मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

हाथी चले अपनी चाल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कुणी कितीही टीका करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात न पडता आपल्या कृतीतून जे ते उत्तर देतात ते नावाजण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्यांपासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत एकीकडे टीकेची झोड उठवत असताना, आमचा कार्यकर्ता, शिवसैनिक ही आमची ताकद आहे, हे त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे दाखवून दिले. अनुल्लेखाने टीकाकारांची तोंडे बंद केली, याला म्हणतात राजकारणातील मुत्सद्देगिरी.

मुंबईत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पहिलाच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी ते मुंबईत आले होते; पण पंतप्रधानांनाही बेदखल करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकाला प्राधान्य दिले.


तुमच्या पक्षाचे आणि आमचे जमत नाही, आमच्यावर टीका करायची मग तुमच्या स्वागताला राजशिष्ठाचार म्हणून आम्ही का यावे?, आपल्या सरकारमधील प्रतिनिधी पाठवला आणि आमच्याकरता तुम्ही बिलकुल महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी आमचा शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. पंतप्रधान आणि लता मंगेशकर कुटुंबीयांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी महत्त्व दिले. गेले काही दिवस त्या नवनीत राणा, रवी राणा या प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. काही उद्योग नसल्यागत सगळ्या वाहिन्या आपापले कॅमेरे मातोश्रीवर लावून बसले आहेत, पण या सगळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आम्ही तुमच्या टीकेला, भुंकण्याला काडीचीही किंमत देत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. हाथी चले अपनी चाल या उक्तीप्रमाणे त्यांनी बेदखल करून या सर्व प्रकारांना उत्तर दिले हे फार महत्त्वाचे होते. आदळआपट करून काही होत नाही शांतपणाने काम केले, तर काही तरी ठोस उत्तर देता येते, झोंबेल असे ते उत्तर असते, हे त्यांनी कृतीतून दाखवले, ही बाब अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांचा कार्यक्रम असताना, तीच वेळ साधत रविवारी अचानक चंद्रभागा शिंदे या ९२ वर्षांच्या महिला शिवसैनिकाच्या घरी भेट दिली, म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमात सन्मानाने बोलावले होते, दोन दिवस माध्यमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार अशा चर्चा होत्या; पण त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेलेच नाहीत. माझ्या दृष्टीने पंतप्रधान महत्त्वाचे नाहीत, माझ्या दृष्टीने लता मंगेशकर महत्त्वाच्या नाहीत तर शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे दाखवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. बरे गेले काही महिने ते आजारी होते, त्यामुळे आजारपणामुळे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नाहीत, अशी बातमी येऊ नये यासाठी त्यांनी आपण ठणठणीत आहोत, हे दाखवत सहकुटुंब ज्येष्ठ शिवसैनिकांच्या घरी जाण्याचा कार्यक्रम केला. याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात. गेल्या चार-पाच दिवसांतील घटना पाहता कोणत्याही नेत्याचा संयम सुटला असता. प्रतिक्रिया दिली असती, कडवट टीका केली असती; पण ते मुख्यमंत्र्यांनी टाळले. आपल्या एका कृतीतून त्यांनी काय-काय सिद्ध केले?


मुख्यमंत्र्यांच्या या अचानक घडलेल्या कार्यक्रमामुळे भाजपची नियोजित असलेली पोलखोल सभा रद्द करावी लागली. ज्या ठिकाणी चंद्रभागा शिंदे राहतात त्याच बिल्डिंगच्या खाली भाजपची रविवारी त्याचवेळी पोलखोल सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला होता; मात्र मुख्यमंत्र्यांच्या गाड्या जाण्यासाठी हे स्टेज तोडावे लागले. हाथी चले अपनी चाल म्हणतात ते असे. अनुल्लेखाने मारणे म्हणतात ते असे.

मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर देखील या सभेला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी उद्या ही सभा घ्या, असे आवाहन केले. या सभेला भाजप नेते नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर संबोधित करणार होते. सभा अचानक रद्द झाल्याचे दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली; मात्र नितेश राणे यांनी सभेच्या ठिकाणी येऊन पोलखोल सभेला मुख्यमंत्री आणि सरकार घाबरत असल्याचे सांगितले, तसेच सोमवारी दणक्यात ही सभा घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले; पण भाजपचा डाव मोडण्यात आपण वारंवार यशस्वी झाल्याचे त्यांनी दाखवून दिले.


२०१९ ला भाजपला मुख्यमंत्री बनवायचा होता; पण तो डाव काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेऊन त्यांनी उधळून लावला. तोच प्रकार त्यांनी काल केला. आमचे शिवसैनिक सर्वांना भारी आहेत. तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यापुढे कोणी पंतप्रधान असोत नाही, तर कुणी भारतरत्न असोत. आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आमचे शिवसैनिक. ही त्यांची मुत्सद्देगिरी अत्यंत दखल घेण्यासारखी आहे.

विरोधकांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पोलखोल सुरू केली असली, तरी इथला मतदार आमच्या पाठिशी आहे, हे दाखवून निवडणुकीपूर्वी शिवसैनिकांत आशावाद निर्माण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्यांना घर देण्याचे, त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी शिवसैनिकांत ऊर्जा निर्माण केलेली आहे. हे फार महत्त्वाचे होते. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, दोन वर्षे मंत्रालयात गेले नाहीत, अशी टीका सातत्याने त्यांच्यावर होत होती; पण केव्हा घरातून बाहेर पडायचे असते, ते त्यांनी दाखवून दिले. पंतप्रधान आले, तरी आमच्यासाठी आमचा मतदार महत्त्वाचा आहे. आज या कृतीमुळे एका आजीला घर मिळाले, यात प्रत्येक शिवसैनिकाला समाधान आहे. प्रत्येक राजकारण्याने या कृतीतून काहीतरी शिकले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: