- 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले. 1950 मध्ये प्रजासत्ताक देश अशी भारताची जगात गणना झाली. पण स्वातंत्र्य मिळूनही आणि प्रजासत्ताक देश असूनही या देशात लोकशाहीची स्थापना झाली नाही. प्रजेचे राज्य येवू शकले नव्हते. त्यामुळेच 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना मिळालेला विजय हा खर्या लोकशाहीचा, प्रजासत्ताकाचा विजय आहे. आता या देशाची वाटचाला स्वराज्याकडून सुराज्याकडे होणार यात शंकाच नाही. नरेंद्र मोदींचा शपथविधी हा सुशासन आणि सुराज्याचे तोरण बांधले आहे याची दखल जगाने घेतली आहे.
- अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार सोमवारी एका शानदार शपथविधी समारंभाने स्थानापन्न झाले. जगाच्या व्यासपीठावर एक वेगळी ओळख असलेला भारत हा खंडप्राय देश आहे. सहासष्ट वर्षांपूर्वी स्वतंत्र झाला तेव्हा नियतीने त्याच्या नावावर काय लिहून ठेवले आहे, याविषयी खूप काही बोलले आणि लिहिले गेले. खरे म्हणजे या देशात जे प्रचंड वैविध्य आहे, त्याच्यासह हा देश पुढे कसा प्रवास करणार, अशा शंका जगाने उपस्थित केल्या. आपल्या नागरिकशास्त्रात सतत सांगितले गेले की या देशातील विविधतेत एकता आहे. पण या विविधतेत दरी निर्माण करण्याचे काम सहा दशकात काँग्रेसने केले. त्यामुळे आता खर्या अर्थाने विविधतेतून एकता साधण्याचे कौशल्य नरेंद्र मोदींना पणाला लावावे लागणार आहे.
- आज जगातील अनेक देश स्थैर्य आणि लोकशाहीसाठी धडपड करत असताना भारत मात्र ‘जगातली सर्वात मोठी लोकशाही’ हा मुकुट घालून मिरवतो आहे. पारंपारीक काँग्रेसचा पगडा दूर करून भारतीय जनता पक्षाच्या हातात इथल्या मतदारांनी सत्ता सोपविली हा खर्या अर्थाने लोकशाहीचा विजय आहे. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अस्तित्वात आलेल्या लोकशाहीतील एक ऐतिहासिक क्षण भारताने साजरा केला.हा क्षण ऐतिहासिक यासाठी आहे की जगातली दुसर्या क्रमांकाची लोकसंख्या म्हणजे जगातील प्रत्येक सहा नागरिकांत एक भारतीय नागरिक आहे. हे प्रमाण असलेल्या देशाचे भवितव्य त्याच्याशी निगडित आहे.
- विकसित जगाशीच जर भारताची तुलना करायची झाली तर त्या निकषांतही भारत मागे नाही, हे सिद्ध करण्यासाठी भारतीय समाज धडपड करतो आहे. दहा वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाने या देशाला महासत्तेचे स्वप्न दाखवले होते. 2020 मध्ये भारत ही महासत्ता असेल हे स्वप्न दाखवल्यामुळे विकासाच्या मार्गावर भारत वेगाने जाणार असे प्रत्येकाला वाटत होते. पण दुर्दैवाने 2004 ला भाजपाची सत्ता गेली आणि दहा वर्ष काँग्रेसची निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी राजवट सुरू झाली. या काँग्रेस सरकारने महासत्तेचे स्वप्न तर पुसून टाकलेच पण देशाला खूप मागे टाकण्याचे काम केले. परदेशी बाजारपेठेत भारताची पत घसरली. त्यामुळे महासत्तेचे स्वप्न दूर गेले. अगदी पुसण्याच्या परिस्थितीत आले. त्याचवेळी नरेंद्र मोदींचे नवे युग सुरू झाले. आता जनतेच्या महासत्तेच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. त्यांना वेळ फार कमी मिळेल पण त्यातही ते काहीतरी चमत्कार घडवून आणतील असा विश्वास आणि अपेक्षा प्रत्येकाच्या मनात आहे. म्हणूनच नरेंद्र मोदींचा इथपर्यंतचा प्रवास हा फार महत्त्वाचा आहे. या प्रवासात सामान्यांचा विचार होईल आणि देश प्रगतीपथावर येईल अशी सामान्य माणसाची तीव्र इच्छा आहे. त्या प्रवासात अतिशय महत्त्वाच्या असलेल्या राजकीय बदलांत म्हणूनच सामान्य माणूस हिरिरीने भाग घेतो आहे. केवळ राजकीय बदलाने आपले आयुष्य बदलत नाही, हा अनुभव पाठीशी असताना त्या बदलाची अपरिहार्यता लक्षात आल्याने त्याने आशावाद अजिबात सोडलेला नाही. पन्नास कोटी नागरिक शांततेत मतदान करतात आणि आपले पुढील राज्यकर्ते ठरवतात, ही तर मानवी इतिहासातील एक महत्त्वाची घटना ठरावी. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात लोकशाही राज्यव्यवस्थेच्या घटना पहायला मिळतात. पण त्याकडे फक्त इतिहास आणि पुराण म्हणूनच पाहिले जाते. तो आदर्श मानला गेला नाही हे या देशाचे दुर्दैव होते. त्यामुळेच राम हा उत्तम लोकपाल, उत्तम राजा असतानाही या देशात रामराज्य यावे असे कधी यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना वाटले नाही. हे चित्र बदलत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्याचा असा सर्वमान्य महामार्ग झालेला जग प्रथमच पाहते आहे. म्हणूनच लोकशाही देश आणि हुकूमशाही देश अशा वाटणीत लोकशाही देशांच्या पारड्यात आधुनिक जग निर्विवाद अधिक माप टाकते आहे. लोकशाहीवर विश्वास असणार्या सामान्य माणसाने नरेंद्र मोदींना भरभरून मतदान केलेले आहे. कारण प्रत्येकाला बदल हवा होता. मतदारांनी मोदींना मतदान केले आहे, कोणत्या विशिष्ट पक्षाला नाही केेलेले. माणूस भविष्यात ज्या प्रकारच्या मानवी समूहाची कल्पना करतो आहे, ती समृद्धता-संवेदनशीलता आणि या पृथ्वीतलावर अतिशय वेगळी भूमिका बजावणार्या माणसाची मानवी प्रतिष्ठा प्रस्थापित होण्यासाठी ज्या मार्गाने जाण्याशिवाय पर्यायच नाही, ती ही लोकशाही आहे.
- जगाच्या दृष्टीने भारत नावाचा देश आज कदाचित गरीब, विकसनशील असेल. पण त्याची दिशा उद्याच्या देदीप्यमान भविष्याशी केवळ नाते सांगणारीच नव्हे, तर जगाला त्या दिशेने घेऊन जाणारी आहे हे दाखवून देणारा आजचा हा क्षण आहे. याचा सार्थ अभिमान बाळगावा, असे काही क्षण आपण आज भारतीय म्हणून आपण साजरे करत आहोत. भविष्यात जगात महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता असलेला भारत आज एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. स्वातंत्र्य मिळून 66 वर्षे झाली असली तरी त्या स्वातंत्र्याची फळे आता आता कोठे काही समूह चाखताना दिसत आहेत. दररोजच्या अन्नपाण्याच्या चिंतेतून काही समूह अगदी अलीकडे बाहेर पडले आहेत. स्वाभिमानी, जबाबदार मानवी समूहात सामील होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही मोजक्या समूहांनी कितीही उड्या मारल्या तरी ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केल्याशिवाय आपण समाधानी, समृद्ध आणि शांत जीवन जगू शकत नाही, हे आता आता अनेकांना उमगू लागले आहे. देशाभिमान हा केवळ प्रतीकांपुरता मर्यादित नाही, त्याचा उच्चार करताना सोबतच्या दुर्बल माणसाचा आवाज ऐकला गेला पाहिजे, त्याला लाचार आणि मुजोरीच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले पाहिजे आणि त्यासाठी भेदभावमुक्त शासनव्यवस्था प्रस्थापित करण्याशिवाय पर्याय नाही, हे कळणारा वर्ग आता सक्रिय झाला आहे. हा आत्मविश्वास, ही आत्मप्रतिष्ठा नरेंद्र मोदी यांनी समाजाला दिलेली आहे. ज्या समूहांपासून आजही स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य, सामाजिक प्रतिष्ठा हा दूरचा प्रवास आहे, अशा समूहांना हात देऊन एक जबाबदारी म्हणून त्यांना मूळ प्रवाहात आणण्यासाठी जे आपापल्या परीने धडपडत आहेत, अशा बहुआयामी समूहांत जगणार्या भारतीय नागरिकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर फार मोठी जबाबदारी आणि विश्वास टाकला आहे. लोकशाही हा समाज पुढे घेऊन जाण्यासाठीचा एक संवाद आहे. तो संवाद नेतृत्व करणार्याला सुरू करावा लागतो आणि नागरिक त्याला साद देतात किंवा नाकारतात. राजकीय प्रक्रियेतील ही सुरुवातीची अपरिहार्यता दोन्ही बाजूंनी पूर्ण झाली आहे. त्यामुळेच सोमवारच्या शपथविधीनंतर एका नव्या टप्प्यावरील प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात होईल. सक्षम आणि भेदभावमुक्त प्रशासन ही या देशाची गरज आह. सूडबुद्धीला निरोप देणे ही काळाची गरज आहे. काँग्रेसने या देशात सूडाचे राजकारण केले त्यामुळे देश विनाशाकडे चालला. ही परिस्थिती बदलते आहे. भारताला आत्यंतिक गरज असलेल्या देशी आणि विदेशी भांडवलाचे स्वागत केले पाहिजे. काळ्या पैशाचे रूपांतर शुद्ध भांडवलात करण्याचा संकल्प आता करण्याची वेळ आलेली आहे. देशातील विरोधक आणि शेजारी देशांना सोबत घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. न परवडणारा बडेजाव आणि बोजड झालेल्या परंपरांना नकार दिला पाहिजे. प्रश्नांच्या गुंत्यात शिरून ज्या प्रश्नांना लगेच उत्तरे शोधली पाहिजेत. नरेंद्र मोदी हेच करताना दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात दिलेल्या मुलाखती व विजयी झाल्यानंतरची त्यांची विविध व्यासपीठांवरील वक्तव्ये यामुळे भारतीय नागरिकांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. त्या अपेक्षा किती आणि कशा पूर्ण होतील त्याची कसोटीही आता सुरू होत आहे. पण हा कसोटीचा काळ यशस्वीपणे टीम मोदी हाताळेल यात शंकाच नाही. जनतेला अभिप्रेत सुराज्य स्थापन होईल यात तीळमात्र शंका नाही.
सोमवार, २६ मे, २०१४
सूराज्याचे तोरण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा