सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

खलनायकातील नायक

  • ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे सोमवारी पहाटे निधन झाले आणि रंगभूमी, मराठी हिंदी चित्रपटसृष्टी एका चतुरस्त्र अभिनेत्याला मुकले. सदाशिव अमरापूरकर यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. चित्रपटात किंवा नाटकात ज्याप्रमाणे विविध भूमिका करण्याची इच्छा सच्च्या कलावंताला असते तशीच वास्तव जीवनातही वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत याचे भान अमरापूरकर यांना होते. त्यामुळेच केवळ रंगकर्मी, चित्रपट अभिनेता ही त्यांची ओळख नव्हती तर एक सच्चा समाजसेवक, चळवळीचा कार्यकर्ता ही अमरापूरकर यांची ओळख होती.
  • शेतकरी, प्रकल्पग्रस्तांच्या वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेणारा कार्यकर्ता ही सदाशिव अमरापूरकर यांची वास्तव जीवनातील भूमिका होती. अन्यायाविरोधात, जातीपातीच्या संघर्षात स्वत:ला झोकून देवून समाजातील उणिवेवर बोट ठेवण्याचे आणि त्याप्रकरणी गलथान कारभार करणार्‍या सरकारवर टिका करण्याचे काम अमरापूरकर यांनी केले होते. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबरीने अंधश्रद्धा निर्मूलनाचे कामही अमरापूरकर यांनी व्रत म्हणून स्विकारले होते. त्यामुळे जेवढा त्यांचा नाटक, चित्रपट हा प्रपंच मोठा आहे तेवढाच समाजकार्याचा व्यापही त्यांनी वाढवला होता. हे सामाजिक भान या कलाकाराने सांभाळले होते म्हणून तो महान कलाकार, मोठा माणूस होता. असा मोठा माणूस गेल्याने अर्थातच सामाजिक कार्याची आणि चित्रपटसृष्टी, रंगभूमीची फार मोठी हानी झालेली आहे.
  • चळवळीतून आलेला कलाकार असल्यामुळे आणि रंगभूमी हा पाया असल्यामुळे मिळालेल्या भूमिकेला जास्तीत जास्त न्याय द्यायचा आणि ती वास्तवतेच्या जवळ नेऊन ठेवायची हे तत्त्व अमरापूरकर यांनी आपल्या भूमिकांबाबत पाळले होते. त्यामुळेच त्या व्यक्तिरेखा आपण कुठेतरी जवळून पाहिल्या आहेत, आपल्या अवतीभवतीच वावरत आहेत हे प्रेक्षकांना  जाणवायचे. कलात्मक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी तितक्याच ताकदीने उभ्या केल्या.
  • रंगभूमीवर त्यांनी साकारलेली नाटके ही अतिशय वैशिष्ठ्यपूर्ण ठरली होती. हँडस अप, अतिरेकी, कन्यादान या नाटकांतील त्यांच्या भूमिका या विशेष लक्ष वेधून घेणार्‍या होत्या. कन्यादान नाटकात श्रीराम लागू, प्रिया तेंडूलकर, सुहास जोशी आणि सदाशिव अमरापूरकर या चौघांची जुगलबंदी होती. त्यामध्ये विचारवंत सामाजिक कार्यकर्ता असलेल्या श्रीराम लागूची मुलगी प्रिया तेंडूलकर ही एका झोपडपट्टीतील दलित तरूण असलेल्या सदाशिव अमरापूरकरशी लग्न करते. त्यानंतर त्याचे दारू पिऊन येणे, तिला मारहाण करणे हे प्रकार अंगावर शहारे आणणारे ठरत होते. तरीही आपली बाजू तितकीच बरोबर आहे हे ठामपणे तो आपल्या सासर्‍याला सांगत असे. कारण दोन समाजातील अंतर काय आहे हे दाखवण्याचा त्यांनी त्या नाटकातून प्रयत्न केला होता. विजय तेंडुलकरांच्या या नाटकाला  सदाशिव अमरापूरकर यांच्यामुळे न्याय मिळाला होता. त्यामुळेच एक चांगला विचार असलेले नाटक अमरापूरकरांंनंतर बंद पडले. अतिरेकी या नाटकात संपूर्ण रंगमंचावर ते फक्त माळ्यावर बसून आहेत. पोलिसांच्या भितीने एका घरात लपून बसलेल्या अतिरेक्याची भूमिका त्यांनी जबरदस्त ताकदीने सादर केली होती. रंगभूमिवर साकारलेल्या सगळ्या भूमिका त्यांनी अत्यंत सहज वावराने साकारल्या होत्या.
  • मराठी चित्रपटांमधूनही सदाशिव अमरापूरकर यांनी साकारलेल्या भूमिका या अतिशय गाजलेल्या भूमिका होत्या. ‘खिचडी’ या व्ही के नाईक या बिग बजेट मराठी चित्रपट प्रॉडक्शनमध्ये अशोक सराफ, रंजना ही त्या काळातील सुपरहीट जोडी होती. श्रीराम लागू, जयश्री गडकर यांच्यासारखे मातब्बर कलाकार होते. तरीही त्या मसाला चित्रपटात रघुवीर नावाचा खलनायक सादर करून आपण मराठी चित्रपटातही चांगली छाप पाडू शकतो हे अमरापूरकर यांनी दाखवून दिले होते. त्यानंतर काही काळाने झेडपी हा सत्य घटनेवरील आधारीत मराठी चित्रपट आला होता. भास्कर वाघ या जिल्हा परिषदेतील एका कारकुनाने भ्रष्टाचार करून कोट्यवधी रूपयांची माया जमवल्याने ते प्रकरण 1980 च्या दशकात गाजले होते. त्यावर आधारीत झेडपी हा चित्रपट होता. त्यातील झेडपीतील कारकूनाची खलनायकाची भूमिका अमरापूरकर यांनी सादर केली होती. पण खलनायक हाच या चित्रपटाचा नायक ठरला होता. जय काळंबादेवी असा घोष करून प्रत्येकाला अडकवणारा वाघमारे ही 1991 ची मराठी चित्रपटातील सर्वोत्कृष्ठ कलाकृती ठरली होती.
  • याच सुमारास जन्मठेप हा दरोडेखोरीवरचा मराठी चित्रपट आला होता. त्यात साकारलेला दरोडेखोर हा अस्सल दरोडेखोर वाटत होता. अश्‍विनी भावे ही या दरोडेखोराची मुलगी असते. ती एका तरूणाच्या की जो दरोडेखोरांना पकडण्यासाठी आतूर झालेला आहे अशा तरूणाच्या प्रेमात पडते. त्यावेळी मुलगी महत्त्वाची की दरोडेखोरी महत्त्वाची या संघर्षात सापडलेली भूमिका अमरापूरकर यांनी अतिशय संवेदनशीलपणे केली होती.
  • आई पाहिजे या चित्रपटात आपली मानलेली बहीण आशा काळे हिला तिच्या मुलाच्या त्रासातून, नरकयातनांमधून सोडवणारा प्रामाणिक नोकर पाहताना हा कलाकार कधीकाळी खलनायक म्हणून काम करत होता असे वाटतच नाही. इतकी लवचिकता त्याच्या भावमुद्रेवर जाणवते.
  • मराठीत मोजकेच चित्रपट केले, पण जे केले त्यात लक्षात राहिल असा अभिनय केला. हिंदी चित्रपटांमध्ये मात्र वेगवेगळ्या भूमिका त्यांना करता आल्या. विनोदी, खलनायक अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका त्यांनी साकारल्या. अगदी रामसे बंधू यांच्या पुरानी हवेली सारख्या लो बजेट आणि त्यांच्या ट्रॅडिशनल स्टाईलने काढलेल्या चित्रपटातातील हवेलीतील कंदील हातात घेवून येणारा नोकरही त्यांनी प्रामाणिकपणे साकारला. अर्धसत्य या हिंदीतील पदार्पणात फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळवणार्‍या चित्रपटाचा उल्लेख केल्याशिवाय अमरापूरकर यांच्यावरील लिखाण हे अर्धसत्यच राहिल. ओम पुरी हा अनंत वेलणकरची भूमिका करत असतो. मुंबई पोलिस मधील एक प्रामाणिक अधिकारी. ओम पुरीची तोपर्यंत सिनेसृष्टीला चांगली ओळख झालेली होती. त्यामुळे चिकणा चोपडा नसलेल्या नायकाला घेवूनही गोविंद निहलानींनी हा यशस्वी चित्रपट काढला होता. स्मिता पाटील या चित्रपटात होती. अमरीष पुरी होता. पण सगळ्यांवर कळस करीत या रामा शेट्टीने आपली चुणूक दाखवली होती. अर्धसत्य चित्रपटातील कोणाची भूमिका लक्षात रहात असेल तर ती फक्त सदाशिव अमरापूरकर यांची रामा शेट्टीची भूमिका. कधीकधी वाटते या चित्रपटात शेवटी ओम पुरी सदाशिव अमरापूरकचा गळा दाबून त्याला मारतो. तेव्हा त्याने गळा दाबण्यासाठी लावलेली ताकद, केलेले मोठे डोळे हेच सांगत होते की सगळा चित्रपट तू खाल्ला आहेस. आता तुला संपवतो.
  • महेश भट्टच्या सडक या चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांनी तृतियंपथियाची भूमिका केलेली आहे. इतकी हिडीस आणि संतापजनक ती भूमिका सादर केली आहे की चित्रपट पाहताना अंगावर शहारे येतात. संजय दत्त पूजा भट्ट हे त्या काळातील आकर्षण असलेले स्टार असतानाही  अमरापूरकर यांचा या चित्रपटातील वावर हा लक्षात राहतो. चित्रपट पाहून बाहेर पडताना प्रत्येकाच्या लक्षात राहते ती अमरापूरकर यांची तृतियंपथियाची भूमिका. या भूमिकेतील संवादफेक.
  • अमिताभ बच्चनसारख्या महानायकासमोर उभे राहतानाही सदाशिव अमरापूरकर यांचा ठामपणा इतका जबरदस्त होता की आखरी रास्तामध्ये  दोन दोन अमिताभ असूनही एका अमरापूरकराने आपली दहशत आपल्या अभिनयाने दाखवून दिलेली आहे.1990 च्या दशकातील अमिताभ बच्चन यांची दुहेरी भूमिका असलेल्या, अँग्री यंग मॅनचा अँग्री ओल्ड मॅन झालेला असताना अमरापूरकर यांचा राजकारणी खलनायक हा चित्रपटात शेवटपर्यंत थरार निर्माण करत राहतो.
  • दाक्षिणात्य निर्मात्यांच्या बुलंदीसारख्या मसाला पटातही विनोदी भूमिका साकारून इथे मक्तेदारी फक्त कादरखानची नाही हे अमरापूरकरांनी दाखवून दिले होते. बायकांबाबत लंपट असलेल्या, परेश रावलच्या बापाची जबरदस्त विनोदी भूमिका सदाशिव अमरापूरकरांनी करून आपण कोणतीही भूमिका करू शकतो हे दाखवून दिले होते.
  • त्यांच्या प्रत्येक भूमिकेबद्दल लिहावे तेवढे थोडेच आहे. पण त्यालाही काही मर्यादा असतात. अमर्यादीत ताकदीच्या अभिनेत्याबद्दल लिहीताना या मर्यादा ओलांडण्याची इच्छा असली तरी शक्य होत नाही. म्हणूनच या चतुरस्त्र अभिनेत्याच्या जाण्याचे दु:ख आहे. खलनायक म्हणून सिनेमात त्यांना नायकाकडून मारताना पाहणे यात खूप आनंद असायचा. पण आज त्याच ताकदीच्या अभिनेत्याचे खरे मरणे असह्य वेदनादायी ठरते. या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली. या सामाजिक कार्यकर्त्यांला श्रद्धापूर्वक आदरांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: