बुधवार, ८ जुलै, २०१५

पाउले चालती, पंढरीची वाट

ज्ञानेश्‍वर माउलींची आणि तुकोब्बारायांची वारी आज आळंदीतून निघते आहे. प्रत्येक माणसाने जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात एकदा तरी वारीचा आनंद आणि अनुभव घेतला पाहिजे इतका सुंदर असा हा सोहळा असतो. माणसाला स्वत:ला विसरायला लावणारा आणि परमेश्‍वराकडे घेवून जावून त्याची अनुभूती देणारा असा निखळ आनंद देणारा कालावधी म्हणजे हा पंढरपुरच्या आषाढी वारीचा काळ. प्रत्येकजण या वारीला जावू शकत नाही म्हणून आपण ही शब्दरूपाने पंधरा दिवसांची वारी करायची आहे. त्यातूनही चांगली अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.   वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणार्‍या लोकांचा संप्रदाय. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते. आषाढी वारी ही दरवर्षी ज्येष्ट महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात वद्य एकादशीच्या अगोदर दोन दिवस निघते आणि आषाढी एकादशीच्या आधी एक दिवस पोहोचते. परंतु यावर्षी आषाढ महिना अधिक आल्यामुळे ती ज्येष्ठात न निघता आषाढ अधिक महिन्यातील वद्य अष्टमीला सुरू होत आहे. अधिकस्य अधिकंम फलम म्हणतात त्याप्रमाणे हा पुरूषोत्तम मासात आलेला दुग्धशर्करा योग आहे. म्हणून यावर्षीच्या वारीचे वेगळेपणही अधिक असे आहे.   संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत. खर्‍या अर्थाने समतेची शिकवण देणारा असा हा वारकरी संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. एकमेकांच्या पाया पडताना दोघेही आनंदी होत असतात. लहान बालकालाही खाली वाकून मोठा वयस्कर माणूस पाया पडत असतो. कारण इथे भाव फार महत्त्वाचा आहे. श्रद्धेवर चाललेली ही अनेक दशकांची प्रथा आधुनिक काळातील चमत्कार म्हणावा लागेल. कारण लाखोंच्या संख्येने येणार्‍या या वारकर्‍यांमध्ये प्रत्येक वारकर्‍याला दिसत  असतो तो फक्त विठोब्बा. विठूमाउलीशिवाय वारकर्‍याला काहीच दिसत नसते. कणाकणात ईश्‍वर सामावला आहे, कणाकणात पांडुरंग आहे, प्रत्येक जीवमात्रांमध्ये विठूमाउली आहे हा भाव प्रत्येकाच्या मनात असतो. त्यामुळे इथे भेदभाव सगळे संपुष्टात येतात आणि अवघी वारीची विठ्ठलमय होवून जाते. त्यामुळे दिसणार्‍या प्रत्येकात विठ्ठल दिसत असतो. प्रत्येक दृष्य गोष्टीत विठ्ठल दिसत असतो. त्यामुळे त्याच्यापुढे लोटांगण घालताना, पाया पडताना कधीच लहान मोठा असा विचार कोणाच्या मनात येत नाही. अशा या वारीच्या प्रवासात प्रत्येकाला कुठे ना कुठे तरी विठ्ठलाचे दर्शन घडतच असते. वारीमध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्त्व आहे. वारकर्‍याच्या मुखातून सतत नामस्मरण होत असते. विठोब्बा माउलीचे नामस्मरण होत असते. पांडुरंग पांडुरंग असा जप करता करता तो दंग होवून जातो, त्याला सगळ्या संसाराचे,जागाचे विस्मरण घडते आणि आणि साक्षात पांडुरंग म्हणता म्हणता दंग होवून जातो. कोणतेही फार मोठे अवडंबर माजवण्यापेक्षा केवळ नामस्मरणाने पुण्यप्राप्ती होते याचे ज्ञान वारकर्‍याला असते. नवविधाभक्तीमध्ये नामस्मरणाचे जे महत्त्व सांगितले आहे, ते वारकर्‍यांचे जीवन बनते. नामजपाने पुण्य मिळते हा भाव इथे आहे. परमेश्‍वराचे पांडुरंगाचे नामस्मरण घेताना पुढे पुढे पडणारी पावले कधी चालून थकत नाहीत. त्या पावलांना येणारा थकवा साक्षात माउली घालवते एवढा विलक्षण असा विश्‍वास वारकर्‍यांचा असतो. म्हणूनच वारकरी कधी वारी केल्यानंतर थकलेले दिसत नाहीत तर तेजस्वी आणि आनंदी दिसतात. इतक्या लांब चालत येवून दर्शन घेताना त्या वारकर्‍याच्या डोळ्यातून येणारे आनंदाश्रू म्हणजे साक्षात पांडरंगाच्या पायावर केलेला अभिषेक असतो. पंचामृताच्या अभिषेकापेक्षा अत्यंत आनंद देणारा हा अभिषेक असतो. हा आनंद प्रत्येकाला घेता आला पाहिजे.कुठलीही अंधश्रद्धा नसलेला हा संप्रदाय आहे. जनजागृती आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणारा हा संप्रदाय आहे. त्यामुळेच अतीशय नियोजनबद्ध पद्धतीने ही वारी आपले ध्येय साध्य करत असते. पण जास्तीत जास्त वार्‍या करणे हे वारकर्‍याचे आनंदाचे साध्य असते. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागेतस्नान, आणि दर्शन विठोबाचे करायचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत. ही वारी आजकाल संपूर्ण जगाला आकर्षित करत आहे. भारत हा जगाचा अध्यात्मिक गुरू आहे असे बोलले जाते. आज वारीनेही हे खरे करून दाखवले आहे. कारण या वारीत चालत पंढरपूरला जाण्यासाठी म्हणून अनेक परदेशी पर्यटक देश विदेशातून येतात. आकर्षण म्हणून, गम्मत म्हणून पहायला येणार्‍या या परदेशी नागरिकांना न भुतो न भविष्यती आनंद मिळतो. पाश्‍चिमात्य भोगवादी संस्कृतीतून आलेल्या या लोकांना त्यागाची आणि सहिष्णूतेची समृद्ध संस्कृती आणि आनंद या वारीतून मिळतो. ज्ञानेश्‍वरांनी विश्‍व स्वधर्म सूर्ये पाहो, अशी पसायदानात मागणी करून जी विश्‍वकल्याणाची प्रार्थना केली आहे, ती विश्‍वातील ठिकठिकाणचे लोक इथे वारीत सामील होण्याने पूर्ण होताना दिसते. त्यांनाही त्याचे महत्त्व पटले आहे, हे आम्ही जाणून घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: