रविवार, १ जून, २०१४

एकच निर्धार, काँग्रेसमुक्त पनवेल

  • संपूर्ण देशाला ज्याप्रमाणे काँग्रेसची झळ लागली आहे तशीच ती पनवेलकरांनाही फार मोठ्या प्रमाणात बसलेली आहे. म्हणूनच पनवेलकरांनी आता एकच निश्‍चय करायचा आहे, निर्धार करायचा आहे की आपणही पनवेल तालुका काँग्रेसमुक्त करायचा आहे.
  • आज पनवेल तालुक्यातील सगळ्या समस्यांची, प्रश्‍नांची जाण फक्त शेतकरी कामगार पक्षाला समजलेली आहे. त्यामुळे पनवेलकराचे सगळे प्रश्‍न सोडविण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत पनवेकर बाळाराम पाटील यांना आमदार म्हणून आपला प्रतिनिधी पाठवतील हे निश्‍चित झालेले आहे. याचे कारण राज्याला समजायला 15 वर्ष लागली, देशाला समजायला 10 वर्ष लागली पण पनवेलकरांना मात्र फक्त पाच वर्षात समजले आहे. ते हे समजले आहे की काँग्रेसला संधी देवून काही साध्य होणार नाही. गेल्या पाच वर्षात पनवेलसाठी काय केले असा सवाल केला तर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना एकही उत्तर देता येणार नाही. किंबहुना त्यांना ज्या ज्या वेळी हा प्रश्‍न केलेला आहे त्या त्या वेळी त्यांनी तोंड लपवले आहे, उत्तर टाळले आहे. अशा तोंड लपविणार्‍या आणि जनतेची फसवणूक करणार्‍या काँग्रेस आमदाराला पनवेलकर पुन्हा उभे करणार नाहीत हे निश्‍चित आहे.
  • पनवेलच्या जनतेने याची चुणूक लोकसभा निवडणुकीतच दाखवून दिलेली आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला चाळीस हजारांच्या फरकाने मागे टाकले आहे. लोकसभेला ही स्थिती तर विधानसभेला हा फरक जास्तीत जास्त वाढविण्याची जबाबदारी आता मतदारांनी उचललेली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. कारण पनवेलकरांनी आता ठरविले आहे की आता पनवेल काँग्रेसमुक्त करायची आहे.
  • चाळीस हजारांचा फटका बसला आहे, काँग्रेस पार मागे फेकली गेली आहे हे लक्षात आल्यावर प्रशांत ठाकूर यांना जाग आली. आपण काहीतरी करतो आहे हे दाखवण्यासाठी मग तीर्थरूपांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घे, नाट्यगृहाचे उद्घाटन कर असले प्रकार केले आहेत. हे आधी का सुचले नाही? रक्तदान काही शो बाजी करण्याचा प्रकार नसतो. कार्यकर्त्यांचे रक्त शोषून काही साध्य होणार नाही. प्रकल्पग्रस्तांचे केलेले शोषण इथला मतदार कधी विसरणार नाही. पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलेले लोक आहेत. त्यांच्यावर होणारे अत्याचार ते लोक कधी विसरणार नाहीत. या प्रत्येकाने निर्धार केलेला आहे की आता पनवेलही काँग्रेसमुक्त करायची. 
  • इथले सगळे प्रश्‍न जर शेतकरी कामगार पक्ष सोडवत असेल तर काँग्रेसच्या आमदाराचा उपयोगच काय? आमदार म्हणून गेल्या पाच वर्षात कोणते काम केले हा प्रश्‍न विचारला तर प्रशांत ठाकूर यांच्याकडे सांगण्यासारखे काहीही नाही. शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या कामांची उद्घाटने करणे हे काही पुरूषार्थाचे लक्षण नाही. आपले वांझोटेपण लपविण्यासाठी कोणते तरी मूल दत्तक घेवून आपले नाव लावले जाते. पण स्वत:चे ते स्वत:चेच असते. तसे प्रशांत ठाकूर यांच्याकडे स्वत:चे असे काहीही नाही. सगळे शेतकरी कामगार पक्षाने केलेले दत्तक घेतले आहे. आज जो विकासनामा म्हणून काही ते बरळत आहेत त्यातील एक तरी काम कसे झाले याची कल्पना तरी प्रशांत ठाकूर यांना आहे काय?
  • एखादा माळी चांगले बिजारोपण करून एखादे रोपटे वाढवतो. त्याचा चांगला वृक्ष तयार होतो. त्याला चांगली फळे येतात. माळी तिथे नसताना हळूच त्याची फळे काढून घेवून एखादा चोरटा जातो आणि सांगतो ही फळे माझ्यामुळे आली. अनेक वर्ष जे झाड मोठे करण्यासाठी गेली त्यामुळे ते फळ आले आहे हे त्या चोराला माहित नसते. तो आपला मी या झाडाकडे गेले दोन महिने लक्ष देवून होतो. त्याला मोहोर कधी आला तेव्हापासून मी लक्ष ठेवून होतो. त्यामुळे ही फळे माझीच आहेत असे बिनधास्त सांगतो. अगदी अशा चोरट्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यांची गत आहे हे पनवेलकरांना पटलेले आहे. म्हणूनच पनवेलकरांनी एकच निर्धार केेलेला आहे तो म्हणजे काँग्रेसमुक्त पनवेल करणे. ठाकूर पितापुत्रांच्या जाचातून पनवेलला मुक्त करणे.
  • मतमोजणीच्या अगोदर दोन दिवस कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती राजेंद्र पाटील यांनी प्रशांत ठाकूर यांना आव्हान दिले होते. पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवारच आघाडी घेईल. या मतदारसंघात काँग्रेस आघाडीला जास्त मते मिळाली तर आम्ही आमचा उमेदवार विधानसभेला उभा करणार नाही, तुम्हाला बिनविरोध निवडून देवू. या आव्हानापुढे प्रशांत ठाकूर- राम ठाकूर यांनी शरणागती पत्करली. घाबरून या पितापुत्रांना भितीने पछाडले. त्यातच लोकसभेत पनवेल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला 40 हजारांचा फटका बसला. आता करायचे काय? यामुळे पितापुत्र अक्षरश: हवालदिल झाले. पण विकासकामे एकाएकी होत नाहीत.
  • आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेत गेल्यानंतर तिथल्या प्रशिक्षणाकडे, कामकाजाकडे दुर्लक्ष करून चक्क झोपा काढत होते. संपूर्ण राज्यातल्या टिव्ही  वाहिन्यांनी हा प्रकार दाखवला. तिथेच खरी पनवेलकरांची इज्जत गेली. आपण झोपा काढायला प्रशांत ठाकूर यांना पाठवले आहे काय? तेव्हाच पनवेलकरांनी निर्धार केला होता आता काँग्रेसमुक्त पनवेल करायची आहे. त्यानंतर झालेल्या तालुक्यातील प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती शेतकरी कामगार पक्षाने जिंकून आणल्या आहेत. ही काँग्रेसमुक्त पनवेल होण्याची सुरूवात होती. आता ती वेळ आलेली आहे. हे संघटीत झालेले मतदान लोकसभेला चाळीस हजारांच्या फरकाने दिसून आले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला याखेपेला सर्वात कमी मते पडलेली पहायला मिळतील. आजपर्यंत इतकी कधी काँग्रेस कमी झालेली पनवेलकरांनी पाहिली नसेल. इतकी कमी मतेे प्रशांत ठाकूर यांना पडतील, हे निश्‍चित झालेले आहे. 
  • बाळाराम पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पनवेल नगरपालिकेला शाळा दुरूस्तीसाठी तब्बल एक कोटी सत्तावन्न लाखांचा निधी दिला. त्यातून खांदा, तक्का येथील नगरपालिकेच्या शाळांचे रूपडे बदलले. पण प्रशांत ठाकूर बिनधास्त खोटे बोलून हे काम मीच केले म्हणून त्याची प्रसिद्धी करतात. जिल्हा परिषदेकडे, नगरपालिकेकडे याच्या नोंदी आहेत. या नोंदींमध्ये बाळाराम पाटील यांनीच हे केल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे ही फसवणूक प्रशांत ठाकूर यांनी केल्याचे पनवेलकरांच्या लक्षात आले आहे. साहजीकच त्यांनी निर्धार केलेला आहे आता काँग्रेसमुक्त पनवेल करू.
  • एकवेळ प्रशांत ठाकूर यांनी काही न करता गप्प बसले असते तरी चालले असते. पण दुसर्‍याने केलेली काम स्वत: केली हे सांगण्यामुळे ते जास्त अडचणीत आलेले आहेत. आता मतदार सुशिक्षीत आहे. चाणाक्ष आहे. मतदाराची स्मरणशक्ती चांगली आहे. जी कामे शेतकरी कामगार पक्षाने केल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून ऐकले आहे ती केवळ उद्घाटन केल्याने आपल्या नावावर खपविण्याचे काम प्रशांत ठाकूर करीत असतील तर अशा चोराला आम्ही संधी देणार नाही हे मतदारांनी ठरविलेले दिसते.
  • प्रशांत ठाकूर यांनी परमेश्‍वराला स्मरून, वडिलांच्या प्रेमाला स्मरून, जनता जनार्दनाला स्मरून प्रामाणिकपणे जाहीर करावे की असे एक तरी काम त्यांनी केलेे आहे जे स्वत:च्या बुद्धीने केलेले आहे. विकासाच्या दृष्टीने केलेले आहे. याचे उत्तर प्रशांत ठाकूर देवू शकत नाहीत. त्यावेळी त्यांची बोलती बंद होते. म्हणूनच आता काँग्रेसमुक्त पनवेल हे धोरण इथल्या मतदारांनी आखले आहे. पितापुत्रांच्या काँग्रेसला इथला मतदार हद्दपार करणार आहे. कारण पनवेलकरांचा एकच निर्धार आहे, काँग्रेसमुक्त पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: