केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०१४ मध्ये घेतलेल्या परीक्षेत यावेळी मुलीच सरस ठरल्या आहेत. तसे दहावी, बारावी परिक्षांचे निकाल लागल्यावरही यशाचे प्रमाण मुलींचे जास्त असते. सर्वत्र मुलीच पुढे आहेत ही एक जमेची बाजू ठरते आहे. म्हणजे राज्यात आणि देशात दर हजारी मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण कमी असले तरी यशाच्या बाबतीत मुलींचे प्रमाण जास्त आहे यातून देशाला सामाजिकदृष्ट्या चांगले दिवस येतील यात शंकाच नाही. गेल्या चार पाच वर्षात मुलींबाबत सकारात्मक दृष्टीने पाहिले जाते आहे. स्त्रीभृणहत्यांना होणारा विरोध, त्याबाबतची जनजागृती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. त्याचा हा परिणाम आहे. यामध्ये सरकारबरोबरच सामाजिक सेवाभावी संस्थांचेही यश आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन तीन वर्षात लोकप्रिय होणार्या मराठी मालिकांमध्येही नायिका गरोदर असल्यावर तिला मुलगी व्हावी अशी अपेक्षा केली जाते. कथानकात तशी गुंफण केली जाते ही सकारात्मकता निर्माण केली जात आहे, त्याचाही या यशात समावेश आहे. अगदी आजच्या लोकप्रियतेच्या आणि टिकेच्या शिखरावर असलेल्या होणार सून मी या घरची मालिकेतील जान्हवीला मुलगी होणार असल्याचे गृहीत धरले जात आहे, तिच्या मुलीच्या स्वागतासाठी सगळे आतूर आहेत ही भूमिकाही महत्त्वाची आहे. यामुळे मुलींना उच्चशिक्षणाला प्रोत्साहन न देणे या दृष्टीकोनाला छेद दिला गेला आहे. त्यामुळेच लोकसेवाआयोगाच्या निकालात मुलींचे यश हे फार कौतुकास्पद आहे. प्रेरणादायी आहे. पहिल्या पाचांत मुलींनी चार क्रमांक पटकावून बाजी मारली आहे. ही गोष्ट मुलगा मुलगी भेद कमी करण्यास अत्यंत पोषक आहे. ईरा सिंघल, रेणू राज, निधी गुप्ता, वंदना राव या त्या यशस्वी मुली आहेत. त्यांचे आणि त्यांच्या आई वडिलांचे यासाठी अभिनंदन करायला हवे. त्याचप्रमाणे पुण्याच्या अबोली नरवणे हिने महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून मुलींच्या यशाची पताका फडकावली आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांनी यशाचे खणखणीत शतक साजरे करत या परीक्षेत राज्याच्या यशाचा टक्का वाढवला आहे. यामध्ये मुलींचे योगदान फार मोठे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. ‘मराठी पाऊल पडते पुढे...’ या उक्तीचा प्रत्यय त्यामुळे आला आहे. त्यात आता मराठी पाउल पडते मुलींमुढेही पुढे हे वाढवले पाहिजे. एक काळ असा होता की प्रशासकीय सेवेत काम करणारे, फक्त बिगर मराठी असायचे. हे आपले काम नाही असाच समज होता. तो आता समज खोटा ठरवला जात आहे आणि मराठी तरूणही या सेवेत सामील होत आहेत, स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळवत आहेत. गेल्या दहा-पंधरा वर्षांत महाराष्ट्राचा या परीक्षेतील यशाचा टक्का पंचाहत्तरीपर्यंतच घुटमळत होता. पण यंदा यशस्वी उमेदवारांची संख्या शतकपार झाली आहे. अर्थात यामध्ये रँकिंग मात्र घसरले आहे, इकडे डोळेझाक करून चालणार नाही. पण तरीही हा आकडा वाढला आहे हे महत्त्वाचे आहे. दरवर्षी पहिल्या पन्नासात राज्याचे विद्यार्थी असतात. यावेळी पहिल्या शंभरात चारच उमेदवार येऊ शकले ही काहीशी नाराजीची बाब आहे. अलिकडे विशेषत गेल्या दहा वर्षात स्पर्धा परीक्षांकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढत आहे. म्हणजे मराठी बाणा जसा तरूणांचे आकर्षण झाले तसेच अनेक राजकीय पक्षांनीही यासाठी सराव परिक्षा घेणे, या परिक्षांची माहिती देण्यासाठी प्रबोधन करणे याकडे लक्ष दिले आहे हे नाकारून चालणार नाही. शिवसेना, मनसे, नितेश राणे यांची स्वाभीमानी संघटना यांनी याबाबत जनजागृती केली आहे. राजकारण व्यतिरीक्त केलेले काम महत्त्वाचे आहे. राज्यातून ६० हजार उमेदवार पूर्वपरीक्षेला बसले होते. मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक ठिकाणी राज्य सरकारची सनदी सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रे कार्यरत आहेत. स्वयंसेवी संस्था तसेच खासगी केंद्रांची संख्याही वाढत आहे. यामुळे मुलींना प्रोत्साहन मिळत आहे. यामध्ये उत्तुंग यश मिळवणार्या दिल्लीच्या ईरा सिंघल व निधी गुप्ता सध्या भारतीय महसूल सेवेत अधिकारी आहेत. रेणू राज कोल्लमच्या रुग्णालयात कामास आहे. महाराष्ट्राची अबोलीदेखील भारतीय महसूल सेवेत गेल्यावर्षी दाखल झाली. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना आणखी पुढे जाण्याची त्यांची जिद्द प्रशंसनीय आहे. कठोर परिश्रम घेण्याची तयारी आणि प्रबळ इच्छाशक्ती असेल तर यशाला गवसणी घालता येते हेच या उदाहरणांवरून स्पष्ट होते. हे यश मुलीसुद्धा सहज साधनेने साध्य करू शकतात हे महत्त्वाचे आहे. मुलाखतींनंतर अवघ्या चारच दिवसात हा निकाल घोषित झाला. दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये मुलींचाच डंका वाजतो. आता तो स्पर्धा परीक्षांमध्येही वाजला आहे. मुलांच्या तुलनेत मुली कुठेही कमी नाहीत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. आधुनिक युगातही ‘मुलगाच हवा’ असा हट्ट धरून बसलेल्या आणि ही मानसिकता जोपासत स्त्रीभ्रूणहत्येची पातके करणार्या पालकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे चित्र आहे.
सोमवार, ६ जुलै, २०१५
हम किसीसे कम नही
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा