शुक्रवार, ३१ जुलै, २०१५

चमकू प्रवृत्तीचे लोक आणि प्रसारमाध्यमे जबाबदार

  •   मुंबई बॉंम्बस्फोटातील गुन्हेगार ( हो त्याला फाशी झाली म्हणजे तो गुन्हेगारच, आता आरोपी असा उल्लेख करण्याचे काहीच कारण नाही. अनेकांनी या बातम्यांमध्ये त्याचा उल्लेख आरोपी केल्यामुळे सखेद आश्‍चर्य वाटले म्हणून हा कंस टाकला.) याकूब मेमनच्या फाशी प्रकरणात त्याचे फारच कौतुक केले गेले. विशेषत: इलेक्ट्रानिक्स मिडीयाने त्याचे फार कौतुक केले. एबीपी माझा या मराठी वाहिनीबाबत जरा आदर वाटत होता, पण गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे प्रक्षेपण त्यांनी दिवसभर दाखवून काय साध्य केले?     याकूबचे शव माहीमला येणार व तिथून ते अंत्यविधीसाठी ६ वा. मरिन लाईन येथील बडा कबरस्तानमध्ये नेले जाणार असे जाहीर झाले होते. नागपुरात फाशी दिलेल्या शवाची रवानगी मुंबईल होणार हे सांगतानाही एबीपी माझा अगदी आमचा प्रतिनिधी त्याच विमानाने येत आहे हे अभिमानाने सांगत होता याची खरं तर लाज वाटली. किती हे गुन्हेगारीचे उदात्तीकरण? याचे परिणाम काय होतील याचा विचार या माध्यमांनी केला आहे काय? याकूबवर हळहळणारे जर यातून काही पडसाद उमटले तर त्याची जबाबदारी घेणार आहेत काय?
  • याकूबच्या अंत्ययात्रेला बंदी होती. गृहखात्याने, न्यायव्यवस्थेने तसे स्पष्ट आदेश दिले होते. तरीही ती अंत्ययात्रा निघाली. हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले. याचा नेमका अर्थ काय काढायचा? या देशात कायदा न मानणारे लोक आहेत? आपल्या न्यायव्यवस्थेला काहीच अर्थ नाही? का मूठभर विद्वानांनी याकूबचे समर्थन केल्यामुळे हे उदात्तीकरण केले गेले? असे असेल तर कोळसे पाटील ते गिरीश कुबेर अशा विद्वानांचे जाहीर सत्कार केले पाहिजेत. म्हणजे यापुढे गुन्हेगार, देशद्रोह्यांचे समर्थन करणे हे पवित्र कार्य आहे असा संदेश तरी जाईल.
  •  याकूब मेमनच्या घराच्या व माहीम चर्चपर्यंतच्या परिसरात हजारो लोक जमले होते. फेसबुक, व्हॉटसअपवरून ते फोटोही प्रसिद्ध झाले. हे लोक फक्त माहीमचे नव्हते. खूप लोक बाहेरुन आले होते. ते याकूब मेमन अमर रहेच्या घोषणा देत होते. स्त्रिया अशा प्रसंगात कमी असतात. पण इथे स्त्रियाही लक्षणीय होत्या. त्याही घोषणा देत होत्या. या कार्यकर्त्यांना हा माहौल नवीन होता. त्यांना वातावरणात खूप ताण व काहीशी भीतीही जाणवत होती. याकूब मेमनच्या घराजवळ राहणार्‍या एका व्यक्तिच्या म्हणण्यानुसार याकूब मेमन गुन्हेगार होता, हे कोणाच्याही गावी नव्हते. मुस्लिम म्हणून त्याला लक्ष्य करण्यात आले, इतर समाजाच्या तुलनेत आम्हाला असेच लक्ष्य करण्यात येते अशी रागाची भावना लोकांच्या मनात ठसठसते आहे. हे ठसठसणे काय रीतीने बाहेर येईल, याबाबत त्या व्यक्तिला भय वाटत होते.
  •    काल संध्याकाळी मुंबईतल्या त्या भागात खूप विरळ लोक रस्त्यावर होते. पोलीस बंदोबस्त मात्र जोरात होता. पण या वातावरणावरून एक प्रकारचा असंतोष, खदखद सर्वत्र असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या खदखदीला टिव्हीवर बोलायला मिळते म्हणून वाटेल ते बरळणारे चमकू प्रवृत्तीचे लोक आणि प्रसारमाध्यमे जबाबदार आहेत.

गुरुवार, ३० जुलै, २०१५

अण्णा भाऊ साठे

  •   तुकाराम भाऊराव साठे ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांची १ ऑगस्ट ही जयंती. अण्णाभाऊ साठे हे मराठी लेखक व समाजसुधारक होते. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला त्यांची ओळख आहे. लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रतिमा आहे. ग्रामीण ढंगातील रांगड्या तमाशाला लोकनाट्य हे बिरुद शाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दिले.
  •  अण्णा भाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतून निर्माण झालेल्या मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याच्या नवनिर्मितीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, अमर शेख व शाहीर कॉ. द.ना. गव्हाणकरांचे मोलाचे योगदान होते. अण्णा भाऊ साठे हे अंतर्बाह्य मार्क्सवादी होते. अण्णा भाऊ साठे म्हणजे विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व होते. वैयक्तिक दु:खांचा विचार न करता आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे ते लोकशाहीर होते. शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व.
  •    बंगालचा दुष्काळ, तेलंगण संग्राम, पंजाब-दिल्लीचा पोवाडा, अंमळनेरचे हुतात्मे, काळ्या बाजाराचा पोवाडा, ’माझी मैना’ हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील छक्कड, कामगार चळवळीवरील ‘एकजुटीचा नेता’ ते हिटलरच्या फॅसिझम विरोधात स्टॅलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, चिनी क्रांतीवरील ‘चिनी जनांची मुक्तिसेना’ हे गौरवगान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील गाजलेले ‘जग बदल घालुनी घाव-सांगुनी गेले भीमराव’ हे गाणे, अशी अनेक गाणी, कवने, पोवाडे अण्णा भाऊ साठे यांनी रचले. त्यांनी आपल्या गाण्यांतून, पोवाड्यांतून अनेक सामाजिक, राजकीय प्रश्नांना, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्याचे महान कार्य केले आहे.
  •     सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. अण्णा भाऊ साठे यांच्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत. लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले. चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
  •   विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलिशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले.
  •    या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वाटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वाटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
  •      भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हेदेखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
  •    १९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली. सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले. इ.स.१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॅलिनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत. मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तमीळ, मल्याळी या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलिश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.

लोकमान्य

  •  लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रगण्य राजकीय पुढारी होते. भारताच्या स्वातंत्र्य लढयाचे आद्य प्रवर्तक म्हणून त्यांना ओळखले जात होते. भारतीय असंतोषाचे जनक अशी ब्रिटीशांपुढे त्यांची प्रतिमा निर्माण झालेली होती. या व्यतिरीक्त एक गणितज्ञ, खगोलतज्ञ, राजकीय तत्त्वज्ञ, पत्रकार, संपादक, लेखक, वक्ते आणि स्वातंत्र्यसेनानी होते. अशा या बहुढंगी व्यक्तिमत्वाला म्हणूनच प्रचंड लोकप्रियता लाभली. त्यामुळेच लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो.
  •        लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै इ.स. १८५६ मध्ये रत्नागिरीमधील मधल्या आळीत, एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. 
  • त्यांचे वडील गंगाधर रामचंद्र टिळक प्रसिद्ध शिक्षक आणि संस्कृत पंडित होते. लहानपणापासूनच टिळक अत्यंत हुशार विद्यार्थी होते आणि त्यांना गणितामध्ये विशेष गती होती. टिळकांना लहानपणापासूनच अन्यायाबद्दल चीड होती. वयाच्या दहाव्या वर्षी गंगाधर टिळकांची बदली पुण्याला झाली. पु्ण्यातील वास्तव्याचा मोठा परिणाम टिळकांच्या आयुष्यावर झाला. त्यांनी पुण्यात एका अँग्लो-व्हर्न्याक्युलर शाळेत प्रवेश घेतला. तेथे त्यांना अनेक प्रसिद्ध शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मिळाली.
  •      इ.स. १८७२ मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. लहानपणापासूनच टिळक अत्यंत कृश होते. त्यांच्या पत्नी तापीबाईपण त्यांच्यापेक्षा दणकट होत्या. यावरून त्यांचे मित्र अनेकदा त्यांना चिडवत असत. त्यांनी हे आव्हान स्वीकारले आणि एक वर्ष आपले लक्ष पूर्णपणे शारीरिक सामर्थ्य संपादन करण्यावर केंद्रित केले. त्यासाठी त्यांनी व्यायामशाळेला जाऊन नियमित कसरती व व्यायाम करणे चालू केले. कुस्ती, पोहणे व नौकाचालन हे त्यांचे आवडते खेळ होते. यासोबतच त्यांनी परिपूर्ण आहार पण चालू ठेवला. एका वर्षाअंती त्यांची शरीरयष्टी जोमदार बनली. परंतु या काळात त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले व ते प्रथम वर्षाच्या परीक्षेमध्ये नापास झाले. पण त्यांच्या मते, ते एक वर्ष व्यर्थ गेले नव्हते व त्याचा उपयोग त्यांना पुढील आयुष्यात अनेक शारीरिक व मानसिक कष्टांना सामोरे जाण्यास झाला.
  • कॉलेजच्या दिवसात त्यांचे वाचनपण प्रचंड होते. त्यांनी संस्कृत धर्मग्रंथे, इंग्रजीमधील राजनीती आणि अतिभौतिकी (मेटा-फिजिक्स) वरील पुस्तके (विशेषतः हेगेल, कांट, स्पेंसर, मिल, बेंथम, व्हॉल्तेअर आणि रूसो) तसेच मराठीमधील संतसाहित्याचे वाचन केले. त्यांची गणितातील रुची आणि संशोधनाची आवड पाहता एल.एल.बी. करण्याचा त्यांचा निर्णय त्यांच्या मित्रांसाठी धक्कादायक होता. त्यांनी टिळकांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले,  ज्या अर्थी, मी माझे आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण करण्याचे ठरवले आहे, त्या अर्थी मला असे वाटते की, कायद्याचे ज्ञान मला उपयोगीच पडेल. मला वाटत नाही की माझे आयुष्य ब्रिटिश साम्राज्याविरोधात संघर्षाशिवाय व्यतीत होईल.
  • इंग्रजांचे अंधानुकरण करणार्‍या भारतीयांबद्दल टिळकांना अत्यंत चीड होती. आपले काही तथाकथित शिक्षित देशबांधव साहेबांची पिण्यात बरोबरी करू शकतात, पण साहेबांची भारताच्या राज्यकारभारातील जागा मिळविण्याची महत्त्वाकांक्षा ते बाळगू शकतात का? असा त्यांचा सवाल होता. इ.स. १८९७ साली महाराष्ट्रात गाठीच्या प्लेगची साथ आली. त्यावेळी त्यांनी पुण्यातील प्लेगच्या साथीच्या काळात घेतलेली भूमिका महत्वपूर्ण ठरली . उंदीर नष्ट करण्यासाठी ब्रिटिश सरकारने पुण्यात फवारणी मोहीम सुरू केली तेव्हा, पुणेकरांनी विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी पुण्याचा ब्रिटिश रेसिडेंट वॉल्टर चार्लस रँड याने लष्कराची मदत घेतली.  त्यांचे जवान पुण्यात आरोग्य विभागाच्या मदतीला आले, घरात घुसून जबरदस्तीने फवारणी करवून घेऊ लागले. साथीचा फैलाव झाल्याचे कारण सांगून लोकांचे सामान, कपडे-लत्ते सर्रास जाळून टाकु लागले. यामुळे पुण्यात एकच हाहाकार उडाला. रँड साहेब मुद्दाम आमची घरे जाळीत आहे, अशी भूमिका त्यांनी घेतली. टिळकांनी केसरीमधून या भूमिकेला उचलून धरले. सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांचा अग्रलेख याच संदर्भातील आहे. या अग्रलेखात लोकमान्य टिळकांनी लिहिले आहे की, रँडसाहेबांच्या फवारणीचा मोर्चा आता आमच्या घरात माजघरात पोहोचला आहे. रँडसाहेबांचे लाडके सोल्जर पायातल्या खेटरासगट फवारणीचे धोटे घेऊन आमच्या घरात घुसतात. घरातले सामान रस्त्यावर फेकून देतात, जाळून टाकतात, हे कमी म्हणून की काय आमच्या देवघरात घुसून उंदरांबरोबर आमच्या विघ्नहर्त्या गणेशावरही फवारणी करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे.
  •    लोकमान्यांच्या कामाला भक्कम पाया आणि सातत्य देण्यासाठी त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नावाची सार्वजनिक संस्था उभारली. पाश्विमात्य शिक्षणाचा भारतात प्रसार होणे अत्यंत निकडीचे आहे, हे टिळकांचे मत होते. टिळक तर इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणत. 
  •     इ.स. १८९६ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. टिळकांनी शेतकर्‍यांना संघटित होण्याचे आवाहन केले. तसेच त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक केले. आपल्या केसरी या वर्तमानपत्राद्वारे त्यांनी सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली. ब्रिटिश सरकार दुष्काळ विमा निधी अतर्ंगत लोकांकडून पैसा गोळा करत असे. त्याचा वापर लोकांसाठी करण्यात यावा असे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले. दुष्काळ पडला असतांना शेतकर्‍यांना कर भरण्याची आवश्यकता नव्हती. तरी काही भागात सक्तीने करवसुली करण्यात येत असे. याविरुद्ध लोकांना जागरूक करण्याचे काम त्यांनी केसरीद्वारे केले. याबरोबरच धनिकांनी व दुकानदारांनी अन्न व पैसा दान करावे असे आवाहन केले व यातून अनेक ठिकाणी सार्वजनिक खानावळी चालवल्या गेल्या.
  •    तत्कालीन भारतीय नेतृत्त्वात भारतास स्वातंत्र्य मिळण्यासाठी इंग्रजांशी व्यवहार कसा असावा याबद्दल दोन स्पष्ट मतप्रवाह होते. इंग्रजांनी भारतास स्वातंत्र्य दिलेच पाहिजे व त्यासाठी त्यांच्याशी असलेले मतभेद उघड करुन वेळ आल्यास कारवाया, आंदोलने करणे हा मतप्रवाह जहालवाद समजला जातो. टिळक जहालवादी होते. 
  •     लाला लजपतराय, बाल आणि पाल यांची राजकीय मते एकमेकांशी जुळणारी होती. यामुळे या त्रिपुटीला लाल-बाल-पाल असे नामकरण मिळाले.
  •  मंडालेच्या कारागृहातून टिळक सुटले आणि त्यांनी पूर्ववत आपले काम चालू केले. कॉंग्रेसमध्ये दुफळी माजून गंभीर मतभेद निर्माण झाले होते. त्यांना एकसंघ करण्यासाठी टिळकांनी फार प्रयत्न केले. परंतु त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांनीच एक स्वतंत्र शक्तिमान संघटना निर्माण करण्याचे ठरवले. यालाच ‘होमरूल लीग’ असे म्हणतात. ‘स्वराज्यप्राप्ती’ हेच या लीगचे ध्येय होते.


डावे पक्ष पर्याय निर्माण करण्याचा विचार करणार कधी?

  • भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गेल्यावर्षी २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रात सरकार आले. महाराष्ट्रातही भाजपची सत्ता आली, याचा अर्थ भारतीय जनता पक्ष एक उत्तम पर्याय आहे किंवा मोदी लाटेवर सत्ता मिळाली आहे असे समजण्याची गरज नाही.
  • या देशातील लोकांना कॉंग्रेसला नाकारायचे होते म्हणून दुसरा पर्याय नाही म्हणून भाजपला संधी मिळाली आहे या दृष्टीकोनातून आता सध्याच्या सरकारकडे पहावे लागेेल. कारण सध्या जे काही चालले आहे त्यात कॉंग्रेसच्याच पावलावर पाउल ठेवून पुढे जाण्याचा प्रकार आहे. किंबहुना कॉंग्रेसने मळलेल्या वाटेनेच भारतीय जनता पक्ष जात आहे असे अनेकदा वाटते.
  •  अशा परिस्थितीत देशात एक तिसरा सक्षम पर्याय निर्माण होण्याची गरज आहे. परंतु तिसरा पर्याय निर्माण करण्याची शक्यता ज्यांच्या हातात आहे ते डावे पक्ष अत्यंत कमकुवत होत चालले आहेत. याचे कारण ते कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर फरपटत जाताना दिसत आहेत. म्हणजे २०१४ पर्यंत जे डावे पक्ष की ज्यामध्ये माकप, भाकप, महाराष्ट्रात शेकाप हे पक्ष कॉंग्रेसला विरोध करत होते, कॉंग्रेसला नाकारा असे आवाहन करत होते तेच डावे पक्ष आज कॉंग्रेसबरोबर जाताना दिसत आहेत. ही त्यांची होत असलेली फरपट म्हणजे हे पक्ष स्वत:च्या हाताने आपली किंमत कमी करून घेत आहेत.
  • डाव्या पक्षांच्या अनेक कामगार संघटना आहेत. उरण, पाताळगंगा अशा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या भांडवलदारांविरोधात आवाज उठवताना या संघटना जेव्हा कॉंग्रेस राष्ट्रवादीबरोबर जातात, तेव्हा त्यांची कीव करावीशी वाटते. एक चांगला सक्षम पर्याय देण्याची डाव्या पक्षांची उमेद आता पूर्णपणे ढासळली आहे? दिल्लीमध्ये नव्याने आलेला केजरीवाल यांचा आपसारखा पक्ष चमत्कार घडवू शकतो. मोदींच्या भाजपला धक्का देवू शकतो, मग हे इथे का घडत नाही?
  •    वृदा करात, प्रकाश करात यांच्यासारखे नेते हे याकूबची फाशी रद्द व्हावी म्हणून मागणी करतात. काय गरज पडली होती? त्या याकूबच्या फाशीऐवजी त्याच दिवशी निधन पावलेल्या भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल चार शब्द बोलले असते, कलाम यांना श्रद्धांजली वाहिली असती तर शोभून दिसले असते. पण याकूबला वाचवण्यासाठी ओवैसी, आबू आझमी अशांसारख्या लोकांच्या पंगतीत जावून बसले. हे सगळे सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी केलेले काम होते. कॉंग्रेसला भाजपशिवाय आणखी चांगला पर्याय देवू शकतो असा विश्‍वास देण्यासाठी हे पक्ष का आपली ताकद पणाला लावत नाहीत?
  •    नरेंद्र मोदींनी मिळवलेल्या २०१४ मधील यशाने हे डावे पक्ष जर असेच खचून जाणार असतील तर भविष्यात या पक्षांना कसलेही अस्तित्व राहणार नाही. कारण कसलाही विचार नसल्यामुळे या पक्षांवर कोणी विश्‍वास ठेवणार नाही. म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्राला आशा निर्माण होईल असा एक किरण निर्माण झाला होता. तो म्हणजे राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष काढला. त्या आनंदात तरूणांनी २००९ च्या निवडणुकीत मनसेला हात दिला, पण या  पाच वर्षात या पक्षाला काहीच करता आले नाही. शिवसेनेच्या पावलावर पाउल टाकूनच हा पक्ष चालला आहे हे लक्षात आल्यावर २०१४ च्या निवडणुकीत या पक्षाला मतदारांनी नाकारले.
  •   हे सगळे दाखले समोर असताना डावे माकप, भाकप, शेकाप हे पक्ष पुन्हा जुन्या मळलेल्या वाटेनेच का जात आहेत? १९७७ च्या निवडणुकीत इंदिरा गांधींची एकाधिकारशाही संपवण्यासाठी हे पक्ष आघाडीवर होते. आता तशीच तयारी भाजपविरोधात करण्याची वेळ असताना कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आसर्‍याला हे पक्ष जात असतील तर आयतीच भाजपला पुन्हा संधी देण्यासारखे आहे.
  •    म्हणजे कॉंग्रेस आणि भाजप सत्तेसाठी वाट्टेल ते करायला तयार होतात. पक्ष वाढीसाठी वाटेल त्याला आपल्या पक्षात घेण्यास तयार होतात. कॉंग्रेसमधून भाजपत आलेल्यांची संख्या काही कमी नाही. अशा परिस्थितीत डावे पक्ष जर कमकुवत होत असतील तर या देशात भाजप आणि कॉंग्रेसशिवाय पर्याय नाही असेच मानावे लागेल. नवा पर्याय निर्माण करण्यासाठी अशा पक्षांच्या आसर्‍याला न जाता आपली ताकद दाखवून दिली पाहिजे. असेही आपण शून्यच आहोत मग आपल्या ताकदीवर शून्य राहिलो तर त्यातून विश्‍व निर्माण करता येईल हा विचार कधी करणार आहेत हे पक्ष?

आर्थिक पारतंत्र्यात जाण्याचा मार्ग

  •  देशाची आर्थिक घडी बसवून आर्थिक स्थैर्य जपण्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी रिझर्व बँक ही अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख खांब आहे.  पण या खांबालाच आता सरकारच्या धडका बसत असून या संस्थेवर स्वायत्तता गमावण्याची वेळ येऊन ठेपली आहे. याचा फार मोठा फटका देशाला बसू शकतो. किंबहुना ग्रीकमध्ये झाले तसे भारतात होवू नये म्हणून हा अनावश्यक सरकारी हस्तक्षेप कमी केला पाहिजे.
  •   सरकारकडून मांडण्यात आलेला सुधारित भारतीय वित्तीय संहितेतील शिफारशी रिझर्व बँकेच्या स्वायत्तेला सुरुंग लावणार्‍या आहेत. त्यांची सरसकट अंमलबजावणी झाली तर देशातील वित्तीय शिस्त बिघडून जाईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. भारताची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व बँक ही
  • १९३५ला अस्तित्वात आली. या नियामक संस्थेने गेली ८० वर्षे आपली स्वायत्तता अबाधित राखली. पण आता ती स्वायत्तता धोक्यात आल्याने आर्थिक अनागोंदीकडे सरकारची आणि देशाची वाटचाल होणार का असा प्रश्‍न पडला आहे.
  •     आजपर्यंत ‘आरबीआय’चे गव्हर्नर आणि सरकार यांच्यात नेहमीच खटके उडत आले आहेत. काही गव्हर्नरांनी आपली भूमिका ठाम ठेवत राजीनामे दिले आहेत. पण म्हणून या संस्थेच्या स्वायत्त कारभारावर घाला घालण्याचा कोणीही प्रयत्न केलेला नाही. मग तो आताच का, असा प्रश्न उद्भवतो. सरकारने सुधारित संहितेचा धरलेला आग्रह वेगळयाच गोष्टींकडे इशारा करणारा आहे. यासाठी औद्योगिक क्षेत्राचा दबाव वाढतो आहे का? हे तपासून पहावे लागेल.
  •     आरबीआय गव्हर्नर रघुराम राजन यांचा कर्तव्यकठोर कारभार मोदी सरकारला रुचलेला नाही, हेच स्पष्ट होते आहे. सुधारित वित्तीय संहितेमध्ये केलेल्या शिफारशी या मतभेदांचाच परिणाम आहे. पतधोरणात ठरणार्‍या व्याजदरावरून नेहमीच अर्थखाते आणि रघुराम राजन यांच्यात मतभेद दिसून आले आहेत. ते प्रसारमाध्यमांपर्यंतही पोहोचले आहेत. मतभेदाच्या  मंथनातूनच चांगला निर्णय होऊ शकतो; पण त्या मतभेदामुळे मजबूत असलेली व्यवस्थाच मोडीत काढणे योग्य ठरणार नाही. असे होणे हे देशाच्या दृष्टीने घातक आहे.
  •      नव्या भारतीय वित्तीय संहितेनुसार पतधोरण ठरवण्याची पद्धत नव्या उंबरठयावर येऊन ठेपली आहे. यात मौद्रिक धोरण समिती (मॉनेटरी पॉलिसी कमिटी)ची शिफारस करण्यात आली आहे. ही समिती चर्चा करून मौद्रिक धोरणाची दिशा ठरवेल. या समितीवर होणारी नेमणूक ही ‘आरबीआय’-सरकार यांच्यातील विचारविमर्ष करून केली जाणार असली तरी महत्त्वाची बाब म्हणजे यात सरकारच्यावतीने चार सदस्य असतील. नव्या शिफारशीत ‘आरबीआय’ गव्हर्नरांच्या याच अधिकारावर गदा आणण्यात आली आहे. शिवाय ही समिती एकूण सात सदस्यांची असणार आहे. ज्यात सरकारचे प्रतिनिधित्व करणारे चार सदस्य असतील. अर्थातच यामुळे बहुमतात पतधोरण ठरवायचे झाल्यास ‘आरबीआय’ गव्हर्नरांचे मत कूचकामी ठरणार आहे. त्यामुळे रिझर्व बँकेचा गव्हर्नर हा फक्त सह्याजीराव राहणार काय?
  •   सद्य:स्थितीत रिझर्व बँकेची पतधोरणावर मत नोंदवण्यासाठी तांत्रिक सल्लागार समिती (टेक्निकल ऍडव्हायझरी कमिटी) आहे. यामध्ये आरबीआयचे अधिकारी तसेच काही बाह्य अर्थतज्ज्ञांचा समावेश असतो. ही समिती आर्थिक आणि मौद्रिक स्थितीनुसार पतधोरणासंबंधी आपली भूमिका मांडतात. मात्र अंतिम निर्णयासाठी ‘आरबीआय’च्या गव्हर्नरांचा शब्द प्रमाण मानला जातो.
  • मात्र अर्थखात्याने सार्वजनिक मते मागवण्यासाठी सादर केलेल्या सुधारित मसुद्यात वेगळीच गोम आहे. या नव्या शिफारशींमधून एकच स्पष्ट होते, ते म्हणजे सरकारला आता देशाच्या मौद्रिक धोरणातही ढवळाढवळ करायची आहे.
  • सर्वसामान्य सदस्याप्रमाणे आरबीआय गव्हर्नरांचे मत जोखले जाणार आहे. म्हणजेच एका जबाबदार व्यवस्थेच्या हातून मौद्रिक धोरणाचा अधिकार हा राजकीय व्यवस्थेकडे जाणार आहे. ‘आरबीआय’कडून कर्जाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी काढून घेतल्यानंतर खरे तर याची सुरुवात झाली होती. मात्र ‘आरबीआय’ने याला तीव्र विरोध केल्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. कर्ज व्यवस्थापनासंबंधीच्या निर्णयापेक्षाही ‘आरबीआय’चा मौद्रिक धोरणावरील अंतिम अधिकार काढून घेणे खूपच गंभीर बाब आहे.
  • मौद्रिक धोरण समितीत सरकारचे प्रतिनिधी जास्त असतील तर मग आरबीआय गव्हर्नरांना मत देण्याचा अधिकार तरी कशाला, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. सात सदस्यीय समितीत चार सरकारी सदस्य असणे म्हणजे सरळसरळ मौद्रिक धोरणावर ताबा घेण्यासारखेच आहे. म्हणजेच बहुमताच्या जोरावर  रिझर्व बँक सहमत असो वा नसो, सरकार आपल्याला हवे तसे मौद्रिक धोरण वाकवेल आणि व्याजदर कपातीस भरीस पाडेल. त्याचे भविष्यात काय परिणाम होतील हे सांगता येत नाही. पण यामुळे खाजगीकरण, खाजगी सावकारी यांना प्रोत्साहन मिळेल तसेच मल्टिनॅशनल बँकांना देशात घुसखोरी अधिक वेगाने करून परदेशी बँकांच्या ताब्यात आपली अर्थव्यवस्था सोपवावी लागेल. थोडक्यात आर्थिक पारतंत्र्यात जाण्याचा मार्ग यातून निर्माण होण्याची भिती आहे.

बुधवार, २९ जुलै, २०१५

फाशी रद्द करण्याची मागणी करणारांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवा

  • मुंबई बॉम्बस्फोटांतला मुख्य गुन्हेगार याकूब मेमन याला फाशी देण्याचा निर्णय आज झाला आणि संपूर्ण देशाने सुटकेचा निश्‍वास टाकला. पण त्याला फाशी देऊ नये, म्हणून देशातल्या अनेक विद्वानांना उमाळा आलेला आहे.  फाशीची शिक्षा होऊ नये, अशी मागणी करणारे सगळे बुद्धिमंत आहेत असे बोलले जाते. त्यात काही माजी न्यायाधीशही आहेत, हे विशेष. त्यात माजी न्यायाधीश कोळसे-पाटील आहेत. स्वदेशीसाठी पत्रकार परिषदा घेऊन रात्री स्कॉच पिणारेसुद्धा आहेत. अर्थात कोळसे पाटलांनी याकूबची बाजू घेतली तर त्यात आश्‍चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. कारण नेहमीच गुन्हेगारांना वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रात पुण्यात चाळीस वर्षांपूर्वी गाजलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्यातील मुख्य आरोपी जक्कलचे वकीलपत्र या कोळसे पाटलांनी घेतले होते. त्याला वाचवण्यासाठी आटापिटा केला होता. त्यामुळे त्यांचे रक्तच तसे गुन्हेगारांना वाचवणारे आणि सामान्य माणसांना जाचक असे राहिले आहे. आता ही फाशीची शिक्षा दिल्यावर अशी याचीका करणार्‍या या विद्वानांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला पाहिजे.
  •    याकूबला पाठिशी घालणार्‍यांमध्ये जेटमलानींसारखा कायदातज्ज्ञही आहे. आता याकूबची शिक्षा झाल्यानंतर ते वकिली करू लागलेले आहेत. एखाद्या आरोपीला शिक्षा होईपर्यंत वकिली डावपेच आणि कायद्याचे डावपेच याचा उपयोग करून आपला अशिल कसा निर्दोष आहे, हे सांगण्याची सनद असल्यामुळे वकिलाला अधिकार आहे. पण सगळी तथ्ये, सबळ पुरावे आणि निर्णय झाल्यानंतर न्यायाधीशाने दिलेला निर्णय दोन्ही पक्षकारांच्या वकिलांना स्वीकारावाच लागतो. त्यावर वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मुभा कायद्यानेच दिलेली आहे आणि याकूब मेमनच्या फाशीच्या निर्णयापर्यंत हे सगळे कोर्टाच्या पायरीचे पर्याय स्वीकारून झालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याकूबला फाशी सुनावली. याचा सरळ अर्थ असा की, बॉम्बस्फोटांत २५७ माणसांचे बळी घेणार्‍या आणि ७००हून जास्त लोकांना जखमी करणार्‍या महाभयंकर कटात याकूब सामील आहे. 
  •  असे असतानाही ही अतिशहाणी मंडळी असे म्हणत आहेत की, बॉम्बस्फोटांत ठार झालेल्या व्यक्तींना मारण्यात याकूबचा थेट हात नाही. पण या कटाचे जे कोणी सूत्रधार आहेत, त्यात पाकिस्तानमध्ये बसलेला जसा दाऊद इब्राहिम कासकर हा मुख्य दहशतवादी आहे. पण तो फरार घोषित झालेला आहे; पण त्यानेच आखून दिलेल्या कटात मेमन बंधूंची भूमिका खलनायकाची आहे. टायगर मेमन आणि याकूब मेमन या दोघांनाही फाशीच्या पलीकडची शिक्षा देता आली असती तर ती द्यायला हवी होती. 
  • भारत हा लोकशाही मानणारा देश आहे म्हणून बॉम्बस्फोट झाल्यानंतर या मंडळींना २२ वर्षे पोसले गेलेले आहे. खरं तर याला अतिलोकशाहीच म्हणायला पाहिजे. अशा लोकांच्या हितासाठी या लोकांना पोसावे लागते. अमेरिकेमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर एका महिन्यात न्यायालयाचा निर्णय होऊन सगळयांना फाशी दिली गेली. आम्ही अमेरिकेचे नुसतेच कौतुक करायचे. तसे झटपट निर्णय घेणार कधी? आपल्या देशविरोधात कारवाई करणारांना वाचवणारांनाच आणि तसे प्रयत्न करणारानांच देशद्रोही ठरवण्याची गरज आहे.
  •   आपल्या इथे २२ वर्षे याकूबला पोसले गेले. तिकडे कसाबलाही सहा वर्षे पोसले होते. पण निदान कसाबच्या फाशीची चर्चा झाली नाही. त्याला फाशी दिल्यानंतर लोकांना कळले. मेमनच्या फाशीचे मार्केटिंग मात्र जोरात केले गेले. या गोष्टी अतिशय हळूवार आणि गुप्तपणे हाताळायच्या असतात; पण केंद्रातला गृहमंत्री आणि राज्यातल्या गृहमंत्री यांना विषयातले गांभीर्य कळत नाही. त्यामुळे याकूबच्या फाशीची जाहिरात जास्त झाली. एवढी चर्चा न करता त्याला फासावर लटकावणे गरजेचे होते. त्याला ३० जुलैला फाशी देणार हे जाहीर करण्याची काहीच गरज नव्हती. कशासाठी गाजावाजा केला गेला? कशासाठी कोळसेपाटील आणि काही विद्वान लोकांना या प्रकरणात नाक खुपसायला संधी दिली गेली?
  •    प्रश्न फक्त याकूबच्या शिक्षेबद्दलचा नाही. ती शिक्षा होऊ नये म्हणून राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज सादर करणारे बुद्धिमंत, यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. या लोकांना काही देशप्रेम आहे की नाही? जो न्याय न्यायालयाने दिला तो अमान्य करणे आणि झालेली शिक्षा कमी करा, असे सांगणे, हा न्यायालयाचा अवमान आहे. माजी न्यायमूर्ती राहिलेल्या कोळसे-पाटलांना तरी हे कळायला हवे होते. पण हे तथाकथित बुरखा घेतलेले समाजवादी दिवसा स्वदेशीवर व्याख्यान देऊन रात्री विदेशी पितात आणि ज्या न्यायमूर्ती पदावर आपण बसलो होतो त्याची अप्रतिष्ठा करतात. ज्या याकूब मेमनचा अर्ज एकदा फेटाळला गेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ३० जुलै ही फाशीची तारीख जाहीरही करून टाकलेली आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या अधिकारात याकूबच्या सुनावणीचा जो अर्ज गेलेला होता तो अर्ज राज्यपालांनी फेटाळावा, असे राज्य सरकारचे मत होते.  याकूब मेमनसारख्या ज्या दुष्ट प्रवृत्ती समाजात वावरत असतात, त्या दुष्ट प्रवृत्तींना कोणत्याही परिस्थितीमध्ये आणि कोणत्याही प्रकारे कोणीही पाठीशी घालता कामा नये. 
  • याकूबच्या फाशी रद्द करण्याबाबत ज्या ४० लोकांनी राष्ट्रपतींकडे अर्ज केला आहे ते सगळे ४० हलकट, मूर्ख आणि देशद्रोही आहेत.  स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणारे कॉंग्रेसचे मणिशंकर अय्यरही त्यात आहेत. माजी न्यायमूर्ती पी. डी. सावंत आणि कोळसे-पाटील आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर एखाद्या गुन्हेगाराला फाशी देऊ नका, असे सांगणे हा न्यायालयाचा अपमान आहे. सर्वोच्च न्यायालयाने या चाळीसही बुद्धिमंतांवर न्यायालयाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. एकदा अशा प्रकारची अद्दल या तथाकथीत विद्वानांना घडवलीच पाहिजे. फाशीचे सर्वच गुन्हेगार सारखे आहेत. नशिब एक़च की या देशद्रोही विद्वानांच्या म्हणण्याला बळी पडून ही फाशी रद्द झाली नाही. या लोकांनी आपल्या न्यायमूर्तीपदाच्या काळात काय निर्णय दिले असतील आणि कित्येक लोकांवर कसे अन्याय झाले असतील याचा विचारच न केलेला बरा.

सोमवार, २७ जुलै, २०१५

प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार थांबवा

  •  कुख्यात तस्कर आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम तसेच टायगर मेमन या मुख्य सूत्रधारांनी आपल्या हस्तकांकरवी मुंबईमध्ये १२ मार्च १९९३ रोजी घडवलेली बारा बॉम्बस्फोटांची मालिका ही तमाम मुंबईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अजूनही भळभळती जखम आहे. म्हणजे मुंबईतील १२ मार्च १९९३ आणि २६/११ चा हल्ला हे कधीच विसरता येणार नाहीत. एकप्रकारे ही दहशतवादी शक्तींनी देशाशी पुकारलेली युद्धच होती. १९९३ पूर्वी  मुंबईवर इतका मोठा दहशतवादी हल्ला कधीही झालेला नव्हता. त्यामुळे हे बॉम्बस्फोट घडवण्यामध्ये सहभागी असलेल्या टायगर मेमनचा भाऊ याकूब याची दुरुस्ती याचिका (क्युरेटिव्ह पिटिशन) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यातील मोठा अडसर दूर झाला. 
  •   याकूब मेमनने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे नव्याने केलेला दयेचा अर्जही फेटाळला गेला तर त्याला पुढील काही दिवसांत फाशी देण्यात येईल अशी शक्यता आहे. ३० जुलैला ही फाशी दिली जाईल असे जाहीर केले गेले. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. त्यानंतर मुंबईत जातीय दंगे उसळले. बाबरी मशीद उद्ध्वस्त केल्याचा बदला घेण्यासाठी दाऊद आणि मेमन बंधूंनी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या मदतीने मुंबईत बॉम्बस्फोट घडवले. यामध्ये शेकडो निरपराधांचे बळी घेतलेल्या मुंबईतील बॉम्बस्फोटप्रकरणी १२३ आरोपींवर खटले चालवण्यात येऊन त्यातील १०० जणांना विविध प्रकारची शिक्षा सुनावण्यात आली. 
  •    या प्रकरणात प्रत्यक्ष फासावर चढवली जाणारी पहिली व्यक्ती असेल, ती म्हणजे याकूब मेमन. मुंबई बॉम्बस्फोटांतील आरोपींवर दाखल केलेले खटले जलदगतीने चालवून त्यांना शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी साधी अपेक्षा नागरिकांनी न्याय यंत्रणेकडून बाळगली होती. मात्र, प्रत्यक्षातले चित्र विदारक आहे. बॉम्बस्फोटांनंतर तब्बल बावीस वर्षांनी याकूब मेमनला फाशीची शिक्षा देण्यात येईल, हा न्यायदानातील विलंब जीवघेणा आहे. म्हणजे जवळपास एका पिढीचा त्यानंतर जन्म झालेला आहे, इतका काळ लोटला आहे. की ही आत्ता विशीतली पिढी या घटनेपासून अनभिज्ञ आहे. आज तरुणांची संख्या या देशात वाढलेली असताना हा युवावर्ग अशा घटनांपासून अनभिज्ञ असणे धोक्याचे आहे. कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांचे खटले आपल्याकडे वर्षानुवर्षे तुंबून राहतात. जलदगती न्यायालये चालवूनसुद्धा या परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे एखाद्या गुन्ह्याची शिक्षा अतिविलंबाने सुनावण्यात आली तर त्या शिक्षेचा जो धाक समाजमनात निर्माण व्हायला पाहिजे, तसा तो होत नाही. या खटल्याबाबत तोच प्रकार झालेला आहे.
  •      बॉम्बस्फोट घडवण्यासाठी पाकिस्तानातून आरडीएक्स आणण्यात दाऊद, टायगर मेमन यांचा हात होता. मात्र, दाऊदच्या हस्तकांना मुंबईतून पैसा पुरवण्याची तसेच वाहने आदी गोष्टी उपलब्ध करून देण्याची कामगिरी याकूबने बजावली होती. दहशतवादाला पाठबळ देणारी कृष्णकृत्ये कोणत्याही स्वरूपाची असोत, ती विलक्षण राष्ट्रद्रोही म्हणूनच समजली गेली पाहिजेत. याकूब मेमन याला फासावर लटकावले जाणे म्हणूनच आवश्यक आहे. मात्र दाऊद इब्राहिम, टायगर मेमन या मुख्य आरोपींना भारतीय तपास यंत्रणा अद्यापही पकडू शकलेल्या नाहीत, हे घोर अपयशच आहे. पण ते सापडले नाहीत म्हणून याकूबची फाशी लांबवणे हेही योग्य नाही. याकूबला फाशी दिल्यानंतर गुन्हेगारी जगतात, डी गँगमध्ये काय पडसाद उमटतात हेही पाहणे महत्त्वाचे आहे.
  •      मुंबई बॉम्बस्फोटांनंतर केंद्रात कॉंग्रेस आणि भाजपची सरकारे आली. पण त्यातील एकालाही दाउदचे हे आव्हान पेलता आले नाही. दाऊदला पाकिस्तानातून फरपटत भारतात आणू, अशा गमजाही निवडणुकांच्या आखाड्यात राजकीय नेत्यांनी मारून झाल्या. पण हे सगळे शब्दांचे बुडबुडे ठरले. १९९३च्या बॉम्बस्फोटांनंतर दहशतवादी कृत्यांचा मुंबईला पुन्हा मोठा तडाखा बसला तो २६ नोव्हेंबर २००८ ला. लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानातील संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात शेकडो नागरिक मारले गेले. हा हल्ला करणार्‍यांपैकी अजमल कसाब हा दहशतवादी जिवंत पकडला गेल्याने पाकिस्तानचा या कृत्यामागील हात उघड झाला. मात्र, त्यानंतरही पाकिस्तानचे दहशतवाद्यांना आश्रय देण्याचे धोरण अजिबात निवळलेले नाही. दाऊद इब्राहिम हा कराची येथे आयएसआय या गुप्तहेर संघटनेच्या संरक्षणात राहत असल्याचे अनेक सबळ पुरावे भारतीय तपास यंत्रणांनी देऊनही पाकिस्तान सरकार हे सत्य मान्य करायला तयार नाही. अल कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन आमच्याकडे नाही, असा खोटारडेपणा पाकिस्तानने सातत्याने चालवला होता. अमेरिकेने पाकिस्तानी हद्दीत घुसून लष्करी कारवाईद्वारे लादेनला ठार केले तेव्हा पाकिस्तान उघडा पडला. पण  आपण तसे करू शकलेलो नाही. समोर आलेल्या प्रत्येक विषयाचा आपल्या राजकीय स्वार्थासाठी वापर केलाच पाहिजे, अशी मनोवृत्ती देशातील राजकीय पक्षांची बनली आहे.  फाशीची शिक्षा रद्द केलेल्या देशांचे अनुकरण भारताने करावे, असाही मुद्दा याकूबला होऊ घातलेल्या फाशीच्या निमित्ताने काहींनी पुढे आणला आहे. कोणत्याही विषयावर साधकबाधक चर्चा नक्कीच हवी, पण ती देशहिताचे तारतम्य राखून झाली पाहिजे. हाच धडा याकूब प्रकरणापासून घ्यायचा आहे. त्याच्या फाशीची तारिख जाहीर करून नेमके काय साधले? कसाबला, अफझल गुरूला ज्याप्रमाणे अचानक लटकावला तसा त्याला का नाही लटकवत हा प्रश्‍नही अनुत्तरीत आहे. त्याची तारिख जाहीर करण्याचे कारण काय हा प्रश्‍न आहे. त्यामुळे अशा घटनांकडे राजकीय इश्यू म्हणून पाहणे , त्याचा  राजकीय लाभ मिळतो का पाहणे हे म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे आहे.

रविवार, २६ जुलै, २०१५

आपली अर्थव्यवस्था कृषीप्रधान नाही मद्यप्रदान अर्थव्यवस्थेमुळे बदलले देशाचे चित्र


: भारताची अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे असा समज वर्षानुवर्षे होता, तो समज खोटा ठरवणारा दाखला आता मिळू लागला आहे. कृषीप्रधान अर्थव्यवस्था असताना देशात कृषी अर्थसंकल्प कधीच मांडला गेला नव्हता. ज्याप्रमाणे रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प असतो तसा शेतीचा अर्थसंकल्प मांडून या देशात शेतीला प्रोत्साहन कधी दिले गेले नाही, शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी तसे प्रयत्न झाले नाहीत. यामागचे नेमके कारण काय आहे याचे उत्तर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील वृत्तांमुळे स्पष्ट झाले. महाराष्ट्राची, देशाची अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान नाही, तर मद्यप्रदान आहे हे स्पष्ट झालेले आहे.
शुक्रवारी मुंबईतील अनेक इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रांनी पावसाळी अधिवेशनाबाबतची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीत अधिवेशनात गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्य सभागृहात प्रश्‍नोत्तरांच्या तासात विचारलेल्या प्रश्‍नाबाबत माहिती होती. यामध्ये महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी होणार काय असा प्रश्‍न विचारला गेल्याचे म्हटले आहे. त्या प्रश्‍नाला उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात संपूर्ण दारूबंदी होणार नाही, असे स्पष्ट केले. याचे कारण महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात महसूल हा दारूपासून मिळतो असे सांगून, बंदी घातली तर त्याचा ताण मोठ्या प्रमाणात पोलिसांवर पडतो. ही बंदी सध्या फक्त वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली येथेच घातली जाणार आहे असे सांगितले. याला पुष्टी जोडताना महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा महसूल हा अल्कोहोलीक उत्पादनापासून मिळतो, देशाच्या अर्थव्यवस्थेतही त्याचा वाटा मोठा असल्याचे म्हटले आहे.
या सगळ्यावरून एकच स्पष्ट होते की आपली अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान असल्याचा डांगोरा आपण पिटत आलो असलो तरी तो साफ खोटा आहे. दारूबंदी करून मोठा रेव्हेन्यू मिळणार्‍या विजय मल्ल्या यांच्यासारख्या मद्य उद्योगपतींना दुखावण्यासाठी कोणतेच सरकार तयार होणार नाही. विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाईन्सपासून ते किंगफिशर बिअरपर्यंत प्रत्येक गोष्टीला संरक्षण मिळते, परंतु अडचणीत असलेल्या शेतीला, शेतकर्‍याला संरक्षण देण्यास सरकार कमी पडते. शेतकरी मेल्याने कोणाचे नुकसान होत नाही पण दारू उत्पादक जगला पाहिजे ही या देशाची नीती ठरली आहे. त्यामुळे ज्या शेतकर्‍यांना आपण आजवर मायबाप म्हणत आलो त्याऐवजी आता दारू उत्पादकांना मायबाप म्हणायचे काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहणार नाही.
दारूबंदी आणि दारू संबंधी जेवढे कायदे आहेत ते सगळे कुचकामी आहेत. आपल्याकडे ड्रंक अँड ड्राईव्हला बंदी असल्याचे सांगितले जाते. दरवर्षी ३१ डिसेंबर किंवा श्रावणापूर्वी होणार्‍या गटारीच्या निमित्ताने बार उशीरपर्यंत सुरू असतात. त्याला परवानगी मिळते. मुंबईत रात्रभर उघडे ठेवले जातात. कारण येणार्‍यांची गर्दी खूप असते. हे दारू पिण्यासाठी किंवा सभ्य भाषेत ड्रिंक्स घेण्यासाठी येतात ते काही चालत येत नाहीत. ते काही रिक्षा टॅक्सीने येत नाहीत. प्रत्येकाच्या घराजवळ काही बार असत नाही. ते आपल्या गाड्याच बारच्या बाहेर पार्क करून बसलेले असतात. मग बारच्या बाहेर असलेल्या बाईक, कार यावरून नंतर हे ड्रंक अँड ड्राईव्ह करणार हे उघड असते. अशावेळी सगळ्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या किंवा बारमधून बाहेर पडतानाच पोलिस त्यांना गाडी चालवू नका असे सांगून संभाव्य धोके टाळू शकतात. पण गुन्हे करण्यास प्रवृत्त करण्याचीच ही मद्यसंस्कृती आहे. तरीही ती जोपासली जाते, याचे कारण केवळ राज्याच्या तिजोरीत मोठा पैसा यातून येतो. त्यामुळेच या धंद्यांना प्रोत्साहन दिले जाते. याचा सरळ अर्थ झाला आहे की आपली अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान नाही तर मद्यप्रधान आहे.
आपल्याकडे इंग्रजी दारू प्यायली तर ती प्रतिष्ठेची आणि देशी दारू प्यायली तर धोकादायक असे समजले जाते. दहा वर्षांपूर्वी रायगडमध्ये शेकडो आदिवासी विषारी दारूने मृत्यूमुखी पडले होते. गेल्या महिन्यात मालवणीत हाच प्रकार घडला. परंतु तरीही ही दारूबंदी होत नाही. याचे कारण या देशी दारूवर बंदी घातली तर विदेशी दारूवर बंदी घाला अशी मागणी येईल. देशी दारू ही गोरगरीब आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी महत्त्वाची असते. त्यांना परवडणारी असते. सहज उपलब्ध होते. ती पिणारे शेतकरी, शेतमजूर, घरेलु कामगार, मोलमजूरी करणारे पितात. त्यामुळे ते जर मृत्यूमुखी पडले तर त्याची फारशी दखल घेण्याची गरज वाटत नाही.
     काही वर्षांपूर्वी कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीही वाईन उत्पादनाला प्रोत्साहन दिले होते. सरकारने मेडिकल स्टोअर्समध्येही वाईन विकली जावी अशी चर्चा केली होती. दारूविक्री आणि उत्पादनाबाबत सरकार इतके जागृत राहते याचे कारणच आपली अर्थव्यवस्था ही मद्यप्रधान आहे. अर्थव्यवस्थेला बळकटी मिळण्यासाठी दारूची विक्री मोठ्या प्रमाणात होणे योग्य असल्याचे सरकारला वाटत असावे.

काळजीपूर्वक जपण्याची सुरूवात

   गेले १९ दिवस सुरू असलेली ही पंढरीची वारी आज अखेर पंढरपुरात येवून दाखल झाली. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या या विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आणि आपल्या जीवनाचे कृतकृत्य झाले असे समजायचे. हा भोळा भक्तीभाव या वारीत पहायला मिळतो. आमचा वारकरी हा विठ्ठलाचा भक्त आहे. विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी तो केव्हाही आसुसलेला असतो. असे असताना आषाढी एकादशीचे असे काही महत्व आहे. नेमके काय आहे हे आषाढी एकादशीचे महत्व तेही समजून घेतले पाहिजे.   आषाढी एकादशीलाच ‘देवशयनी एकादशी’ म्हटले जाते. या मागचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते. म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला ‘देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.   या देवशयनी आषाढी एकादशीचे नेमके महत्व आता जाणून घेतले पाहिजे. ज्या दिवसासाठी आमचा वारकरी अत्यंत व्याकूळ झालेला असतो, विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतूर झालेला असतो. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून (आसुरी शक्तींपासून) स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत (साधना) करणे आवश्यक असते. त्याची सुरूवात करण्याचा हा दिवस असतो. विष्णूला आपला पालनकर्ता, तारणहार किंवा रक्षक म्हटले आहे. त्याचे स्मरण यासाठीच केले जाते.  विष्णूची अनेक नामे आहेत. परंतु या दिवशी श्रीविष्णूची ‘श्रीधर’ या नावाने पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे. ज्यांना वेळेअभावी किंवा प्रकृती, वयमानानुसार चालत वारी करता येत नाही ते लोक वाहनाने का होईना येवून पंढरपूरच्या विठोबाचे दर्शन घेतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो आणि वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.  पुराणातील एका कथेनुसार मृदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकराची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत होऊन मृदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्यांचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो. ती मृदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचे स्नान होते आणि ते गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला, आहे असे म्हटले आहे. एका कथेनुसार मृदुमान्य राक्षसाशी विष्णू खूप वेळ युद्ध करत होता. त्या युद्धात विष्णूला झोप आली. म्हणून त्याने गुहेत येवून झोप घेतली. तेव्हा त्याच्या शरिरातील अकरा इंद्रियांमधील तेजापासून एक शक्ती तयार झाली. त्या शक्तीचे नाव एकादशी. त्या एकादशीने त्या राक्षसाचा वध केला. तेव्हा जागा झालेल्या विष्णून या एकादशीला वर दिला की जो कोणी तुझ्या या नावाने उपवास करेल त्याचे रक्षण मी करेन. अशा एकादशीबद्दल अनेक कथा आहेत. थोडक्यात काय तर परस्परावर प्रेम करणे, प्राणीमात्र,अपंगावर प्रेम करणे, गरजवंताला मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.     शास्त्रार्थाने, आयुर्वेद आणि वैद्यक शास्त्रानुसार आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशीपयर्र्तचा काळ हा प्रकृतीसाठी जपण्याचा दिवस असतो. यालाच आपल्याकडे चातुर्मास म्हणतात. या काळात व्रते केली जातात. व्रत म्हणजे जागृत राहणे. जागे राहिले, काळजीपूर्वक वागले म्हणजे कोणतेही संकट येत नाही. या जागे राहण्याच्या काळाची सुरूवात ही आषाढी एकादशीपासूनची असते. म्हणजेच देव झोपले की आपण जागले पाहिजे. या काळात कांदा, वांगे खाल्ले जात नाही. याचे कारण या काळात ते शरीरास अपायकारक असते. म्हणून त्याचे प्रमाण कमी करायचे असते. देवाला आवडत नाही म्हणून कांदा खायचा नाही, तर तुमच्या शरिराला, पोटाला मानवणार नाही म्हणून तो खायचा नसतो. या काळात जप केला जातो. हा जप नामस्मरणाचा असला तर तो स्वत:ला जप असेच सांगत असतो.  अशा प्रकारे एकादशी, वारी हे जागृती निर्माण करणारे घटक आहेत. जागृती निर्माण करणार्‍या शक्ती आहेत. त्यांचा सन्मान म्हणजेच भक्ती शक्तीयुक्त असा वारकरी संप्रदाय. अशी वारी केली की ती वारंवार करावी असे वाटते. त्याची अनुभुती प्रत्येकाने घ्यायची आहे.

शनिवार, २५ जुलै, २०१५

जीवनाचा अविभाज्य भाग वारकरी संप्रदाय

 माणसाच्या जीवनात आलेली अनिश्चितता आणि नैसर्गिक परिस्थिती, नैसर्गिक संकटे, दुष्काळ, अतिवृष्टी अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी लागणारी जी तात्त्विक भूमिका लागते, ती तयार करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलं आहे. विशेष म्हणजे शेतकर्‍यांबरोबरच गाववाडयातल्या बलुतेदारांचाही या संप्रदायाची भूमिका ठरवण्यात मोठा वाटा होता. कारण खर्‍या अर्थाने ज्ञानेश्‍वरी अर्थात भगवतगीतेचा अर्थ या वारकर्‍यांना समजलेला असतो. त्यामुळेच संकटांशी सामना करण्याची ताकद त्यांच्यात असते. महाराष्ट्रात लाखो शेतकर्‍यांनी गेल्या दहा वर्षात आत्महत्या केल्या आहेत. परंतु या आत्महत्या करणार्‍यांमध्ये वारकरी संप्रदायातील शेतकरी नाही ही बाब लक्षात घेतली पाहिजे. ही खरी श्रद्धा आहे.       पावसाची अनिश्चितता आणि त्यामागची तात्त्विक भूमिका म्हणजे दैववाद नव्हता. शहरी माणसांना हेच समजलं नाही. कारण शहरी जीवनात अडकलेल्या या वर्गाला त्याचा पूर्ण अंदाज नव्हता. वेळ नसणारे लोक पंढरीच्या वारीला जातात, असाच समज त्यांच्यात रूढ झाला होता. वास्तविक ‘मढे झाकुनिया करती पेरणी’ हा तुकोबांचा अभंग वाचला तरी या वारकर्‍यांना वेळेचं किती महत्त्व होतं, हे आपोआपच कळेल. वेळेचा अपव्यय समजणार्‍या वर्गातले हेच लोक आयपीएलसारखे किंवा कोणतेही क्रिकेट सामने तासनतास बघत राहतात. पण वारीने माणसांचे मनोबल वाढवण्याचे फार मोठे काम केले आहे. तसे आयपीएलसारख्या जुगारी खेळांनी केलेले नाही हे लक्षात घेतले पाहिजे.     जगण्यातल्या अनिश्चितेबाबतची वारकर्‍यांची भूमिका हा दैववाद नाही. ती अंधश्रद्धाही नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात भिनलेली ती एक तात्त्विक जीवनसृष्टी आहे. ‘ठेविले अनंते तैसेची राहावे’ या तुकोबांच्या अंभगाचा अर्थच ही भूमिका अधिक स्पष्ट करतो. एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला, तर व्यवसाय सोडायचा नाही, आशा सोडायची नाही हाच विचार त्यातून दिला जातो. आज नोकरी अथवा व्यवसायात अपयशाने वैफल्यावस्था प्राप्त झालेले दारूच्या आहारी जातात तेव्हा त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त केली जाते. पण शेतकरी वारकरी हा संकटांशी सामना करतानाही व्यसनांच्या आहारी जात नाही कारण माउली आणि पांडुरंगाची कृपा त्यांच्यावर आहे हा विश्‍वास फार महत्त्वाचा असतो.     गेल्या दोन दशकात विशेषत: जागतीकीकरणानंतर आधुनिक काळात औद्योगिकीकरणाचा आणि शहरीकरणाचा अन्य संस्कृतीवर परिणाम झाला आहे. गाववाडा पद्धतही बदलून गेली आहे. असं असलं तरीही हा पारंपरिक संप्रदाय लोकांच्या मनात टिकून राहिला. तो अधिक ग्लोबल होत चालला हे फार मोठे यश आहे. हा संप्रदाय आता कुळाचाराच्या स्वरूपात, जो आजही स्पष्ट दिसतो. उदाहरणार्थ, गावातला सुतार आज दुसरीकडे सुतारकी करत असला तरीही तो वारी न चुकता करतो. वारीची रचना ही शेती आणि शेतक-यांची सोय डोळ्यांपुढे ठेवून करण्यात आली आहे. आषाढ शुद्ध एकादशी किंवा कार्तिक शुद्ध एकादशीच्या वार्‍यांपैकी किमान आषाढीची वारी आचारधर्म म्हणून बहुतेक जण पाळताना दिसतात.    मुळात वारीचा हंगामच असा पकडला आहे की, पहिला पाऊस पडून गेला आहे. पेरण्यांची कामं पूर्ण झाली आहेत. तुलनेने शेतकरी तेव्हा मोकळा असून शेतीचं काम त्याला नसतं. याच काळात हे लोक पंढरपुरात पोहोचतात. असं म्हणतात की पंधरा दिवसात माझ्या शेताचं काय झाले असेल असा विचार जर वारकर्‍यांच्या मनात आला तर तो विठोबा सांगतो की ही एवढी मोठी झाली असतील तुझी शेतातील पिकं. म्हणजे विठोबाच्या कमरेवरचे हात हे जणू याचीच साक्ष देतात असा आभास वारकर्‍यांना होत असतो. म्हणून विठोबाच्या विश्‍वासावर ही पिके सोपवून शेतकरी वारीला येत असतो. त्याचे फळ त्यांना निश्‍चित मिळते. यातून सामूहिक, सहजीवन आणि सहकार्य या लौकिक जीवनातल्या गोष्टी शेतकरी परमार्थातही आणू शकत. म्हणूनच पंढरपूरला एकटयाने न जाता समूहाने जायचं, असा दंडक पडला.   पूर्वी प्रत्येक गावाच्या स्वतंत्र दिंडया निघत असत. संत ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या काळात पालखी नव्हती. तेव्हा हे लोक स्वयंत्स्फूर्तीने दिंडीत टाळ मृदंग वाजवत, गात-नाचत पंढरपूरला जात. पालखीची पद्धत ही सतराव्या शतकाच्या शेवटी सुरू झाली. तुकोबांचे धाकटे चिरंजीव नारायणबाबा यांनी ज्ञानेश्वर आणि तुकारामांच्या पादुका एकाच पालखीत नेऊन पालखीची प्रथा सुरू केली. त्यानंतर शंभर वर्षानी ज्ञानेश्वरांची पालखी वेगळी निघू लागली.सर्व संतांच्या शिकवणीमध्ये शेतीचे उल्लेख आणि वर्णनं केलेली आढळतील. महाराष्ट्राला तेराव्या शतकातला शेतकरी शेती कशी करायचा, हे जाणून घ्यायचं उत्तम साधन म्हणजे ज्ञानेश्वरीतील तेरावा अध्याय. यात शेतीसाठी जमीन तयार करण्यापासून ते शेवटी पिकं काढून बलुतेदारांना वारीपर्यंतची साद्यंत वर्णनं वाचायला मिळतील. म्हणजे ही वारी, हा वारकरी संप्रदाय आपल्या जीवनाचा किती अविभाज्य भाग आहे हे समजून घेतले पाहिजे. 

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

वारीचे नाते, शेतीशी, मातीशी

पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकर्‍यांना येणारा प्रत्येक दिवस खरे आनंदाचा वाटत असतो. त्यामुळे त्याची प्रत्येक कृती आनंदमय असते. या वर्षी अधिक महिन्यामुळे दिंडी थोडी उशिरा सुरू झालेली आहे. शिवाय यंदा वरुणराजाने चांगलीच कृपा केल्यामुळे दिंडीत पाऊसही अगदी पहिल्यापासून सोबतच असलेला पहायला मिळतो. मधल्या काळात पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी त्याने पुन्हा हजेरी लावून आपले काम चोख केल्याचे दिसत आहे. पाऊस असला की वारकर्‍यांच्या त्रासात वाढच होते. कारण दिंडीतील वाटचाल ते झोप ही सगळीच कामे उघड्यावर होतात. संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की ‘आकाश मंडप| पृथिवी आसन’ असाच अनुभव वारीत वारकर्‍याला घ्यायचा असतो. त्यामुळे झोडपून काढणारा पाउस त्याला वारीत नको असतो. असेच वातावरण यावर्षी दिंडीत वारकर्‍यांना मिळाले.    निसर्गाच्या अगदी जवळ नेणार्‍या या अनुभवाची गोडी कोणालाच प्रत्यक्ष चाखल्याशिवाय कळणार नाही. जसे आपल्याला साखर गोड आहे, हे प्रत्यक्ष तिची गोडी अनुभवल्यानंतरच कळते, तद्वत आषाढी-कार्तिकीच्या वारीमधील आनंद हा अनुभवल्याशिवाय कळणार नाही. ज्यांना पूर्ण वारी करता येत नाही असे शहरी नोकरदार आणि व्यावसायिक शक्य तिथे वारीचे दर्शन घेवून या हरिनामात गुंंग होतात. ही मंडळी जेव्हा हरिनामाच्या नादाने धुंद होऊन दिंडीसोबत थोंडफार चालतात, ते पाहून संतांच्या करिष्म्याची आणि पांडुरंगाच्या महतीची प्रचिती येते. दिंडीतील आनंद हा या दिव्य अनुभूतीमध्ये दडला आहे याची प्रचिती येते.    तुकाराम महाराजांनी एका अभंगात वारकर्‍यांच्या या सहजस्थितीचे वर्णन  केले आहे. 

मी गातो नाचतो आनंदे, वेडा झालो तव छंदेगाईन ओविया मी त्या पंढरीच्या राया..

आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये भक्तांचा महामेळा जमतो. विठ्ठलाला माऊली मानून त्याच्या भेटीची ओढ या काळात प्रत्येक वारकर्‍याला लागलेली असते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून सुरू झालेला हा विठ्ठलभक्तीचा मळा आजही तेवढयाच तेजानं बहरतो आहे. दरवर्षी या मेळ्यात सहभागी होणार्‍या वारकर्‍यांची संख्या वाढत आहे. हे वारकरी देहभान विसरून वारीमध्ये सहभागी होतात. विठ्ठलाचं दर्शन घडलं की, ते धन्य होतात.
  आषाढी एकादशी जवळ आली की, सार्‍यांनाच वेध लागतात विठ्ठलदर्शनाचे. तशी तर प्रत्येक भक्ताच्या मनात विठ्ठल दर्शनाची ओढ कायमच असते. विठुरायाला ‘विठुमाऊली’ म्हणून प्रत्येक वारकर्‍यानं या देवतेशी आगळंच नातं जोडलं आहे. भक्तपुंडलिकाच्या हाकेला धावून जाणारी ही देवता आपल्याही हाकेला ‘ओऽऽ’ देईल याची खात्री प्रत्येक भक्ताच्या मनात असते.त्यामुळे वारीचा सोहळा रंगतो.  या वारीमध्ये नानाविध जातीचे वारकरी सामील झालेले असतात. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. इतकी वर्ष उलटून गेली; पण वारकर्‍यांच्या मनातील विठ्ठलभक्ती जराही कमी झालेली नाही. उलट ती दिवसेंदिवस अधिकच वाढते आहे. दरवर्षी पंढरीच्या वारीमध्ये जमणारे लाखो वारकरी पाहिले की, याची प्रचिती येते. गेल्या सातशे वर्षापासून ही वारीची परंपरा सुरू आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आलेले वारकरी सहभागी होतात. वारी हा महाराष्ट्रातल्या धर्मजीवनातला सर्वात मोठा असा मुख्य प्रवाह आहे.    हा वारकरी धर्मसंप्रदाय प्रामुख्यानं ग्रामीण शेतकरी आणि बहुजन समाजानेच व्यापलेला होता. या मागच्या वर्गीय आणि जातीय स्वरूपाच्या विश्लेषणाचं काम यापूर्वी अनेकांनी केलेलेे आहे. मराठी सारस्वतांनीही त्याचे कौतुक केले आहे, अभ्यास केला आणि सहभागही नोंदवला आहे. म्हणून तर साहित्य शारदेच्या दरबारात होणार्‍या साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी हा एक अविभाज्य भाग असतो. या दिंडीत ज्ञानेश्‍वरीचा मान हा वेगळाच असतो. गं. बा. सरदार, बा. र. सुंठणकर आणि डॉ. डी. डी. कोसंबी या अभ्यासकांनी याचे चांगले विश्‍लेषण केलं आहे. हा संप्रदाय केवळ धर्मावर आधारित नसून तो सामाजिक वास्तवात पूर्णपणे रुजलेला होता, आहे. हा संप्रदाय राजकीय स्वरूपाचाही होता. त्याची चिकित्सा करण्यात गैर काहीच नाही. कारण समाज जीवनाची ही अंग एकमेकांशी निगडित असतात. म्हणूनच हा मुख्यत्वे कृषीकर्म करणार्‍या शेतकर्‍यांचा संप्रदाय होता आणि आहे.   कृषी हा भारतीय अर्थ आणि समाजव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे बाकीचे बलुतेदारी व्यवसाय किंवा गाववाडा हे शेतीभोवतीच फिरत होते. सामाजातील बलुतेदार हे शेतीशी संबंधित उद्योग करत. ही शेती अशा प्रकारे इतर व्यवसायांचा आधार बनली होती. त्यामुळे आपल्या या वारीत सर्व जातीचे महान संत पहायला मिळतात. त्या वारीचे बिज हे शेतीत दडले आहे. त्यामुळे काळी माती आणि काळा विठ्ठल दोघांनाही आपण माय माउली म्हणतो.

गुरुवार, २३ जुलै, २०१५

परिवर्तनाची वारी

 ज्ञानोबा माउली, तुकाराम तुकाराम,‘ग्यानबा-तुकाराम’चा गजर करत महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून निघालेल्या दिंडया आता सोलापूर जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. लवकरच त्या पंढरपूरच्या वेशीवर येऊन पोहोचतील. आज बरोबर पंधरा दिवस झाले. अष्टमी ते अष्टमी या पंधरा दिवसात पंढरपुराच्या दरवाजात वारकरी दाखल होत आहेत.  ऊन-वारा अंगावर झेलत पांडुरंगाच्या भेटीसाठी व्याकूळ झालेला वारकरी आता त्या सावळया रूपाशी एकरूप होण्याच्या ओढीने झपाझप पावलं टाकत आहे. भेटीलागी जीवा, लागलीसे आस या ओळीचा शब्दश: आनंद आता वारकरी घेत आहेत, त्याचा प्रत्यय प्रत्येकाला येत आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे. हा ठेवा आता   मोठ्या प्रमाणात समाजजागृतीचं व्यासपीठ ठरू लागलं आहे. पंधरा वीस दिवसांच्या प्रवासात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील लाखो भाविक सहभागी होतात. यानिमित्ताने अनेक संस्था समाजातील वेगवेगळया अनिष्ट गोष्टींबाबत जागृती करण्यासोबतच व्यसनमुक्तीचा प्रचारही करताना दिसतात. या वारीत अनेक वारकरी हे केवळ समाजजागृतीसाठी आणि अंधश्रद्धेवर हल्ला करण्यासाठी येत असतात. हे समाजभान फार महत्त्वाचे असते.

  संपदा सोहळा नावडे मनाला|लागला टकळा पंढरीचा॥          जावे पंढरीशी आवडी मनाशी| कधी एकादशी आषाढी ये॥

अशा आर्त भावनेने वाटचाल करणारी लाखो पावलं आता पंढरपूरच्या वेशीवर येऊन ठेपली आहेत. प्रत्येकाच्या मनात विठ्ठल भेटीची ओढ लागलेली आहे. परंतु प्रत्येकाचे या पंधरा वीस दिवसात परिवर्तनही घडलेले आहे. त्याच्यात जणू काही परकाया प्रवेश झाला आहे इतके अमूलाग्र बदल त्याच्यात जाणवतात. हा वारीचा महिमा आहे.

   ‘डोळे भरोनिया पाहीन तुझे मुख| हेचि मज सुख देई देवा॥ अशी हृदयापासून साद आता घातली जात आहे. खरोखरच त्या सावळ्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यावर डोळ्यातून येणारे आनंदाश्रू, ते भरून येणे हे फार दुर्मिळ असते. डोळ्यातून येणारे ते पाणी म्हणजे साक्षात माउलींना घातलेला गंगेच्या पाण्याने अभिषेक असतो. ऊन-वा-याची तमा न बाळगता या दिंडीत चालताना प्रत्येक क्षण एक वेगळी ऊर्मी देऊन जातो. कोणत्याही अपेक्षेविना इतक्या आर्त भावनेने केवळ आपल्या दैवताच्या दर्शनासाठी निघालेला भोळया भाविकांचा मेळावा हा जणू जगात एकमेव असतो. 

  वारीच्या या प्रवासात येणार्‍या अनेक अडचणी, गैरसोयी, समस्या यांची तीळमात्र तमा न बाळगता ही वाटचाल होतच राहते. एकाच वेळी एकाच ठिकाणी इतक्या मोठया प्रमाणात लोक जमत असल्याने काही सामाजिक संस्थांनी गेल्या काही दिवसांपासून ‘वारी’चा ‘समाज जागृतीचे व्यासपीठ’ म्हणूनही उपयोग सुरू केला आहे.वारकर्‍यांमध्ये बहुतेक लोक हे माळकरी असतात. माळकरी अभक्ष्य भक्षण (मांस-मच्छी) आणि अपेयपान (दारू) करीत नाहीत. मात्र यातील बहुतेक जण शेतकरी आणि कष्टकरी असल्याने त्यांना तंबाखू आणि विडीसारखी व्यसनं मात्र असतात. कळत-नकळतपणे या दोन्ही व्यसनांचा त्यांच्या शरीरावर आणि संसारावर परिणाम होत असतो. गेल्या अनेक वर्षापासून सर्व व्यसनांपासून मुक्तीसाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त संघाच्या वतीने दिंडीत समाज जागृती केली जाते. पंढरपूरची वारी हे सर्व दोष दूर करणारे माध्यम आहे हे वारंवार सांगितले ते यासाठीच. सर्व पापांपासून मुक्त करणारी आहे हे सांगितले ते यासाठीच. म्हणजे दारू, गांजा, अफीम, गर्द या व्यसनांपासून ते तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट यांच्या सेवनाने होणार्‍या दुष्परिणामांबाबत या वारीत जागृती केली जाते. अशी व्यसने म्हणजेच पापकर्म आहे. प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी या व्यसनांपासून होणार्‍या रोगांच्या परिणामाचं प्रदर्शन भरवलं जातं. त्याशिवाय दिंडीच्या वाटेवर एका ट्रकमध्ये अखंड पथनाटय सुरू असतं. व्यसनाचा राक्षस कसा समाजाला गिळंकृत करतोय, ते या पथनाटयातून दाखवलं जातं.      त्याचप्रमाणे पर्यावरण ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगाची समस्या होऊ पाहत आहे. पर्यावरण जागृतीबाबत अनेक संस्थांच्या माध्यमातून जागृती केली जाते. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे तर गेल्या पाच वर्षापासून पालखी सोहळयात पर्यावरणाची दिंडी काढतात. त्याशिवाय भारूड सम्राज्ञी चंदाबाई तिवाडी याही भारुडाच्या माध्यमातून समाज जागृती करतात. वारक-यांचा संत वचनांवर विश्वास असल्यामुळेच संत वचनांच्या माध्यमातूनच ही जागृती केली जाते. संत तुकारामांनी साडेतिनशे वर्षांपूर्वी वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरी सांगितले ते या पर्यावरणाच्या रक्षणासाठीच. त्यामुळे त्यांचीच दिंडी पंढरीला नेताना, त्यांचा जयघोष होत असताना पर्यावरणाचे महत्त्व हे दिेलेच पाहिजे. 

 नगरेची रचनावी| जलाशये निर्मावी| महा वने लावावी| नानाविध॥ असे ज्ञानेश्‍वरांनी म्हटले आहे. त्यांचा विचार हा समाजजागृती आणि सुधारणेचा होता. त्यामुळेच याचा प्रसार करणारे कार्य, प्रबोधन हे दिंडीतून होत असते. म्हणूनच वारी ही परिवर्तनाची आणि आत्मशुद्धीची वारी असते.

बुधवार, २२ जुलै, २०१५

जन्म दिला म्हणजे मुलांचे आपण मालक होतो का?

* मुलांकडे प्रॉडक्ट म्हणून पहायचे का?

मुलीने प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून धुळे जिल्ह्यातील कासारे गावातील अविनाश तोरवणे नामक निर्दयी बापाने आपल्या जिवंत मुलीचा पंचक्रिया करण्याचा कार्यक्रम गावात फलक लावून जाहीर केला. या कार्यक्रमाची व्हॉटसऍप, फेसबुकवरून इतकी जाहीरात केली गेली की कोणाही सभ्य माणसाला शरम वाटावी आणि अशा माणसांबद्दल घृणा निर्माण व्हावी. आपल्या मुलांवर आपला संपत्तीप्रमाणे मालकी हक्क असतो काय? असा प्रश्‍नच यातून निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.
    या प्रकाराची व्हॉटस्ऍप व सामाजिक माध्यमांवरून त्याची माहितीही दिली आहे. आधुनिक भावी पिढी घडवण्याचे काम करणार्‍या एका शिक्षक बापाचा हा घृणास्पद उपद्व्याप आहे. अशा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना कोणते धडे दिले जाणार? या निर्दयी शिक्षकाच्या मुलीने मात्र बापाविरुद्ध पोलिसांत तक्रार देण्याचे धाडस दाखवले. अशा व्यक्तिंना शिक्षक म्हणवून घेण्याचा अधिकार आहे काय? मुलीला जन्म दिला म्हणजे त्या प्रॉडक्टचा मालक झाला असे त्या बापाला वाटते काय?
   पोलीस आणि अंनिस कार्यकर्त्यांनी बापाचा प्रयत्न हाणून पाडला. पण तेवढ्याने  भरकटलेल्या मनोवृत्तीने निर्माण केलेला प्रश्न अनुत्तरीतच राहतो. बाप शिक्षक आहे म्हणून त्याच्या डो्क्यातून मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध करणारी नवी शक्कल निघाली. तथापि मुला-मुलींनी घेतलेले व्यक्तिगत जीवनाबद्दलचे स्वयंनिर्णय मान्य करण्याचे औदार्य जगाला धडे देणार्‍या शिक्षकाकडेसुद्धा नसावे ही कोणत्या प्रकारची प्रगती म्हणावी?
  महाराष्ट्राची उत्तुंग संस्कृती व परंपरेचे गुणगान अभिमानाने गायले जाते. मायमराठीचा डंका देशात व देशाबाहेर वाजवण्यासाठी साहित्य संमेलने भरवली जातात. पण राज्यातील सामाजिक स्थितीकडे लक्ष पुरवावे व सामाजिक प्रश्नांवर चर्चा घडवून आणाव्यात असे महाराष्ट्रातील बुद्धिवंतांनाही वाटत नाही. अर्थात अशा शिक्षकाला बुद्धिजीवी तरी कसे म्हणावे हा प्रश्‍नच आहे.
  राजकारणावर टीका-टिपण्णी करण्यात आघाडीवर असणार्‍या मराठी माणसांना महाराष्ट्रधर्माच्या अधोगतीबद्दल काहीच खंत वाटत नाही. मुलीने इच्छेविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणून तिचा जीव घेणारी अनेक कुटुंबे पाहायला मिळतात. कधी मुलीसह तिच्या पतीचा काटा काढल्याच्या घटनादेखील कानावर येतात. हुंड्यासाठी छळवाद मांडून लेकीसमान सुनांना आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. रॉकेल ओतून जाळले जाते. वंशाच्या दिव्यासाठी गर्भातच मुलींचा गळाघोट करण्याची प्रवृत्ती फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात फोफावली आहे.
हे सगळे प्रकार पाहता भविष्यातील महाराष्ट्र कसा असेल याची कल्पना तरी करवेल का? जातीपातीच्या खोट्या प्रतिष्ठेच्या नशेतही महाराष्ट्र मागे नाही असा दुर्लौकिक मिळवण्याची नशा राज्यातील स्वार्थांध पालकांना चढली आहे. ती कोण उतरवणार?
   शंभर वर्षांपूर्वी महत्त्वाच्या प्रश्नांवर महाराष्ट्राचे मत सर्वत्र महत्त्वाचे मानले जात होते. गेल्या अर्धशतकात मात्र विचारांची दिशा भरकटली आहे. एखादी स्त्री पतीच्या मृत्यूनंतर सती गेली म्हणून टीका होत असे. आताच्या पालकांची मनोवृत्ती लेकीने मनाविरुद्ध प्रेमविवाह केला म्हणजे जणू ती मेली असे समजत तिच्या पंचक्रियेचा कार्यक्रम करण्याइतकी का खालावली? अशा प्रवृत्तीविरोधात समाजमन पेटून उठल्याची चिन्हेही कुठे दिसत नाहीत. या प्रकाराचा प्रसारमाध्यमांनी फक्त बातमी म्हणून वापर केला, त्यातून निषेध हा होणे अपेक्षित असताना तो फारसा कोणी केला नाही.
   त्यामुळे अशा सातत्याने होणार्‍या घटनांमुळे प्रश्‍न निर्माण होतो की मुलांना जन्म दिला म्हणजे त्यांचे आपले नाते काय? मुलांवर आपला मालकीहक्क असतो काय? आपण त्यांच्याकडे एक प्रॉडक्ट म्हणून पहायचे काय? त्यांच्या मनावर आपण अशा प्रकाराने राज्य करू शकू का?
मालिकांचे योगदान किती?सध्या झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या का रे दुरावा या मालिकेत आदितीचे वडिल दाभोळकर हे जय आदितीमध्ये अशीच फूट पाडून मुलीवर आपला मालकी हक्क दाखवत आहेत. इतक्या पुढारलेल्या समाजात, उच्चभ्रू समाजात त्या जयचे खच्चीकरण करून आदितीची मालकी मिळवण्यासाठी चाललेला दाभोळकर (राजन भिसे) यांचा प्रयत्न म्हणजे अशा घटनांना प्रोत्साहन देणारा आहे. त्यामुळे मालिकांमधून अशी कथानके थांबवली पाहिजेत.


वारीतील नामस्मरणाचे महत्त्व

आपल्याकडे आजपर्यंत जेवढी म्हणून धार्मिक कार्य होतात, त्यांना काळवेळेची बंधनं असतात. मात्र, भगवंत नामाला काळवेळेचं बंधन नसतं. ते केव्हाही कुठंही घेता येतं. भगवंत नामस्मरणामुळे मानसिक समाधान लाभतं. त्यामुळेच नामस्मरण घेणे हे अत्यंत सोपे आहे. आपली सर्व कर्म, कर्तव्य पूर्ण करून नंतर जरी नामस्मरण केले तरी चालते. वारीमध्ये सतत भगवंताच्याच सानिध्यात असल्यामुळे सतत नामघोष होत असतो. त्याला कधीच वेळकाळाचं बंधन नसतं. आता देवांच्या झोपेची वेळ झाली आहे म्हणून रात्री अपरात्री नामस्मरण करायचे नाही असे कधी होत नाही. आता काय पहाट आहे, कशाला देवाला डिस्टर्ब करा सकाळ सकाळ असे कधी भगवंताला वाटत नाही. त्यामुळे आपण केव्हाही त्याचे नाव घेवू शकतो. इतकी सोपी आणि सोयीची ही भक्ती आहे. या नामस्मरणाच्या ताकदीवर तर वारी चालत असते.
काळवेळ नाम उच्चारित नाही| दोन्ही पक्ष पाही उद्धरती॥
रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण्| जडजीवा तारण हरी एक॥
हरीनाम सार जिव्हा या नामाची|उपमा त्या देवाची कोण वाणी॥
ज्ञानदेव सांग झाला हरीपाठ्| पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा॥

   नामस्मरण, जप याचे महत्त्व फार असल्यामुळेच असा जप करणार्‍या लोकांच्या गळ्यात ही नामजपाची माळ असते. आम्ही माळकरी आहोत. आमच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. याचा अर्थ सतत आणि केव्हाही आम्ही हरिनाम घेवू शकतो याचा तो भगवंताने दिलेला अधिकारच आहे. नामसाधनेतील सुलभता ही अभंगांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेली आहे. इतर सर्व साधनांना काळवेळेचं बंधन असतं. अगदी आपल्या संसारी व्यवहारातही काळवेळ आणि मुहूर्त पाहूनच कार्य केलं जातं. अगदी विवाह, मौंजीबंधन, गृहप्रवेश या सर्व सोहळ्यासाठीही मुहूर्त पाहिला जातो. कोणता मुहूर्त चांगला हे पाहिलं जातं. धार्मिक कार्यातही  तो विशिष्ट काळात आणि विशिष्ट पद्धतीने करावा, अशी अपेक्षा असते. ‘जगामधले एकमेव साधन असं आहे, की त्याला काळवेळेचं बंधन नाही. ते म्हणजे भगवंताचं नाम. कोणताही मुहूर्त न पाहता, कोणताही विशिष्ठ दिवस न पाहता, ना तिथीची गरज आहे ना नक्षत्राची गरज आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा आपण नामस्मरण करू शकतो. कारण नामस्मरणासाठी कोणत्याही काळवेळेचं बंध नाही. म्हणूनच संत ज्ञानदेव म्हणतात की,
काळवेळ नाम उच्चारित नाही| दोन्ही पक्षपाही उद्धरती॥
या अभंगाच्या पहिल्या ओळीमध्ये ज्ञानेश्‍वरांनी काळवेळेचं बंधन नाही हे सांगितले आहे तर दुसर्‍या ओळीमध्ये नामस्मरणाचा फायदा सांगितलेला आहे. भगवंताच्या नामाचे स्मरण केले, तर आई आणि वडिलांकडील दोन्ही कुळांचा उद्धार होतो. उद्धाराचा सोपा मार्ग हा नामस्मरणातच आहे. इतका हा सोपा भक्तीमार्ग वारकरी संप्रदायातील आहे.
   आपल्याकडून काही दोष घडले असतील तर त्या दोषांचं हरण करण्याचाही एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. दोष हरणाचे अनेक मार्ग आहेत. योगाच्या माध्यमातून दोषांचं हरण होतं. पण योग किती अवघड आहे.  तो योग्य प्रमाणात केल्यानंतरच दोषांचं हरण होतं. मात्र तो करताना त्यांच्या नियमात, काळवेळेत फरक झाला तर दोषांचं हरण होण्यापेक्षा नवीन दोष लागण्याचीच शक्यता जास्त असते. मात्र नामसंकीर्तनाला काळवेळेचं बंधन नाही. स्थळकाळाचं बंधन नाही. हरिनामामध्येच जिव्हा सतत रत असली पाहिजे. किंबहुना जगात हरिनाम हेच एकमेव सारभूत असल्याने त्यात रमून जाण्याने जिवाचा उद्धार होतो. म्हणून सार काय असार काय, याची निवड करता आली पाहिजे.
    ‘सार’ म्हणजे अस्सल आणि टाकाऊ तांदळावरील टरफल म्हणजे ‘असार’. लोणी म्हणजे सार असून, ताक म्हणजे असार आहे. जगातील कोणतीही गोष्ट आपल्याला सार स्वरूपात मिळत नाही, तर ती असारामध्ये वेष्टीत झालेली असते. नारळाच्या आतील खोबरं सार आहे, पण ते करवंटीशिवाय मिळत नाही, केळीच्या आतील गाभा असार आहे, पण तो सालीशिवाय मिळत नाही. भगवंताचं नाम हे एकमेव असं साधन आहे की,
त्याच्यासोबत कोणताही असार पदार्थ नाही. इतके महत्त्व या नामस्मरणात आहे. म्हणूनच वारीमध्ये चालताना सतत नामस्मरण केले जाते. हरिमुखे म्हणा, हरिमुखे, पुण्याची गणना कोण करी? या नामस्मरणाने, मुखात हरिनाम घेतल्याने किती पुण्याचा संशय होतो याची गणना कधीच होवू शकत नाही. अशा अगणित पुण्याचा संचय करण्याचा पर्वकाळ म्हणजे पंढरपूरची वारी. तुकाराम महाराजही म्हणतात.
सारासार विचार करा उठाउठी| नाम धरा कंठी विठोबाचे॥ भगवंताचं नाम सर्व सारभूत असल्यामुळे त्याच्याशी कुणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्याला इतर कशाचीही उपमा देता येणार नाही. हे नाम आपला तर उद्धार करतंच; परंतु आपल्या पूर्वजांचाही उद्धार करतं, असे वचन ज्ञानदेव महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला देतात. या अभंग भक्तीलाच नामस्मरण म्हणतात. हे नामस्मरण हा वारीचा पाया आहे.


मंगळवार, २१ जुलै, २०१५

भ़क्तीचा उमाळा वेगाने होण्याचा काळ

आज सातारा जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात वारी पुढे सरकत आहे. विठ्ठलाच्या अधिकाअधिक जवळ वारी पोहोचत आहे. जसजसा एकादशीचा दिवस जवळ येवू लागतो तसतसा हा आनंद, ही विठ्ठल भेटीची ओढ वेगाने वाढत जाते. कधी एकदा या विठ्ठलाच्या पायावर डोकं टेकून आपल्या आयुष्याचं सार्थक करून घेवू अशी ओढ लागते. तुकारामांच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे भेटी लागी जीवा, लागलीसे आस म्हणजे नेमके काय ते या आठवड्यात वारकरी अनुभवताना दिसेल. मजल दरमजल करत एकेक गांव, शहर, तालुका, जिल्हा मागे टाकत आता पंढरपुराच्या दिशेने पावले पडत आहेत.
वारकर्‍यांच्या दींडीचा मार्ग म्हणजे प्रेमभक्तीचा मार्ग. समर्पणाचा मार्ग. हे समर्पण म्हणजे आपल्यातील अहंकार, गर्व, मत्सर या भावनांचा त्याग करण्याचा मार्ग. जे काही आहे ते या वारीत आहे. जे काही घडते आहे ते या पांडुरंगामुळे घडले आहे. कर्ता करवता तो आहे हे समजण्याचा मार्ग. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी अर्जूनाला गीता सांगताना जे काही घडते आहे ते माझ्या इच्छेने सांगितले. सगळं काही माझ्यामुळे आहे, माझ्या इच्छेने घडते आहे. जे तू करत नाहीस त्याचा शोक का करतोस असे सांगून आपल्या कर्तव्यापासून च्यूत होणार्‍या अर्जूनाला मार्गावर आणले. तोच हा मार्ग. प्रत्येक वारकर्‍याला त्याचा अर्थ समजला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जूनाला ज्याप्रमाणे सांगतात की तुझे नी माझे नाते हे जन्म जन्मांतराचे आहे. आपण सतत एकमेकांबरोबरच आहोत. तसेच आपले या पांडुरंगाशी नाते जोडले गेलेले आहे याची जाणिव प्रत्येक वारकर्‍याला आहे. त्यामुळे आपण वारीच्या मार्गावरून चालायचे आहे, आपल्याला दरवर्षी वारी करायची आहे आणि त्या भगवंतावर प्रेम करून त्याच्या सानिध्यात रहायचे आहे हे वारकर्‍याला समजले आहे. त्यामुळे भगवंतभेटीची ही ओढ फार महत्त्वाची असते.
    भगवंताच्या या भक्ताला, या वारकर्‍याला भगवत प्रेमाची एवढी भूक आहे की ती काही केल्या संपत नाही. याचे कारण एकदा प्रेमाची गोडी चाखल्यानंतर तितकं प्रेम त्याला मिळत नाही. म्हणून त्याला प्रेमाची भूक आहे आणि त्याचाच त्याला दुष्काळ आहे. याचे वर्णन संत तुकाराम एका अभंगात करतात. ते म्हणतात-
थोर प्रेमाचा भुकेला| हाचि दुष्काळ तयाला|
पोहे सुदाम देवाचे| फके मारी कोरडेची|
न म्हणे उचिष्ट अथवा थोडे| तुका म्हणे भावापुढे॥

आपल्या वाट्याला जे आलेले आहे हे थोडं आहे का, उष्टं आहे याचीही पर्वा त्या भगवंताला नसते. शबरीची उष्टी बोरेसुद्धा तो आवडीने खातो. कारण त्यामध्ये भक्ताचे प्रेम त्याला दिसते आहे. कारण त्यात प्रेम आहे, भाव आहे. ही भावाची महती प्रत्येक वारकर्‍याला समजली आहे. त्यामुळे कधीही तोंडात घास घेताना पांडुरंगाचे स्मरण केल्याशिवाय तो घेत नाही. केवळ वारीतच नाही तर त्याच्या जीवनातच प्रत्येक श्‍वास, प्रत्येक घास हा तो पांडुरंगासाठी घेत असतो. हे प्रत्येक संतांना समजले होते. त्यामुळे वारकर्‍यांच्या या भगवत भक्तीची माहीती असल्याने संत एकनाथ महाराजांनी म्हटले आहे की,
भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा| अभिमान नित्य नवा तयामाजी|
प्रेम सूख देई प्रेम सूख देई्| प्रेमावीन नाही समाधान॥

 म्हणजे ज्ञानापेक्षाही प्रेमाचं महत्त्व आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ‘भावाशिवाय भक्ती करणं म्हणजे शक्तीशिवाय बळ दाखवण्यासारखं आहे.’ अगदी बळ जरी असलं तरी प्रेमापुढे बळाचा वापरही होऊ शकत नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने भगवंतावर प्रेम करत, प्रत्येक गोष्टीत भगवंताचे दर्शन घेट हा वारकरी ही वारी करत असतो. त्याला जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्‍वर दिसत असतो, पांडुरंग दिसत असतो. कारण तो आहे यावर त्याचा विश्‍वास गाढ असतो.
विश्‍वास, श्रद्धा, भक्ती असल्याशिवाय याची अनुभूती मिळणे शक्य नसते.
  पदरी घाली पिळा| बाप निर्बळसाठी बाळा|
  एखादा अगदी हिंदकेसरी पैलवान आहे. संपूर्ण देशात त्याला तोडीस तोड असा कोणी नाही, असा दांडगा पैलवान घराबाहेर पडू लागतो. तेव्हा त्याचा दोन वर्षाचा मुलगा त्याला पायाला धरून सांगतो. बाबा तू बाहेर जाऊ नको. मी तुला सोडणार नाही. मोठमोठ्या पैलवानांना सहज आडवा करणारा तो हिंदकेसरी मग बाहेर जायचे सोडतो आणि मुलांच्या आग्रहाखातर घरात जाऊन बसतो. बाप निर्बळासाठी बाळा. भगवंतही तसाच शक्तिमान आहे. परंतु भक्तांच्या प्रेमापुढे तो त्यांच्यासारखा होऊन राहतो. मात्र भावावीन केलेल्या भक्तीचा कोणताही उपयोग होणार नाही. तशा भक्तीने कोणतंही दैवत प्रसन्न होऊ शकत नाही, असं ज्ञानेश्‍वरांनी सांगितले आहे. त्यामुळे या दिंडीत येणार्‍या प्रत्येक वारकर्‍यांच्या मनात अत्यंत भक्तीभाव असतो म्हणूनच त्यांना त्याचे दर्शन होते. दूध जसे जास्त उष्णता मिळाल्यावर वर वर येवू लागते, तसा हा भक्तीभाव उफाळून येतो. कारण आता सोलापूरच्या हद्दीत शिरताना त्या भगवत प्रेमाची उब वाढत असते. दुधाप्रमाणे हे प्रेमाचे, भक्तीचे उतू जाणे हा खरा आनंद आता इथून पुढच्या प्रवासात मिळत असतो.


पापविनाशी पंढरीची वारी

पंढरीची वारी केल्याने माणूस पापमुक्त होतो. कित्येकदा आपल्याला पाप म्हणजे नेमके काय हेच माहित नसते. आपण पाप करतो आहोत हेही माहित नसते. त्यामुळे कळत नकळत आपल्या हातून पापकर्म घडत असते. या पापांपासून आपल्याला मुक्ती देण्याचे काम या वारीत होते. कारण पाप म्हणजे मनाची मलिनता असते. ही मनाची मलिनता धुवून टाकण्याचे काम नामस्मरणातून होत असते. हे नामस्मरण वारीत घडत असते. लाखो भाविक प्रत्येक सेकंदाला पांडुरंगाचे नाव घेत असतात. विठ्ठलाचे नाव घेत असतात. हरिनाम घेत असतात. यातून केवळ वारीतील वारकर्‍यांचीच नाही तर तो आवाज जेथपर्यंत पोहोचतो तेथील पापांचा नाश होत असतो. म्हणूनच आमची पंढरीची वारी ही पापविनाशी अशी वारी आहे. ही वारी म्हणजे वाहती निर्मळ गंगा आहे. ही गंगा पंधरा दिवसांच्या प्रवासात चंद्रभागेत येवून मिळते आणि सर्वांना पावन करते.
    पाप म्हणजे नेमके काय? ते अगोदर समजून घेतले पाहिजे, म्हणजे माणूस पापापासून दूर राहिल. पाप, उपपाप आणि महापाप हे पापांचे तीन प्रकार आहेत. तर कायिक पाप, वाचिक पाप, मानसिक पाप हे पुन्हा पापांचे आणखी उपप्रकार आहेत. खोटं बोलणं, लोकांची निंदा करणं, चहाडी करणं, दुस-यांबद्दल अपशब्द उच्चारणं, अयोग्य पदार्थ खाणं या सर्व गोष्टींचा समावेश पापांमध्येच होतो. हे अवगुण टाळण्यासाठी मुखी असावे हरिनाम. हरिनामात व्यस्त झाल्यावर या गोष्टी हातून घडणारच नाहीत.
  हरी उच्चारणी अनंत पापराशी| जातील लयाशी क्षणमात्रे॥ तृण अग्निमेळे समरस झाले| तैसे नामे केले जपता हरी॥ हरी उच्चारण मंत्र पै अगाध| पळे भूतबाधा भय तेणे॥ ज्ञानदेव म्हणजे हरी माझा समर्थ्| न करवे अर्थ उपनिषदा॥ अत्यंत सोप्या भाषेत ज्ञानोबांनी पापापासून दूर राहण्याचे तंत्र सांगितले आहे. भगवंतांच्या नामाशी जो विन्मुख असेल तोच खरा पापी आहे, असं हरिपाठाच्या अभंगात ज्ञानेश्वरांनी ठामपणे सांगितलं आहे. या अभंगात मात्र ते अशी कोणतीही पापं झालेली असतील तर ती पापं जळून जाण्याचा उपाय सांगितलेला आहे.
   आपल्याला सर्वाना सर्वात जास्त भीती कशाची वाटत असेल तर ती पापाची. आपल्या जीवनामध्ये येणार्‍या दु:खाचं कारण हे पाप आहे, असं अनेक पिढयांपासून आपल्या मनावर बिंबवलेलं आहे. पाप पळवण्यासाठी अनेक कर्मकांडाची वर्णनं इतर शास्त्रात आलेली आहेत. मात्र वारकरी संतांनी पाप पळवण्याचा मार्ग दाखवला नाही, तर पाप जाळण्याचा मार्ग दाखवला आहे. कारण पळालेलं पाप पुन्हा येऊ शकतं. ते जळल्यास मात्र पुन्हा येण्याची सुतराम शक्यता नसते. म्हणून ज्ञानदेवांनी म्हटले आहे की,
हरी उच्चारणी अनंत पाप राशी| जातील लयाशी क्षण मात्रे|
या ठिकाणी हरिनामाच्या उच्चाराने एक पाप जळेल असं म्हटलेलं नाही, तर पापाच्या अनंत राशी जळून जातील, असा उल्लेख केलेला आहे. ज्या अर्थी ‘अनंत’ असा उच्चार करतात त्या अर्थी पापाचे अनेक प्रकार असले पाहिजेत. तसे ते आहेतही. अभक्ष भक्षण, सुरापान, परदारागमन अशा पापांचा यात समावेश आहे. तसेच दुसर्‍याची निंदा, चहाडी, वाईट उच्चारण याला ‘वाचिक पाप’ म्हटलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आणि धोक्याचं आहे ते मानसिक पाप.
    मानसिक पापाचं उदाहरण म्हणजे, एका वेश्यांच्या वस्तीत भगवान शिवाचं मंदिर असतं. या मंदिराचा पुजारी सोवळयाने शिवाची पूजा करत असे. तेव्हाच मंदिरासमोरच्या बंगल्यात राहणारी वेश्या अंघोळ करून केस सुकवत असे. तिचं लक्ष मंदिरातील शिवपिंडीकडे असे. कालांतराने दोघांचंही देहावसान होतं. तेव्हा पुजार्‍याला घेऊन जाण्यासाठी यमदूत, तर वेश्येला घेऊन जाण्यासाठी शिवदूत येतात. यमदूत पुजार्‍याला मारत-झोडत तर शिवदूत वेश्येला सन्मानाने घेऊन जातात. ज्याने जन्मभर पूजा केली त्याला घेऊन जायला यमदूत आणि जिने वेश्येसारखं निंद्य समजलं जाणारं कर्म केलं, तिला घेऊन जायला शिवदूत आले. याचे कारण ‘पुजारी सकाळी अंघोळ करून मंदिरामध्ये पूजेला बसायचा. पण त्याचं चित्त वेश्येकडे असायचं. तिच्याविषयीच्या वाईट भावना त्याच्या मनात यायच्या. वेश्येच्या मनात मंदिरातील पूजेविषयी चिंतन सुरू असायचं. ती विचार करायची, ‘किती हा पुजारी भाग्यवान आहे? त्याला सतत शिवाची पूजा करता येते. बिल्वदल वाहता येतात. मी जर त्या ठिकाणी असते तर अशी पूजा केली असती! तसंच बिल्वपत्र वाहिली असती. म्हणजे उभी वेश्यालयात आणि मनात मात्र भगवंत म्हणून तिला घेऊन जायला शिवदूत आले. तर अशा प्रकारे  मानसिक पाप जरी घडलेलं असेल त्याची दाहकता हरिनाम उच्चारण्याने कमी होते. ज्याप्रमाणे गवताची गंजी एका अगीच्या काडीने जळून खाक होते, त्याचप्रमाणे कायीक, मानसिक पाप हरिनाम स्मरणाने जळून जातं. ही पापे नष्ट करण्याची ताकद या वारीच्या मार्गावर आहे. म्हणून पंढरीची वारी ही पापविनाशी गंगाच आहे. गंगेत मारलेली डुबकी आणि हरीनामाच्या या वारीत घेतलेला मानसिक आनंद हा आपल्याला सम्मार्ग दाखवून पवित्र करतो.

भक्तांची कैवारी, पंढरीची वारी

 भजन, कीर्तन, नामस्मरण हे वारीसाठी फार महत्त्वाचे आहे. वारीत ते सतत घडत असते. या भजन, कीर्तन आणि नामस्मरणाच्या जयघोषातच वारी पुढे सरकत असते. या वारीमध्ये हरीनाम घेणे, हरीकथा निरूपण आणि हरीभजन याला फार महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक वारकरी हा नित्यनेमाने हरिपाठ करीत असतो. अतिशय एकरूप होऊन हरिपाठाचं मनापासून वाचन करणारे भक्त तसे वास्तव जीवनात फारच कमी आहेत. पण रममाण होवून जे करतात, त्यांना काळाचं भय राहत नाही. हरिपाठ वाचत असताना त्यांच्या डोळ्यातून पाणी येत असते इतके ते त्यात रमून जातात. अशा प्रकारे हरिपाठ करतात त्यांना जीवनाचा अर्थ समजतो. हरिपाठाचं महत्त्व हे शिवशंकराला होतं. सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या जय मल्हार मालिकेतही हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर यांच्या परस्परांवरील भक्तीचे वर्णन केलेले आहे. अनेकजण शिव आणि विष्णू असा भेदभाव करतात. शैव वेगळे, वैष्णव वेगळे असे समजतात ते खरे अज्ञानी आहेत. साक्षात शिवशंकरच हरिनाम जपत असतात.  हरिपाठात, हरिनामात इतकी जबरदस्त ताकद आहे की, आपल्याला निजधामापर्यंत सहज पोहोचता येतं. त्यामुळे ज्ञानदेवांनी हरिनामाचा जप तरी करा, असं सांगितलं आहे.
  नित्य सत्य मित हरीपाठ ज्यासी| कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी॥
 रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप| पापाचे कळप पळती पुढे॥
 हरि हरि हरि हा मंत्र शिवाचा| म्हणती जे वाचा तया मोक्ष्॥
 ज्ञानदेव पाठ नारायण नाम| पाविजे उत्तम निजस्थान॥

  म्हणजे हरिपाठात जीवन जगण्याचं सार सांगितलं आहे. जो हरिपाठ एकरूप होऊन वाचतो, त्याला जगण्याचं सार आपसुकच समजतं. त्याला काळाचंही भय राहात नाही.अशा हरिपाठाचे वाचन, मनन, चिंतन आणि कीर्तन हे वारीमध्ये सातत्याने होत असते. त्यामुळे वारकर्‍याला ही वारी नुसतेच पांडुरंगाचे दर्शन घडवीत नाही, तर त्याला मुक्तीचा मार्ग दाखवते. वैकुठात नेवून पोहोचवते.
    आज जगात एकही वस्तू अशी नाही की, जिला काळाचं भय नाही. त्यामुळे ‘हरिपाठ वाचल्यावर काळाचं भय राहत नाही,’ यावर ज्ञानदेवांचा ठाम विश्वास आहे. हरिपाठ करतात त्यांच्यातला अहं ब्रह्मास्मी भाव जागृत झालेला असतो. द्वैत संपलेलं असतं. ‘भक्त आणि देव दुजा नाही भाव| ’ याची खात्री पटलेली असते. मी आणि देव वेगळा नाही, ही धारणा ज्यावेळेला पक्की होते, तेव्हा ‘कळीकाळा’चं भय उरत नाही.
   जगात आलेल्या प्रत्येकाने जो आकार धारण केलेला आहे, तो आकार कधी ना कधी सोडावाच लागतो. हेच तर खरे गीतेचे सार आहे. ते समजणे नाही तर श्‍वासाश्‍वासात, रंध्रारंध्रात बिंबवण्याची ताकद या वारीमध्ये आहे. इथे कळीकाळाचं भय नाही किंवा कळीकाळ त्यांच्याकडे पाहत नाही, असं म्हणणार्‍या ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ‘भावार्थदीपिका’ म्हणजे ‘ज्ञानेश्वरी’ या ग्रंथांमध्ये, ‘जे निर्माण होते त्याचा नाश होतो, ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू होतो,’ हे भगवत गीतेमधील विचार ठामपणे सांगताना नमूद केलंय की,
उपजे ते नाशे| नाशे ते पुनरपि दिसे|
हे घटिका यंत्र जैसे| परिभ्रमे गा॥

म्हणजे उपजणार्‍याला नाश असली तरी हरिपाठ करणार्‍यांना मात्र कळीकाळाचं भय राहात नाही. कारण धारण केलेला देह जरी कालपरत्वे नष्ट होत असला तरी आत्मा हा कधीही नष्ट होते. तो अमर आहे. या विचारांवरची श्रद्धा पक्की झाली की, त्याला काळाचं भय राहात नाही. तो काळ आपल्याकडे वाकडया नजरेने पाहू शकत नाही, हा विचार पक्का होतो. आत्मा देहाची आदलाबदल कशी करतो, हे सांगताना संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-
जैसे जीर्णवस्त्र सांडिजे| मग नूतन वस्त्रे लेईजे|
तैसे जन्मांतराते स्वीकारीजे| चैतन्य नाथे॥

    हरिपाठावरील श्रद्धाभाव दृढ झाल्यावर ही भूमिका पटते. म्हणूनच मग रामकृष्ण नामाचा उच्चार केला की, अनंत राशी तप निर्माण होतं. राशी म्हणजे संचय. रामकृष्ण नामाच्या उच्चाराने अनंत राशी तप निर्माण झाल्यावर काय होतं? तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘पापाचे कळप पळती पुढे. नुसते पाप म्हणलेलं नाही. तर त्याचे कळप म्हणजे समूह पळून जातो,’. महाराजांना विचारलं, ‘या भगवंतांच्या नामाचं तुम्ही एवढं महत्त्व सांगता. परंतु यापूर्वी ते कुणी घेतलं आहे का,’ महाराजांनी हरिनाम हे किती पुरातन आहे हे सांगताना चक्क शिवशंकराचाच दाखला दिला. ‘साक्षात भगवान श्रीशंकरसुद्धा सतत हरिनामाचा जप करतात. जेवढी निष्ठा श्रीशंकाराची हरिनामावर आहे, खचितच ती दुसर्‍या कुणाची असेल.’ तितकीच श्रद्धा हरिचीही हरावर आहे. हा हरी हरातील भेद नष्ट करणारा भाव हरिपाठात आहे. याचा पाठ सतत केल्याने वारकरी हा भेदभाव विरहीत असा स्वच्छ आणि निर्मळ असतो.

शनिवार, १८ जुलै, २०१५

भगवंतावर प्रेम करण्याची प्रक्रीया वारी

 वारीमध्ये नामस्मरण, जपाला फार महत्त्व आहे. विठ्ठलाचे, पांडुरंगाचे,हरीचे नाव घेणे हे वारकर्‍याचे श्‍वासाप्रमाणे असते. इतके की नंतर नंतर त्याला समजतही नाही की आपल्या मुखातून हरीनाम येते आहे. त्याचा श्‍वासच पांडुरंग, पांडुरंग असे स्मरण करत असतो. ही तल्लीनता खरी भक्ती आहे. खर्‍या भक्तीच्या ठिकाणी भगवंताचे स्थान आहे. हे स्थान आपल्याला वारीत पहायला मिळते. वारीतील लाखो वारकरी म्हणजे परमेश्‍वराचे विराट रूप असते.    रामाच्या आणि कृष्णाच्या नावाचा जप यापूर्वी कितीतरी मोठया लोकांनी केलेला आहे. अनेकांनी तो सहजपणे केला आहे तर कित्येकांनी तो अगत्यपूर्वक केला आहे. याचे फार मोठे उदाहरण म्हणजे भगवान श्रीशंकर सतत श्रीराम चंद्रभूच्या नामाचे स्मरण करतात. किंबहुना आपल्या आत्म्यावर ते जितकी प्रिती करतात तितकीच प्रिती ते रामकृष्ण नामावर करतात.भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही. कारण नाम घेतले की द्वेत संपते. एकदा द्वेत संपले की भेद संपला. भेद संपला की देव आणि भक्त हा भावच उरत नाही. हा भेदभाव संपवण्याचे काम वारीत होत असते. म्हणूनच वैष्णवांच्या मुखामध्ये सदैव नामामृत असते.   योग्यांना जशी जीवनमुक्त अवस्था सुख देते तोच अनुभव वैष्णवांना नाममृताचे सेवन करताना मिळतो. प्रल्हादाच्या मनात सत्वर म्हणजे तत्काळ भगवंतांच्या नामाचा उच्चार बिंबला होता. राक्षसकुळातील प्रल्हादही परमेश्‍वराला प्रिय झाला होता. विष्णूमय सारे जीवन आहे हे समजणे फार महत्त्वाचे असते. ही समज वारीत येते. कारण सगळे वातावरण विष्णूमय झालेले असते. म्हणून तर आमचे पंढरपूराला वैकुंठाचे स्वरूप येते. अशा विष्णूच्या सतत नामस्मरणाने तर प्रल्हादाच उद्धार झाला होता. उद्धवाचा दाता म्हणून कृष्ण लाभला होता. कारण तो सतत भगवंतांचे चिंतन करीत होता. कृष्ण ज्यावेळी निजधामाला निघाले तेव्हा त्यांनी आपल्याकडील असलेले सर्व ज्ञान हे उद्धवला देऊन टाकले. हा कशाचा परिणाम असेल तर तो भगवंतांच्या नामाचा परिणाम आहे. म्हणून हा वारीचा मार्ग फक्त पंधरा दिवस चालण्याचा नाही तर अखंड वैकुंठाला जाण्याचा मार्ग आहे.  संत ज्ञानदेव म्हणतात, नाम ही साधना अत्यंत सुलभ आहे. मात्र इतके सुलभ असणारे नाम घेणारे मात्र दुर्लभ आहेत. ज्या लोकांना नामचे महत्त्व पटले आहे, तेच हरिपाठात दंग होतात. संतांच्या संगतीत राहून नामात दंग होतात. तेच मनोमार्गाने हरीला समजू शकतात. हे आकलन खर्‍या अर्थाने होते ते या वारीत. त्यामुळे भक्तीने, मजेने, सहजपणे, आकर्षणाने किंवा कोणत्याही हेतुने जरी ही वारी कोणी पूर्ण केली तरी त्याला त्याचे फळ प्राप्त होते. कारण कोणतेही लोखंड असले तरी परिसाच्या स्पर्शाने ते पावन असे सोनेच होते. तसेच या वारीबरोबर जाण्याने आपले जीवन पावन होत असते.    भगवंताची भक्ती करताना फळापेक्षा त्यातील भावाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. भक्तिमार्गाचा भाव जर सकारात्मक असेल तर फळ आपसूकच मिळतं.पण ‘भाव’ म्हणजे नेमके काय? हे समजून घेणेही फार महत्त्वाचे आहे. भावेवीण भक्ती भक्तिवीण मुक्ती| बळेवीण शक्ती बोलो नये॥ कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित| उगा राहे निवांत शिणसी वाया॥        सायासे करीशी प्रपंच दिननिशी| हरिशी न भजशी कोण्या गुणे|्|३्॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे| तुटेल धरणे प्रपंचाचे॥ भावाशिवाय कोणतीही भक्ती फलद्रूप होऊ शकत नाही. भावाशिवाय केलेली भक्ती म्हणजे बळाशिवाय दाखवलेल्या शक्तीसारखे आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. इतकं भावाचं महत्त्व जर भक्तीमध्ये आहे, तर भाव म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यावं लागेल. हा भाव, हा भक्तीभाव निर्माण करण्याची ताकद वारीच्या वाटेवर आहे. त्यामुळे कोणी चेष्टेने किंवा मजेने जरी त्या मार्गावर आला तरी त्याच्यामध्ये भावन निर्माण करण्याची ताकद या वारीत आहे. अर्थात भाव या शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. मात्र या ठिकाणी भाव शब्दाचा अर्थ प्रेम हाच अभिप्रेत आहे. भक्तीच्या, प्रेमाच्या, ईश्‍वराच्या माउलीच्या प्रेमात पडण्याचा मार्गच ही पंढरपूरची वारी आहे. म्हणून हा भक्तीभाव फार महत्त्वाचा आहे. भावाचं महत्त्व सांगताना एकनाथ महाराजही म्हणतात-एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती|कळो आले जिवे मज माझियाची भावे॥ अंतकरणात एक भाव जर असेल तर इतर कोणत्याही साधनाची आवश्यकता नाही. मात्र तो भाव निर्माण होणंच मोठी कठीण गोष्ट आहे. निर्व्याज, निरपेक्ष प्रेमाचा आविष्कार म्हणजेच भाव आहे. परंतु भगवंताकडे येताना बहुतेक जण काही ना काही अपेक्षेने येत असतात. जिथे अपेक्षा असते तिथे प्रेम नसते तर व्यवहार असतो. भगवंत हा प्रेमाचा भुकेला आहे. प्रेमाची त्याला आवड आहे. आवड केव्हा निर्माण होते. एखाद्या गोष्टीचा आनंद अनुभवल्यानंतर ती गोष्ट ज्यावेळी दुर्मीळ होते; तेव्हा त्या गोष्टीची आवड निर्माण होते. भगवंतांच्या बाबतीत तेच आहे. हनुमंत, प्रल्हाद, ध्रुव, शबरी, सुदामा, उद्धव, गोकुळातल्या गवळणी यांची भक्ती ही निर्विकल्प अशी भक्ती होती. प्रेमयुक्त भक्ती होती. म्हणून भगवंत त्यांच्या अधीन झाला होता. हे अधिन होणे, वारीच्या मार्गावर घडत असते.

शुक्रवार, १७ जुलै, २०१५

संतांच्या संगतीत परमेश्‍वराचे दर्शन

 वारीमध्ये जाणे म्हणजे खरा सत्संग असतो. संतांची संगत लाभते. फार मोठा आनंद असतो हा. लोणंदपासून वाखरीपर्यंतचा प्रवास तर संतांच्या संगतीत समुद्राला भरती यावी असा असतो. याचे कारण संतांच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते. संत सतत भगवंतांच्या नामाचे उच्चारण करीत असतात. जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते, तिथेच आपण राहतो, असे भगवंत स्वत: गीतेमध्ये सांगतात. भगवंतांच्या नामाचे साधन साधले तर इतर साधनाची आवश्यकताच उरत नाही. ज्या लोकांना या नामाचे महत्त्व पटले, तेच हरिपाठात दंग होतात. संतांच्या संगतीत राहून नामात दंग होतात. तेच मनोमार्गाने हरीला आपलेसे करू शकतात. दींडीतील या नामस्मरणाचे हेच खरे महत्त्व आहे. संतसंगतीचे हे महत्त्व दिंडीत प्राप्त होते.
  संतांचे संगती मनोमार्ग गती| आकळावा श्रीपती येणे पंथे॥ १्॥
रामकृष्ण वाचा भाव हा जिवाचा| आत्मा जो शिवाचा रामजप॥ २्॥
 भगवत प्राप्तीसाठी ही सतसंगती वारीमध्ये लाभते. संतांची संगत म्हणजेच सन्मार्ग असतो. या मार्गावरून प्रवास करत असताना आभाळातून होणारा वर्षाव म्हणजे साक्षात भगवंताचा आशीर्वाद असतो. हरिपाठात म्हटले आहेच की,   एक तत्त्व नाम साधीती साधन| द्वेताचे बंधन न बाधिजे॥ ३्॥
नामा अमृत गोडी वैष्णवा लादली| योगिया साधली जिवनकळा॥ ४्॥
सत्वर उचार प्रल्हादी बिंबला| उद्धवा लादला कृष्ण दाता॥ ५्॥
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ| सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे॥ ६्॥
हरिपाठामध्ये संत संगतीचे हे महत्त्व जागोजागी पटवून देण्यात आले आहे. संत हे जगाला योग्य मार्ग दाखवत असतात. खर्‍या संतांची संगत लाभली तर मनाच्या वेगाने भगवंतांकडे जाण्याचा मार्ग आपल्याला सापडतो. हा मार्ग वारीचा आहे. संतांच्या संगतीनेच साक्षात श्री म्हणजे लक्ष्मी आणि तिचा पती म्हणजे भगवंत आपल्याला भेटतो. भगवंतापर्यंत पोहोचवणारी शिडी म्हणजे संत असतात. भगवंताला जर प्राप्त करून घ्यायचे असेल तर संतांच्या संगतीशिवाय घडू शकत नाही.
 संत तुकाराम महाराजांनी आपल्याला भगवंत कसा कळला हे सांगताना एके ठिकाणी म्हटले आहे की,
संत दर्शने हा लाभ| पद्मनाभ जोडला॥
 संताच्या संगतीत भगवंतांची प्राप्ती होते कारण संत सतत त्याच्या नामाचे उच्चारण करीत असतात.हे नामस्मरण वारीमध्ये होत असते. त्यामुळे वारीच्या मार्गावरील प्रत्येकाला भगवंताचा मार्ग दिसत असतो. काहींना नामस्मरणाने तर काहींना श्रवण केल्याने. काहींना संतसंगतीने हा मार्ग दिसतो. भगवंताच्या सानिध्यात घेवून जातो. जिथे आपल्या नामाचे उच्चारण होते, तिथेच आपण राहतो, असे भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगतात. आपण वैकुंठामध्ये राहत नाही. योग्यांच्या मनातही आपण नसतो. यावर भगवंताला अर्जुनाने विचारले आहे की , तू कुठे असतो. तेव्हा भगवंत सांगतात, जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला असतो, तिथे मी असतो. हाच घोष आपल्या वारीत सातत्याने असतो. त्यामुळे भगवंताचे अधिष्ठान तिथे जाणवल्याशिवाय रहात नाही. गीतेतील भगवंतांच्या मुखातील भाषा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमध्ये अलगद पकडली आहे. ओघवत्या आणि रसाळ भाषेत ज्ञानेश्‍वरांनी आपल्या भावार्थ दीपीकेत म्हटले आहे की भगवंत म्हणतात,
मी तो वैकुंठी नसे| एक वेळ भानुबिबीही न दिसे॥
वरी योगियांची माणसे| उमरोडोनी जाय॥
जे गीतेमध्ये श्रीकृष्णाने संस्कृृतमध्ये सांगितले ते ज्ञानोबांनी प्राकृत भाषेत सहजपणे सांगितले आहे. भगवंत म्हणतात, मी वैकुंठात नसतो. सूर्याची किरणे जिथपर्यंत पोहोचली आहेत. तिथे जरी मला शोधण्याचा प्रयत्न केला, तरी सापडणार नाही. मग अर्जुनाने विचारले, देवा तू कुठे असतोस ते सांग. याचे वर्णन करताना ज्ञानोबा म्हणतात की अर्जूनाला तेव्हा भगवंत सांगतात,
परी तयापाशी पांडवा| मी हरपला गिवसावा|
जेथ नामघोषण बरवा| करीती ते माझे॥
मी हरपलेला तुम्हाला तिथे सापडेन जिथे माझ्या नामाचा घोष चाललेला आहे. संतांच्या मुखात सतत भगवंतांचे नाव सुरू असते. नामस्मरणातच देवाला सुख वाटते. म्हणून ते सुख मिळविण्यासाठी तो संतांच्या घरी वास्तव्याला येतो.
वारी हा संतांचा सागर असतो. तो आपल्या भगवंताचे सानिध्यात नेणारा मार्ग आहे. हेे सांगताना एकनाथ महाराजांनीही म्हटले आहे की,
ज्या सुखा कारणे देव वेडावला| वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला॥
अशी ही संतांची संगती लाभते त्यालाच पंढरपूरची वारी म्हणतात. आज दहा दिवस जे अशा संतांच्या संगतीत वारीमध्ये आहेत त्यांना साक्षात श्रीहरीचा वास लाभला आहे. एकादशीपर्यंत या श्रीहरी विठ्ठलाबरोबरच आमचे वारकरी पंढरपुरात दाखल होतील.