गुरुवार, ९ जुलै, २०१५

सन्मार्गाला नेणारा मार्ग- पंढरीची वारी

पंढरीची वारी करणारा वारकरी हा देवाचीये द्वारी पोहोचत असतो. पंढरीची वारी म्हणजे आळंदी ते पंढरपूर हा मार्ग साक्षात जिवंतपणी वैकुंठाचे दर्शन घडवणारा प्रवास आहे. दशकानुदशके हा प्रवास सुरू आहे. अनेक दशके, शतके ही पंढरीची वारी दरवर्षी निघते आहे. पण या वारीला गेल्यावर कोणाला वाईट अनुभव आला आहे असे होत नाही. कारण हा सन्मार्ग आहे. ही वारी म्हणजे सन्मार्गाला लावणारा संप्रदाय आहे.लाखोंची संख्या असूनही इथे कधी ढकलाढकली होत नाही, चेंगराचेंगरी होत नाही कारण विठोब्बा सगळ्यांच्या जवळ असतो. त्यामुळे ढकलत जावून, घुसाघुसी करून दर्शन घेण्याची इच्छाच कोणाला होत नाही. वारीचा मार्ग हा पुणे शहरातून जातो, सासवडच्या घाटातून जातो, मुळा मुठा, कर्‍हा, नीरा, कृष्णा अशा नद्यांच्या प्रदेशातून जातो पण चंद्रभागेच्या तीरी या नद्यांचे तीर्थ जाते ते जनसागराला मिळते. भक्तीसागरात विलीन होते. तसा हा उलटाच प्रवास म्हणावा लागेल. म्हणजे प्रत्येक नदी ही उगमातून वाहते ती समुद्राला जावून मिळते. परंतु इंद्रायणी, मुळा, मुठा, कर्‍हा, नीरा, कृष्णा या नद्यांचे पाणी मात्र या वारीच्या मार्गाने भक्तीसागरात मिळते. हा प्रवास केल्यावर चंद्रभागेतील स्नान म्हणजे साक्षात सर्व नद्यांचे मिश्रण असलेल्या समुद्रस्नानाचा आनंद असतो. या चंद्रभागेत स्नान केल्यानंतर विठोबाचे दर्शन घ्यायचे म्हणजे आयुष्याचे सार्थक होत असते. पण लाखो वारकरी इथे कसे जमत असतात? त्याचे नियोजन कसे होत असते? एखादा शे दीडशे लोकांचा मोर्चा काढायचा म्हटले तरी तेवढाच पोलिस बंदोबस्त आपल्याला लागतो. पण लाखोंच्या या गर्दीत पोलिसांना पाचारण करण्याची वेळ कधी येत नाही. मग हे नियोजन नेमके होते कसे? कोणत्याही व्यावसायिक प्रशिक्षण महाविद्यालयात न जाता माऊलीवर विश्‍वास ठेवून हे नियोजन होत असते. साक्षात माऊली आपल्याबरोबर आहे, ज्ञानोबा माऊली आपल्याबरोबर आहे हा  विश्‍वास इथे असतो. त्यामुळे नियोजन हे व्यवस्थित होते. आळंदीतून जेव्हा ज्ञानोबांची पालखी या वारीसाठी निघते तेव्हा जो नामघोष होत असतो त्याने आपली सर्व ज्ञानेंद्रिये तृप्त होत असतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम तुकारामचा गजर आपल्या कानांना तृप्त करतो. श्रवणेद्रियांना तृप्त केल्यामुळे याची देही याची डोळा हा सोहळा पाहणार्‍याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत असतात. या आनंदात पावित्र्या निर्माण करणारा फुले, बुक्का, कापूर यांचा वास आपले ईश्‍वरी अधिस्ठान स्थिर करतो. कानांवर पडणार्‍या ग्यानबा तुकारामच्या जयघोषात आपला श्‍वास आणि रसना म्हणजे जीभ केव्हा सामील होते आणि त्या घोषात आपली जीभही नामस्मरण आणि जयघोष करते तेव्ही ती जीभही तृप्त होते. या सर्व ज्ञानेद्रियांना तृप्त करताना नकळत जोडले जाणारे हात हे आपले सर्वात मोठे ज्ञानेद्रिय म्हणजे स्पर्शज्ञान देणार्‍या त्वचेला आनंदी करते. त्याचा सगळीकडे प्रभाव होवून आपल्या कांतीवर एकप्रकारचे तेज झळकते. ही ब्रम्हानंदी टाळी लागलेली असतानाच आता चला जावू पंढरीला म्हणत ज्ञानोबांची पालखी बाहेर येते. त्याला निरोप देताना साक्षात कळसच हालून होकार देतो आणि डुलायला लागतो की काय असा भास प्रत्येक भाविकाला होतो. हा अनुपम असा आनंद असतो. मग अंगात वारे संचारल्याप्रमाणे तल्लीन होवून वारकरी पंढरीकडे निघतात. एकच ध्येय, चला जावू पंढरीला.  या पंढरीला जाण्यासाठी आणि वारकर्‍यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असतात. अनेक मठ काम करत असतात. त्याचप्रमाणे या वारकर्‍यांच्या सेवेसाठी म्हणून अनेकजण पुढाकार घेत असतात.  त्यामध्ये संत गाडगे महाराज संप्रदायाचे मठ, वारकर्‍यांच्या संस्था आणि संघटना कार्यरत असतात. यात अखिल भारतीय वारकरी मंडळ, कर्नाटक वारकरी संस्था, कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद, जागतिक वारकरी शिखर परिषद, तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था), दिंडी, वारकरी, फडकरी संघटना, देहू गाथा मंदिर (संस्था), फडकरी-दिंडीकरी संघ, राष्ट्रीय वारकरी सेनावारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ, ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा - दिंडी समाज, ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान ,वारकरी प्रबोधन महासमिती यांच्यासह अनेक संस्था मोठ्या उत्साहाने काम करत असतात.    या वारीमध्ये कोणताही सरकारी हस्तक्षेप नको असतो. परंतु तरीही पुणे, सातारा, सोलापूरचे प्रशासन मोठ्या उत्साहात मदतीसाठी आणि वारकर्‍यांच्या सेवेसाठी तयार असतात. अशी ही एकजूट फक्त वारीतच पहायला मिळते. वारीमध्ये असतो फक्त भोळा भाव. निर्व्यास श्रद्धा. वारीच्या मार्गावर चालताना आपल्यातला अहंकार आपण पायदळी तुडवत जातो आणि पंढरपूरला जाईपर्यंत तो पार गाडला जातो. मग समोरचा तो मोठा आपण छोटे असे म्हणता म्हणता आपण मोठे होतो. देव शोधावया गेलो, देव होवूनी आलो असे तुकाब्बारायांनी म्हटले आहे तसे प्रत्येक वारकर्‍याबाबत घडत जाते. कारण या वारीत माणसाचा फक्त अहंकारच गळत नाही तर भेदाभेदाच्या भिंती गळून पडतात. षडरिपूंचा नाश होतो आणि फक्त परमेश्‍वराचे चिंतनच महत्त्वाचे हे ज्ञान मिळत जाते. ते ज्ञान देण्यासाठी अनेक मोठे वारकरी विविध भक्तीमार्गांतून प्रबोधन करत असतात. त्यामध्ये कीर्तन आणि भारूड याला फार महत्त्व आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: