बुधवार, २१ मे, २०१४

मोदी युगाचा प्रारंभ आशादायक

  • 26 मे रोजी भारताचे नवे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी या देशाची सूत्र हाती घेत आहेत. मंगळवारी संसदीय नेतेपदी त्यांची निवड झाल्यानंतर त्यांनी जे आपले पहिलेच भाषण केले ते खूप आश्‍वासक आणि आशादायक असे होते. त्यामुळे नरेंद्र मोदी या देशाला विकासाच्या मार्गावर नेतील हे स्वप्न सत्यात उतरले याबाबत विश्‍वास वाटतो. अत्यंत हेटाळणीतून आणि द्वेष मत्सर पत्करून लोकांच्या हृदयात स्थान मिळवण्याचे काम नरेंद्र मोदींनी केलेले आहे. नरेंद्र मोदींप्रमाणे या देशात अनेकांना अवहेलना सहन करावी लागली होती. पण त्या व्यक्ती आपल्या ध्येयापासून किंचितही विचलीत झाल्या नाहीत, त्यामुळे त्या व्यक्ती थोर झाल्या. संत, महात्मा झाल्या. त्याच पंगतीत आज नरेंद्र मोदी जावून बसलेले दिसत आहेत.
  • नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यापासून 125 कोटी भारतीयांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. आपल्या देशाला तब्बल 25 वर्षांनी मजबूत सरकार मिळते आहे, राजकीय साठमारी कमी होऊन सरकार वेगाने कामाला लागू शकेल, मंत्रिमंडळाचा आकार छोटा असेल, त्यामुळे सरकारी खर्चावर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, या सर्व सकारात्मक गोष्टींचा आनंद जनतेला झाला आहे. पण याचा खरा अर्थ असा आहे की, आता भारताचा आर्थिक विकास वेगाने होईल आणि आपलेही चांगले दिवस येतील, असे नागरिकांना मनापासून वाटू लागले आहे. नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर येते आहे हे समजल्यावर शेअर बाजारात केवढे चैतन्य निर्माण झाले. शेअर बाजाराने ऐतिहासिक उंची गाठली. गेल्या चार वर्षात सातत्याने होत असलेली रूपयाची घसरण थांबून भारतीय रूपाया आपली किंमत निर्माण करू शकला हे मोदी यांच्या येण्याने झालेले आहे. त्यामुळे खरोखरच अच्छे दिन आनेवाले है या मोदींच्या घोषणेचे सत्यात रूपांतर होताना दिसत आहे.
  •  एखाद्या नेत्याविषयी किंवा येऊ घातलेल्या सरकारविषयी जनतेच्या मनात असा विश्वास वाटणे ही चांगली आणि अत्यावश्यक गोष्ट आहे. शेअर बाजारातील चढउतार हा काही भारतीय नागरिकांच्या आर्थिक प्रगतीचा किंवा अधोगतीचा एकमेव निकष नाही; मात्र तो देशाच्या आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा निकष झाला आहे. त्या शेअर बाजाराने नरेंद्र मोदी यांना जी सलामी दिली आहे, ती अभूतपूर्व अशीच आहे. भारतीय शेअर बाजाराची चाल परकीय गुंतवणूकदारच ठरवतात, हे आता लपून राहिलेले नाही. भारतात स्थिर सरकार येणार आणि त्याचे नेतृत्व नरेंद्र मोदी करणार, या अंदाजावरच त्यांनी बाजारात पैसा ओतायला सुरुवात केली आणि नरेंद्र मोदी यांचे नाव पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यापासून म्हणजे गेल्या सात महिन्यांत असे एक लाख कोटी रुपये त्यांनी ओतले आहेत. शेअर बाजाराने नवनवे उच्चांक गाठले आहेत आणि पुढे तो 30 हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी भाकिते या क्षेत्रातील काही लोक करू लागले आहेत. अर्थात शेअर बाजार असो नाही तर जागतिक आर्थिक संस्थांनी केलेले मूल्यांकन असो; ते शेवटी प्रत्यक्षात काय होईल, या आशेवर अवलंबून असते. त्यांची ती भाकिते आहेत. त्यासाठी देशाला झटकून कामाला लागावे लागणार आहे. भविष्य रंगवताना वस्तुस्थितीचे भान ठेवावेच लागणार आहे. 
  • आज देशाचा विकासदर दशकातला सर्वात कमी म्हणजे 4.5 टक्के आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेसने फक्त सत्तेेची खुर्ची उबवायची, गरम करायची एवढेच काम केले आहे. विकासाच्या मार्गावर देशाला नेलेच नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षात हा देश पंचवीस वर्ष मागे गेला. 2004 पर्यंत असलेले भारतीय जनता पक्षाच्या सरकारने 2020 चे जे महासत्तेचे स्वप्न या देशाला दाखवले होते ते स्वप्न पुसण्याचा अधमपणा काँग्रेसने केला. या देशाला विकासाच्या मार्गावरून अधोगतीकडे नेण्याचा नीचपणा केला. हा खरं तर काँग्रेसने केलेला देशद्रोहच म्हणावा लागेल. ते चित्र बदलण्याची संधी आता प्राप्त होणार आहे.
  • या देशात गेल्या दहा वर्षात नवे रोजगार निर्माण होण्याची गती अतिशय मंदावली आहे. गेल्या काही महिन्यांत वित्तीय तूट कमी झाली असली तरी इंधनाचे दर वाढले की ती कधीही वाढू शकते. महागाई आटोक्यात येत नसताना एल निनोचे संकट घिरट्या घालते आहे. कमी पाऊस पडला तर महागाई 2.5 टक्क्यांनी वाढते, असा 2009चा अनुभव आहे. गुंतवणुकीचे चाक यूपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळे रुतले आहे. पायाभूत उद्योग अजूनही अंदाजच घेत आहेत. कर्ज महाग झाले आहे. किचकट करप्रणालीने व्यावसायिक वैतागले आहेत. ही परिस्थिती बदलणे, ही काही साधी गोष्ट नाही. आर्थिक जगतात भारताला हत्ती म्हटले जाते. त्याचा आकारच एवढा आहे की, तो चालायला लागला की आर्थिक उलाढालीला आपोआप वेग येतो; मात्र तो बसला तर त्याला उठवून चालायला लावणे, महाकठीण काम आहे. म्हणूनच काही दिवसांपूर्वी भारत ही जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे, असे जाहीर होऊनही देशात जागचे काहीच हलले नाही. प्रत्यक्ष हालचाल होण्यासाठी निवडणुकीचे नगारे त्याच्या कानात वाजवावे लागले. ते मात्र इतक्या जोरात वाजले की, हा हत्ती आता खडबडून जागा होणार आणि एकदम पळायला लागणार, अशी भाकिते केली जात आहेत. हत्ती एकदम पळायला लागणार नाही, हे तर खरेच आहे. मात्र तो उठून चालायला लागणार, असे आता सर्वच जण मानू लागले आहेत. हा काँग्रेसच्या काळात गाळात रूतलेला आणि बसलेला हत्ती उठून चालवण्याचे आश्‍वासक काम नरेंद्र मोदींना करावे लागणार आहे. त्यामुळे मोदी जे काही करतील ती प्रत्येक गोष्ट अत्यंत आश्‍वासक अशी असेल.
  • निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून ज्या प्रकारच्या अपेक्षा व्यक्त होत आहेत आणि जो आशावाद जागा झाला आहे, ती त्याची चुणूकच म्हणता येईल. पुढील वर्षी विकासदर 6.5 टक्के आणि त्याच्या पुढे तो 7 टक्क्यांवर जाईल, असे आर्थिक संस्था सांगू लागल्या आहेत. शेअर बाजार तर उधळलाच आहे. देशात पुढील काळात सकारात्मक बदल होईल, असे बहुतांश नागरिक मानू लागले आहेत. अर्थव्यवस्थेवरील विश्वास वाढीला लागताच आगामी काळात ग्राहक खर्च करायला लागतील. सरकार दरबारातील फाइल्स वेगाने पुढे सरकू लागतील. गुंतवणुकीची संधी शोधत असलेले परकीय गुंतवणूकदार एफडीआयच्या माध्यमातून भांडवलाची गरज भागवतील.
  •  येत्या जून-जुलैत सादर होणार्‍या अर्थसंकल्पात उत्साहवर्धक निर्णय घेतले जातील, असे आणि यासारखे बरेच काही होऊ शकते. नरेंद्र मोदी यांना उद्योजकांचा असो किंवा 10 कोटी नवमतदारांचा पाठिंबा मिळाला, तो यासाठीच. ग्राहकशक्तीच्या माध्यमातून भारत तिसरी आर्थिक सत्ता आहे. पण केवळ चाक रुतल्याने ती आज निद्रिस्त आहे. ती जागी झाली की कोठे जाऊ शकते, हे गेल्या काही दिवसांतील उत्साहवर्धक घटनांनी दाखवून दिले आहे. भ्रष्टाचार आणि बलात्काराच्या घटनांचा इतका गवगवा झाला की, जणू या देशात फक्त अशाच गोष्टी घडतात, असा संदेश जगभर गेला. त्याला थोपवण्यास काँग्रेसचे नेतृत्व कमी पडले. आता नरेंद्र मोदी जी भाषा बोलत आहेत, त्यात देशाची ही प्रतिमा बदलण्याचा इरादा दिसतो आहे. आज हा इरादा प्रामुख्याने भावनेवर हिंदोळे घेणार्‍या शेअर बाजारावर दिसत असला तरी उक्ती तशी कृती, याची नव्या सरकारकडून नुसती चुणूक जरी दिसली तरी भारताच्या विकासाचा नवा टप्पा सुरू होईल, अशी आशा करायला काहीच हरकत नाही. या देशाने जो नरेंद्र मोदींवर भरभरून विश्‍वास टाकला आहे त्याला जागून नरेंद्र मोदी मोठ्या मनाने हा बदल घडवतील आणि जनतेला खूष ठेवतील याबाबत शंका घेण्याचे कारण आता नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: