गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५

कालबाह्य


‘आऊट आॅफ डेट’मध्ये कालबाह्य झालेल्या गोष्टींवर आपण नेहमी प्रकाश टाकतो, पण आज जी कालबाह्य झालेली गोष्ट आहे, ती अत्यंत खेदाची आहे. ती म्हणजे ‘सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारा मोर्चा’. आज मोर्चे राजकीय शक्तिप्रदर्शनासाठी निघतात. जातीय संघटनांचे निघतात. सरकारविरोधात निघतात. सरकार समर्थनार्थ निघतात. मोर्चाला उत्तर देण्यासाठी मोर्चे निघतात, पण सामान्य माणसांच्या गरजांसाठी निघत नाहीत.


काँग्रेसच्या राजवटीत सत्तरच्या दशकात, आणीबाणीनंतर जसे मोर्चे निघत होते आणि सामान्य माणूस रस्त्यावर उतरत होता, ते आता कालबाह्य झालेले आहे. आता फक्त वैयक्तिक स्वार्थासाठीचे मोर्चे निघताना दिसत आहेत. १९७०चे दशक जरा सगळ्यांनी आठवून पाहा. आपल्या हक्कासाठी माणसे रस्त्यावर उतरत होती. मोर्चे निघत होते. घोषणा होत होत्या, पण यात सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांसाठी सगळे असायचे. माणसे जातीपातीत, धर्मात विभागलेली नव्हती. सगळी माणसेच होती. आज फक्त जातीय हक्कांसाठी, धार्मिक हक्कांसाठी मोर्चे निघत आहेत. शक्तिप्रदर्शन होत आहे. राजकीय ताकद दाखवून आपले उपद्रवमूल्य दाखवले जात आहे. या शक्तिप्रदर्शनात कोणाच्या बाजूने उभे राहायचे हे संघटक ठरवतात. इथे सामान्य माणसांचे हित कुठे दिसतच नाही, पण पूर्वी मोर्चे हे सामान्यांसाठी निघायचे. आबालवृद्ध त्या मोर्चात सहभागी व्हायचे. ना सोबत पाण्याची बाटली होती, ना येण्यासाठी खर्च करणारी कोणती संघटना होती, होती फक्त उत्स्फूर्तता. या मोर्चात सहभागी होणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे ही भावना होती. हा माणसांचा समाज कोणत्या विशिष्ट जातीचा नव्हता, तर सर्वसमावेशक होता.

आजकाल जात या अर्थाने समाज हा शब्द वापरला जातो, पण समाज याचा अर्थ माणसांचा समूह. विशिष्ट जातीच्या माणसांचा समूह असा त्याचा अर्थ तेव्हा नव्हता. त्यामुळे सामाजिक कार्य, समाजकार्य याचा अर्थही सर्वांसाठी कार्य असा होता. विशिष्ट जाती-धर्मासाठी कार्य नव्हते. हे आजकाल पाहायला मिळत नाही, याचीच खंत आहे. एकविसाव्या शतकातील तिसरे दशक सुरू झाले आणि माणसे समाजातून जातीपातीत विभागली गेली. त्यांचे गठ्ठे तयार झाले. ते फक्त आपल्यापुरताच विचार करू लागले. संपूर्ण समाजहित कालबाह्य झाले.


मृणालताई गोरे, अहिल्या रांगणेकर अशा महिला जेव्हा सरकारविरोधात पेटून उठायच्या आणि मोर्चाची हाक द्यायच्या तेव्हा सामान्य घरातील महिला, पुरुष हे उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येत, मोर्चात सामील होत, पण आज तसे होत नाही. त्यांचा समाजवाद हा राजकीय पक्ष नव्हता, तर खºया अर्थाने समाजासाठी, सामान्य माणसांसाठी सारे काही होते. आज हे दिसत नाही. साखरेचे दर वाढले, रॉकेलचे दर वाढले, रेशनवर माल मिळत नाही, महागाई झाली, पाणी टंचाई झाली, लगेच मोर्चे निघत होते. सामान्यांची एकजूट होत होती. सरकारला विचार करायला लागत होता. थाळी मोर्चा, घंटानाद, घोषणांची बरसात, महिला नुसता सगळा परिसर दणाणून सोडत होत्या. या मोर्चाच्या भोवती पोलीस असायचे. कडे करून पोलीस असायचे, पण या मोर्चेकºयांचा ते आदर करायचे. कारण महागाई पोलिसांनाही होतीच ना. ना कधी पोलिसांनी लाठीमार केला, ना अश्रूधुराची नळकांडी फोडावी लागली. नाममात्र जेल भरो केल्यावर, निवेदन दिल्यावर पोलीस ‘घरापर्यंत सोडायला येऊ का?’ असे प्रेमाने विचारत होते. कारण त्यांनाही माहीत होते की, सरकारला वठणीवर आणायला हा मोर्चा आवश्यक आहे. हे काही आता दिसत नाही. आता फक्त कुणाचा अवमान झाला, कुणी काही बरळले म्हणून त्याचा निषेध करा, त्याचा पुतळा जाळा, त्याला जोड्याने मारा असले मोर्चे निघतात. तेही कॉर्पोरेट मोर्चे असतात. प्रसारमाध्यमांना, कॅमेरामनला बोलावून सगळे केले जाते, पण तेव्हा ना मोर्चाची बातमी कोणी देत होते, ना कोणी माध्यमे दखल घ्यायला होती, पण सरकारला महागाई कमी करायला लावणारी ताकद मात्र, तेव्हा होती. आता माध्यमे असून काही उपयोग नाही. महागाईविरोधात लढणारा मोर्चा निर्माण करता येत नाही. कारण तो आता कालबाह्य झालेला आहे. आता पैसा प्रत्येकाच्या हातात पोहोचतो आहे. जसा येतोय, तसा जातोय. संचय, बचत होत नाही, याची ना कुणाला खंत आहे, ना खेद आहे. कोणी महागाईविरोधात रस्त्यावर उतरत नाही. शिक्षणात बट्ट्याबोळ आहे, महिला असुरक्षित आहेत, शेतकºयांचे प्रश्न आहेत, कोणाला काही पडलेले नाही त्याचे. साखरेचे भाव वाढले काय, कमी झाले काय, महागाई झाली काय, काही नाही. माणसे घरातल्या घरात बोलत आहेत. महिला चिंतित आहेत. तोकड्या पैशांत मॅनेज करत आहेत, पण त्याविरोधात आवाज उठवत नाहीत. रस्त्यावर येत नाहीत. महागाईविरोधात बोलायला कमीपणा वाटतो आहे का?

आज मध्यमवर्गीय आणि नवश्रीमंतांचा एक वर्ग असा आहे की, त्यांना आपण नेमके कोणत्या गटात आहोत हे समजेनासे झाले आहे. महागाई परवडत नसली, तरी आपण श्रीमंत आहोत, सधन आहोत हे दाखवण्याचा बुरखा तोंडावर घेऊन जगत आहेत. हा समाजाला आलेला मुर्दाडपणा फार घातक आहे. महागाई, सामान्यांचे प्रश्न, न्याय याबाबत कोणी रस्त्यावर येत नाही. सामान्यांच्या प्रश्नासाठी निघणारे मोर्चे बंद झाले आहेत. याचा अर्थ सगळे काही आलबेल आहे, असे नाही, पण यावर संदीप खरेंची ‘आयुष्यावर बोलू काही’ यातील एक कविताच भाष्य करते. ‘मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही, मी निषेधसुद्धा साधा कधी नोंदवलेला नाही...’ ही कविताही कालबाह्य झालेल्या संवेदनांचेच वर्णन करताना दिसते.


९१५२४४८०५५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: