वारीतील नामस्मरणाचे महत्त्व
आपल्याकडे आजपर्यंत जेवढी म्हणून धार्मिक कार्य होतात, त्यांना काळवेळेची बंधनं असतात. मात्र, भगवंत नामाला काळवेळेचं बंधन नसतं. ते केव्हाही कुठंही घेता येतं. भगवंत नामस्मरणामुळे मानसिक समाधान लाभतं. त्यामुळेच नामस्मरण घेणे हे अत्यंत सोपे आहे. आपली सर्व कर्म, कर्तव्य पूर्ण करून नंतर जरी नामस्मरण केले तरी चालते. वारीमध्ये सतत भगवंताच्याच सानिध्यात असल्यामुळे सतत नामघोष होत असतो. त्याला कधीच वेळकाळाचं बंधन नसतं. आता देवांच्या झोपेची वेळ झाली आहे म्हणून रात्री अपरात्री नामस्मरण करायचे नाही असे कधी होत नाही. आता काय पहाट आहे, कशाला देवाला डिस्टर्ब करा सकाळ सकाळ असे कधी भगवंताला वाटत नाही. त्यामुळे आपण केव्हाही त्याचे नाव घेवू शकतो. इतकी सोपी आणि सोयीची ही भक्ती आहे. या नामस्मरणाच्या ताकदीवर तर वारी चालत असते.
काळवेळ नाम उच्चारित नाही| दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण्| जडजीवा तारण हरी एक॥
हरीनाम सार जिव्हा या नामाची|उपमा त्या देवाची कोण वाणी॥
ज्ञानदेव सांग झाला हरीपाठ्| पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा॥
नामस्मरण, जप याचे महत्त्व फार असल्यामुळेच असा जप करणार्या लोकांच्या गळ्यात ही नामजपाची माळ असते. आम्ही माळकरी आहोत. आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. याचा अर्थ सतत आणि केव्हाही आम्ही हरिनाम घेवू शकतो याचा तो भगवंताने दिलेला अधिकारच आहे. नामसाधनेतील सुलभता ही अभंगांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. इतर सर्व साधनांना काळवेळेचं बंधन असतं. अगदी आपल्या संसारी व्यवहारातही काळवेळ आणि मुहूर्त पाहूनच कार्य केलं जातं. अगदी विवाह, मौंजीबंधन, गृहप्रवेश या सर्व सोहळ्यासाठीही मुहूर्त पाहिला जातो. कोणता मुहूर्त चांगला हे पाहिलं जातं. धार्मिक कार्यातही तो विशिष्ट काळात आणि विशिष्ट पद्धतीने करावा, अशी अपेक्षा असते. ‘जगामधले एकमेव साधन असं आहे, की त्याला काळवेळेचं बंधन नाही. ते म्हणजे भगवंताचं नाम. कोणताही मुहूर्त न पाहता, कोणताही विशिष्ठ दिवस न पाहता, ना तिथीची गरज आहे ना नक्षत्राची गरज आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण नामस्मरण करू शकतो. कारण नामस्मरणासाठी कोणत्याही काळवेळेचं बंध नाही. म्हणूनच संत ज्ञानदेव म्हणतात की,
काळवेळ नाम उच्चारित नाही| दोन्ही पक्षपाही उद्धरती॥
या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वरांनी काळवेळेचं बंधन नाही हे सांगितले आहे तर दुसर्या ओळीमध्ये नामस्मरणाचा फायदा सांगितलेला आहे. भगवंताच्या नामाचे स्मरण केले, तर आई आणि वडिलांकडील दोन्ही कुळांचा उद्धार होतो. उद्धाराचा सोपा मार्ग हा नामस्मरणातच आहे. इतका हा सोपा भक्तीमार्ग वारकरी संप्रदायातील आहे.
आपल्याकडून काही दोष घडले असतील तर त्या दोषांचं हरण करण्याचाही एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. दोष हरणाचे अनेक मार्ग आहेत. योगाच्या माध्यमातून दोषांचं हरण होतं. पण योग किती अवघड आहे. तो योग्य प्रमाणात केल्यानंतरच दोषांचं हरण होतं. मात्र तो करताना त्यांच्या नियमात, काळवेळेत फरक झाला तर दोषांचं हरण होण्यापेक्षा नवीन दोष लागण्याचीच शक्यता जास्त असते. मात्र नामसंकीर्तनाला काळवेळेचं बंधन नाही. स्थळकाळाचं बंधन नाही. हरिनामामध्येच जिव्हा सतत रत असली पाहिजे. किंबहुना जगात हरिनाम हेच एकमेव सारभूत असल्याने त्यात रमून जाण्याने जिवाचा उद्धार होतो. म्हणून सार काय असार काय, याची निवड करता आली पाहिजे.
‘सार’ म्हणजे अस्सल आणि टाकाऊ तांदळावरील टरफल म्हणजे ‘असार’. लोणी म्हणजे सार असून, ताक म्हणजे असार आहे. जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला सार स्वरूपात मिळत नाही, तर ती असारामध्ये वेष्टीत झालेली असते. नारळाच्या आतील खोबरं सार आहे, पण ते करवंटीशिवाय मिळत नाही, केळीच्या आतील गाभा असार आहे, पण तो सालीशिवाय मिळत नाही. भगवंताचं नाम हे एकमेव असं साधन आहे की,
त्याच्यासोबत कोणताही असार पदार्थ नाही. इतके महत्त्व या नामस्मरणात आहे. म्हणूनच वारीमध्ये चालताना सतत नामस्मरण केले जाते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी? या नामस्मरणाने, मुखात हरिनाम घेतल्याने किती पुण्याचा संशय होतो याची गणना कधीच होवू शकत नाही. अशा अगणित पुण्याचा संचय करण्याचा पर्वकाळ म्हणजे पंढरपूरची वारी. तुकाराम महाराजही म्हणतात.
सारासार विचार करा उठाउठी| नाम धरा कंठी विठोबाचे॥ भगवंताचं नाम सर्व सारभूत असल्यामुळे त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्याला इतर कशाचीही उपमा देता येणार नाही. हे नाम आपला तर उद्धार करतंच; परंतु आपल्या पूर्वजांचाही उद्धार करतं, असे वचन ज्ञानदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देतात. या अभंग भक्तीलाच नामस्मरण म्हणतात. हे नामस्मरण हा वारीचा पाया आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा