पंढरीची वारी केल्याने माणूस पापमुक्त होतो. कित्येकदा आपल्याला पाप म्हणजे नेमके काय हेच माहित नसते. आपण पाप करतो आहोत हेही माहित नसते. त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून पापकर्म घडत असते. या पापांपासून आपल्याला मुक्ती देण्याचे काम या वारीत होते. कारण पाप म्हणजे मनाची मलिनता असते. ही मनाची मलिनता धुवून टाकण्याचे काम नामस्मरणातून होत असते. हे नामस्मरण वारीत घडत असते. लाखो भाविक प्रत्येक सेकंदाला पांडुरंगाचे नाव घेत असतात. विठ्ठलाचे नाव घेत असतात. हरिनाम घेत असतात. यातून केवळ वारीतील वारकर्यांचीच नाही तर तो आवाज जेथपर्यंत पोहोचतो तेथील पापांचा नाश होत असतो. म्हणूनच आमची पंढरीची वारी ही पापविनाशी अशी वारी आहे. ही वारी म्हणजे वाहती निर्मळ गंगा आहे. ही गंगा पंधरा दिवसांच्या प्रवासात चंद्रभागेत येवून मिळते आणि सर्वांना पावन करते.
पाप म्हणजे नेमके काय? ते अगोदर समजून घेतले पाहिजे, म्हणजे माणूस पापापासून दूर राहिल. पाप, उपपाप आणि महापाप हे पापांचे तीन प्रकार आहेत. तर कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप हे पुन्हा पापांचे आणखी उपप्रकार आहेत. खोटं बोलणं, लोकांची निंदा करणं, चहाडी करणं, दुस-यांबद्दल अपशब्द उच्चारणं, अयोग्य पदार्थ खाणं या सर्व गोष्टींचा समावेश पापांमध्येच होतो. हे अवगुण टाळण्यासाठी मुखी असावे हरिनाम. हरिनामात व्यस्त झाल्यावर या गोष्टी हातून घडणारच नाहीत.
हरी उच्चारणी अनंत पापराशी| जातील लयाशी क्षणमात्रे॥ तृण अग्निमेळे समरस झाले| तैसे नामे केले जपता हरी॥ हरी उच्चारण मंत्र पै अगाध| पळे भूतबाधा भय तेणे॥ ज्ञानदेव म्हणजे हरी माझा समर्थ्| न करवे अर्थ उपनिषदा॥ अत्यंत सोप्या भाषेत ज्ञानोबांनी पापापासून दूर राहण्याचे तंत्र सांगितले आहे. भगवंतांच्या नामाशी जो विन्मुख असेल तोच खरा पापी आहे, असं हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वरांनी ठामपणे सांगितलं आहे. या अभंगात मात्र ते अशी कोणतीही पापं झालेली असतील तर ती पापं जळून जाण्याचा उपाय सांगितलेला आहे.
आपल्याला सर्वाना सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती पापाची. आपल्या जीवनामध्ये येणार्या दु:खाचं कारण हे पाप आहे, असं अनेक पिढयांपासून आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. पाप पळवण्यासाठी अनेक कर्मकांडाची वर्णनं इतर शास्त्रात आलेली आहेत. मात्र वारकरी संतांनी पाप पळवण्याचा मार्ग दाखवला नाही, तर पाप जाळण्याचा मार्ग दाखवला आहे. कारण पळालेलं पाप पुन्हा येऊ शकतं. ते जळल्यास मात्र पुन्हा येण्याची सुतराम शक्यता नसते. म्हणून ज्ञानदेवांनी म्हटले आहे की,
हरी उच्चारणी अनंत पाप राशी| जातील लयाशी क्षण मात्रे|
या ठिकाणी हरिनामाच्या उच्चाराने एक पाप जळेल असं म्हटलेलं नाही, तर पापाच्या अनंत राशी जळून जातील, असा उल्लेख केलेला आहे. ज्या अर्थी ‘अनंत’ असा उच्चार करतात त्या अर्थी पापाचे अनेक प्रकार असले पाहिजेत. तसे ते आहेतही. अभक्ष भक्षण, सुरापान, परदारागमन अशा पापांचा यात समावेश आहे. तसेच दुसर्याची निंदा, चहाडी, वाईट उच्चारण याला ‘वाचिक पाप’ म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आणि धोक्याचं आहे ते मानसिक पाप.
मानसिक पापाचं उदाहरण म्हणजे, एका वेश्यांच्या वस्तीत भगवान शिवाचं मंदिर असतं. या मंदिराचा पुजारी सोवळयाने शिवाची पूजा करत असे. तेव्हाच मंदिरासमोरच्या बंगल्यात राहणारी वेश्या अंघोळ करून केस सुकवत असे. तिचं लक्ष मंदिरातील शिवपिंडीकडे असे. कालांतराने दोघांचंही देहावसान होतं. तेव्हा पुजार्याला घेऊन जाण्यासाठी यमदूत, तर वेश्येला घेऊन जाण्यासाठी शिवदूत येतात. यमदूत पुजार्याला मारत-झोडत तर शिवदूत वेश्येला सन्मानाने घेऊन जातात. ज्याने जन्मभर पूजा केली त्याला घेऊन जायला यमदूत आणि जिने वेश्येसारखं निंद्य समजलं जाणारं कर्म केलं, तिला घेऊन जायला शिवदूत आले. याचे कारण ‘पुजारी सकाळी अंघोळ करून मंदिरामध्ये पूजेला बसायचा. पण त्याचं चित्त वेश्येकडे असायचं. तिच्याविषयीच्या वाईट भावना त्याच्या मनात यायच्या. वेश्येच्या मनात मंदिरातील पूजेविषयी चिंतन सुरू असायचं. ती विचार करायची, ‘किती हा पुजारी भाग्यवान आहे? त्याला सतत शिवाची पूजा करता येते. बिल्वदल वाहता येतात. मी जर त्या ठिकाणी असते तर अशी पूजा केली असती! तसंच बिल्वपत्र वाहिली असती. म्हणजे उभी वेश्यालयात आणि मनात मात्र भगवंत म्हणून तिला घेऊन जायला शिवदूत आले. तर अशा प्रकारे मानसिक पाप जरी घडलेलं असेल त्याची दाहकता हरिनाम उच्चारण्याने कमी होते. ज्याप्रमाणे गवताची गंजी एका अगीच्या काडीने जळून खाक होते, त्याचप्रमाणे कायीक, मानसिक पाप हरिनाम स्मरणाने जळून जातं. ही पापे नष्ट करण्याची ताकद या वारीच्या मार्गावर आहे. म्हणून पंढरीची वारी ही पापविनाशी गंगाच आहे. गंगेत मारलेली डुबकी आणि हरीनामाच्या या वारीत घेतलेला मानसिक आनंद हा आपल्याला सम्मार्ग दाखवून पवित्र करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा