मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचं मंगळवारी पुण्यात निधन झाले. मराठी कलासृष्टीला लाभलेला एक हरहुन्नरी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: मराठी चित्रपटातील चरित्र अभिनेता म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. जे स्थान हिंदी चित्रपटात ओमप्रकाश, ओम शिवपुरी अशा अभिनेत्यांनी मिळवले होते तेच स्थान त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत मिळवले होते. हिरो म्हणून अनेकजण लक्षात राहतात, पण चरित्र अभिनेता म्हणून लक्षात राहणारे नट फार कमी असतात. ते स्थान जयराम कुलकर्णी यांनी अढळपणे मिळवले होते.
  मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. विशेषत: १९८० च्या दशकानंतर सचिन पिळगांवकर आणि महेश कोठारे या दोन दिग्गजांच्या चित्रपटात जयराम कुलकर्णी यांची भूमिका हमखास असायची. ती ते अत्यंत प्रामाणिकपणे आणि लक्षवेधी अशी करायचे. महेश कोठारे यांचा पहिलाच निर्मिती असलेला चित्रपट म्हणजे धुमधडाका. या चित्रपटात महेश कोठारेंच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. छोटी असली तरी या भूमिकेला एक वेगळी झलक होती. संस्कृत भाषा शिकवणारा शिक्षक की जो एकही इंग्रजी शब्द बोलत नाही. त्यांनी शोधून काढलेल्या मराठी शब्दांनी धमाल उडवली होती. महेश कोठारे, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, शरद तळवलकर या दिग्गज अभिनेत्यांमध्ये जयराम कुलकर्णी यांनी वेगळ्या भाषेचा वापर करून आपली सहज अभिनयाची शैली दाखवून दिली होती. त्यानंतर महेश कोठारेंच्या चित्रपटात त्यांचे स्थान अढळ होते.
 सचिन पिळगांवकर याच्या चित्रपटातील त्यांची प्रत्येक भूमिका ही लक्षात राहणारी होती. 'माझा पती करोडपती' या चित्रपटात लुकतुकेची भुमिका करणार्रंया अशोक सराफचा बॉस त्यांनी साकारला होता. म्हणजे एकीकडे शहरी कार्पोरेट आॅफीसमधील बॉस तर दुसरीकडे सचिनच्याच 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटात ग्रामीण भाषेत बोलणारा तमाशाचा मालक आणि प्रिया बेर्डेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती. 'आयत्या घरात घरोबा' या चित्रपटातील त्यांची भूमिका तर अतिशय विलक्षण होती. सचिनच्या घरातील विश्वासू नोकर असलेला परंतु लिंबाची अ‍ॅलर्जी असलेला गडी अशी अफलातून भूमिका त्यांनी केली होती. लिंबाची अ‍ॅलर्जी उठल्यावर लाल बुंद झालेले नाक, आवाजात झालेला बदल आणि सरपटत झाडावर जाउन बसलेला गडी त्यांनी अफलातून केला होता. सचिनच्या आणखी एका चित्रपटात जयराम कुलकर्णी यांनी मध्यवर्ती भूमिका केली होती. ती म्हणजे आमच्या सारखे आम्हीच हा चित्रपट.  या चित्रपटात सचिन आणि अशोक सराफ यांचा डबलरोल आहे. एक जोडी श्रीमंत घरातील बावळट भावांची आहे तर दुसरी जोडी इरसाल भामटे, चोरटे आहेत. इस्टेटीचे रक्षण करण्यासाठी खरया सचिन अशोक सराफला वाचवण्यासाठी या भामट्यांना डुप्लीकेट बनवण्याचे काम दिवाणजी असलेल्या जयराम कुलकर्णी यांनी केले होते. सुरवातीला ती भूमिका खलनायकाची आहे काय असा भास होतो पण अत्यंत निष्ठावंत विश्वस्ताची भूमिका त्यांनी यात केली होती. सचिन आणि सुप्रियाची भूमिका असलेला पहिलाच चित्रपट म्हणजे नवरी मिळे नवर्रंयाला. या चित्रपटात राजघराण्यात वावरणारया दया डोंगरे यांच्या राजवाडयातील दिवाणजीची भूमिका अत्यंत सहजपणे जयराम कुलकर्णी यानी केली होती.
 महेश कोठारेंच्या  'थरथराट',  'दे दणादण',  'झपाटलेला' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. यातील बहुतेक चित्रपटात त्यांनी पोलीस अधिकारयाची भूमिका केलेली आहे.  सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आंबेजवळगे हे जयराम कुलकर्णी यांचे मूळगाव. गावात शिक्षणाची जेमतेम सोय असल्याने त्यांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथेच श्रीकांत मोघे, शरद तळवलकर यांच्याशी मैत्री झाली. पुढे १९५६ साली आकाशवाणी पुणे केंद्रात नोकरी केली. जयराम यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मराठी चित्रपटात त्यांनी केलेल्या सर्वच भूमिका या अविस्मरणीय होत्या. सातारचे निर्माते अरुण गोडबोले यांचा पहिलाच चित्रपट कशासाठी प्रेमासाठी हा होता. त्यात आयुर्वेदाचार्य असलेल्या आणि आयुवैदीक औषधांचा कारखान्याच्या मालकाची सहज भूमिका त्यांनी केली होती. अजिंकय देव आणि निवेदिता जोशी यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या.