शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

मनाला निर्बंध

 अग्रलेख


कोरोना गेला, आपण कोव्हिडमुक्त झालो, सगळे निर्बंध उठले, या भ्रमात सगळे जण अत्यंत गाफीलपणे वावरत आहेत; पण कोरोनाच्या काळात जी स्वच्छतेची आणि सुरक्षेची सवय लागलेली आहे ती बंद करून चालणार नाही. मास्क आणि सॅनिटायझर न वापरता बाहेर वावरणे हे धोकादायक ठरू शकते, याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रात मंगळवारी दुप्पट दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यातील दैनंदिन रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण मुंबईतील असून, पालिकेने यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावरून काही तरी बोध घेणे आवश्यक आहे.


देशात गेल्या २४ तासांत १,२४७ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीहून अधिक रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील सर्वाधिक ८५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे मुंबई पालिका सतर्क झाली आहे; पण महापालिकेने सांगितल्यावर जागे होण्यापेक्षा आपण गेल्या दोन वर्षांत लागलेल्या सवयी मोडण्याची काय गरज आहे? आज लोकलमधून, सार्वजनिक ठिकाणी हजारो लोक बिनामास्क हिंडताना दिसतात. पूर्वीच्या कुठेही थुंकायच्या सवयी विशेषत: तंबाखू, गुटखा खाणाºयांच्या गेलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा एखादी लाट आली, तर आश्चर्य वाटायला नको.

पण आता काही झाले तरी पुन्हा निर्बंध लावूच नयेत. माणसांनी आता लढा द्यायला सज्ज असले पाहिजे. कोरोना असेल नाही, तर आणखी एखादा नवा व्हायरस येईल; पण बंद करणे, निर्बंध लावणे, लॉकडाऊन करणे असले उपाय मात्र आता लावायला नकोत. रोजगार, शेती, अर्थव्यवस्था ठप्प करणारे असले उपाय योजणे आता थांबवले पाहिजे. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणारा नाही. गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्राचे पर्यायाने भावी पिढीचे जे नुकसान झालेले आहे, ते कधीही भरून येणारे नाही. शाळेत मुले जात आहेत; पण त्यांना काहीही येत नाही. फक्त मोबाइलकडे लक्ष लागले आहे. त्यांच्यातील चंचलता वाढली आहे. असे प्रत्येक क्षेत्रात नुकसान झालेले आहे. यामुळे आर्थिक दरी वाढली आहे. एक विशिष्ठ वर्ग पैसेवाला होतो आणि दुसरा वर्ग देशोधडीला लागतो आहे. त्यामुळे वारंवार निर्बंध, लॉकडाऊन आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सरकारने निर्बंध उठवले असले, तरी नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतली, तर रुग्णसंख्या वाढणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.


सध्या मुंबईमध्ये हवाई मार्गाने येणाºया रुग्णांची तपासणी करण्यात येते, परंतु रेल्वे किंवा अन्य मार्गाने येणाºया नागरिकांचा शोध घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या विभागांमध्ये मुंबईबाहेरून व्यक्ती किंवा कुटुंबे वास्तव्यास येत आहेत का, याची पाहणी करण्याची सूचना प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिली आहे. या व्यक्तींना कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या तातडीने चाचण्या करण्याची सूचनाही प्रशासनाने दिली. उपचारासाठी येणाºया व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तातडीने आणि सक्तीने कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांना द्याव्यात, असे आदेश पालिकेने विभाग कार्यालयांना दिले आहेत; पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आता सगळ्यांचे लसीकरण झालेले आहे. तसे चिंतेचे कारण नाही. पूर्वीसारखी आता भीतीही राहिलेली नाही; पण तरीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. किंचितसा गाफिलपणाही घात करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची संख्या कमीच आहे. मुंबईत सेरो सर्वेक्षणामध्ये ९९ टक्के अत्यावश्यक आणि आरोग्य कर्मचाºयांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. तसेच लसीकरणही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढली, तरी मुंबईत फारशी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका नाही; पण आपण जागृत असणे आवश्यक आहे. दिल्लीमध्ये नव्याने आढळणाºया रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे मुंबईत काही प्रमाणात रुग्णवाढ झाली असली, तरी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण पूर्ण करावे आणि मुखपट्टीची सक्ती नसली, तरी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तिचा वापर करणे आवश्यक आहे. या सवयी आपण अंगवळणी लावून घेतल्या, तर रोगाचा प्रसार थांबेल. केवळ कोरोनासाठीच नाही, तर अनेक बाबींपासून मास्क आपले रक्षण करू शकतो. आजकाल सगळीकडे धुळीचा प्रादुर्भाव असतो. विविध कण आपल्या नाकातोंडात जाण्याची शक्यता असते. त्यासाठी मास्क वापरणे ही काही वाईट सवय नाही. थोडावेळ काढावा परत वापरावा. बाहेर जाताना तर तो अवश्य घालावा. सरकारने निर्बंधमुक्त केले याचा अर्थ मास्कमुक्त केले असे नाही. मास्क ऐच्छिककेला याचा अर्थ घालायचाच नाही, असे नाही. त्यामुळे सरकारने आता आपल्यावर सोडले आहे. त्याची दखल घेत प्रत्येकाने मनाला निर्बंध लावून घेतले पाहिजेत.


दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत असली, तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, सलग सुट्ट्या आणि सण-उत्सवांमुळे नागरिक एकत्र येत असल्याने ही रुग्णवाढ दिसत आहे. मात्र, चौथ्या लाटेची सुरुवात झाली, असे लगेच म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बुस्टर डोस किंवा वर्धक मात्रा आणि १२ ते १७ वयोगटातील लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे आदेश पालिकेने विभागांना दिले आहेत, तसेच २६६ कोरोना चाचणी केंद्रे सुरू असून, चाचण्या आणि मुखपट्टी वापरण्याबाबत जनजागृती करण्याची सूचनाही पालिकेने दिली आहे; पण पालिकेबरोबरच आपली जबाबदारीही लक्षात घेतली पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: