यागाची पळवाट शोधायला लागली. यासारखी कॉंग्रेसवरची आणि राहुल गांधीवरची नामुष्की दुसरी कोणती असेल? त्यामुळे राहुल गांधींचे हे पलायन म्हणजे जनतेच्या दरबारातून पुढच्या पाच वर्षांसाठी नाकारल्याचे लक्षण आहे. स्मृती इराणींच्या भडीमाराला सामोरे जाण्याची हिंमत विरोधकात राहिली नव्हती. ज्या अन्याय अत्याचारासाठी भाजपावर संघावर आरोप झाले, ते करणारे अधिकारी, कुलगुरू कॉग्रेसच्याच राजवटीत नेमलेले आहेत आणि कित्येक घटना तर युपीए कॉग्रेसची सत्ता असतानाच झालेल्या आहेत, त्याची जंत्री स्मृतीनी पेश केली. कॉंग्रेसच्या गळ्यात तंगड्या अडकवून मोकळ्या झाल्या आणि त्याची चर्चा संपूर्ण चार पाच दिवस देशभर होत आहे, प्रसारमाध्यम, सोशल मिडीयावर होत आहे. ह्या चर्चेचा आग्रह विरोधकांनी धरला नसता तर ही पाळी आली नसती. त्यामुळे विरोधकांना निष्प्रभ करण्यात भाजप पहिल्या आठवड्यात यशस्वी झाला हे मान्य करावे लागेल.
रविवार, २८ फेब्रुवारी, २०१६
तंगड्या गळ्यात अडकवल्या
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा