रविवार, ४ मे, २०१४

काँग्रेस आहेच कुठे?

  • काँग्रेसकडून सत्ता काढून घेण्यासाठी आता फक्त 12 दिवस बाकी आहेत. 7 मे आणि 12 मे हे दोन मतदानाचे टप्पे बाकी आहेत. पण काँग्रेस आणि यूपीएचे आता जेमतेम दोन आठवडे बाकी आहेत. मुख्य सामान आवरल्यावर जे किरकोळ सामान कचर्‍यात जमा करायचे असते तसा प्रकार बाकी आहे. कारण आज तरी देशातील महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता नाही. त्यामुळे जिथे शिल्लक आहे तिथे संपवणे आता बाकी आहे.
  • उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, तामिळनाडू, पश्‍चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही दहा राज्ये आजपर्यंत लोकसभेचे चित्र रंगवत आलेली आहेत. त्यांच्या हातात सत्तेचे समिकरण कायम राहिलेले आहे. कारण सर्वाधिक खासदार पाठवणारी ही मोठी राज्ये आहेत. बाकी छोटीमोठी राज्ये चार दोन खासदार देतात. पण संख्याबळ ठरविणारी ही महत्त्वाची राज्ये आहेत. त्यामुळेच या दहा राज्यातच काँग्रेस संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे आता फकत जी छोटी छोटी राज्ये आहेत तिथे शिरकाव करू पाहणार्‍या काँग्रेसला हटवणे हे या देशाच्या नागरिकाचे कर्तव्य असेल.
  • उत्तरप्रदेश हे सर्वात मोठे राज्य. सर्वाधिक खासदार या राज्यातून लोकसभेत पाठवले जातात. त्यामुळेच सर्वाधिक पंतप्रधान या राज्याने दिलेले आहेत. 80 खासदार एकटा उत्तरप्रदेश लोकसभेत पाठवत असतो. त्यामुळे या राज्यात ज्याला जास्त खासदार निवडून आणता येतात त्या पक्षाला संधी निर्माण होवू शकते. उत्तरप्रदेशच्या विभाजनापूर्वी उत्तराखंडच्या निर्मितीपूर्वी 84 खासदार लोकसभेत एकट्या उत्तर प्रदेशचे होते. महणजे लोकसभेच्या संख्याबळाच्या 15 टकके खासदार उत्तरप्रदेशातून जातात. त्याचप्रमाणे बहुमतासाठी आवश्यक असणारा जादुई आकडा जो आहे त्याच्या 30 टक्के खासदार एकट्या उत्तरप्रदेशातून जातात. या उत्तरप्रदेशने स्वातंत्र्यापासून काँग्रेसला साथ दिली होती. पण हे सर्वात मोठे राज्य सर्वात मागास ठेवण्याचे काम काँग्रेसने केल्यामुळे गेल्या वीस वर्षात उत्तरप्रदेशातून काँग्रेसला मतदारांनी हाकलले आहे. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे दीर्घकाळ सत्ता भोगलेले पंतप्रधान या राज्यांमधून  निवडून आले. पण इथल्या तरूणांना तेव्हाही आणि आत्ताही रोजगार मिळू शकला नाही. रोजगारासाठी इथल्या तरूणांना अन्य राज्यांकडे धाव घ्यावी लागली. महाराष्ट्र तर सर्व उत्तरभारतीयांना पोसणारे राज्य झाले आहे. कारण महाराष्ट्रातील मुंबईची सकाळ उजाडते तीच भैय्या दूध घेवून येतो तेव्हा. रात्रीचा दिवा मालवताना बनारसी पान खावून आपण झोपतो. या दरम्यानच्या काळात जेवढ्या सेवा लागतात त्यामध्ये रिक्षा असो, सलून, भेळपुरी, रद्दी, भंगार, बांधकाम साहित्य, वाहतूक या सगळ्या बाबतीत उत्तरप्रदेशातील लोकांना महाराष्ट्र रोजगार देतो आहे. कारण त्यांना पंचेचाळीस वर्ष राज्य करूनही नेहरू गांधी घराण्याने काही दिले नाही. पोटासाठी वणवण करत बाहेरच्या राज्यात जावे लागले. याची जाणिव जेव्हा पंचवीस वर्षांपूर्वी झाली तेव्हा उत्तरप्रदेशातून काँग्रेसची सत्ता गेली. काही काळ भारतीय जनता पक्ष, काही काळ मायावती, काही काळ कल्याणसिंग, काही काळ मुलायमसिंग आणि आता त्यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांच्याकडे या राज्याची सत्ता राहिली. पण या वीस वर्षात उत्तरप्रदेशातून काँग्रेस नामशेष होत राहिली. भारतीय जनता पक्ष काही तरी विकासाची कामे करतो आहे हे लक्षात आल्यावर तिथल्या जनतेने 1996 मध्ये 84 पैकी 54 खासदार भाजपच्या पदरात टाकले होते. अशा या महत्त्वपूर्ण राज्यात गेल्या दोन दशकांपासून काँग्रेस नाहीशी झालेली आहे. आता तिला मूळापासून उखडण्यासाठी फक्त अमेठी आणि रायबरेलीतून मायलेकरांना हालवणे गरजेचे आहे. 1977 साली ज्याप्रमाणे इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांना पराभूत केले तसा पराभव पुन्हा एक़दा करून काँग्रेसला संपविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे आहे. सव्वाशे वर्षांची परंपरा सांगणार्‍या काँग्रेसला एवढ्या मोठ्या राज्यात उमेदवारही मिळत नाहीत, सत्ता मिळत नाही हे काँग्रेस संपल्याचे लक्षण आहे.
  • उत्तरप्रदेशनंतर सर्वात जास्त खासदार पाठवणारे महाराष्ट्र हे राज्य आहे. पूर्वी महाराष्ट्र तिसर्‍या क्रमांकावर होता. पण बिहारचे विभाजन झाल्यानंतर बिहारची खासदारसंख्या 54 वरून 40 इतकी झाली. त्यामुळे 48 खासदार पाठवणारा महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर पोहोचला. हा महाराष्ट्र  भ्रष्टाचाराने पोखरण्याचे काम काँग्रेसने केले. इथला रोजगार ठप्प केला. जलसिंचनाबाबत समृद्धी असूनही पाणी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवता आले नाही. कारण शेतकर्‍यांना तडफडत ठेवण्याची काँग्रेसची प्रवृत्ती होती. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या दहा वर्षात लाखो शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. हे काँग्रेसचे पाप आहे. याची जाणिव इथल्या मतदारांमध्ये झालेली आहे. त्यामुळे गेली दोन दशके काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळवता आलेली नाही. 1995 मध्ये मतदारांनी युतीला संधी दिली होती. या काळात सेना भाजपयुतीने लक्षणीय कामे केली होती. पण ती पूर्ण करण्याचे काम गेल्या पंधरा वर्षात या आघाडी सरकारने केलेले नाही. काँग्रेसची स्वबळावरची सत्ता तर काढून घेतलीच. महाराष्ट्रातून ठिकठिकाणची काँग्रेस हद्दपार होताना दिसते आहे. पण आघाडीचे राजकारण करून काँग्रेसने सत्ता मिळवली. इथल्या जनतेवर अन्याय केला. मतविभागणीचा फायदा उठवत काँग्रेसने सत्ता मिळवली पण या खेपेला ती संधी मिळणार नाही. काँग्रेसच्या स्थानिक पुढार्‍यांच्या निष्क्रियतेमुळे काँग्रेसचे बालेकिल्ले संपुष्टात येत आहेत हे महाराष्ट्रातून काँग्रेस हद्दपार होत असल्याचे लक्षण आहे. सातारा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री होते. याठिकाणी गेल्या वीस वर्षात काँग्रेसला खासदार निवडून आणता आलेला नाही. आनंदराव चव्हाण, प्रेमलाकाकी चव्हाण यांनी पराभव कधी कराड लोकसभा मतदारसंघातून पाहिलेला नव्हता. परंतु त्याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून आनंदराव चव्हाण आणि प्रेमलाकाकींचे सुपुत्र असलेले सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर निवडून येण्याची क्षमता नसलेले नेते असा शिक्का  पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर बसला तो गेली पंधरा वर्ष तसाच आहे. राज्यसभा आणि विधानपरिषद यावर त्यांना आपली भूक भागवावी लागली आहे. सांगलीतही आज तीच परिस्थिती आहे. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला या निवडणुकीत पूर्ण ढासळणार आहे. त्यामुळे ठिकठिकाणहून महाराष्ट्रातून काँग्रेसला हादरे बसणार आहेत. रायगड जिल्ह्यात तीच परिस्थिती आहे. 1952 च्या पहिल्या निवडणुकीपासून प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार रायगडमधून निवडणूक लढवत होता. ही पहिली निवडणूक आहे की काँग्रेसचा हात झटकून टाकला आहे. जिल्ह्यात राम ठाकूर यांनी केलेली काँग्रेसची दुर्दशा आणि भ्रष्ट कारभारामुळे दोन गटांमध्ये काँग्रेस विभागली आहे. ओरीजनल काँग्रेसला राम ठाकूर यांचा गट विचारात न घेता वाटेल तसे निर्णय घेत असल्यामुळे काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ रायगडातून घालवला गेला. विधानसभेलाही तेच होणार आहे. रायगडमधून  एकही आमदार निवडून येणार नाही याची दक्षता इथला मतदार घेत आहे. त्यामुळे दुसर्‍या क्रमांकाचे खासदारसंख्याबळ पाठवणारे राज्यही काँग्रेसच्या ताब्यात नाही हे चित्र आहे. सव्वाशे वर्षांच्या काँग्रेसला या देशात स्वबळावर एकही राज्य जिंकता येत नाही यासारखे दुर्दैव ते काय असणार? पण विकासापासून जनतेला वंचित ठेवल्यामुळे ही वेळ काँग्रेसवर आलेली आहे. अशा मोठ्या राज्यांमधून संपुष्टात ये चाललेली काँग्रेस ढोबळ प्रमाणात मार खाताना दिसत आहे.
  • बिहार हे तिसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य. चाळीस खासदार असलेल्या या राज्यात काँग्रेसला कधी संधीच मिळालेली नाही. लालूंची भ्रष्ट सत्ता संपुष्टात आणून आता नितिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाकडे गेली दहा वर्ष सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाबरोबर युती केल्यामुळे संयुकत जनता दलाला हे यश मिळाले आहे. एकेकाळचा भाजपचा मित्रपक्ष असलेला संयुक्त जनता दल आज भाजपबरोबर नसला तरी तो काँग्रेसबरोबरही नाही. इथे सध्या नरेंद्र मोदींचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे इथे काँग्रेसला एकही खासदार निवडून आणता येणे शक्य नाही. विधानसभेत हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही आमदार काँग्रेसकडे नाहीत. त्यामुळे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र बिहार या तीन प्रमुख राज्यांमध्ये काँग्रेस शिल्लकच राहिलेली नाही. इथे उमेदवारही काँग्रेसला मिळत नाहीत. याचा स्पष्ट अर्थ आहे की अखिल भारतीय काँग्रेस किती दुबळी आहे, किती संपलेली आहे.
  • कर्नाटकात अनेक दशकांनंतर काँग्रेसला गेल्यावर्षी सत्ता मिळाली. ती केवळ अपघाताने. म्हणजे अपघाताने देवेगौडा जसे या देशाचे पंतप्रधान झाले होते तसाच तो प्रकार होता. भारतीय जनता पक्षाने उत्तम कामगिरी केलेली असतानाही येदीयुरप्पा प्रकरणामुळे भाजपचे झालेले विभाजन काँग्रेसच्या पत्थ्यावर पडले. पण हे क्षणिक सुख आहे. हे राज्य वगळता या देशात कोणत्याही मोठ्या राज्यात काँग्रेस नाही. या देशातून काँग्रेस कोणाचा तरी आधार घेवून कुठे तरी शेवटच्या घटका मोजत आहे. पण 16 मे च्या पराभवानंतर शिल्लक कचराही उधळून लावला जाईल. कोपर्‍यात टाकला जाईल.
  • गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये गेल्या पंधरा वर्षात काँग्रेसला हद्दपार केलेले आहे. मध्यप्रदेशातून 2003 मध्ये दिग्विजयसिंग यांची दहा वर्षांची सत्ता संपुष्टात आणली त्याचा मानसिक धक्का एवढ्या मोठ्या प्रमाणात दिग्विजयसिंगांना बसला की ते मनोरूग्णाप्रमाणे बरळणारे नेते अशी प्रतिमा त्यांची झालेली आहे. काँग्रेसमधील राहुल गांधी गटातील वेड्यांच्या बाजारातील नेते अशी त्यांची ओळख झालेली आहे. राजस्थानातही काँग्रेसला शून्य करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थान ही तीन राज्य मिळून 75 पेक्षा जास्त खासदार निवडून देतात. त्याठिकाणी काँग्रेस शून्य झालेली आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींचे काँग्रेसमुक्त भारत हे स्वप्न साकार होण्याचे काहीच दिवस राहिलेले आहेत.
  • प. बंगालमध्ये अडीच दशके डाव्या पक्षांची सत्ता होती. मागच्या निवडणुकीत ती गेली असली तरी ती काँग्रेसकडे गेलेली नाही. ती सत्ता तृणमूल काँग्रेसने मिळवली आहे. तृणमूलच्या नेत्या ममता बॅनर्जी या राहुल गांधींना गृहीतही धरत नाहीत. 39 खासदार या राज्यातून निवडून दिले जातात. या मोठ्या राज्यातही काँग्रेस नामशेष झालेली आहे.
  • तामिळनाडूतूनही 39 खासदार निवडून दिले जातात. याठिकाणी कधी जयललिता तर कधी करूणानिधी यांचा पाठशिवणीचा खेळ चालतो. पण इथे काँग्रेसला बिल्कूल थारा नाही. इथे शिरकाव करण्यासाठी राजीव गांधींच्या मारेकर्‍यांना वाचवण्याचे जे गलिच्छ राजकारण काँग्रेसने केले आहे त्याचा परिणाम संपूर्ण देशावर होत आहे. त्यामुळे इथेही काँग्रेसला संधी नाही.
  • आंध्र प्रदेशातही कायम तेलगू देसमची सत्ता राहिलेली आहे. इंदिरा गांधी हत्येनंतर सहानुभूतीच्या लाटेत सगळ्या पक्षांना झोपावे लागले असताना तेलगू देसम या पक्षाने राज्यातील सर्वाधिक संख्याबळ मिळवून आपली चूणूक दाखवली होती. त्यामुळे या मोठ्या राज्यातही काँग्रेस अस्तित्वात नाही.
  • संपूर्ण देशामध्ये काँग्रेसकडे स्वबळावर येण्याची कोणतीही चिन्हे नाहीतच. पण ही काँग्रेसच्या अस्तित्वाची लढत आहे. उत्तरप्रदेश, गुजरात, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमधून काँग्रेस संपली ती पुन्हा उभारली नाही. बाकीच्या दक्षिणेतल्या राज्यात कधी त्यांची सत्ता नव्हतीच. आता महाराष्ट्रातूनही काँग्रेसची अशीच अवस्था होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: