रविवार, १७ एप्रिल, २०२२

हनुमान एक व्यवस्थापक


आपल्याकडे रामाचा वापर राजकारणासाठी केला जातो. त्यासाठी रामराज्याचे स्वप्न दाखवले जाते, पण रामराज्य येण्यासाठी मंत्रीगण हे हनुमंतासारखे असावे लागतात. रामराज्याचे स्वप्न पाहणाºयांनी हनुमान आणि राम समजून घेतला पाहिजे. नुसती हनुमान चालिसा वाचून किंवा महाआरती करून, अयोध्येत माती घेऊन जाणे असल्या गोष्टींनी रामराज्य येत नसते. त्यासाठी आजच्या हनुमान जयंतीला रामाचा हनुमान काय होता, त्याचे वैशिष्ट्य काय होते हे समजून घेतले पाहिजे.


परकीय राजवटीच्या काळात बलोपासनेसाठी समर्थ रामदासांनी मारुती मंदिरांची स्थापना केली. यामागचा उद्देश हा अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा मिळावी आणि अत्याचारी राज्यकर्त्यांना हुसकावून लावणे हा त्यामागचा संदेश होता. समर्थ रामदास हे रामभक्त होते. ते साक्षात हनुमंताचा अवतार होते. हनुमान हा रामसेवक, रामभक्त, रामदास होता. तितकाच तो एक कुशल मंत्री होता. प्रचंड बुद्धिमान होता. तो किश्किंधा नरेश सुग्रिवाचा उत्तम मंत्री होता.

संकटकाळी आणि कठीण समयी नेमके कसे वागावे याचे चातुर्य हनुमंतामध्ये होते. शक्ती, युक्ती, भक्ती याचे उत्तम उदाहरण म्हणजे हनुमान. म्हणूनच रामदासांनी हनुमंताकडे एक उत्तम व्यवस्थापक म्हणून पाहिले आहे. हनुमंताकडे पाहूनच त्यांना उत्तम महंताची लक्षणे सुचली असावीत असे वाटते. अशा बुद्धिमान हनुमंताचा आदर्श ठेवून सर्वत्र चोख व्यवस्था ठेवली, तर रामराज्य येऊ शकते हे जाणणा‍ºया समर्थांनी अकरा मारुतीची स्थापना तत्कालीन काळात केली. याचे कारण हनुमंतामधील महंत लक्षणे समर्थांना दिसली होती. तीच लक्षणे त्यांनी दासबोधातील ११ व्या दशकातील ६ व्या समासात वर्णन केलेली आहेत.


एका उत्तम महंताने आपले जे काही लिखाण असते ते स्वच्छ नीटनेटके आणि स्पष्ट लिहावे. त्याने इतरांकडून काम करवून घेताना त्याच्या सूचना योग्य प्रकारे पोहोचवण्यासाठी त्या अत्यंत स्पष्ट आणि सोप्याप्रकारे द्याव्यात. त्यात कसलीही गुंतागुंत असता कामा नये. त्याचे लेखन, वाचन हे अत्यंत शुद्ध असावे. आज आपल्या शासकीय परिपत्रकातील भाषा पाहिली, त्यातील गुंतागुंत पाहिली की जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी या योजना आणल्या आहेत असे वाटतच नाही. ती भाषाच कधी समजत नाही. पण हनुमंताने नेहमी स्पष्ट समजेल अशी भाषा वापरली, हे महत्त्वाचे आहे. ते आजच्या राजकीय नेत्यांनी समजून घेतले पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, तेव्हा मिळेल पण किमान मराठी माणसांना समजेल अशी भाषा परिपत्रकात वापरावी याचे भान तरी सांभाळले पाहिजे. हे हनुमानाकडून शिकले तर रामराज्य येईल.

एक उत्तम महंत आपल्या सहकार्यांकडून झालेल्या चुका सुधारवून घेण्याचे काम करतो. त्या चुका त्यांच्या लक्षात आणून देतो. महंत म्हणजे एक व्यवस्थापक. ज्याच्यामागे फार मोठी जनशक्ती असते. अशा महंताने वागताना नेमके कसे असले पाहिजे याचा उहापोह समर्थ अकराव्या दशकातील सहाव्या समासात करतात. महंतामध्ये असणारे सभा चातुर्य फार मोठे असते. आपले मत प्रदर्शित करताना, ते व्यवस्थितपणे तो सांगतो. त्यासाठी योग्य ते दाखले तो देतो. त्याचे चांगले वाचन असते. त्या वाचनाचा वापर असा महंत योग्य प्रकारे कथा सांगण्यास करतो. उत्तम महंत हा अगोदर चांगला अभ्यास करतो. चांगले पाठांतर करतो. केवळ शाद्बिक अर्थात अडकत नाही, तर त्यातील गर्भीत अर्थ समजून घेतो. आजच्या मंत्र्यांनी असा अभ्यास केला, तर त्यांची सभागृहात कोंडी होणार नाही. आपल्या चुका विरोधकांनी दाखवल्या तर तुम्ही केंद्रातल्या चुका दाखवणार आणि बोट दुसरीकडे वळवणार, असला पळपुटेपणा हनुमानाने कधी केला नाही. त्याच्याकडे प्रत्येक समस्येचे समाधान होते. म्हणून तो उत्तम मंत्री होता.


हनुमानासारखा मंत्री हा आपल्या विवेक बुद्धीचा वापर करून तो अडलेल्या लोकांना शिकवतो. उत्तम महंताचे अक्षर सुंदर असते, त्याचे वाचणे म्हणजे उच्चारही सुंदर असतात. त्याचे संपूर्ण वागणेच अतिशय सुंदर असे असते. उत्तम महंत हा कोणतीही गोष्ट प्रयत्न साध्य असते यावर विश्वास ठेवतो. कोणत्याही प्रसंगाला तो सहजपणे आणि धाडसाने सामोरा जातो. रंगुनी रंगात सा‍रा रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सा‍रा पाय माझा मोकळा अशी अवस्था महंताची असते. कारण कोणत्याही गोष्टीकडे अलिप्तपणे पाहण्याची त्याची बुद्धी असते. म्हणजे भगवत गीतेत ज्या स्थितप्रज्ञतेबद्दल सांगितले आहे, अशी स्थितप्रज्ञता एका उत्तम महंताकडे असते. आपल्या सहकार्यांना ज्ञान देण्याची, शिकवण्याची आणि सर्वांना आपल्या कामात तरबेज करण्याची हातोटी ही उत्तम महंताकडे असतात. समर्थांनी दासबोधातील अकराव्या दशकातील सहाव्या समासात जी महंताची लक्षणे सांगितली आहेत ती व्यवस्थापकास लागू पडतात. कारण महंताला आपल्या मठाची, मठातील सर्वांची उत्तम व्यवस्था पाहायची असते. जो विचार सर्वत्र पोहोचवण्याचे कार्य महंताला करायचे असते त्या कार्यासाठी लागणारी चोख व्यवस्था महंताला करायची असते. महंत म्हणजे प्रधान. महंत म्हणजे सेनापती. महंत म्हणजे व्यवस्थापक. पण आजच्या व्यवसाय व्यवस्थापन किंवा कोणत्याही एमबीएच्या अभ्यासक्रमात शिकण्यासारखे विचार या एका व्यवस्थापकाची म्हणजे महंताची जबाबदारी आहे की तो त्या संस्थेचा विश्वस्त आहे. व्यवस्थापक हा संस्थेचा रक्षक आहे. व्यवस्थापक हा त्या संस्थेचा सेवक आहे. ज्या संस्थेचे व्यवस्थापन करायचे आहे ती संस्था टिकवणे, मोठी करणे हे व्यवस्थापकाचे परमकर्तव्य आहे. त्यासाठी एखाद्या तटाप्रमाणे, पर्वताप्रमाणे त्याने खंबीर असले पाहिजे. एक उत्तम व्यसस्थापक सागरासारखा असला पाहिजे. तो सागरासारखा शांत असला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत त्याचा तोल जाता कामा नये. त्याने मर्यादेचा भंग करता कामा नये. कितीही वादळे आली तरी सागर आपली मर्यादा कधी ओलांडत नाही. उथळ पाणी असलेली नदी पावसाने रूंद होते, उन्हाने रोडावते. नदी आटते, नदीला पूर येतो. पण सागर मात्र कोणत्याही परिस्थितीत स्थिर असतो. तो अथांग असतो. त्याचा थांगपत्ता कोणाला लागत नाही. तोच गुण एका महंतामध्ये असावा. तोच गुण एका उत्तम व्यवस्थापकाकडे असला पाहिजे. ही सर्व लक्षणे आपल्याला रामभक्त हनुमंतामध्ये आढळतात. एका उत्तम व्यवस्थापकाने कधीही कोणावरही अन्याय होणार नाही याचा विचार केला पाहिजे. त्याने अत्यंत न्याय बुद्धीने वागावे असे समर्थ या समासात सांगतात. असा महंत असा उत्तम व्यवस्थापक हा सर्वांना बरोबर घेऊन जातो. कारण अशा महंतामध्ये, अशा उत्तम व्यवस्थापकाकडे अनेक गोष्टींचे ज्ञान असते. हे ज्ञान अत्यंत सूक्ष्म असे असते. या ज्ञानाचा वापर तो इतरांसाठी करतो. महंत लक्षण समासातून समर्थ रामदास स्वामींनी हेच सर्व गुण एका उत्तम व्यवस्थापकाच्या अंगी असावेत हे सुचीत केले आहे. आजच्या राज्यकर्त्यांनी आपण यापैकी कोणत्या कसोटीत बसतो हे पाहणे गरजेचे आहे.

- प्रफुल्ल फडके/ प्रासंगिक


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: