- पनवेल काँग्रेसमुक्त करण्याची गरज का आहे, तर पितापुत्रांच्या काँग्रेसने फक्त खोटे बोलण्याची, फसवणूक करण्याची, भ्रष्टाचाराची परंपरा चालवली आहे. या फसवणुकीतून पनवेलकरांना मुक्त करण्यासाठी पितापुत्रांच्या काँग्रेसला मूठमाती देण्याचे काम करायचे आहे. राम ठाकूर यांच्या वाढदिवसाची जाहीरात झी 24 तास या वाहिनीवर केली होती. राम ठाकूर यांना पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुभेच्छा या जाहीरातीत दिल्या होत्या. त्यात राम ठाकूर यांचा उल्लेख हा ‘काँग्रेसचे माजी खासदार’ असा केला होता. किती हा खोटारडेपणा?
- राम ठाकूर कधी काँग्रेसचे खासदार होते? काँग्रेसने तर राम ठाकूर यांना अडगळीत टाकले आहे. राम ठाकूर निवडून येऊ शकत नाहीत हे माहित असल्यामुळे त्यांनी राम ठाकूर यांना 2009 ला तिकीट नाकारले. राम ठाकूर हे खासदार झाले ते शेतकरी कामगार पक्षामुळे. परंतु खोटेपणा आणि गद्दारी ही या ठाकूर पितापुत्रांच्या रक्तातच असल्यामुळे टिव्हीवरच्या जाहीरातीतही चक्क काँग्रेसचे माजी खासदार म्हणून उल्लेख केला. हा खोटारडेपणा काँग्रेस खपवून घेणार का? पूर्वी तोतया आमदार म्हणून एक मराठी चित्रपट होता. त्यात आपण आमदार आहोत अशी अरूण सरनाईक सगळ्या गावाची फसवणूक करायचा. गाववाले अडाणी असल्यामुळे कधीही त्यांनी विचारले नाही की तुला निवडून कोणी दिला, कधी मतदान झाले, कधी निवडणूक लढवलीस? तो तोतया आमदार सगळ्यांवर अत्याचार, जुलूम करत असतो. तसाच प्रकार प्रशांत ठाकूर-राम ठाकूर यांचा आहे. काँग्रेसचे माजी खासदार असा उल्लेख जाहीरातीत प्रशांत ठाकूर यांनी झी 24 तासवर केलेला आहे. हे कधी काँग्रेसचे खासदार होते? आता प्रदेश काँग्रेसनेच हे जाहीर करावे. काँग्रेसचाही खोटा इतिहास लिहीण्याचा प्रकार राम ठाकूर- प्रशांत ठाकूर करणार आहेत काय? पक्षाने त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. या तोतया खासदाराच्या मुसक्या आवळण्याचे काम आता आगामी काळात इथला मतदार केल्याशिवाय राहणार नाही. रक्तारक्तात गद्दारी या पितापुत्रांच्या भरलेली आहे. एखाद्या महिलेचा घटस्फोट झाला तरी ती आपल्या मुलांची नावे लावताना घटस्फोटीत पतीचे नाव आडनाव लावतात. शेतकरी कामगार पक्षापासून घटस्फोट घेतलेल्या राम ठाकूर यांनी मात्र आपल्या नावामागे पाट लावलेल्या, पुनर्विवाहीत पतीचे नाव लावण्याचे काम केले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माजी खासदार असा उल्लेग केलेला आहे.
- प्रत्येक गोष्ट ढापायची जी सवय या उचल्या पितापुत्रांना लागली आहे, त्याचा हा अतिरेक आहे. शेतकरी कामगार पक्षाने केलेली कामे आपण केलेली आहेत असे भासवून आजवर जनतेची फसवणूक करत आले. आता खासदारकीही काँग्रेसने दिली म्हणून सांगण्याचा अधमपणा हे पितापुत्र करीत आहेत. काँग्रेसने खासदारकी नाही दिली, तर पितापुत्रांची लायकी दाखवून दिली. काँग्रेसमुळे तुम्हाला अस्तित्व आहे नाही तर गेला असतात बाराच्या भावात हे काँग्रेसने दाखवून दिलेले आहे. अजून तीन महिन्यांनी प्रशांत ठाकूर यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार अशी बिरूदावली लावली तर मान्य करता येईल. कारण त्यांना काँग्रेसने उमेदवारी दिली, आमदार केले. परंतु नंतर टुणकन अन्य पक्षात उडी मारली, शिवसेना-भाजप-आप अशा पक्षांची सध्या चाचपणी सुरू आहे, तिकडे गेल्यावर शिवसेनेचा माजी आमदार अशी बिरूदावली प्रशांत ठाकूर लावणार का? किंवा भाजपचा माजी आमदार, आपचा माजी आमदार अशी जाहीरात त्यांनी केली तर लोक तोंडात शेण घालतील. आज तोच प्रकार राम ठाकूर यांच्या बाबतीत होत आहे. काँग्रेसचे माजी खासदार नाही तर काँग्रेसचे तोतया माजी खासदार अशी गत राम ठाकूर यांची झालेली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना यातून पनवेलकरांचे जाहीर आव्हान आहे. काँग्रेसने कधी राम ठाकूर यांना खासदार केले होते ते जाहीर करा. खासदार म्हणून पनवेलकरांनी राम ठाकूर यांना कधीही निवडून दिले नव्हते. मग ते काँग्रेसचे खासदार झाले कोठून? शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या प्रत्येक कामावर स्वत:चे आणि काँग्रेसचे लेबल लावण्याचा जो सपाटा चालवला आहे त्याचा हा अतिरेक आहे.
- प्रशांत ठाकूर वारंवार खोटे पडत आहेत. त्यांचे खोटे उघड होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम शेतकरी कामगार पक्षाने केले. आमदार विवेक पाटील, जे एम म्हात्रे, संदीप पाटील, बा. रा. सदावर्ते यांचे त्यामध्ये फार मोठे योगदान आहे. ज्या ठिकाणी हे भवन बांधण्यात आले आहे त्या भूखंडाचे आरक्षण जे एम म्हात्रे यांनी केले. त्याच्या सगळ्या मंजूरी, कागदपत्रांची पूर्तता, प्लॅन, आराखडे हे शेतकरी कामगार पक्षाने केले. त्या कामाला सुरुवातही झाली. राम ठाकूर यांनी भवनाच्या भूखंडावर झोपडपट्टी वसवली त्या झोपडपट्टीचे पुनर्वसन आमदार विवेक पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून केले. फक्त उद्घाटन करण्याच्यावेळी शेकापकडे पालिकेची सत्ता नव्हती. त्याचा गैरफायदा घेत प्रशांत ठाकूर यांनी आंबेडकर भवन उभे केले असे सांगण्यास सुरूवात केली.
- शेतकरी कामगार पक्षाने केलेल्या कामाशिवाय एकही काम प्रशांत ठाकूर यांच्याकडे दाखवण्यासारखे नाही. यातून त्यांच्यात किती दम आहे हे दिसते. पनवेलच्या नाट्यगृहाबाबत असाच प्रकार चालवला. प्रशासकीय इमारत, पनवेलच्या शाळांबाबतही प्रशांत ठाकूर यांनी असाच खोटेपणा केला. दुसर्याच्या मुलांवर स्वत:चे नाव लावून कधी आपला पुरूषार्थ सिद्ध होत नाही हे या पितापुत्रांना समजलेले नाही. या खोटेपणाला पनवेलची जनता विटली आहे म्हणून त्यांनी आता या पितापुत्रांना पुन्हा गव्हाण शिवाजीनगरात नेऊन टाकण्याचे ठरवले आहे.
- स्वत: केलेली कामेही दाखवण्यासाठी नाहीत, त्याचबरोबर आता शेकापने दिलेली खासदारकीही काँग्रेसने दिली असे सांगण्याचा अधमपणा प्रशांत ठाकूर करत आहेत. त्यामुळे पनवेलच्या जनतेचा प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना सवाल आहे. पनवेलच्या जनतेचा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना सवाल आहे. पनवेलच्या जनतेचा राहुल गांधी यांना सवाल आहे. पनवेलच्या जनतेचा मुख्यमंत्र्यांना सवाल आहे की काँग्रेस इतकी रसातळाला गेलेली आहे काय? की स्वत:च्या जिवावर निवडून येण्याची क्षमता नसल्याने दुसर्याने देवू केलेल्या खासदारकीला आपली खासदारकी म्हणायची वेळ आलेली आहे? काँग्रेसच्या इतिहासात, निवडणूक आयोगाच्या नोंदीत, संसदेच्या कागदपत्रांच्या नोंदीत राम ठाकूर कधी काँग्रेसचे खासदार होते ते या सर्वांनी जाहीर करावे. राम ठाकूर काँग्रेसचे माजी खासदार असल्याची फसवी आणि खोटी जाहीरात करणार्या प्रशांत ठाकूर यांच्यावर पक्ष काय कारवाई करणार? काँग्रेसच्या तोतया खासदारांवर पक्ष काय कारवाई करणार?
- शेकापने दिलेली खासदारकी जशी काँग्रेसची खासदारकी म्हणून प्रशांत ठाकूर यांनी सांगून थापेबाजी करायला सुरूवात केलेली आहे तशीच शेकापने केलेली, आमदार विवेक पाटील यांनी केलेली, बाळाराम पाटील यांनी केलेली, जे एम म्हात्रे यांनी केलेली कामे आपणच केली हे सांगण्याचे काम प्रशांत ठाकूर यांनी केलेले आहे. प्रशांत ठाकूर यांच्या अंगात कसलेही कर्तृत्त्व नाही, हेच यातून सिद्ध झालेले आहे. प्रशांत ठाकूर यांनी केलेले एक तरी काम त्यांनी दाखवून द्यावे. हे आव्हान आता प्रशांत ठाकूर यांना वेळोवेळी देवूनही त्यांना ते सांगता आलेले नाही. तर हे समस्त पितापुत्रांच्या काँग्रेसला, पितापुत्रांना आणि पनवेलकरांना आव्हान आहे की प्रशांत ठाकूर यांनी पनवेल मतदारसंघासाठी स्वत:च्या अकलेले केलेले एक तरी काम दाखवून द्यावे. शेकापने केलेले काम स्वत:चे म्हणून सांगण्यापेक्षा प्रशांत ठाकूर यांच्या कल्पनेतून आलेले एक तरी काम या मतदारसंघातील कोणीही सांगावे, त्याचा जाहीर सत्कार आम्ही करण्यास तयार आहोत.
- देविचा रोगी कळवा, एक हजार रूपये मिळवा अशी घोषणा भारताने 1973 मध्ये दिली होती. तशीच अवस्था प्रशांत ठाकूर यांनी केलेले विकासकाम कळवा आणि सत्काराची शाबासकी मिळवा असे म्हणावे लागेल.
- या पितापुत्रांनी फसवणूक करणे, खोटी कामे करणे, भ्रष्टाचार करणे याशिवाय काहीही केलेले नाही. अतिरेक झाला की दिल्लीत जावून बोगस पुरस्कार खरेदी करायचा आणि स्वत:ला मोठे करायचे. बोगस पुरस्कारांनी मोठे झालेले हे काँग्रेसचे तोतया खासदार आणि त्यांचे पुत्र आता पनवेलकरांच्या नजरेतून उतरल्याने तिरस्काराने झिडकारले जातील हे निश्चित.
सोमवार, २ जून, २०१४
काँग्रेसचे तोतया खासदार
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा