पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत (संसद) अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि दुसºया क्षणी इम्रान खान यांचे सरकार कोसळले. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षांनंतर इम्रान खान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले. खरेतर इम्रान खान यांनी मनातल्या मनात आनंदच व्यक्त केला असेल, कारण सध्या पाकिस्तानातच नाही, तर संपूर्ण जगातच राज्यकर्त्यांना सरकार चालवणे हे सोपे राहिलेले नाही. प्रत्येक देशात नवनवे प्रश्न आ वासून उभे आहेत. पाकिस्तानसारख्या कर्जबाजार देशात तर सरकार चालवण्यासाठी कोणत्याही योजना राहिलेल्या नाहीत. कोणी त्यांना जवळ करेल असेही वाटत नाही. पाकिस्तानला यातून बाहेर पडण्यासाठी दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवणे हाच उपाय आहे. जगभरातील दहशतवाद हा पाकिस्तानातून निर्माण होत आहे. तालिबानींचे समर्थन, त्यांना आसरा देणे असो वा अन्य दहशतवादी संघटनांचे लाड करणे यात पाकिस्तान आणि पाकिस्तानी लष्कर धन्यता मानत आलेली आहे. त्यामुळे असे राज्य हातातून गेले तर बरेच, असे इम्रान खान यांना वाटले असेल. सामना हरणार असू तर त्याचे कॅप्टन आपण नसलेले बरे हे क्रिकेटचे धोरण इम्रान खान चांगलेच जाणतात; पण एका रात्रीत ही उलथापालथ झाली आहे. होणार हे नक्की होते, पण लगेच निवडणुका घेण्याचा इम्रान यांचा डाव फसल्याने आता पुढे काय होणार ते रंजक असेल.
शनिवारी, ९ एप्रिलच्या रात्री पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडले. यात १७४ सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने म्हणजेच इम्रान खान सरकारविरोधात मतदान केले. परिणामी इम्रान खान यांचे सरकार कोसळले. अर्थात इम्रान खान यांनी दावा केलाय की, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च नेतृत्वाने कट रचला होता. तसेच, नव्या सरकारचा स्वीकार करण्यासही इम्रान खान यांनी नकार दिला आहे; पण हे सगळे दहशतवादी संघटनांच्या जोरावर पाकिस्तानी नेत्यांचे चोचले चालतात. त्यामुळेच अमेरिकेच्या इशाºयावर हा बदल झाला असला, तर तो योग्यच म्हणावा लागेल.
खरेतर पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाविरोधात अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाला आहे. पाकिस्तानात लोकशाही हा प्रकार नाहीच आहे. तिथे चालते ती मनमानी. झुल्फीकार अली भुट्टो ते जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अशीच मनमानी केली होती. त्यामुळे तिथल्या लोकशाहीला कसलाही अर्थ नाही. नुसता अनागोंदी कारभार असतो. भारताचा द्वेष करून सत्ता मिळवणे हा एकच अजेंडा प्रत्येकाचा असतो. आता आज ११ एप्रिलला पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत एक महत्त्वाचे अधिवेशन होणार आहे आणि यातच पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान निवडला जाईल. तसे नवाज शरीफ यांच्या भावाची निवड पक्की झालेली आहे; पण ते पाकिस्तान आहे. तिथे काही सांगता येत नाही. पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील, हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शाहबाज शरीफ हे सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीतले विरोधी पक्षाचे नेते आहेत. पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, पाकिस्तानात आम्ही राज्यघटना आणि कायदा व्यववस्था पुन्हा आणू इच्छित आहोत. विशेष म्हणजे शाहबाज शरीफ यांनी म्हटले की, आम्ही कुणाचाही बदला घेणार नाही. मात्र, कायदा आपले काम करेल. यातच सगळे काही आले; पण तिथे आणखी एक गोंधळ झालेला आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीत (संसद) मतदान पार पडण्याआधीच असेम्बलीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. असद कैसर यांच्यानंतर आता पीएमएल-एन नेते अयाज सादिक हे नॅशनल असेम्बलीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे तिथे आता नवा गडी नवे राज्य अशी परिस्थिती असणार आहे. या संसदेचा कालावधी संपायला अजून सव्वा ते दीड वर्ष आहे. मग सार्वत्रिक निवडणुका लागतील; पण एवढा कालावधी या नव्या सरकारला आपली कामगिरी बिंबवण्यासाठी पुरेसा आहे का, हे येणारा काळच ठरवेल.
पाकिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवलेले इम्रान खान दोन दशकांपूर्वी राजकारणात आले आणि पीटीआय पक्षाची त्यांनी स्थापना केली. २०१८ साली ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. क्रिकेटची कारकीर्द इम्रान खान यांची यशस्वी झाली होती. अगदी १९९२चा वर्ल्ड कप जिंकून त्यांनी सर्वांची मनेही जिंकली होती. त्याच क्रिकेट प्रेमातून इम्रान खान यांनी सत्ता मिळवली होती. मात्र, आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी वाढतच गेल्या. मागील वर्षी मार्च महिन्यात इम्रान खान यांच्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडले. त्यानंतर खºया अर्थाने राजकीय संघर्ष सुरू झाला. त्यातून त्याला बाहेर पडणे अवघड गेले.
खरेतर इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराचे विश्वास संपादन केले होते. पाकिस्तानात सत्ता हस्तगत करण्यासाठी लष्कराशी संबंध चांगले असणे आवश्यक असते; पण गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील अंतर वाढत चालले होते. लष्करप्रमुखांनी सत्तेची सूत्र ताब्यात घ्यायची ही पाकिस्तानची कायम परंपरा राहिलेली आहे. त्यामुळे लष्कराचा राजकारणातला हस्तक्षेप ही पाकिस्तानच्या लोकशाहीची डोकेदुखीच आहे. ती परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत तिथे शांतता प्रस्थापित होणे अवघडच आहे. त्यात इम्रान खान हे सातत्याने आरोप करत आहेत की, पाकिस्तानातील विरोधी पक्ष हे परदेशी शक्तींसोबत काम करत आहेत. रशिया आणि चीनच्या प्रकरणात आपण अमेरिकेच्या बाजूने उभे राहण्यास नकार दिला आणि त्यानंतरच सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या नेतृत्वाने कट रचला होता, असे त्यांचे मत आहे. नेमके शरीफ यांच्या हातात सत्तेची सूत्र गेली, त्यामुळे आगामी निवडणुकीत इम्रान खान हाच मुद्दा उचलून धरणार यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा