संतांच्या संगतीत परमेश्वराचे दर्शन
वारीमध्ये जाणे म्हणजे खरा सत्संग असतो. संतांची संगत लाभते. फार मोठा आनंद असतो हा. लोणंदपासून वाखरीपर्यंतचा प्रवास तर संतांच्या संगतीत समुद्राला भरती यावी असा असतो. याचे कारण संतांच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते. संत सतत भगवंतांच्या नामाचे उच्चारण करीत असतात. जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते, तिथेच आपण राहतो, असे भगवंत स्वत: गीतेमध्ये सांगतात. भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही. ज्या लोकांना या नामाचे महत्त्व पटले, तेच हरिपाठात दंग होतात. संतांच्या संगतीत राहून नामात दंग होतात. तेच मनोमार्गाने हरीला आपलेसे करू शकतात. दींडीतील या नामस्मरणाचे हेच खरे महत्त्व आहे. संतसंगतीचे हे महत्त्व दिंडीत प्राप्त होते.
संतांचे संगती मनोमार्ग गती| आकळावा श्रीपती येणे पंथे॥ १्॥
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा| आत्मा जो शिवाचा रामजप॥ २्॥
भगवत प्राप्तीसाठी ही सतसंगती वारीमध्ये लाभते. संतांची संगत म्हणजेच सन्मार्ग असतो. या मार्गावरून प्रवास करत असताना आभाळातून होणारा वर्षाव म्हणजे साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो. हरिपाठात म्हटले आहेच की, एक तत्त्व नाम साधीती साधन| द्वेताचे बंधन न बाधिजे॥ ३्॥
नामा अमृत गोडी वैष्णवा लादली| योगिया साधली जिवनकळा॥ ४्॥
सत्वर उचार प्रल्हादी बिंबला| उद्धवा लादला कृष्ण दाता॥ ५्॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ| सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥ ६्॥
हरिपाठामध्ये संत संगतीचे हे महत्त्व जागोजागी पटवून देण्यात आले आहे. संत हे जगाला योग्य मार्ग दाखवत असतात. खर्या संतांची संगत लाभली तर मनाच्या वेगाने भगवंतांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. हा मार्ग वारीचा आहे. संतांच्या संगतीनेच साक्षात श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती म्हणजे भगवंत आपल्याला भेटतो. भगवंतापर्यंत पोहोचवणारी शिडी म्हणजे संत असतात. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर संतांच्या संगतीशिवाय घडू शकत नाही.
संत तुकाराम महाराजांनी आपल्याला भगवंत कसा कळला हे सांगताना एके ठिकाणी म्हटले आहे की,
संत दर्शने हा लाभ| पद्मनाभ जोडला॥
संताच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते कारण संत सतत त्याच्या नामाचे उच्चारण करीत असतात.हे नामस्मरण वारीमध्ये होत असते. त्यामुळे वारीच्या मार्गावरील प्रत्येकाला भगवंताचा मार्ग दिसत असतो. काहींना नामस्मरणाने तर काहींना श्रवण केल्याने. काहींना संतसंगतीने हा मार्ग दिसतो. भगवंताच्या सानिध्यात घेवून जातो. जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते, तिथेच आपण राहतो, असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगतात. आपण वैकुंठामध्ये राहत नाही. योग्यांच्या मनातही आपण नसतो. यावर भगवंताला अर्जुनाने विचारले आहे की , तू कुठे असतो. तेव्हा भगवंत सांगतात, जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला असतो, तिथे मी असतो. हाच घोष आपल्या वारीत सातत्याने असतो. त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान तिथे जाणवल्याशिवाय रहात नाही. गीतेतील भगवंतांच्या मुखातील भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अलगद पकडली आहे. ओघवत्या आणि रसाळ भाषेत ज्ञानेश्वरांनी आपल्या भावार्थ दीपीकेत म्हटले आहे की भगवंत म्हणतात,
मी तो वैकुंठी नसे| एक वेळ भानुबिबीही न दिसे॥
वरी योगियांची माणसे| उमरोडोनी जाय॥
जे गीतेमध्ये श्रीकृष्णाने संस्कृृतमध्ये सांगितले ते ज्ञानोबांनी प्राकृत भाषेत सहजपणे सांगितले आहे. भगवंत म्हणतात, मी वैकुंठात नसतो. सूर्याची किरणे जिथपर्यंत पोहोचली आहेत. तिथे जरी मला शोधण्याचा प्रयत्न केला, तरी सापडणार नाही. मग अर्जुनाने विचारले, देवा तू कुठे असतोस ते सांग. याचे वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात की अर्जूनाला तेव्हा भगवंत सांगतात,
परी तयापाशी पांडवा| मी हरपला गिवसावा|
जेथ नामघोषण बरवा| करीती ते माझे॥
मी हरपलेला तुम्हाला तिथे सापडेन जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला आहे. संतांच्या मुखात सतत भगवंतांचे नाव सुरू असते. नामस्मरणातच देवाला सुख वाटते. म्हणून ते सुख मिळविण्यासाठी तो संतांच्या घरी वास्तव्याला येतो.
वारी हा संतांचा सागर असतो. तो आपल्या भगवंताचे सानिध्यात नेणारा मार्ग आहे. हेे सांगताना एकनाथ महाराजांनीही म्हटले आहे की,
ज्या सुखा कारणे देव वेडावला| वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला॥
अशी ही संतांची संगती लाभते त्यालाच पंढरपूरची वारी म्हणतात. आज दहा दिवस जे अशा संतांच्या संगतीत वारीमध्ये आहेत त्यांना साक्षात श्रीहरीचा वास लाभला आहे. एकादशीपर्यंत या श्रीहरी विठ्ठलाबरोबरच आमचे वारकरी पंढरपुरात दाखल होतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा