रविवार, २२ मे, २०१६

कॉंग्रेस नेतेच करतील कॉंग्रेसमुक्त भारत


  • जहाज बुडू लागले की, त्यावरील उंदीर सगळ्यात आधी पळ काढतात असे म्हटले जाते. हा अनुभव कॉंग्रेसला पाच राज्यातील निवडणुकांमधील पराभवानंतर येत असेल. या पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल आणि तमीळनाडूमध्ये कॉंग्रेसची सत्ता येण्याची शक्यता नव्हती. त्यांनाही तशी आशा नसणार. कारण या दोन्ही ठिकाणची पक्षसंघटना अनेक वर्षांपासून मृतप्राय झालेली आहे. चिदंबरम आदी निवडून येतात ते स्वतःच्या संघटनशक्तीच्या जोरावर. पॉण्डिचेरीत कॉंग्रेसची सत्ता द्रमुकच्या सहकार्याने येत असली तरी राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टिकोनातून त्याला फार महत्व नाही. त्यामुळे उरलेल्या केरळ आणि आसाममध्ये असलेली सत्ता कॉंग्रेसने गमावली व आता कर्नाटक हे एकमेव मोठे राज्य वगळता मणिपूर, मिझोराम, मेघालय, हिमाचल, उत्तराखंड व पॉण्डिचेरी या सहा ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता उरली आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील विदुषक किंवा वायफळ बडबडणारा नेता म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या दिग्गीराजांचे आता डोळे उघडले आहेत. कॉंग्रेसची पुनर्रचना केली पाहिजे असा साक्षात्कार त्यांना आता झाला आहे. कॉंग्रेसचे सर्वाधिक कुणी वाटोळे केेले असेल आणि राहुल गांधींच्या माकड चेष्टांचे कौतुक करून त्यांना आणखी बावळट बनवण्याचे काम कोणी केले असेल तर ते या दिग्गीराजांनी. आता त्यांनाच कॉंग्रेसमधील गांधीवर्चस्वाची अडगळ वाटू लागली आहे हे विशेष.
  •   कॉंग्रेसमुक्त भारत अशी घोषणाच मोदी-शहा यांनी दिली होती. तेच घडताना दिसते आहे. त्यानंतर कॉंग्रेसमधील काही नेत्यांची या निकालांवरील प्रतिक्रिया पाहिली तर त्यांना पक्षाच्या पराभवाचा सर्वाधिक आनंद कॉंग्रेस नेत्यांनाच झाला असावा असे वाटून जाते. कॉंग्रेसमध्ये गटतट आहेत यातही नवे काही नाही आणि सोनिया व राहुल गांधी यांच्याखेरीज पक्षात राष्ट्रीय पातळीवर कोणी स्टार प्रचारक नाही हे नाकारण्यात अर्थ नाही. त्यामुळे सगळ्या उमेदवारांना सभा हवी असते ती राहुल किंवा सोनिया गांधींची. फार तर प्रियंका वड्रा यांची.
  •   कारण दिग्वीजय सिंग आणि अन्य दुसर्‍या फळीतला कोणताही नेता सभेला बोलावला तर कॉंग्रेसच्या खूण असलेल्या हाताच्या बोटावर मोजावे इतकेही लोक सभेला जमणार नाहीत अशी परिस्थिती आहे. हे उघड गुपित या द्वितीय श्रेणीतील नेत्यांनाही चांगले ठाऊक आहे. शिवाय पक्षाचे जे काही बरे वाईट होत आहे, किंबहुना पक्ष आज जो काही तोडक्या मोडक्या अवस्थेत टिकून आहे तो या दोन नेत्यांमुळे हेही त्यांना समजते. तरीही दिग्विजय सिंगांसारख्या काही नेत्यांनी आणि कार्यकारिणीतील त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया पाहिल्या तर कॉंग्रेसमध्ये पाच राज्यांच्या निकालानंतर केवळ निराशेचे वातावरण असल्याचे जाणवते. किंबहुना एक सुप्त टोळीयुध्दच पक्षात सुरु झाले आहे, असे दिसते.
  •  विशेषतः केरळ आणि आसाममधील पराभव या सगळ्यांनाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे पक्षातील दुफळी वाढली असे मत कॉंग्रेसचे नेते पी. सी. चाको यांनी व्यक्त केले आहे. या राज्यातील आणखी एक मोठे नेते शशी थरुर यांनी या पराभवाबद्दल थेट श्रेष्ठींना जबाबदार धरले आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाला आता दोन वर्षे झाली आहेत. त्यामुळे जे काही विचार, चिंतन, आत्मपरीक्षण करण्याचे त्यांनी ठरविले होते, त्याला एवढा कालावधी पुरेसा आहे. आता त्यांनी त्या चिंतन, आत्मपरीक्षणावर ठोस कृती करण्याची वेळ आली आहे, असे थरुर यांनी म्हटले आहे. त्याचवेळी कॉंग्रेसचे आणखी एक महासचिव दिग्विजयसिंग यांनीही, पक्षाने आत्मचिंतन करण्याची वेळ निघून गेली आहे आणि आता कठोर शस्त्रक्रियेचीच वेळ आल्याचे मत व्यक्त केले आहे. ही शस्त्रक्रिया नेमकी कोणत्या ठिकाणी करायची हे दिग्विजयसिंगांनी सांगितले असते तर अधिक बरे झाले असते. नाहीतर जखम मांडीला अन मलम शेंडीला असा प्रकार पप्पू गांधीकडून व्हायचा.
  •  दिग्विजयसिंग म्हणतात की, पक्ष आणखी किती दीर्घकाळ आत्मपरीक्षण करत राहणार. खरे तर कृती करण्यास आज फार विलंब झाला आहे, असे दिग्विजयसिंग यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसमध्ये आज एका गटाला राहुल गांधी पक्षाध्यक्ष झालेले हवे आहेत. त्यांना आणखी किती काळ प्रतीक्षेत ठेवणार असा या गटाचा सवाल आहे. तर सोनिया गांधींच्या निकटवर्तीयांना त्याच अध्यक्षा हव्या आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांनी केरळप्रमाणेच आसाममधील पराभवाला पक्षातील निर्णय न घेण्याची पध्दत जबाबदार धरली आहे. दिग्विजयसिंग आणि थरुर यांची गंमत सगळ्यांनाच ठाऊक आहे. दिग्जियसिंग राहुलसमर्थक वाटतात, पण त्यांच्यावरच टीकास्त्र सोडतात. तसेच थरुर कॉंग्रेसच्या बाजूने कमी आणि केंद्रातील सत्तेला मदत होईल अशीच विधाने अधिक करत असतात.
  •  चापलुसीच्या प्रतिक्रिया देणे सोपे असते. समजा आसाम आणि केरळमधील पराभवाला राहुल व सोनियांना जबाबदार धरायचे असेल तर पश्चिम बंगालमध्ये ममता लाटेत डावे भुईसपाट होत असताना कॉंग्रेसच्या जागा वाढल्या त्याचे श्रेयही मग या दोघांनाच द्यावे लागेल. त्यावर बोलण्यापेक्षा स्वार्थी प्रतिक्रिया देण्यात कॉंग्रेसनेत्यांचे आयुष्य चालले आहे. हे असे चापलुसी करणारे आणि स्वार्थी नेतेच कॉंग्रेसला संपवत आहेत. भाजपकडून नाही अशा नेत्यांकडून कॉंग्रेसमुक्त भारत होतो आहे. कॉंग्रेसचा पराभव फक्त कॉंग्रेस नेतेच करू शकतात हे शरद पवारांचे गेले पंचवीस वर्षांपासून असलेले वक्तव्य अगदी खरे ठरते आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: