मंगळवार, २६ एप्रिल, २०२२

हाथी चले अपनी चाल


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संयमाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कुणी कितीही टीका करण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला प्रत्युत्तर देण्याच्या फंदात न पडता आपल्या कृतीतून जे ते उत्तर देतात ते नावाजण्यासारखे आहे. भारतीय जनता पक्षाचे किरीट सोमय्यांपासून छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत एकीकडे टीकेची झोड उठवत असताना, आमचा कार्यकर्ता, शिवसैनिक ही आमची ताकद आहे, हे त्यांनी अत्यंत चाणाक्षपणे दाखवून दिले. अनुल्लेखाने टीकाकारांची तोंडे बंद केली, याला म्हणतात राजकारणातील मुत्सद्देगिरी.

मुंबईत रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. पहिलाच लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना जाहीर झाला होता. या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी ते मुंबईत आले होते; पण पंतप्रधानांनाही बेदखल करून मुख्यमंत्र्यांनी आपल्या शिवसैनिकाला प्राधान्य दिले.


तुमच्या पक्षाचे आणि आमचे जमत नाही, आमच्यावर टीका करायची मग तुमच्या स्वागताला राजशिष्ठाचार म्हणून आम्ही का यावे?, आपल्या सरकारमधील प्रतिनिधी पाठवला आणि आमच्याकरता तुम्ही बिलकुल महत्त्वाचे नाही, आमच्यासाठी आमचा शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. पंतप्रधान आणि लता मंगेशकर कुटुंबीयांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली आणि आपल्या तळागाळातल्या कार्यकर्त्याला त्यांनी महत्त्व दिले. गेले काही दिवस त्या नवनीत राणा, रवी राणा या प्रकरणावरून भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेवर, मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. काही उद्योग नसल्यागत सगळ्या वाहिन्या आपापले कॅमेरे मातोश्रीवर लावून बसले आहेत, पण या सगळीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आम्ही तुमच्या टीकेला, भुंकण्याला काडीचीही किंमत देत नाही, हे त्यांनी दाखवून दिले. हाथी चले अपनी चाल या उक्तीप्रमाणे त्यांनी बेदखल करून या सर्व प्रकारांना उत्तर दिले हे फार महत्त्वाचे होते. आदळआपट करून काही होत नाही शांतपणाने काम केले, तर काही तरी ठोस उत्तर देता येते, झोंबेल असे ते उत्तर असते, हे त्यांनी कृतीतून दाखवले, ही बाब अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगेशकर कुटुंबीयांचा कार्यक्रम असताना, तीच वेळ साधत रविवारी अचानक चंद्रभागा शिंदे या ९२ वर्षांच्या महिला शिवसैनिकाच्या घरी भेट दिली, म्हणजे मुख्यमंत्र्यांना त्या कार्यक्रमात सन्मानाने बोलावले होते, दोन दिवस माध्यमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच व्यासपीठावर येणार अशा चर्चा होत्या; पण त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री गेलेच नाहीत. माझ्या दृष्टीने पंतप्रधान महत्त्वाचे नाहीत, माझ्या दृष्टीने लता मंगेशकर महत्त्वाच्या नाहीत तर शिवसैनिक महत्त्वाचा आहे, हे दाखवण्याला त्यांनी प्राधान्य दिले. बरे गेले काही महिने ते आजारी होते, त्यामुळे आजारपणामुळे मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले नाहीत, अशी बातमी येऊ नये यासाठी त्यांनी आपण ठणठणीत आहोत, हे दाखवत सहकुटुंब ज्येष्ठ शिवसैनिकांच्या घरी जाण्याचा कार्यक्रम केला. याला राजकीय मुत्सद्देगिरी म्हणतात. गेल्या चार-पाच दिवसांतील घटना पाहता कोणत्याही नेत्याचा संयम सुटला असता. प्रतिक्रिया दिली असती, कडवट टीका केली असती; पण ते मुख्यमंत्र्यांनी टाळले. आपल्या एका कृतीतून त्यांनी काय-काय सिद्ध केले?


मुख्यमंत्र्यांच्या या अचानक घडलेल्या कार्यक्रमामुळे भाजपची नियोजित असलेली पोलखोल सभा रद्द करावी लागली. ज्या ठिकाणी चंद्रभागा शिंदे राहतात त्याच बिल्डिंगच्या खाली भाजपची रविवारी त्याचवेळी पोलखोल सभा आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी स्टेज देखील उभारण्यात आला होता; मात्र मुख्यमंत्र्यांच्या गाड्या जाण्यासाठी हे स्टेज तोडावे लागले. हाथी चले अपनी चाल म्हणतात ते असे. अनुल्लेखाने मारणे म्हणतात ते असे.

मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर देखील या सभेला परवानगी नसल्याचे कारण देत पोलिसांनी उद्या ही सभा घ्या, असे आवाहन केले. या सभेला भाजप नेते नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर संबोधित करणार होते. सभा अचानक रद्द झाल्याचे दिसताच भाजप कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली; मात्र नितेश राणे यांनी सभेच्या ठिकाणी येऊन पोलखोल सभेला मुख्यमंत्री आणि सरकार घाबरत असल्याचे सांगितले, तसेच सोमवारी दणक्यात ही सभा घेऊ, असेही त्यांनी जाहीर केले; पण भाजपचा डाव मोडण्यात आपण वारंवार यशस्वी झाल्याचे त्यांनी दाखवून दिले.


२०१९ ला भाजपला मुख्यमंत्री बनवायचा होता; पण तो डाव काँग्रेस-राष्ट्रवादीला बरोबर घेऊन त्यांनी उधळून लावला. तोच प्रकार त्यांनी काल केला. आमचे शिवसैनिक सर्वांना भारी आहेत. तेच माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यांच्यापुढे कोणी पंतप्रधान असोत नाही, तर कुणी भारतरत्न असोत. आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते आमचे शिवसैनिक. ही त्यांची मुत्सद्देगिरी अत्यंत दखल घेण्यासारखी आहे.

विरोधकांनी आगामी महापालिका निवडणुका डोळ्यापुढे ठेवून पोलखोल सुरू केली असली, तरी इथला मतदार आमच्या पाठिशी आहे, हे दाखवून निवडणुकीपूर्वी शिवसैनिकांत आशावाद निर्माण करण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले. ज्येष्ठ शिवसैनिकाच्या घरी जाऊन त्यांना घर देण्याचे, त्यांच्या कुटुंबीयांना नोकरी देण्याचे आश्वासन देऊन त्यांनी शिवसैनिकांत ऊर्जा निर्माण केलेली आहे. हे फार महत्त्वाचे होते. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत, दोन वर्षे मंत्रालयात गेले नाहीत, अशी टीका सातत्याने त्यांच्यावर होत होती; पण केव्हा घरातून बाहेर पडायचे असते, ते त्यांनी दाखवून दिले. पंतप्रधान आले, तरी आमच्यासाठी आमचा मतदार महत्त्वाचा आहे. आज या कृतीमुळे एका आजीला घर मिळाले, यात प्रत्येक शिवसैनिकाला समाधान आहे. प्रत्येक राजकारण्याने या कृतीतून काहीतरी शिकले पाहिजे.

चित्रकथी


लोककला आणि संस्कृतीमधील अनेक फॉर्म आपल्याकडे आजपर्यंत नाटकासाठी वापरले गेले आहेत. जांभुळआख्यान या नाटकासाठी गोंधळाचा फॉर्म वापरला होता. महानिर्वाणसाठी सतीश आळेकरांनी किर्तनाचा फॉर्म वापरला होता. अनेक नाटकांसाठी पथनाट्याचा वापर केला होता. पारंपरिक नटी सूत्रधाराचे फॉर्म वगळून ज्या मार्गाने कथा सांगितली जाते असे अनेक फॉर्म हे नाटकासाठी वापरले जातात. तसाच एक फॉर्म १९८० च्या दशकात एकांकीका आणि नाटकासाठी वापरला गेला होता. तो म्हणजे चित्रकथी.

चित्रकथी म्हणजे चित्रांच्या सहाय्याने सादर केलेली कथा. त्याप्रमाणे पडद्यावर पालखी आणल्याप्रमाणे रंगीत चित्रांचे फळे आणले गेले होते आणि त्यामागे खरे कलाकार. चित्र पुसल्याप्रमाणे, चित्रातील माणसांप्रमाणेच त्याची रंगभूषा वापरून बाहुल्या वाटाव्यात अशाप्रकारे कलाकारांचा वापर करून एक उत्तम नाट्य उभे केले होते. त्यासाठी हा चित्रकथीचा फॉर्म वापरला होता.


आदिवासी जीवनात चित्रकलेची फार मोठी परंपरा आहे. पिंगुळीच्या ठाकर आदिवासींचा चित्रकथी हा कलाप्रकार खूप नावाजलेला आहे. एका वेगळ्या चित्रशैलीतील परंपरा पिंगुळीच्या ठाकर आदिवासींनी जोपासली आहे; मात्र ही कला वारली कलेसारखी फक्त भिंतीचित्रांपुरतीच मर्यादित नसून, ती एक प्रयोगशील कला आहे. चित्रांच्या सहाय्याने कथा सांगण्याची कला म्हणजेच चित्रकथी.

‘वर्णकै: सह ये वक्तिस चित्रकथको वर: गायका यत्र गयन्ति विना तालेर्मनोहरम’, असा चित्रकथी कलेचा उल्लेख सोमेश्वराच्या मानसोल्लासमध्ये आढळतो. यावरून लक्षात येईल की, ही कला किती प्राचीन आहे ते. ठाकर आदिवासी १५ इंच लांब आणि १२ इंच रुंद आकाराच्या कागदावर एका विशिष्ट्य शैलीत चित्रे काढतात. वनस्पती आणि मातीच्या रंगाने ही चित्रे रंगवितात. रामायण, महाभारतातील एखादे आख्यान निवडून प्रसंगानुरूप चित्रे काढतात. कथानकाच्या घटनाक्रमानुसार त्यांचा क्रम ठरलेला असतो. कागदाच्या दोन्ही बाजूस ही चित्रे काढली जातात. एका कथानकाच्या चित्रांची एक पोथीच तयार होते.


चित्रकथी म्हणजे चित्रांद्वारे सादर केलेली कथा. या कथा सादरीकरणाला ठाकर कलावंत पोथी सोडणे म्हणतात. हे आदिवासी कलावंत गावातील मंदिरात चित्रकथीचा खेळ करतात. कलाकार मंदिरात घोंगडीवर मांडी घालून बसतात. सूत्रधार सर्वप्रथम पोथीची पूजा करतो. सूत्रधाराच्या समोर एक लाकडी फळी उभी केली जाते. सूत्रधाराच्या उजव्या हातात तीन तारी वीणा, तर डाव्या हाताच्या अंगठा आणि करंगळीमध्ये टाळ गुंतविलेला असतो. तर साथीदारांकडे डमरू आणि तुणतुणे ही वाद्ये असतात. सूत्रधार रिद्धीसिद्धीसह गणपतीचे चित्र फळीच्या आधाराने उभे करतो आणि गाऊ लागतो.

विघ्नहरासी गायो एकदंता देवागौरीहराचिया सुता सकट सरसी गुण गाता तुझे चरणी नमन माझे।। असे पद म्हणून गणपतीचे स्तवन करतो. त्यानंतर पान पलटून सरस्वतीचे चित्र समोर ठेवतो आणि सरस्वतीची आराधना करतो. रसिकांची मने जिंकू शकेन, अशी रसाळ वाणी मला दे अशी सरस्वतीकडे मागणी करतो आणि मग आख्यानाला सुरुवात करतो. रामायण, महाभारत आणि पौराणिक कथांवर आधारित आख्याने सूत्रधार सादर करतो. आख्यान सादर करताना प्रथम त्या प्रसंगाला अनुरूप असे चित्र फळीवर लावतात आणि त्याविषयी वर्णनपर ओवी गायली जाते आणि त्यानंतर त्या ओवीचे निरूपण सूत्रधार करतो, तसेच आख्यानातील पात्रांचे संवाद सूत्रधार आणि साथीदार बोलतात आणि कथानक पुढे नेतात, कथानकाच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रसंगाची चित्रे फळीवर लावली जातात. आख्यानाचे निरूपण करताना सूत्रधार मराठी भाषेसोबतच स्थानिक भाषेचा वापर विनोदासाठी करतो, तसेच काही दाखले देण्यासाठी विद्यमान घटनांचा आधार घेतात. सूत्रधाराचे निरूपण कौशल्य आणि गायनातील गोडवा रसिकांना खिळवून ठेवतो. पिंगुळीतील ठाकर आदिवासींकडे असलेल्या पोथ्यात रामायण, महाभारतातील अनेक आख्याने तसेच डांगीपुराण, नंदीपुराण, जालंदर वध, कपिलासूर अशी अनेक आख्याने आहेत. या आख्यानातील पदे, कवने आणि संवाद एका पिढीकडून दुसºया पिढीकडे मौखिक परंपरेने चालत असतात.


ही आपल्याकडे फार सुंदर लोककला आहे. पण कोणताही फॉर्म असला, कोणतीही लोककला, असली तरी त्यात रामायण आणि महाभारताशिवाय ती अपुरी आहे. दशावतार असोत व आणखी कोणत्याही प्रादेशिक नाटकांचा प्रकार त्याचप्रमाणे चित्रकथीतही अशा कथांचा वापर होतो, हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे. त्यामुळेच या फॉर्मची भुरळ रंगकर्मींना पडली.

प्रफुल्ल फडके/संस्कृती


9152448055\\

महाराष्ट्राला शांतता हवी आहे


गेले काही दिवस सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्राचे इतके वातावरण गढूळ केले आहे की, सगळीकडे अशांतता माजली आहे. महाराष्ट्रात असे वातावरण अभिप्रेत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या वक्तव्यामुळे भंग पावणारी अशांतता थांबवण्याची गरज आहे. सर्वच पक्षांत असे लोक आहेत, त्यांना आवर घालण्याचे काम सर्व पक्षांच्या नेत्यांनी केले पाहिजे. त्याचप्रमाणे सर्वच वृत्त वाहिन्यांनी अशा नेत्यांना थोडे डावलले पाहिजे. काही तरी करमणूकप्रधान वक्तव्य मिळतात, म्हणून त्यांचे कोट घेणे, प्रतिक्रिया घेणे हे प्रकार थांबवले पाहिजेत, कारण महाराष्ट्राला शांतता हवी आहे.


वृत्त वाहिन्यांनी काही दिवस किरीट सोमय्या, संजय राऊत, अमोल मेटकरी या नेत्यांची वक्तव्ये दाखवणे थांबवले पाहिजे. आता शुक्रवार, शनिवार संपूर्ण महाराष्ट्रासह मुंबईला वेठीस धरण्याचा प्रकार खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दोघांनी केला. त्यामुळे शिवसैनिक भडकले आणि दोन दिवस दुसरा कोणताही विषय टीव्हीवर दिसत नव्हता. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक झाल्यावर भाजप नेते किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले. त्यानंतर तेथून परतत असताना सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. किरीट सोमय्या कशासाठी गेले होते खार पोलीस ठाण्यात?, प्रत्येक गोष्टीत प्रतिक्रिया दिली पाहिजे, असे का सोमय्यांना वाटते?, तुम्हाला काय भ्रष्टाचाराची प्रकरणे काढायची आहेत ती काढा; पण वातावरण गरम असताना पोलीस ठाण्यात जाण्याची काय गरज होती?, तिथं ठिय्या देऊन शिवसैनिक दोन दिवसांपासून आहेत, हे सर्वांना माहिती होते. असे असताना आक्रमक शिवसैनिक अंगावर येणार हे गृहीत होते. असे असताना किरीट सोमय्या तिथे गेलेच कशासाठी?, राणा पती-पत्नी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेली होती. काँग्रेस पुरस्कृत ते उमेदवार होते. ते भाजपचे नेते, कार्यकर्ते नव्हते. मग त्यांना अटक केली, म्हणून तिथे बघायला सोमय्या कशासाठी गेले? त्यांनी भाजप प्रवेश केला असेलच, तर भाजपचे चंद्रकांत पाटील, आशिष शेलार हे जातील ना पाहायला. ते कोणीही गेलेले नसताना किरीट सोमय्या तिथले वातावरण बिघडवायला कशासाठी गेले, हा संपूर्ण महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे.

कधीकधी आपलं बरोबर असलं तरी गप्प बसण्यातच शहाणपणा असतो. आधीच मुंबई पोलिसांवर दोन दिवसांपासून इतका ताण पडलेला आहे. तहान-भूक विसरून या कडक उन्हाळ्यात, काही दंगा होऊ नये, म्हणून त्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे. अशा परिस्थितीत किरीट सोमय्यांचे काय कारण होते तिथे जाण्याचे?, तुमची यंत्रणा इतकी प्रभावी आहे, तर पाहिजे ती माहिती फोनवरून सोमय्यांना मिळाली असती; पण वातावरणात तणाव निर्माण करण्यासाठी तिथे जाणे टाळायला हवे होते. महाराष्ट्राला शांतता हवी आहे, यासाठी अशा नेत्यांना पक्षप्रमुखांनी आवर घातला पाहिजे.


किरीट सोमय्या यांना झेड प्लस सिक्युरिटी असतानाही हल्ला कसा झाला, हा प्रश्न विचारण्यात येत आहे. यावर आता सोमय्यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या म्हणाले, झेड सिक्युरिटीचा अर्थ असा आहे की, जे प्रोटेक्टी आहेत त्यांची सुरक्षा करणे. झेड सिक्युरिटी कायद्यात लिहिले आहे की, लोकल बंदोबस्त हा स्थानिक पोलिसांनी करायचा आहे. हजारोंची संख्या तिथे असताना, वातावरण तणावपूर्ण असताना पोलिसांवर ताण टाकायला ते बाहेरच का पडले?, पोलिसांना तेवढीच कामे आहेत का?, यापूर्वीही शिवसैनिकांकडून सोमय्यांवर हल्ले झालेले आहेत. असे असताना सोमय्यांनी अशा परिस्थितीत जाणे चुकीचे होते. त्यांना भाजपच्या नेत्यांनी का अडवले नाही?

कोणत्याही पक्षाचे मोठे नेते बोलत नाहीत. या संपूर्ण प्रकरणात भाजपचे केंद्रीय नेते बोलले नाहीत, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शांत होते. हा संयम महत्त्वाचा होता; पण प्रसिद्धीच्या सतत झोतात राहण्याची सवय लागल्याप्रमाणे किरीट सोमय्या, संजय राऊत हे मात्र सतत प्रतिक्रिया देत होते. त्यामुळे वातावरण बिघडत होते. महाराष्ट्रात अशा प्रकारे वातावरण तापवण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. अतिपरिचयात अवज्ञा होते, त्याप्रमाणे सतत कॅमेºयापुढे आल्याने जनतेच्या मनातून तुम्ही उतरत आहात, हे अशा नेत्यांनी लक्षात घेतले पाहिजे. वाहिन्यांनीही प्रत्येक गोष्टीवर, घटनेवर याच नेत्यांची प्रतिक्रिया घेण्याची गरज नाही. जरा नवे चेहरे दाखवा. नाही तर वाहिन्यांचाही टीआरपी खाली येईल. एकाही वाहिनीला आपण कोणा वेगळ्या नेत्याची प्रतिक्रिया घ्यावी असे वाटत नाही.


प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाइन्स

9152448055\\

महागाईवर कोणी बोलणार आहे की नाही?


देशातले राज्यातले सगळे प्रश्न संपले आहेत, कोणीही चिंतेत नाही, त्यामुळे काही तरी उचापती करायच्या म्हणून निरनिराळे वाद उकरून काढायचे, असा सध्या राजकारणाचा प्रवाह संपूर्ण देशात चाललेला दिसतो आहे; पण यामध्ये सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत असलेल्या महागाईवर कोणीही काहीही बोलताना दिसत नाही.


खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जर हनुमान चालिसा या विषयापेक्षा महागाईचा मुद्दा हातात घेतला असता आणि त्यासाठी रस्त्यावर उतरले असते, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना प्रतिसाद मिळाला असता. आज जीवनावश्यक वस्तूंच्या किमती इतक्या भयानक वाढल्या आहेत की, सामान्यांचे जगणे कठीण झालेले आहे. भाजीपाल्याचे भाव तर इतके वाढले आहेत की, गृहिणींना आपल्या नवºयाला टिफीनमध्ये काय द्यायचे हा प्रश्न पडलेला आहे. यावर कोणीच बोलत नाही. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील महंगाई मार गयी या गाण्याची प्रचिती आता येताना दिसत आहे. ‘पहले मुठ्ठी में पैसे जाते थे, थैलाभर शक्कर आती थी, अब थैले में पैसे जाते हैं, मुठ्ठी में शक्कर आती हैं,’ या त्या गाण्यातील ओळीप्रमाणे आजची परिस्थिती आहे. त्यावर कोणीही बोलत नाही.

महागाई का झाली, तर राज्याने केंद्राकडे बोट दाखवायचे, केंद्राने राज्याकडे बोट दाखवयाचे. या प्रकाराला सामान्य माणूस वैतागला आहे. सामान्यांच्या प्रश्नावर बोलणारा कोणीच नाही, त्यामुळे फक्त वाचाळवीरांचे राजकारण होताना दिसत आहे. दुधाची दरवाढ मागच्या आठवड्यात झालेली आहे. खाद्यतेलाच्या किमती तर इतक्या वाढल्या आहेत की, त्याची दरवाढ का तर म्हणे रशिया-युक्रेन युद्धामुळेही दरवाढ झालेली आहे. स्थानिक बाजारात तयार होणाºया तेलाचा आणि रशियाच्या युद्धाचा काय संबंध आहे, याचे उत्तर सामान्य माणसाला मिळत नाही. आता १ तारखेपासून म्हणे सलूनचे दर ३० टक्क्यांनी वाढणार आहेत. खरंतर लॉकडाऊन उठल्यानंतर त्यांनी सगळे दर दुप्पट केले होते. निर्बंध उठल्यावर ते पुन्हा कमी केलेले नाहीत, तरी ही दरवाढ होणार आहे. ओला-उबेर आणि टॅक्सी-रिक्षांचे दर आता वाढणार आहेत. त्यामुळे कोणतीच गोष्ट आता स्वस्त राहिलेली नाही. रस्त्यावरचा चहा महागला, वडापाव महागला. यावर कोणीही काहीही बोलत नाही. फक्त राजकारण आणि टाईमपास चालला आहे. चिखलफेक करण्याची चढाओढ लागली आहे. हे प्रकार कधी बंद होणार आणि जगणे कसे सुखकर होईल, म्हणून सामान्य माणूस चिंतेत आहे.


एक काळ असा होता की मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर अशा रणरागिणी महागाई, टंचाई, दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरायच्या आणि जनतेला न्याय मिळवून द्यायच्या. सत्ता हालवायची ताकद त्यांनी निर्माण केलेली होती; पण आजकाल स्टंटबाजी करण्यात राजकारण चालले आहे. महिलांच्या प्रश्नावर, सामान्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले पाहिजे, असे महिला असूनही नवनीत राणांना का वाटले नाही?, कोणा आमदाराची किती लग्न झाली, कुणाला फसवले, कुणी महिलांवर अत्याचार केले, पिडीतेला कसे फसवले यावर महिला नेत्या आक्रमक होताना दिसतात. त्यासाठी पत्रकार परिषदा घेतात; पण सामान्य गृहिणींना भेडसावणाºया महागाईविरोधात महिला नेत्याच उतरत नाहीत, ही शोकांतिका आहे. आम्ही महिलांच्या प्रश्नावर लढा देतो, असे सगळ्या पक्षातील नेत्या म्हणतात. यामध्ये भाजपच्या चित्रा वाघ असतील, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण असतील आणि अन्य पक्षातील महिला नेत्या असतील; पण महिलांचे प्रश्न म्हणजे फक्त त्यांच्यावर होणारे बलात्कार आणि फसवून शरीरसंबंध हेच आहेत का?, सामान्य महिलांना घर कसं चालवायचं हा प्रश्न पडतो, त्यासाठी महागाईविरोधात लढा देण्याची जबाबदारी का कोणी घेत नाही?, पण तसे केले तर फारशी प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच महागाईचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळे सामान्य माणसांचा सवाल आहे की, महागाईवर कोणी बोलणार आहे की नाही?

महागाईच नाही, तर सर्वसामान्यांचे खूप प्रश्न आहेत. शिक्षणाचा प्रश्न आहे. शिक्षणाचे लॉकडाऊनमुळे तीन तेरा वाजले आहेत. अजून पूर्वपदावर त्याची घडी आलेली नाही. दहावी- बारावी परीक्षांचे पेपर तपासण्यास काही शिक्षक संघटनांनी नकार दिला आहे. त्यामुळे दहावी-बारावीचे निकाल वेळेत लागतील याची शक्यता नाही. भावी पिढीचे किती नुकसान होताना दिसत आहे. यावर कोणीही राजकीय नेता बोलायला पुढे येत नाही. कोणीही त्यावर आंदोलन करत नाही. अनेकांना एसटी संपाचा फटका बसल्यामुळे शाळेत जाता आले नाही. एसटी संपामुळे अतोनात नुकसान झाले. त्यावर कोणी वाच्यता करत नाही; पण जिथे फुकट प्रसिद्धी मिळते, अशा प्रकारांवर चर्चा करायला, रस्त्यावर उतरायला सगळे तयार असतात. कुणाचा अवमान झाला, कुणाच्या भावना दुखावल्या, कसली स्टंटबाजी झाली की, सगळे रस्त्यावर येतात; पण महागाई आणि सर्वसामान्यांसाठी कोणीच कसे काय रस्त्यावर येत नाहीत?, अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. अवकाळीने शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाऊस भरपूर पडला, तरी पाण्याचे नियोजन न केल्यामुळे अनेक भागात पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यावर कोणी का बोलत नाही?, हनुमान चालिसा, भोंगे इतके महत्त्वाचे आहेत की, त्यापुढे सामान्यांचे प्रश्न तुच्छ वाटावेत?

पीके काँग्रेसला तारणहार होणार का?


सध्या पीके म्हणजे प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा आहे. २९ एप्रिलला ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे वाटत आहे. प्रवेशापूर्वीच पक्षाच्या पुनरुत्थानासाठी ६०० पानांचे प्रझेंटेशन पीकेंनी केले; पण त्याला कोणा काँग्रेस नेत्याने फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. त्यामुळे पीके जरी भाजप, तृणमूल आणि आपल्याला फायदेशीर ठरले, तरी त्यांचा काँग्रेसला कसलाही फायदा होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असेल.


काँग्रेसमध्ये मुळातच गांधी कुटुंबाला काय हवे ते चालते. गांधी कुटुंबांशिवाय कोणाच्याही मताला तिथे अजिबातच महत्त्व नसते. त्यामुळे बाहेरून नव्याने अनेक पक्ष फिरून आलेल्यांची मते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मानणार नाहीत. त्यामुळे काँग्रेसला प्रशांत किशोर यांचा काहीही फायदा होणार नाही. मुळात काँग्रेसच्या पुनर्रुजीवनासाठी नेतृत्व बदलाची गरज आहे; पण गांधी परिवाराशिवाय कोणाकडे नेतृत्व देण्याची कुटुंबाची इच्छा नाही. तीन-तीन वर्षे बिन अध्यक्षाचा पक्ष चालवला जातो. त्याला बिगर गांधी परिवार अध्यक्ष आणण्याची हिंमत प्रशांत किशोर यांच्यात असेल, तर त्यांना यश येईल. नाही तर यशस्वी रणनीतीकारांनाही अपयशाचा सामना करावा लागेल.

सुप्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार अशी ख्याती मिळवलेले प्रशांत किशोर (पीके) यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी तब्बल ६०० स्लाइड्सचे एक प्रझेंटेशन तयार केले आहे. पण, कोणत्याही नेत्याने अद्याप ते सविस्तर पाहिले नाही. किशोर यांनी काँग्रेसला गतवैभव मिळवून देण्यासाठी ज्या सूचना केल्या आहेत, त्या आता हळूहळू उजेडात येत आहेत. पण, त्या सूचना कोणी मनावर घेत नाही. बाहेरून आलेला आम्हाला काय शिकवणार ही भावना जोपर्यंत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि गांधी परिवार हे प्रमाण मानले जात आहे, तोपर्यंत प्रशांत किशोर यांना यश मिळणार नाही, हे वास्तव आहे. प्रशांत किशोर यांनी आपल्या ब्ल्यू प्रिंटमध्ये काँग्रेसला आपल्या जुन्या सिद्धांतांकडे वळण्याची, तळागाळातील कार्यकर्त्यांना मजबूत करण्याची व पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष नेमण्याची सूचना केली आहे. पण, गेल्या तीन वर्षांत त्यांना हे करता आलेले नाही. निष्ठावंत अशा जी २३ नेत्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना अडगळीत टाकण्याचा प्रकार परिवाराने केला. त्यामुळे नुकताच प्रवेश करणाºया प्रशांत किशोर यांचे गांधी कुटुंबीय काय करतात, हे पाहावे लागेल.


प्रशांत किशोर यांनी आघाडीशी संबंधित मुद्दे सोडवण्यासाठी पक्षाच्या कम्युनिकेशन सिस्टममध्ये बदल करण्यावरही जोर दिला आहे. त्यांनी आपल्या प्रझेंटेशनची सुरुवात महात्मा गांधी यांच्या विधानाने केलेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला केव्हाही मरण्याची परवानगी देता येत नाही. हा पक्ष केवळ राष्ट्रासोबतच मरू शकतो. हा गांधींचा विचार त्यांनी काँग्रेसला आठवण करून दिला आहे. याचा अर्थ मी बरोबर आलो, तरच काँग्रेस जगेल अन्यथा मरेल, असा संदेश पीकेंनी दिला आहे. त्यामुळे फक्त नंदीबैलासारखे मुंड्या हलवणारे अन्य नेते याचा काय अर्थ घेतील?

किशोर यांनी सादर केलेले प्रझेंटेशन सोनिया गांधींपुढे गतवर्षी जून महिन्यात सादर करण्यात आले होते. त्यात भारताची लोकसंख्या, मतदार, विधानसभा व लोकसभेच्या जागा आदींची आकडेवारी आहे. एवढेच नाही तर त्यात महिला, तरुण, शेतकरी व छोट्या व्यापाºयांच्या आकडेवारीचाही उल्लेख आहे. त्यात २०२४ मधील १३ कोटी फर्स्ट टाइम मतदारांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पण, वर्षभरात सोनिया गांधी, राहुल गांधींना याचे महत्त्व कळले नाही. ते प्रशांत किशोर यांना कुजवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रशांत किशोर यांना काँग्रेस घेईल ते फक्त त्यांनी दुसरीकडे जाऊ नये म्हणून. त्यांचा विचार ऐकण्यासाठी नाही.


पीकेंनी आपल्या सादरीकरणात सांगितले की, काँग्रेसचे आता राज्यसभा व लोकसभेत ९० खासदार आहेत. विविध विधानसभांत ८०० आमदार आहेत. काँग्रेसचे ३ राज्यांत सरकार आहे. ३ राज्यांत ते आघाडी सरकारमध्ये आहेत. दुसरीकडे, १३ राज्यांत काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे. ३ राज्यांत सहकारी पक्षांसोबत मुख्य विरोधी पक्ष आहे. आपल्या प्रझेंटेशनमध्ये किशोर यांनी १९८४नंतर काँग्रेसच्या मतांत कशी घसरण झाली याची सविस्तर माहिती दिली आहे; पण याकडे लक्ष देण्यास काँग्रेस नेतृत्वाला वेळ नाही. काँग्रेसमध्ये कोणा सल्लागाराची आवश्यकता नसते. त्यामुळे रणनीतीकार म्हणून त्यांना तिथे बिल्कुल वाव असणार नाही. आज जरी प्रवेश केला, तरी २०२४च्या निवडणुकीनंतर प्रशांत किशोर नवीन घर शोधतील, नव्या पक्षाचा विचार करतील.

काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रशांत किशोर यांनी ३ फॉर्म्युले सांगितलेत. त्यामध्ये काँग्रेसने संपूर्ण देशात स्वबळावर निवडणूक लढवावी, तसेच भाजप व मोदींचा पराभव करण्यासाठी काँग्रेसने विविध विरोधी पक्षांची मोट बांधून यूपीएला मजबूत करावे आणि काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी, तर काही ठिकाणी सहकाºयांसोबत मिळून लढवावी. पण, असे करताना पक्षाच्या राष्ट्रीय प्रतिमेला तडा जाणार नाही याची काळजी घ्यावी. पण हे सल्ले काँग्रेस विचारात घेणार का? त्यामुळे भाजप, तृणमूल आणि आपला मोठे करण्यात यश आले, तरी पीकेंचे कर्तृत्व काँग्रेसमध्ये सिद्ध होणार नाही. काँग्रेसमध्ये विचारांची मोकळीक असणार नाही.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

साहित्य संमेलनातील अस्वस्थता



शनिवारपासून उदगीरमध्ये सुरू झालेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये संमेलनाध्यक्ष भारत सासणे, उद्घाटक शरद पवार आणि प्रमुख पाहुणे व ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ कोकणी लेखक दामोदर मावजो या तिघांच्याही भाषणांमध्ये लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा प्रकर्षाने चर्चिला गेला, परंतु त्यानिमित्ताने एकूण तिघांचाही रोख देशातील सध्याच्या राजवटीवरच असल्याचे दिसले. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून राजकीय भाष्य करण्याची संधी साधली गेली. अर्थात गेल्या काही वर्षांत हेच चित्र पाहायला मिळत आहे; पण किमान संमेलनाध्यक्ष सासणे यांनी, तरी साहित्यावरच बोलायला हवे होते; पण त्यांचे बरेचसे भाषण हे शेजारी बसलेल्या शरद पवारांना खूश करणारे ठरले. त्यांचे अध्यक्षीय भाषण बोचºया टोमण्यांनी ठासून भरलेले होते.

भाषणामधून अशा प्रकारची प्रस्थापित राजकीय व्यवस्थेविरुद्धची मते प्रकट करणे हे प्रतिष्ठेचे ठरू लागले आहे. आपणही राजकीय भाषण चांगले करू शकतो, हे दाखवण्याची जणू अहमहमिका लागल्याचे दिसत होते. निवडणुकीची प्रचाराची व्यासपीठे कमी पडली म्हणून की काय, साहित्य संमेलनातही विरोधकांवर टीका करण्याचा प्रकार केला जात आहे, असे वाटते. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नसताना उगाचच भीतीचा बागुलबुवा निर्माण केला जात आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर साहित्यिक भूमिकेच्या आडून आपली विशिष्ट राजकीय भूमिका आणि विचारधारा मांडण्यासाठीच सर्रास होत आलेला आहे, असे गेली काही वर्षे प्रकर्षाने दिसत आहे.


दोन वर्षांपूर्वी बडोद्याच्या संमेलनात तत्कालीन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजा, तू चुकतो आहेसचा इशारा दिला होता. या संमेलनामध्ये सासणेंनी यंत्रयुग आणि तंत्रयुगानंतर आपण भ्रमयुगात येऊन पोहोचलो आहोत, सामान्य माणूस भ्रमित, संमोहित झालेला आहे, त्याची वाचा हरवलेली आहे. एक अबोध दहशत, भीती आणि आतंक त्याच्या जगण्याला वेढून व्यापून राहिलेली आहे आणि या भीतीबद्दल साहित्याने बोलणे, सांगणे अपेक्षित आहे, असे ठासून सांगितले; पण बाकी कोणापासून सुरुवात होण्यापेक्षा सासणे यांनीच अगोदर लिहावे आणि व्यक्त व्हावे. ते लिहिले तर अशी कोणतीही परिस्थिती नाही हे दिसून येईल. त्यामुळे हा भ्रम राहणेच चांगले, असे वातावरण साहित्य संमेलनातून निर्माण केले जात आहे.

सासणे आपल्या भाषणात म्हणतात, आपण सध्या छद्मबुद्धी विध्वंसकांच्या ताब्यामध्ये जातो आहोत, ही काळरात्रीची सुरुवात आहे. एका पुंगीवाल्यामागून समाज फरफटत चाललेला आहे वगैरे वगैरे कोरडे ओढत त्यांनी आपली विशिष्ट राजकीय भूमिकाच आपल्या अध्यक्षीय भाषणामधून मांडण्याचा प्रयत्न केला. पण, पुंगीवाल्यामागे माणसे जात असतील, तर त्या अगोदर उंदीरही गेले आहेत, हे समग्र भा. रा. तांब्यांच्या कवितेतील पूर्वाध विसरलेला दिसतो.


संमेलनाचे उद्घाटक शरद पवार तर स्वत: राजकारणी नेतेच आहेत. त्यामुळे त्यांनीही देशातील विद्यमान राजकीय नेतृत्वावर ताशेरे ओढणे स्वाभाविक होते. त्यात भरीस भर म्हणून आपले ज्ञानपीठकार दामोदर मावजो यांनी आज साहित्यात सत्ताधाºयांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स तयार झाले आहेत, असे म्हणत आपलेही हात धुवून घेतले. सत्ताधाºयांना चिअर्स करणारे चिअर लीडर्स आजच तयार झालेले आहेत काय? प्रत्येक राजवटीमध्ये, प्रत्येक विचारधारेच्या राजवटीमध्ये असे सत्तेपुढे नांगी टाकणारे होते. किंबहुना केव्हा नव्हते हे पण सांगता येणार नाही.

विशिष्ट विचारधारेचाच साहित्यिक हा ताठ कण्याचा असतो, असे कसे काय म्हणता येईल? आणीबाणीच्या काळ्या कालखंडामध्ये कोणी कोणी साहित्यीकांना वेठीस धरले हे सगळ्यांना माहिती आहे. अगदी कराडच्या साहित्य संमेलनापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कराडमध्ये लाडक्या व्यक्तिमत्वाची अंत्ययात्राही काढली होती. याचा शरद पवारांना विसर पडलेला असेल का?


साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे जरूर असावे, परंतु ते त्याच्या आडून आपल्या राजकीय भूमिका मांडण्याचा मंच बनू नये, एवढीच सामान्य वाचकाची अपेक्षा आहे. सामान्य वाचक आपली साहित्यिक भूक भागविण्यासाठी मोठ्या अपेक्षेने आलेला असतो. पण अशा व्यासपीठावरून राजकीय नेतृत्वाला जेव्हा विदूषक, थाळीवाला आणि पुंगीवाला संबोधून खिल्ली उडविली जाते, तेव्हा एका परीने देशातील लोकशाही प्रक्रियेप्रतीच यातून अविश्वास प्रकट होतो. त्यामुळे त्यांनी भाषणांतून मांडली गेलेली अस्वस्थता ही खरोखर लेखकाची अस्वस्थता आहे की, सत्तेपासून दूर राहिलेल्या विचारांची अस्वस्थता आहे, याचा विचार केला पाहिजे.

साहित्य संमेलनाचे व्यासपीठ हे राजकीय झाल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांची हुजरेगिरी करण्याची वेळ जर संमेलनाध्यक्षांवर येत असेल, तर लेखक स्वत:ची मते कशी काय मांडणार? स्पष्ट मते मांडणारे, व्यक्त होणारे लेखक या महाराष्ट्रात नाहीत का?, कसल्या भीतीपोटी लेखक, साहित्यिक ही हुजरेगिरी करत आहेत?, सत्ताधाºयांवर टीका करण्यासाठी तिथे उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांच्या दबावापोटी आणि त्यांना खूश करणारी मते व्यक्त करण्याचे ते व्यासपीठ आहे का?, म्हणजे आज राष्ट्रवादी काँग्रेसचा कोल्हापुरात संकल्प सभा आहे, त्या संकल्पाची सुरुवात साहित्य संमेलनातून केली काय, असा प्रश्न पडतो. साहित्य संमेलनापासून खरे साहित्यिक, वाचक लांब जात आहेत आणि राजकीय नेत्यांचे शक्तीप्रदर्शनाचे ते स्थान होत आहे, हे चांगले नाही.

रिमोट आहे, त्याचा वापर करा


इस्लामपूर येथील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण व पुरोहितांबाबत भाषणात अपमानास्पद उल्लेख केला. त्यामुळे अनेक ब्राह्मण संघटनांनी निषेध व्यक्त केला, आंदोलन केले. पुणे, नाशिक, पंढरपुरात काही ब्राह्मण संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या, पण याची काहीच गरज नव्हती. अमोल मिटकरी यांना स्वत:चे महत्त्व वाढवायचे असल्यामुळे त्यांनी हे दुष्कृत्य केले होते, पण त्यांच्याविरोधात आंदोलन करावे इतके ते काही मोठे नाहीत. किमान आपल्या हातात मतदानाचा रिमोट आहे, त्याचा योग्य वेळी वापर करून चाणक्याने ज्याप्रमाणे नंदकुळाचा नाश करून त्यांना सत्तेवरून हटवले तसे बाणेदारपणे कृत्य ब्राह्मणांनी करायला पाहिजे. आजवर राज्यात इतकी विविध समाजाची आंदोलने झाली त्यातली किती यशस्वी झाली? आंदोलनाने प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्येक समाजाने आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या हातातील मतदानाचा रिमोट योग्यप्रकारे वापरला पाहिजे आणि त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.


अमोल मिटकरींच्या वक्तव्याचा राष्ट्रवादीकडूनही निषेध झालेला आहे, ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असे सांगून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे हे प्रकरण जास्त ताणून धरायची गरज नाही. काय ताकद आहे ती मिटकरींना तिथल्या लोकांनी निवडणुकीत मतदानाचा रिमोट वापरून दाखवावी. रस्त्यावर उतरायची गरज नाही.

अमोल मिटकरींना हिंदू धर्मातील कन्यादान या प्रकाराचा खेद वाटतो. त्यावर त्यांचा आक्षेप आहे. असूदे असला तर आक्षेप. त्यांचा राक्षस विवाहावर विश्वास असेल, मुलींना पळवून नेणाºया प्रवृत्तीचा ते पुरस्कार करणारे असतील, तर सुसंस्कृतपणाने होणारे विवाह त्यांना रुचणार कसे? आपल्याकडे म्हण आहे की, कुठल्या तरी प्राण्याला म्हणे गुळाची चव काय? तसाच तो प्रकार आहे. त्यामुळे त्यांना इतके महत्त्व देण्याची काहीच गरज नाही.


मुळात अमोल मिटकरींना एक मिमिक्री आर्टिस्ट म्हणून त्या सभेला बोलावले होते. त्यांना काही विचारवंत म्हणून आणले नव्हते. विचारवंत असतात ते अभ्यास करून बोलतात. वाचाळविरांची गरज प्रत्येक पक्षांना वाटतेच. राष्ट्रवादीची ती ख्याती आहे. दहा वर्षांपूर्वी अजितदादांनी धरणात नको तिथले पाणी सोडले होते. तेच पाणी प्राशन केलेले हे मिटकरी, चांगले बोलतील अशी अपेक्षा ब्राह्मण समाज कशी काय करू शकतो? पण अशा प्रकारचे पाणी पाजणाºया अजित पवारांनाही आत्मक्लेश करून घ्यावा लागला होता, तिथे या अमोल मिटकरींची काय बात? ब्राह्मण समाजावर टीका केल्याने काही फरक पडत नाही, म्हणून ती टीका केली जाते. ना त्यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल होत ना कोणी दंगल करायला उतरत. त्यामुळे दुर्बलांवर, जेमतेम एक ते दीड टक्का असलेल्या लोकांवर बलप्रयोग करणाºयांच्या या पुरुषार्थाला काय म्हणावे? त्यांना जर ज्ञान असते तर ते हजारोंच्या सभेपुढे चुकीचे बरळले असते का?

मिटकरी भाषणात म्हणाले, आपण एका लग्नात गेलो होतो, तिथला महाराज मम भार्या समर्पयामी म्हणाला. असा लग्नात कुठेच मंत्र नाही. कन्यादान हे काही भटजी करत नाही, कन्यादान मुलीचा पिता करत असतो. त्यामुळे तो मम कन्या म्हणेल फारतर. पण काहीही बोलून विनोद निर्मिती करण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. त्यातून हिंदू लग्न विधीवर टीका केली. अशी टीका अन्य धर्मीयांबाबत करण्याची त्यांची हिंमत झाली असती का? हिंदू विभागलेला आहे, दुबळा आहे, त्यामुळे त्याच्यावर टीका केली तरी चालते म्हणून त्यांनी टीका केली.


पण याला कसलेही जातीय वळण न देता बोलघेवड्या माणसाने केलेली पोपटपंची म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या विरोधात ब्राह्मण सेवा संघाने सुरू केलेल्या आंदोलनात राष्ट्रवादीचेच आमदार संग्राम जगताप ही सहभागी झाले होते, त्यामुळे तो राष्ट्रवादीचा विचार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे आंदोलने, निषेध असले प्रकार न करता आपल्या हातातील रिमोटचा वापर करून आगामी निवडणुकांत अमोल मिटकरींसारख्या सर्वच जातीयवादी प्रवृत्तींना दूर लोटले पाहिजे. अगदी एखादा ब्राह्मण जरी जातीयवादी विधाने करत असेल, तरी त्याला दूर केले पाहिजे. आज गेल्या काही वर्षांत इतकी आंदोलने, मोर्चे झाले. त्यातून कुणाला यश मिळाले आहे? शांततेच्या मार्गाने ५५ मोर्चे काढून आणि २८८ मध्ये १५० पेक्षा जास्त मराठा आमदार असूनही मराठा समाजाला आरक्षण मिळालेले नाही. एसटी कर्मचाºयांनी पाच महिने आंदोलन केले, पण त्यांना यश आले नाही. त्यामुळे या सर्वांनीच आपल्या हातातील रिमोटचा वापर केला पाहिजे आणि ज्यांच्या हातात आहे, पण ते आपल्याला न्याय देत नाहीत त्या राजकीय नेत्यांना मतदानाच्या रिमोटमधून धडा शिकवण्याचे ध्येय ठेवावे. या लोकांची खुर्ची खेचून घेतली की, आपोआप सर्वांना न्याय मिळेल.

बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके


9152448055\\

दयनीय अवस्था


उद्गीर येथे ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू झाले. खरेतर आता साहित्य संमेलन मराठी भाषेचे आहे हे सांगावे लागते आहे. या संमेलनाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे शुक्रवारी ग्रंथदिंडी काढली होती. त्या ग्रंथदिंडीतील युवतींच्या प्रतिक्रिया काही वृत्तवाहिन्यांवरून दाखवल्या गेल्या आणि त्याची अत्यंत कीव करावीशी वाटली. या युवती स्कुटी घेऊन आल्या होत्या आणि आमच्या उद्गीरमध्ये हा ऐतिहासिक कार्यक्रम होत असल्याचा आनंद आहे हे सांगताना, किती छान मुव्हमेंट आहे, काय छान इव्हेंट आहे, हिस्टॉरीकल मुव्हमेंट अशा प्रतिक्रिया देत होत्या. मराठी सारस्वतांचा मेळा असा टोकाचा शब्दप्रयोग एकीकडे केला जात होता, तर दुसरीकडे इंग्रजीतून प्रतिक्रिया दिल्या जात होत्या. म्हणजे आपल्या आयुष्यात या मुलींनी एखादे तरी पुस्तक वाचले आहे का?, असा प्रश्न पडतो. साहित्य संमेलन म्हणजे काय असते याची कसलीही माहिती या मुलींना नसावी, इतकी दयनीय अवस्था आहे.


दुसरीकडे आज म्हणे २३ एप्रिल हा पुस्तक दिन म्हणून साजरा केला जात आहे. अरे पुस्तक हे काय एक दिवसच वाचायचे आहे का? कधी तरी बघायला ते काय पासबुक आहे का? पुस्तक दिन कसा काय साजरा केला जाऊ शकतो? तो रोजच वाचायचा दिवस असला पाहिजे. जशी पोटाची भूक तशी मेंदूची भूक आहे. त्यासाठी वाचनाचा खुराक दिला पाहिजे. पण तो दिला जात नसल्यामुळे डोक्यात चुकीचे विचार घुसतात.

खरेतर गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनात राजकारण्यांचा धुडघूस पाहायला मिळतो. त्यामुळे साहित्यिकांचे विचार ऐकायलाच मिळत नाहीत. राजकारण्यांनी साहित्य संमेलनात लूडबूड करू नये, यासाठी दुर्गा भागवत, पु. ल. देशपांडे यांनी प्रयत्न केले होते. दुर्गा भागवत यांनी तर आणीबाणीच्या निषेधार्थ त्यांना मिळालेली पद्मश्री आणि ज्ञानपीठ पुरस्कारही नाकारला होता. हे धाडस आजच्या साहित्यिकांमध्ये नाही. आजकाल एक पुस्तकी साहित्यिक झालेले आहेत. अखंड लिखाण करणारे लेखक, विचारवंत कुठे लुप्त झाले आहेत? वर्षातील चार दिवस तरी किमान सारस्वतांच्या चर्चा, गप्पा-गोष्टी ऐकायला मिळाव्यात अशी रसिकांची अपेक्षा असते. पण तिथेही राजकारणी मंडळी जात असल्यामुळे असाहित्यिकांचे साहित्य संमेलन होताना दिसते.


चांगले विचार मांडणारे, हसवणारे, करमणूक करणारे, ज्ञानात भर घालणारे भाषण आजकाल साहित्य संमेलनातून पाहायला मिळत नाही, हे दुर्दैव आहे. साहित्य संमेलनातून कसले चांगले ठराव मांडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे अत्यंत वाईट अवस्था गेल्या काही वर्षांत साहित्य संमेलनाची झालेली आहे. साहित्य संमेलनात त्या वर्षभरात किती पुस्तके प्रकाशित झाली, कोणती पुस्तके सर्वाधिक खपली, कोणत्या लेखकाची पुस्तके विकली गेली, याचा उहापोह कधी होताना दिसत नाही. त्यामुळे साहित्य संमेलनाचे गेल्या दहा-बारा वर्षांतील बदललेले स्वरूप पुसून टाकून त्याची पुनर्रचना करण्याची गरज आहे.

साहित्य संमेलन हे वाचकाभिमुख असले पाहिजे. साहित्याच्या प्रक्रियेतील अंतिम बिंदू किंवा उपभोक्ता हा वाचक आहे. वाचणारे कोणी असेल, तर लिहिण्याला अर्थ आहे, वाचणाराच नसेल तर सगळे लिहिलेले व्यर्थ आहे. पण वाचकांचा विचार होतो का? वाचकांना कमी किमतीत पुस्तके कशी मिळतील? त्याला वाचायला हवे ते पुस्तक कसे मिळेल यावर चर्चा झाली पाहिजे. विविध वाचनालयातून वाचल्या जाणाºया पुस्तकांचे सर्वेक्षण झाले पाहिजे. कोणती पुस्तके वाचली जातात याचे अहवाल वाचनालयांकडून मागवले पाहिजेत, त्याचा एकत्रित अहवाल तयार करून वाचकांचा नेमका कल आहे कुठे यावर माहिती संमेलनात मिळाली पाहिजे. प्रत्येक ग्रंथालयात वर्षभरात सर्वाधिक पुस्तके वाचणाºया वाचकाची नावे या संमेलनात दिसली पाहिजेत. वाचक हा घटक या प्रवाहातील सर्वात महत्त्वाचा आहे याचा विसरच सर्वांना पडला आहे. त्यामुळे कसलेही वाचन नसलेले लोक येथे मिरवायला येतात. त्यामुळे वाचकांना त्यांचे श्रेय मिळाले पाहिजे.


साहित्य संमेलनात प्रकाशकांचा सन्मान झाला पाहिजे. अनेक प्रकाशन संस्था वर्षानुवर्षे परंपरेने पुस्तके प्रकाशित करत असतात. प्रकाशकांची पुस्तके प्रकाशनामागची भूमिका, त्यांचे आर्थिक गणित ते कसे काय मांडतात यावर कुठे तरी चर्चा झाली पाहिजे. नवोदित लेखकांना त्यातून चांगले मार्गदर्शन मिळू शकते.

पुस्तक प्रकाशित होण्यात अनेक कलाकारांचा समावेश असतो. अनेक जण मुखपृष्ठ करणारे कलाकार असतात. अशा मुखपृष्ठ तयार करणाºयांना एखादे व्यासपीठ मिळाले पाहिजे. मुखपृष्ठ तयार करताना, त्याचे चित्र रेखाटताना तो कलाकार काय मेहनत घेतो, कसा विचार करतो यावर कुठे तरी भाष्य झाले पाहिजे.


साहित्य संमेलनाची दिंडी म्हणजे फक्त एक पालखी काढायची, त्यात ज्ञानेश्वरी आणि काही ग्रंथ ठेवायचे आणि मिरवत आणायची असे नाही. या दिंडीत साहित्यसेवेतील प्रत्येक घटक सामील झाला पाहिजे. वाचक असला पाहिजे. ग्रंथपाल असले पाहिजेत. प्रकाशक असले पाहिजेत. लेखक असले पाहिजेत. मुखपृष्ठ तयार करणारे, डीटीपी करणारे, छपाई काम करणारे कर्मचारी यांनाही कुठे तरी त्यात स्थान असले पाहिजे. पुस्तक काही आभाळातून पडत नाही. लेखकाने लिहिले की त्यावर अनेकांचे हात फिरत असतात आणि मग ते वाचकांपर्यंत पोहोचते, या प्रवाहातील प्रत्येकाला यात सामील केले, तर पुस्तके वाचली जातील. एक दिवस पुस्तक दिन साजरा करण्याची नामुष्की येणार नाही.

शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२

झी टीव्हीच्या पुरस्कारांचे भावी मानकरी


म्हसोबाला नाही बायको आणि सटवाईला नाही नवरा, अशी आपल्याकडे म्हण आहे. त्याप्रमाणे चांगले दर्जेदार कार्यक्रम नसल्याने टीआरपी घसरलेल्या झी मराठी या वाहिनीला कोणताही ठोस कार्यक्रम नसलेले राजकीय नेते हाच आधार झालेला दिसतो. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून झी मराठीच्या किचन कल्लाकार कार्यक्रमात कलाकारांऐवजी करमणूकप्रधान राजकीय नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. वाहिनीवरील लोकप्रिय अभिनेते अन्य वाहिन्यांकडे वळाल्याने आता राजकीय नेत्यांचाच आधार या वाहिनीला आहे का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे येत्या वर्षात झी गौरव, उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात होणाºया नामांकनामध्ये राजकीय नेत्यांना हा मान मिळणार का, असा प्रश्न पडतो.


गेल्या दीड दोन महिन्यांपासून राजकीय नेते, प्रवक्ते आणि चर्चेतील राजकीय व्यक्तींना आपल्या कार्यक्रमात आणण्याचा चंग झी मराठी वाहिनीने बांधला. याची सुरुवात हे तर काहीच नाही या अल्पकाळ चाललेल्या मालिकेपासून सुरू झाला. त्यात भाजप नेते प्रवक्ते केशव उपाध्ये यांना बोलावले आणि त्यांनी हे तर काहीच नाही, असे म्हटल्यावर झी मराठीला आयला करमणूक तर राजकारणातच आहे, याची जाणीव झाली. त्यानंतर प्रशांत दामले आणि संकर्ष कºहाडे चालवत असलेल्या किचन कल्लाकार या मालिकेत आता राजकीय नेत्यांचा वावर सुरू झाला आहे.

किचन कल्लाकार या कार्यक्रमाची सुरुवात होण्यापूर्वी जी जाहिरात केली गेली होती, त्यामध्ये नामांकीत कलाकार इथे येऊन आपली रेसीपी वापरणार, एखादा पदार्थ करून दाखवणार असे दाखवले होते. त्याप्रमाणे सुरुवातीला अप्सरा सोनाली कुलकर्णी, नागराज मंजुळे, आकाश ठोसर, अनंत जोग, चिन्मय मांडलेकर, स्वप्नील जोशी, अभिज्ञा भावे असे अनेक कलाकार येऊन गेले. विविध चित्रपट, मालिकांच्या प्रमोशनसाठी या मालिकेचा वापर होऊ लागला. प्रमोशनसाठी गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या चला हवा येऊ द्या या मालिकेतील हवा गेल्याने आता या मालिकेचा वापर होताना दिसला. तरी प्रेक्षकांनी या किचन कल्लाकारला प्रतिसाद दिला; पण यातील तोच तो पणा आणि पोरकट विनोदांमुळे प्रेक्षक कंटाळू लागले. त्यामुळे टीआरपी सुधारण्यासाठी आणि मनोरंजनासाठी अभिनेते कमी पडले, म्हणून की काय आता मसालेदार मनोरंजनासाठी राजकीय नेते बोलावले जाऊ लागले. गेल्या महिनाभरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सदस्य भाजप नेते प्रसाद लाड, मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे नेते आले. सतत चर्चेत राहणारे सकाळ झाली पत्रकार परिषदेतून भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नेते किरीट सोमय्या, ईडीचा ससेमिरा लागलेले एकनाथ खडसे हे पण येऊन गेले. त्या अगोदर मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आमंत्रित केले होते. त्या आधी पावशेर तुपासोबत ३५ पुरणपोळ्या खातील, असे वक्तव्य करणाºया अमृता फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती.


हे सगळे पाहता राजकारणात करमणूक जास्त आहे आणि ती कॅश करण्यासाठी झी मराठीने नेत्यांना आमंत्रित करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दरवर्षी आॅक्टोबर महिन्यात होणाºया उत्सव नात्यांचा किंवा त्यानंतर होणाºया झी गौरव पुरस्कार सोहळ्यात आता राजकीय नेत्यांचे नामांकन होणार का, हे आता पाहावे लागेल. या व्यासपीठावर आल्यावर नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांनी शिवसेनेची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांनी आमदारांना फ्लॅट देण्याची घोषणा केल्यामुळे त्यावर बरीच सर्वबाजूनी टीका झाली होती. किचन कल्लाकारमध्ये विजेत्याला ट्रिपल डोअर फ्रीज मिळणार असे सांगितल्यावर नितीन सरदेसाई यांनी आता आमदारांना फ्लॅट मिळाला, तर या फ्रिजला जागा होईल, अशी टिप्पणी केली. तर नाना पटोले यांनी आम्हाला नको फ्लॅट तो गोरगरीबांना मिळावा, अशी टिप्पणी करून आपल्याच सरकारच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर बोट ठेवले; पण यातून राजकीय नेत्यांनी चांगली करमणूक केल्याने त्यांना सेलिब्रेटीचा दर्जा देऊन आगामी पुरस्कारांसाठी नामांकित केले जाईल का, अशी शंका प्रेक्षकांच्या मनात आली, तर आश्चर्य वाटायला नको.

या आठवड्यात नाना पटोले, प्रसाद लाड आणि नितीन सरदेसाई यांचा सहभाग असलेल्या किचन कल्लाकारने चांगली करमणूक केली. एरवी जे चिडून परस्परांवर टीका करत असतात, ते हे परस्पर विरोधी नेते हसत खेळत एकमेकांवर टीका आणि कुरघोडी करताना दिसत होते. यात बनवाबनवी या थीमवर तिखट शंकरपाळे, कडबोळी, शेव हे पदार्थ या तिघांना करायला लावून राजकीय कडबोळी, भाजणी आणि शंकरपाळी यावर टिप्पणी करताना आपापल्या पक्षांचाही मोठेपणा सांगितला. त्यातून चांगले पंच निघाले आणि करमणूकही चांगली झाली. त्यामुळे भविष्यात झी मराठीला अभिनेते मिळाले नाहीत, तर राजकीय नेते टीआरपी मिळवून देतील, असा विश्वास निर्माण केला. यामध्ये नितीन सरदेसाई यांनी बाजी मारल्याचेही दिसून आले.


प्रफुल्ल फडके/छोटा पडदा

9152448055\\

आसामी दणका

 गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना बुधवारी रात्री उशिरा आसाम पोलिसांनी गुजरातमधील पालनपूर येथील सर्किट हाऊसमधून अटक केली. हा फार मोठा आसामी दणका मेवाणींना बसला आहे. आपण लोकप्रतिनिधी आहोत, म्हणजे काहीही बोलले तरी चालते हा भ्रम आसाम पोलिसांनी खोटा ठरवला आहे. अर्थात हे आसामच्या पोलिसांनी केले हे योग्य झाले. तीच कृती गुजरात पोलिसांनी केली असती, तर लगेच विरोधकांना बोलायला हत्यार मिळाले असते. सत्तेचा गैरवापर केला वगैरे बोलायला मोकळे झाले असते; पण मेवाणींना गुजरात पोलिसांनी नाही, तर गुजरातमध्ये घुसून आसामी पोलिसांनी अटक केली हे विशेष.


मेवाणींना अटक केल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा पालनपूर येथून अहमदाबादला नेण्यात आले आहे. त्यानंतर गुरुवारी आसामला नेण्याची तयारी केली. त्यामुळे काँग्रेस आदी विरोधकांनी गळा काढला. आसाम पोलिसांनी कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता मेवाणी यांना अटक केली आहे, तसेच कायदेशीर कारवाईबाबत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत देखील देण्यात आली नसल्याचा दावा काँग्रेस नेता कन्हैया कुमार यांनी ट्विटमधून केला आहे; पण ही देशात फूट पाडणारी, द्वेषाची भावना पसरवणारी प्रवृत्ती ठेचून काढणेच आवश्यक आहे. आज सगळीकडे द्वेषाचे वातावरण पसरवले जात आहे. जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण केले जात आहे. अशा प्रवृत्तीत हे मेवाणी, कन्हैया कुमार असे लोक आघाडीवर आहेत. त्यांना प्रोत्साहन देणाºया प्रवृत्ती विरोधकांमध्ये आहेत. त्यामुळे चांगल्याला चांगले म्हणण्याची प्रवृत्ती आता संपुष्टात आलेली आहे. मोदींनी कोणतीही चांगली कामगिरी केली, तरी त्याचे कौतुक करायचे मोठे मन विरोधकांकडे राहिलेले नाही. सतत टीकाच करत राहायचे. अर्थात मोदी अशा विरोधकांना काडीचीही किंमत देत नाहीत. मोदींवर सतत टीका करण्यामुळेच तर काँग्रेसची वाताहात झाली. गेली तीन वर्षे ज्या काँग्रेसला अध्यक्ष मिळू शकत नाही, उभे करायला उमेदवार मिळत नाहीत, त्यांची ही अवस्था मोदींवरील टीकेमुळे झालेली आहे. कारण जनता, मतदार जागृत आहेत. आता काँग्रेसने काहीही सांगावे आणि मतदारांनी त्याला होला हो म्हणावे हे दिवस संपले आहेत. सोनिया गांधींनी गुजरातच्या २००२, २००७ आणि २०१२च्या निवडणुकीत सातत्याने घाणेरडी टीका मोदींवर केली होती. मौत का सौदागर म्हटले होते, त्यामुळेच मोदी मोठे झाले. मोदींनी त्याला उत्तर दिले नव्हते. आजही मेवाणींच्या गलिच्छ टीकेला मोदींनी उत्तर दिले नाही; पण आसामी पोलिसांनी मात्र आपला दणका दाखवून या देशात काहीही खपवून घेतले जाणार नाही याची झलक दाखवली.

वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्याविरोधात आसाममध्ये काही गुन्हे दाखल झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास आमदार जिग्नेश मेवाणी यांना अटक करण्यात आली आहे. आसाममधील कोक्राझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. जिग्नेश मेवाणी यांना अशाप्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता अटक केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे, तसेच एखाद्या लोकप्रतिनिधीला अशाप्रकारे अपरात्री अटक केल्याने संबंधित कारवाईवर राजकीय नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. पण कायद्यापुढे सगळे समान असतात. लोकप्रतिनिधी आहे, म्हणजे त्याला वाटेल ते बोलायचा, न्यायालयावर टीका करायचा, कोणाचाही अवमान करायचा अधिकार दिलेला नाही, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.


वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह ट्विटमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती कोक्राझरचे पोलीस अधीक्षक थुबे प्रतीक विजय कुमार यांनी दिली आहे. मेवाणी यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले होते की, गोडसेला देव मानणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील जातीय संघर्षाविरोधात शांतता आणि सौहार्द राखण्याचे आवाहन करावे. याच ट्विटवरून जिग्नेश मेवाणीविरोधात कोक्राझर पोलीस ठाण्यात दोन समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे, शांतता भंग करण्यासाठी हेतुपुरस्सर अपमानास्पद वक्तव्य करणे आणि आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोदींना गोडसे भक्त हे केवळ द्वेषाच्या भावनेतून म्हटले आहे. मोदींनी कधीही आपल्या भाषणात कुठेही गोडसेचा उल्लेख कधीच केलेला नाही. गोडसेचे समर्थन केलेले नाही. उलट अशाप्रकारे काही साध्वी खासदारांनी केलेल्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केलेला आहे. असे असताना मेवाणींनी असे ट्विट करून द्वेष भावना पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. या द्वेषाच्या राजकारणाला आता चाप बसवला पाहिजे. त्यामुळे आसाम पोलिसांनी केलेल्या या कृतीबद्दल त्यांचे अभिनंदन करावे लागेल.

या द्वेषाच्या भावनेतूनच अनेक चांगल्या कामांना विरोध होताना दिसतो. अडाणी लोकांना वेठीला धरून शेतकºयांच्या फायद्याचे कायदे राजकीय स्वार्थापोटी आणि दलालांचे भले करण्याच्या हेतूने मागे घेण्याची वेळ आली. बहुमत असलेल्या लोकसभेने केलेले कायदे गुंडगिरीच्या दबावाने मोडून काढण्याची प्रथा पाडली आणि या देशात लोकशाहीचा खून केला गेला. हे जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. त्यामुळेच व्यक्ती द्वेषातून कोणाबद्दलही काहीही बोलण्याचे घाणेरडे राजकारण चालू केले गेले आहे; पण आसाम पोलिसांनी कोणाचीही तमा न बाळगता जिग्नेश मेवाणींना ताब्यात घेतले आणि कायदा अजून मेलेला नाही हे दाखवून दिले, ही चांगली बाब म्हणावी लागेल.

उखाणा


सवाष्णीने आपल्या पतीचे नाव घेण्याची एक पारंपरिक शैली ही महाराष्ट्राची ओळख आहे. लग्नात किंवा सण-समारंभात घेतले जाणारे उखाणे हे आपल्या संस्कृतीचे आणि काव्य, कला प्रतिभेला दिले जाणारे प्रोत्साहन आहे. या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचे चांगल्यापैकी काम हे झी मराठीवरच्या होम मिनिस्टरने केले. हमखास आदेश भावोजी उखाणा घ्यायला लावणार, म्हणून अनेक भगिनी तयारी करून, पाठ करून येतात आणि बºयाचवेळा ऐनवेळी फाफलतातही. विसरतात आणि हसे करून घेतात; पण आपण या संस्कृतीकडे लक्ष दिले पाहिजे.


उखाणा हा फक्त नाव घेण्यापुरताच नाही, तर अन्य प्रकारचाही असतो. म्हणजे, कोड्यातून, कूटप्रश्नातून, कथनातून व काव्यात्म पदबंधातून चटकदार, तसेच खेळकरपणे आपले म्हणणे मांडण्याचा लोकवाङ्मयातील अभिव्यक्ती प्रकार म्हणजे उखाणा असे म्हणतात. आपल्याकडे उखाण्यालाच आहणा, उमाना, कोहाळा असे अनेक प्रतिशब्द आहेत. त्याला संस्कृतमध्ये प्रहेलिका आणि हिंदीत पहेली असेही म्हणतात. कोडे किंवा कूटप्रश्न हा उखाण्याचा आणखी एक अर्थ आहे.

महाराष्ट्रातील वारली आणि आगरी जमातीत उखाण्यांना कलंगुडे असे म्हणतात. मध्यभारतातील छोटानागपूर प्रदेशातील खारियात उखाण्यांसाठी बुझबुझावली असा शब्द प्रचलित आहे. कर्नाटक राज्यांमध्ये उखाण्यासाठी ओडकथू, ओडगते तसेच आंध्र प्रदेशात विडीकथ हे शब्द प्रचलित आहेत. यावरून उखाण्यांचे स्वरूप हे कथानात्म असल्याचेही लक्षात येते.


पूर्वी पतीचे नाव घेणे सभ्यपणाचे मानले जात नव्हते. आजकाल आपण नाव घ्या म्हणतो; पण पूर्वी त्याला उखाणा असेच म्हणत असत. आजकाल पती-पत्नी एकमेकांना नावाने हाक मारतात. पण पूर्वी अहोजाहो, अगं तुगं असायचं. यात आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव काय आहे, हे पण विसरून जात असावे कदाचित. त्यामुळे पाहुण्यांसमोर कोणाची कोण आहे, याची ओळख करून देण्यासाठी या उखाण्यांची निर्मिती झाली असावी.

उखाणे फक्त पतीचे नाव घेण्यासाठीच नाही, तर अन्य कारणांसाठीही वापरले जात असत. घरातील वयस्कर सदस्य लहान मुलांना अनेकदा कोड्यातून प्रश्न विचारतात. एखाद्या वस्तूचे बाह्यवर्णन हे रंगात्मक, प्रतिकात्मक आणि खुणदर्शक पद्धतीने करून संबंधित वस्तू कोणती? असे कोडे विचारणे ही बाब जास्त प्रचलित आहे. लहान मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळावी या हेतूने हे उखाणे विचारले जातात. टोमणे वजा प्रश्नोत्तरातूनही उखाणे विचारले जातात. फुगडी, झिम्मा, झोके तसेच महिला विषयक खेळांमध्ये या उखाण्यांचा वापर होतो.


नाव घेण्याचा उखाणा महाराष्ट्रात प्रसिद्ध आणि प्रचलित आहे. आपल्या प्रिय व्यक्तीचे नाव उच्चारल्याने त्याचे आयुष्य कमी होते, ही लोक समजूत समाजमनात रूढ आहे. पती-पत्नी परस्परांना नावाने हाक मारीत नाही, परंतु सण-उत्सव, विधीप्रसंगी पती-पत्नींनी परस्परांचे नाव घ्यावे असा संकेत आहे. महाराष्ट्रात लग्न, डोहाळ जेवण, बारसे, हळदी-कुंकू अशा प्रसंगी नावाचे उखाणे घेतले जातात. हे उखाणे काव्यात्मक पदबंधातून व्यक्त होतात. या काव्यात्मक पदबंधामध्ये दोन यमकबद्ध चरण असतात. दुसºया चरणात पूर्वार्धात नवºयाचे नाव घेऊन वेगळ्या अर्थाचे पद घेऊन उखाणा पूर्ण केला जातो.

याशिवाय कुटुंबातील विविध नात्यांमध्ये म्हणजे नणंद-भावजय, दीर-भावजय, व्याही-विहीण यांमध्ये थट्टामस्करी व्हावी, त्यातून नात्यामध्ये गोडवा निर्माण व्हावा, यासाठी कौटुंबिक कार्यक्रमामध्ये उखाणे घेतले जातात. हे उखाणे दीर्घ असतात. ग्रामीण भागात विहिणी विहिणी एकमेकींना अश्लील उखाणेही घालतात.


मांडवाच्या दारी गं पडलं टिपरं

.......विहिणीला पोर झालं झिपरं


ईवाय म्हणतो पोर कां हो झिपरं?

असुंद्या दादा रात्री निजाया गेली होती


तेव्हा नवºया आलं फेफरं

तेव्हा पोर झालं झिपरं.


सर्वसाधारणत: उखाण्यांची भाषा खेळकर व चटकदार असते. प्राचीन काळापासून लोकसंस्कृतीमध्ये रूढ असणारी उखाण्यांची परंपरा आजही समाजजीवनात प्रचलित आहे. उखाण्यांमध्ये वापरले जाणारे काव्यबंध, प्रतिमा तसेच कथनरूपे याबाबीतही समकालीन संदर्भ रुजू लागले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात पूर्वी लग्नातला रुखवत नाचवत नेताना उखाणे घेत जाण्याची प्रथा होती. यात वधू आणि वर यांच्याकडच्या बायका परस्परांवर कुरघोडी करणारे, नवरा, नवरी, करवली, सासू, विहिण यांच्या कुरापती काढणारे उखाणेही घेत. नंतर त्यांतून भांडणे पण होत असत. एखादी करवली जाड असेल, तर तिला हमखास उखाणा पडायचा, ‘आला आला रखवत, रुखवतात ठेवला आयना.... मुलाकडची करवली... बोगद्यात माईना..’ अशा तºहेचे उखाणे घेऊन लग्न कार्यात धमाल येत असे.


प्रफुल्ल फडके/संस्कृती

9152448055\\

मनाला निर्बंध

 अग्रलेख


कोरोना गेला, आपण कोव्हिडमुक्त झालो, सगळे निर्बंध उठले, या भ्रमात सगळे जण अत्यंत गाफीलपणे वावरत आहेत; पण कोरोनाच्या काळात जी स्वच्छतेची आणि सुरक्षेची सवय लागलेली आहे ती बंद करून चालणार नाही. मास्क आणि सॅनिटायझर न वापरता बाहेर वावरणे हे धोकादायक ठरू शकते, याची जाणिव प्रत्येकाने ठेवली पाहिजे. मुंबईसह महाराष्ट्रात मंगळवारी दुप्पट दैनंदिन रुग्णवाढ नोंदविण्यात आली. राज्यातील दैनंदिन रुग्णांपैकी बहुतांश रुग्ण मुंबईतील असून, पालिकेने यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यावरून काही तरी बोध घेणे आवश्यक आहे.


देशात गेल्या २४ तासांत १,२४७ रुग्ण आढळले. महाराष्ट्रातही सोमवारच्या तुलनेत मंगळवारी दुपटीहून अधिक रुग्ण आढळले. त्यात मुंबईतील सर्वाधिक ८५ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे मुंबई पालिका सतर्क झाली आहे; पण महापालिकेने सांगितल्यावर जागे होण्यापेक्षा आपण गेल्या दोन वर्षांत लागलेल्या सवयी मोडण्याची काय गरज आहे? आज लोकलमधून, सार्वजनिक ठिकाणी हजारो लोक बिनामास्क हिंडताना दिसतात. पूर्वीच्या कुठेही थुंकायच्या सवयी विशेषत: तंबाखू, गुटखा खाणाºयांच्या गेलेल्या नाहीत. अशा परिस्थितीत पुन्हा एखादी लाट आली, तर आश्चर्य वाटायला नको.

पण आता काही झाले तरी पुन्हा निर्बंध लावूच नयेत. माणसांनी आता लढा द्यायला सज्ज असले पाहिजे. कोरोना असेल नाही, तर आणखी एखादा नवा व्हायरस येईल; पण बंद करणे, निर्बंध लावणे, लॉकडाऊन करणे असले उपाय मात्र आता लावायला नकोत. रोजगार, शेती, अर्थव्यवस्था ठप्प करणारे असले उपाय योजणे आता थांबवले पाहिजे. सारखा सारखा लॉकडाऊन आपल्याला परवडणारा नाही. गेल्या दोन वर्षांत शिक्षण क्षेत्राचे पर्यायाने भावी पिढीचे जे नुकसान झालेले आहे, ते कधीही भरून येणारे नाही. शाळेत मुले जात आहेत; पण त्यांना काहीही येत नाही. फक्त मोबाइलकडे लक्ष लागले आहे. त्यांच्यातील चंचलता वाढली आहे. असे प्रत्येक क्षेत्रात नुकसान झालेले आहे. यामुळे आर्थिक दरी वाढली आहे. एक विशिष्ठ वर्ग पैसेवाला होतो आणि दुसरा वर्ग देशोधडीला लागतो आहे. त्यामुळे वारंवार निर्बंध, लॉकडाऊन आपल्याला परवडणारे नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. सरकारने निर्बंध उठवले असले, तरी नैतिक जबाबदारी म्हणून प्रत्येकाने खबरदारी घेतली, तर रुग्णसंख्या वाढणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.


सध्या मुंबईमध्ये हवाई मार्गाने येणाºया रुग्णांची तपासणी करण्यात येते, परंतु रेल्वे किंवा अन्य मार्गाने येणाºया नागरिकांचा शोध घेणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या विभागांमध्ये मुंबईबाहेरून व्यक्ती किंवा कुटुंबे वास्तव्यास येत आहेत का, याची पाहणी करण्याची सूचना प्रशासनाने विभाग कार्यालयांना दिली आहे. या व्यक्तींना कोणतीही लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या तातडीने चाचण्या करण्याची सूचनाही प्रशासनाने दिली. उपचारासाठी येणाºया व्यक्तींना कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तातडीने आणि सक्तीने कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना खासगी डॉक्टरांना द्याव्यात, असे आदेश पालिकेने विभाग कार्यालयांना दिले आहेत; पण त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. आता सगळ्यांचे लसीकरण झालेले आहे. तसे चिंतेचे कारण नाही. पूर्वीसारखी आता भीतीही राहिलेली नाही; पण तरीही खबरदारी घेणे आवश्यक आहे. किंचितसा गाफिलपणाही घात करू शकतो, हे लक्षात घेतले पाहिजे.

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील रुग्णसंख्येत काही अंशी वाढ झाली आहे. रुग्णसंख्या वाढली असली, तरी रुग्णालयात दाखल होणाºया रुग्णांची संख्या कमीच आहे. मुंबईत सेरो सर्वेक्षणामध्ये ९९ टक्के अत्यावश्यक आणि आरोग्य कर्मचाºयांमध्ये प्रतिपिंडे आढळली आहेत. तसेच लसीकरणही मोठ्या प्रमाणात झालेले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये रुग्णसंख्या वाढली, तरी मुंबईत फारशी रुग्णसंख्या वाढण्याचा धोका नाही; पण आपण जागृत असणे आवश्यक आहे. दिल्लीमध्ये नव्याने आढळणाºया रुग्णांच्या तुलनेत रुग्णालयात दाखल रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यामुळे मुंबईत काही प्रमाणात रुग्णवाढ झाली असली, तरी रुग्णालयात दाखल रुग्ण आणि मृतांचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता लसीकरण पूर्ण करावे आणि मुखपट्टीची सक्ती नसली, तरी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी तिचा वापर करणे आवश्यक आहे. या सवयी आपण अंगवळणी लावून घेतल्या, तर रोगाचा प्रसार थांबेल. केवळ कोरोनासाठीच नाही, तर अनेक बाबींपासून मास्क आपले रक्षण करू शकतो. आजकाल सगळीकडे धुळीचा प्रादुर्भाव असतो. विविध कण आपल्या नाकातोंडात जाण्याची शक्यता असते. त्यासाठी मास्क वापरणे ही काही वाईट सवय नाही. थोडावेळ काढावा परत वापरावा. बाहेर जाताना तर तो अवश्य घालावा. सरकारने निर्बंधमुक्त केले याचा अर्थ मास्कमुक्त केले असे नाही. मास्क ऐच्छिककेला याचा अर्थ घालायचाच नाही, असे नाही. त्यामुळे सरकारने आता आपल्यावर सोडले आहे. त्याची दखल घेत प्रत्येकाने मनाला निर्बंध लावून घेतले पाहिजेत.


दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ नोंदविण्यात येत असली, तरी तज्ज्ञांच्या मतानुसार, सलग सुट्ट्या आणि सण-उत्सवांमुळे नागरिक एकत्र येत असल्याने ही रुग्णवाढ दिसत आहे. मात्र, चौथ्या लाटेची सुरुवात झाली, असे लगेच म्हणता येणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बुस्टर डोस किंवा वर्धक मात्रा आणि १२ ते १७ वयोगटातील लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे आदेश पालिकेने विभागांना दिले आहेत, तसेच २६६ कोरोना चाचणी केंद्रे सुरू असून, चाचण्या आणि मुखपट्टी वापरण्याबाबत जनजागृती करण्याची सूचनाही पालिकेने दिली आहे; पण पालिकेबरोबरच आपली जबाबदारीही लक्षात घेतली पाहिजे.

तांबूलदान, तांबूल सेवन


आपल्याकडे कोणत्याही धार्मिक विधीमध्ये, पूजेमध्ये विड्याच्या पानांचे महत्त्व खूप आहे. कोणत्याही देवाला गेल्यावर तुळजापूर, अंबाजोगाई या देवी मंदिरातून आपल्याला तांबुलाचा प्रसाद मिळतो. हा विडा, तांबुलदान, तांबूल सेवन याचे आपल्याकडे फार महत्त्व आहे. असे म्हणतात की, पूर्ण जेवण देण्याइतके पुण्य नुस्त्या विड्याने मिळते. पान, विडा, तांबूल अशी वेगवेगळी नावे असली, तरी त्याचा आपल्या जीवनाशी, संस्कृतीशी, धर्माशी, इतिहासाशी फार जवळचा सातत्यपूर्ण असा संबंध आहे.


नागवेलीच्या म्हणजे विड्याच्या पानाचा विडा. नागवेलीची पाने, चुना, कात, सुपारी, वेलदोडा, जायपत्री, कस्तुरी, कापूर, कंकोळ, लवंग इ. तांबुलाची घटकद्रव्ये असतात. तरी साधारणत: पहिले तीन-चार पदार्थ सर्वसामान्य जनता वापरते.

ज्या नागवेलीपासून रुचकर पाने मिळतात, त्या वेलीस स्कंदपुराणात अमृतोद्‌भव असे म्हटले आहे. तांबुलसेवनाची प्रथा भारतात दोन हजार वर्षांपासून रूढ असल्याचे सांगण्यात येते. आयुर्वेदाच्या चरक संहिता, सुश्रुत संहिता आदी ग्रंथांत तांबुलाचे गुणधर्म सांगितले आहेत; पण ही प्रथा गुप्त कालात ३२१ ते ५५० जावा, सुमात्रा इ. आग्नेयकडील द्वीपांतून भारतात आली असावी, असे कित्येकांचे मत आहे.


तांबूल हा शब्द आॅस्ट्रो-आशियाई भाषासमुहातील समजला जात असल्यामुळे या मतास दुजोरा मिळतो. मांदसरच्या (मंदसौर) रेशमी विणकरांच्या इ. स. ४७३च्या कोरीव लेखावरून हेच दिसून येते. इसवी सनाच्या थोड्या पूर्वी किंवा आरंभकाळी दक्षिण भारतात तांबुलाचा वापर सुरू झाला असावा व तेथून तो उत्तरेकडे प्रसृत झाला असावा, असे डॉ. पां. वा. काणे यांनी आपल्या संशोधनात म्हटले होते.

वात्स्यायनाचे कामसूत्र, वराहमिहिराची बृहत्संहिता या जुन्या वाङ्‌मयात जो तांबूल विषयक उल्लेख आला आहे, त्यावरून तांबूल सेवनाची प्रथा खास करून भारतीयच दिसते. भारताप्रमाणे जावा, सुमात्रा, मलाया, मालदीव, निकोबार, दक्षिण अरबस्तान या प्रदेशातही प्राचीन काळापासून तांबूल सेवनाची प्रथा दिसून येते. पाश्चिमात्य देशांत, विशेषत: यूरोप-अमेरिकेत ही प्रथा दिसून येत नाही.


तांबूल हा किंचित तिखट, कडवट, उष्ण, मधुर, खारट, तुरट, वातकफहारक, दुर्गंधीनाशक, उद्दीपक, सुगंधी, सौंदर्यवर्धक व मुखशुद्धीकारक आहे. त्यास रसिकतेचे तसेच मंगलतेचेही प्रतीक मानण्यात येते. लग्नादी समारंभात पानसुपारी देण्याचा प्रघात आहे. सन्मान वा स्वागत करताना किंवा निरोप देतेवेळीही तांबूल देण्याचा शिष्टाचार आहे. एखादी गोष्ट पैजेने करण्याचा निर्धार व्यक्त करण्याकरिता विडा उचलण्यास शपथ घेण्याइतकेच महत्त्व आहे. पितरांना द्यावयाच्या पिंडांना अक्षता, गंध, पुष्पादीबरोबरच पानाचा विडा देणेही धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तांबुलाचा समावेश आठ भोगांमध्ये केला आहे. पूर्वी राजा-महाराजांकडून विडा मिळणे बहुमानाचे समजण्यात येई. नियमित पण मर्यादित स्वरूपात केलेले तांबूल सेवन आरोग्याला हितावह असते.

अर्थात कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, तसेच तांबुलाचे अतिरेकी सेवन हे इतर अतिरेकी सेवनासारखेच हानिकारक आहे. पानाबरोबर तंबाखू खाणाºयाला बहुधा हे अतिसेवनाचे व्यसन जडते. त्यातून मग नाना प्रकारचे रोग निर्माण होणे शक्य असते. तांबूल खाऊन कोठेही थुंकण्याने रस्ते, चांगल्या इमारतींच्या भिंती, सार्वजनिक ठिकाणी घाण केली जाते. थुंकण्याची आवश्यकता पडल्यास पिकदाणीचा उपयोग करण्यात येतो वा यावा. सार्वजनिक जागेवर पिंक टाकणे अनिष्ट आहे.


खरंतर तांबूल केव्हा सेवन करावा, याचेही संकेत आहेत. प्रात:काळी, जेवल्यानंतर, स्त्री समागमाच्या पूर्वी व शेवटी, त्याचप्रमाणे विद्वत्‌सभेत व राजसभेत तांबूल सेवन करण्याचा संकेत आहे. झोपेतून उठल्यावर, जेवणानंतर, स्नानानंतर, ओकारीनंतर पान खाणे हितावह असते, असे वाग्भटाचे म्हणणे आहे. व्रतस्थाच्या जीवनात तांबूल सेवन निषिद्ध मानण्यात आले आहे. स्मृतिप्रकाश या धार्मिक ग्रंथात यती, ब्रह्मचारी, विधवा, रजस्वला यांनी तांबूल किंवा तांबूलसंबंधी कोणतेही पदार्थ म्हणजे सुपारी सेवन करणे, निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. उपवासाच्या दिवशीही तांबूल सेवन वर्ज्य मानण्यात येते.

भारतात विभिन्न भागांत निरनिराळ्या प्रकारची विड्याची पाने आढळतात. त्यांपैकी काही कडक वा मऊ, लहान वा मोठी, रुक्ष किंवा बेचव, नरम किंवा लवचिक असतात. चवीलाही ती भिन्नभिन्न असतात. औषधी गुणधर्मांच्या दृष्टीनेही त्यांच्यात भिन्नता असते. गोविंद विडा किंवा त्रयोदशगुणी विडा प्रसिद्ध आहे. देश, गंध इत्यादींवरून त्यांचे गुणधर्म दाखविणारी नावेही प्रचलित आहेत, उदा. बंगाली, रामटेकी, बनारसी, जगन्नाथी सांची, कपुरी, मालवी, मद्रासी, मगही, मंगेरी इत्यादी.


पानाचा भारतात होत असलेला वापर आणि त्याला दैनंदिन जीवनात प्राप्त झालेले महत्त्व यामुळे तांबूल सेवन हे भारतीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्यपूर्ण अंग झाले आहे. आपल्याकडे अनेक चित्रपट गीतांमध्येही पानाचा उल्लेख आहे. खैके पान बनारसवाला, पान खायो सय्या हमारा...अशी असंख्य गाणी लोकप्रिय आहेत. पण पान किंवा तांबूल हे आपल्या संस्कृतीचे प्रतीक आहे.

धार्मिक ठिकाणी म्हणजे देवस्थानाच्या ठिकाणी वाहिलेले विडे हे प्रसाद म्हणून देताना ते कुटून भाविकांना वाटले जातात. आपल्याकडच्या बहुतेक देवीच्या मंदिरात, साडेतीन पिठांच्या मंदिरात असा तांबुलाचा प्रसाद भाविक मोठ्या श्रद्धेने घेत असतात.


प्रफुल्ल फडके/ संस्कृती

9152448055\\

प्रादेशिक पक्षांची ताकद


कोणत्याही पोटनिवडणुकांचे निकाल किती गांभीर्याने घ्यावयाचे ते त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते; पण पोटनिवडणुकीच्या निकालावरून परिस्थिती बदलली, वातावरण बदलले म्हणणे तसे पोरकटपणाचेच ठरेल. पोटनिवडणुकीत पराभूत होणे हे भाजपसाठी काही नवीन नाही. पण म्हणून त्यांची ताकद कुठे कमी झालेली नाही, हे पण लक्षात घेतले पाहिजे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यावर योगी आदित्यनाथ यांनी आपला खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्या पोटनिवडणुकीत योगींच्या मतदारसंघात, भाजपचा पराभव झाला होता. त्यामुळे भाजपची हवा संपली असा निष्कर्ष अनेकांनी काढला; पण मोदींची लाटही पुन्हा आली आणि योगींची लाटही पुन्हा आली. मोदी दुसºयांदा पंतप्रधान झाले, तर योगी दुसºयांदा मुख्यमंत्री झाले. त्यामुळे भाजपच्या या पराभवांमुळे लगेच भारावून जाण्याची गरज नाही; पण पोटनिवडणुकीतील निकालावरून प्रादेशिक पक्षांची ताकद वाढत आहे, हे समोर येताना दिसत आहे.

खरंतर पोटनिवडणुकीच्या निकालांना एरवी त्यांना फार महत्त्व नसते; मात्र अलीकडेच जाहीर झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पाश्‍र्वभूमीवर ताज्या पोटनिवडणुकांकडे पाहावे लागेल. चार राज्यांत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवल्याने सर्वत्र हाच पक्ष सतत विजय मिळवत राहणार, असे चित्र पक्षातर्फे रंगवले जात आहे. त्याला ताज्या निकालांनी जोरदार तडाखा दिला आहे. चार राज्यांत पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकांत लोकसभेची एकच जागा आहे. बाकी विधानसभांच्या जागा आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपच्या वाट्याला एकही जागा आली नाही. महाराष्ट्रात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात व छत्तीसगडमधील खैरागढमध्ये विजय मिळवून जनता अजूनही काँग्रेसच्या पाठिशी असल्याचा संदेश पक्षाने दिला आहे; पण भाजपचा तिथे वाढलेला मतदार याकडे विरोधकांनी दुर्लक्ष करून चालणार नाही.


पश्‍िचम बंगालमध्ये ममतादीदींच्या तृणमूलची ताकद व लोकप्रियता अबाधित आहे, हे सिद्ध झाले. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला कमी लेखून चालणार नाही हेही दिसून आले. काहीसे अडगळीत गेलेल्या नामवंतांना या निवडणुकीने पुन्हा प्रकाशात आणले आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांपेक्षा वरचढ ठरणार का?, हा प्रश्‍नही या निकालांनी उपस्थित केला आहे.

पश्‍िचम बंगालमधील असनसोल लोकसभा मतदारसंघात पूर्वीचे अभिनेते व आताचे राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दणदणीत विजय मिळवला. सिन्हा आधी भाजपात होते. नाराज होऊन ते काँग्रेसमध्ये आले. गेल्या लोकसभा निवडणुकीत पाटण्यात त्यांचा पराभव झाला. त्यांना अगदी अलीकडे ममतादीदींनी आपल्या पक्षात ओढले. असनसोल मतदारसंघात तृणमूल काँग्रेसला कधीच विजय मिळाला नव्हता, त्यामुळे त्यांच्यासाठी हा विजय महत्त्वाचा आहे. तो सिन्हा यांच्या वलयाचा आहे की, तृणमूलचा आहे हे स्पष्ट होण्यास थोडा कालावधी जाईल. मात्र, यामुळे तृणमूलचा लोकसभेतील आवाज अधिक मोठा होईल यात शंका नाही. बालीगुंज विधानसभा मतदारसंघात तृणमूलचेच बाबुल सुप्रियो जिंकले. बाबुल मूळचे गायक. ते भाजपतर्फे दोनदा असनसोलमधून लोकसभेत गेले. मंत्री झाले; पण गेल्या वर्षी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली. ज्या तृणमूलच्या विरोधात ते लढत असत त्याच पक्षातर्फे आता ते जिंकले आहेत. या मतदारसंघात भाजप चौथ्या स्थानावर राहिला. एखादा पक्ष सोडून कोणी जातो आणि तो त्याच पक्षाच्या विरोधात उभा राहतो आणि विजयी होतो, तेव्हा ती ताकद त्या व्यक्तीची असते, पक्षाची नाही हे लक्षात घेतले पाहिजे.


छत्तीसगडमध्ये खैरागढ मतदारसंघात यशोदा वर्मा जिंकल्याने ९० जागांच्या विधानसभेत काँग्रेसच्या ७१ जागा झाल्या आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसच्या जयश्री जाधव जिंकल्या. तेथील दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. त्यांचा विजय जवळपास नक्की होता. या दोन विजयांमुळे काँग्रेसला किरकोळ दिलासा मिळाला; मात्र बिहार आणि बंगालमध्ये त्यांची स्थिती दयनीय आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे. बिहारच्या बोकाहा मतदारसंघात राष्ट्रीय जनता दलाचे अमर पासवान जिंकले. विकासशील इन्सान पक्षाचे मुसाफिर पासवान यांचे ते चिरंजीव. मुसाफिरही आमदार होते. त्यांच्या निधनामुळे ही निवडणूक झाली. हा पक्ष भाजपचा मित्रपक्ष होता; पण त्याचे संस्थापक मुकेश सहानी यांनी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपवर टीका केल्याने दोघांत दुरावा निर्माण झाला. अमर यांना विजयी करून लालू यांनी भाजपला जागा दाखवून दिली. या निवडणुकांमध्ये भाजप स्पर्धेत नाही, असे दिसत होते. पश्‍चिम बंगाल व महाराष्ट्रात राजकीय नेत्यांच्या मागे केंद्र सरकारने तपास संस्थांच्या चौकशीचे शुक्लकाष्ठ लावले आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम झाला असे म्हटले जात आहे, पण ते कितपत खरे कितपत खोटे यासाठी पुढच्या निवडणुकीतील निकालाची वाट पाहावी लागेल.

खरंतर भाजपचा पराभव करता येतो, हे गेल्या वर्षी तामिळनाडू, केरळ, पश्‍िचम बंगालमधील निवडणुकांनी दाखवून दिले. त्यास ताज्या निकालांनी पुष्टी दिली. काँग्रेसला देशभरातील आपले स्थान बळकट करण्यावर लक्ष दिले पाहिजे, हा संदेशही या निकालांनी दिला आहे. तसेच, काँग्रेसला वगळून विरोधकांचे ऐक्य होणार नाही हे ममतादीदी यांना उमगेल. विरोधी पक्ष व काँग्रेसला जागे करणारे हे निकाल आहेत, हे त्यांचे वैशिष्ट्य. धार्मिक ध्रुवीकरण करण्याची भाजपची खेळी फसल्याचे ताज्या निकालांनी दाखवले. त्यावरून लोकसभेचे भाकीत कोणी करू नये. योग्य मुद्दे घेऊन जनतेसमोर गेले पाहिजे, हे काँग्रेसला उमगले तरी पुष्कळ झाले; पण यातून प्रादेशिक पक्षाची ताकद वाढत आहे, हे पण लक्षात घेतले पाहिजे.

मंगळवार, १९ एप्रिल, २०२२

अपोलो


काही शब्द आपण अनेकवेळा ऐकतो, वाचतो, बोलतो. आपल्या भाषेत ते रुळलेलेअसतात. ते आपण सतत उच्चारतही असतो. पण त्याचा आपल्याला नेमका अर्थ माहिती नसतो. तो शब्द कुठून आला हे आपण समजत नाही. अशापैकीच एक शब्द म्हणजे अपोलो. अपोलोबंदर, अपोलो11, अपोलो सिनेमा ही नावे आपल्या ओळखीची आहेत. पुण्यातले अपोलोटॉकीजमध्ये अनेक चित्रपट पाहिले असतील पण अपोला म्हणजे काय? चांद्रयान मोहिमेला अपोलो हे नाव दिले होते पण आपल्याला प्रश्न कधी पडला नाही की अपोलो म्हणजे काय? म्हणूनच अशा या अपोलोचा अर्थ आपण समजावून घेणार आहोत.

आपल्याकडे माणसाला असो वा संस्थेला देवदेवतांची नावे देण्याची प्रथा आहे. अशाचा नावापैकी एक म्हणजे अपोलो. अपोलो हा ग्रीक देवतांपैकी महत्त्वाचा आणि प्रसिद्ध देव मानला जातो. तो ज्यूस आणि लेटो यांचा डीलोस येथे जन्माला आलेला पुत्र होता. ज्यूसच्या पत्नीचा संशयी, मत्सरी आणि संतापी स्वभाव माहीत असल्याने त्याचे अपत्य पोटात असताना लेटोला आश्रय देण्यास कोणतीही भूमी तयार नव्हती. शेवटी तिला ओर्टिजिया नावाच्या प्रवाही बेटावर आश्रय मिळाला. त्याच बेटाला पुढे डेलोस असे नाव मिळाले.


आर्टेमिस या अपोलोच्या बहिणीच्या जन्मानंतर ते बेट स्थिर झाले. आर्टेमिस ही स्त्री शिकारी देवी त्याची जुळी बहीण आहे. तिनेच स्वत:चा जन्म झाल्यानंतर लेटोला अपोलोला जन्म देण्यासाठी मदत केली. अपोलोचे पोषण अमृतावर झाले आणि जन्म झाल्यानंतर लगेचच तो वाढू लागला व बाल्यावस्थेतून यौवनावस्थेला प्राप्त झाला. त्यानंतर त्याने आपल्या मातेला त्रास देणार्‍या पायथॉनला डेल्फी येथे ठार मारले. या कामामध्ये हेपेस्टस या धातुशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या देवाने त्याला शस्त्रे पुरविली. अपोलो आणि पायथॉन यांच्यातील या नाट्यमय संघषार्चे स्मरण पुढील काळात सेप्टेरिआ हा उत्सव साजरा करून जागविले जाई. या युद्धानंतर ज्यूसने अपोलोला शुद्धीकरणासाठी पाठविले. जिथून परतल्यावर त्याने डेल्फीमधील प्रार्थनास्थळावर जम बसविला.

ग्रीक पुराणकथाशास्त्रात डेल्फी येथील अपोलोशी संबंधित भविष्यसूचनाचा अनेकदा उल्लेख येतो. डेल्फी येथील अपोलो, सर्वतोपरी साहाय्यकर्ता असून, तो देवता आणि मानव यांच्यातील दुवा मानला गेला आहे. अगदी स्वजनांच्या रुधिराने कलंकित झालेल्यांनादेखील तो पावन करतो.


इतर ग्रीक देवांप्रमाणे याचेही अनेक स्त्रियांवर प्रेम होते. त्या सर्व स्त्रिया काही राजी नव्हत्या. त्यांपैकी डॅफने ही अप्सरा, कोरोनिस, प्रिअम राजाची कन्या कॅसेण्ड्रा तसेच क्रीनी नावाची आणखी एक अप्सरा या महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यापासून अपोलोला अपत्यप्राप्तीही झाली.

कोरोनिसपासून झालेला अ‍ॅस्क्लेपिअस नावाचा पुत्र पुढे वैद्यक विद्येचा अधिष्ठाता दैवत मानला गेला, तर क्रीनी या अप्सरेपासून अपोलोला झालेला अ‍ॅरिस्टेअस हा पुत्र पशू आणि शेतीबरोबरच विशेषकरून मधुमक्षिकापालनाचा रक्षक समजला जातो.


अपोलो हा काव्य, संगीत, धनुर्विद्या, ज्योतिषविद्या आणि औषधविद्या या शास्त्रांशी संबंधित आहे. तसेच हा देव पशू तसेच शेती यांच्या सुरक्षेची काळजी वाहतो. काही विद्वानांच्या मते अपोलो हे हेलिओस या सूर्यदेवाचे रूप असून, उत्तर ग्रीकमधील पशुपालक देवतेशी त्याचे एकीकरण झाले असावे. डॉल्फीन मासा आणि कावळा हे त्याच्याशी संलग्न केले आहेत. तसेच लॉरेल हा वृक्ष त्याचे प्रतीक मानला जातो.

सौंदयार्चे प्रतीक मानला गेलेला अपोलो हा ग्रीक देव चिरंतन यौवनात असल्याचे वर्णन येते. सोन्याच्या तंतुवाद्यावर वादन करून मने रिझवणारा, रुप्याचे धनुष्य असणारा, विवेकाचे व न्यायाचेही प्रतीक आहे. तसेच धार्मिक आणि नागरी कायद्याचा अधिष्ठाता दैवत आहे. अपोलो रोगनिवारणाची विद्या जाणणारा आणि ती लोकांनाही शिकवणारा देव आहे. अंधाराचा स्पर्शही नसणारा प्रकाशाचा आणि म्हणूनच सत्याचा दैवत मानला जातो. अपोलोचे व्यक्तिमत्त्व अत्यंत लोभस तसेच गुंतागुंतीचे असल्याने अपोलो हा चित्रकार तसेच मूर्तिकारांचा अतिशय आवडता विषय आहे.


कलाप्रांतात अनेक वास्तूंना त्यासाठीच अपोलोचे ना ंव दिलेलेआढळते. अपोलो अकरा या यानाने पहिली चांद्रयान मोहिम यशस्वी केली होती. अपोलो हॉस्पिटल, अपोलो टायर अशा अनेक संस्थांना आपण अपोलो या नावाने ओळखतो. पण हा मूळ शब्द कुठून आला हे आपल्याला माहिती नसते. आपल्याकडे देवी देवतांची नावे दुकाने, आॅफीस, कारखाने, विविध संस्थांना देण्याची प्रथा आहे तशी ती जगभरात आहे. बाहेरच्या देशातील या देवदेवतांच्या नावांपैकीच हे एक नाव आहे.

प्रफुल्ल फडके/ संस्कृती


9152448055

राणा दाम्पत्याची कुरघोडी


गेले दोन दिवस राज्यात अत्यंत हिडीस असे राजकारण पाहायला मिळाले. तसे गेली तीन वर्षे राज्यात आणि देशात महत्त्वाच्या प्रश्नांपेक्षा अशा गोष्टींचाच उहापोह केला जात आहे; पण हनुमान चालिसावरून जो सध्या प्रकार पाहायला मिळाला त्यातून खेद वाटल्याशिवाय राहत नाही. युवकांची किती शक्ती फालतू कामासाठी वाया जाते. तीच शक्ती विधायक आणि चांगल्या कामासाठी वापरण्याची बुद्धी का होत नाही?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याचा इशारा देणाºया आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले. काही आवश्यकता होती का याची?, नवनीत राणा आणि रवी राणा यांना किती महत्त्व द्यायचे हे शिवसेनेने ठरवायला पाहिजे होते. अनावश्यक त्यांचे महत्त्व वाढवून काय साध्य केले?


रविवारी राणा यांच्या घरासमोर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ केली गेली, हे प्रसारमाध्यमे, टीव्ही चॅनेलवरून सर्व जग पाहत होते. त्यामुळे नवनीत राणा यांची काहीच बेअब्रू झाली नाही, तर शिवसैनिकांबाबत जनतेचे मत खराब होण्याची शक्यता आहे, याचे भान राखायला पाहिजे होते. ज्याप्रकारे महिला शिव्या घालत होत्या, ओरडत होत्या त्यावरून नवनीत राणांची बदनामी नाही, तर शिवसेनेची होतेय हे लक्षात घेणे गरजेचे होते. त्यामुळे राणांच्या जाळ्यात शिवसेना अडकली की काय, असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला. एक नवरा-बायको, अपक्ष आमदार आणि खासदार आहेत, त्यांना इतके महत्त्व देण्याचे कारण काय होते? यामुळे काही काळ मुंबई आणि अमरावतीतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात ५०० शिवसैनिकांचा मोर्चा राणा दाम्पत्याच्या घरावर धडकला होता. आंदोलकांनी आमदार व खासदार राणा मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. महिला शिवसैनिकांनी खा. राणा यांच्या घरावर बांगड्या फेकल्या. शिवसैनिकांनी हनुमानाचा मुखवटा घातला होता. जोरदार घोषणाबाजी करणारे शिवसैनिक आक्रमक होत असल्याचे बघून तेथे वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले आणि नंतर काही वेळाने सोडून दिले. यातून काय मिळाले? युवकांची, एखाद्या पक्षाची, संघटनेची एवढी ताकद वाया घालवायचे कारण काय होते? त्यापेक्षा स्वच्छतेच्या, विकासाच्या, लोकसहभागाच्या कामासाठी ही ताकद वापरली असती, तर बरे झाले असते. नवनीत राणा किंवा रवी राणा इतके महत्त्वाचे नव्हते.

पण शिवसैनिकांच्या या कृतीवर राणा दाम्पत्याने कुरघोडी करण्याचा चांगला प्रयत्न केला. हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी येणाºया कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांना अडवू नये, अशी विनंती आमदार राणा यांनी केली. ते म्हणाले की, जर हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी व त्याचा मुख्यमंत्र्यांना आग्रह करण्यासाठी कोणी आमच्या विरोधात मुर्दाबादचे नारे देत असतील, तर त्याचे आम्हाला काहीच वाटणार नाही. मातोश्रीवर जाताना कोण अडवतो पाहू, बांगड्या या महिलांच्या सौभाग्याचे देणे आहे. मी सौभाग्यवती आहे. महिला शिवसैनिकांनी बांगड्या फेकण्याऐवजी मला दिल्या असत्या, तर मी त्या आदराने स्वीकारल्या असत्या. हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी मी व युवा स्वाभिमान कार्यकर्ते मातोश्रीवर जाणारच आहोत. मीही मुंबईची मुलगी आहे. मला कोण अडवणार ते बघतेच. मी हिमतीने जाणार, मला कोणी अडवून दाखवावे, असे आव्हान देऊन नवनीत राणांनी कुरघोडी केली. शिवसैनिकांच्या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी राणा दाम्पत्यानेदेखील तयारी केली होती. आमदार राणा म्हणाले की, आम्ही शिवसैनिकांचे स्वागत करण्यासाठी लाल कार्पेट टाकून तयार होतो. त्याचबरोबर आम्ही सरबत आणि फुलांचे बुकेही तयार ठेवले होते. परंतु, शिवसैनिक आलेच नाहीत. काही झाले तरी आम्ही मातोश्रीवर जाणारच आहोत.


या एकूणच घडामोडीतून काय साध्य झाले? आपल्या विरोधकांना, मुख्य प्रतिस्पर्ध्याला टक्कर देण्याऐवजी राणांसारख्या किरकोळ शक्तीच्या पाठीमागे शिवसेना का लागली याचे आश्चर्य वाटते.

खरंतर अशा प्रकारांकडे मोठे नेते असतात, ते कधीही लक्ष देत नाहीत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचेही उदाहरण देता येईल. मोदींवर इतकी टीका केली जाते, विरोधक काय वाटेल ते बोलत असतात, सोशल मीडियावर टीका होते; पण ते आपल्या कामातून त्याला उत्तर देतात आणि टीकेकडे दुर्लक्ष करून आपले काम करतात. त्या कामावर बाजी मारतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कधी असल्या गोष्टींवर प्रतिक्रिया देत बसत नाहीत. आपले काम बरे आणि आपण बरे.


कधी-कधी अनुल्लेखाने मारणे योग्य ठरते. समोर भाजपसारखा बलाढ्य पक्ष असेल, तर त्यांच्यापुढे शक्तिप्रदर्शन करणे ठिक आहे. आपली ताकद दाखवणे योग्य ठरले असते. पण, अपक्ष असलेल्या राणा पती-पत्नीविरोधात एवढी ताकद खर्च करणे यातून त्यांचे महत्त्व वाढवले गेले आहे. त्यांना कोणी इतकी प्रसिद्धी दिली नसती, ती शिवसेनेमुळे मिळाली.

नवनीत राणा कशाच्या जोरावर इतके बोलत आहेत, त्यांच्यामागे कोण आहे? याचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात शक्तिप्रदर्शन करणे गरजेचे होते. शिवसेनेला चांगल्या कामापासून भरकटवायचे, भडकवायचे हाच यांचा मुख्य उद्देश होता. तो त्यांनी साध्य केला; पण आपण सत्तेत असताना अशाप्रकारे आपण आपली ताकद वाया घालवली नाही पाहिजे, याचे भान आता ठेवावे लागेल.


उठसूट प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची गरज नसते. गर्जेल तो पडेल काय, अशी आपल्याकडे म्हण आहे. मातोश्रीवर जाण्याची नवनीत राणांनी घोषणा केली. आल्या असत्या आणि त्यांनी म्हटली असती हनुमान चालिसा तिथे तर काय फरक पडला असता?, उलट त्यांनी येऊन पौरोहित्य केले समजून त्यांना दक्षिणा देऊन बोळवण केली असती, तर त्यांची जागा दाखवून देता आली असती. शांतपणे त्यांना उत्तर देण्याची संधी असताना आणि त्यांची सहजपणे जागा दाखवण्याची शक्यता असताना शक्तिप्रदर्शन करून काहीही साध्य झाले नाही. त्यांना मोठे केले गेले. त्यांना वाय सुरक्षा काय प्रदान केली गेली. सगळे कॅमेरे काय त्यांच्या घराभोवती जमा झाले. शक्ती शिवसेनेची आणि प्रसिद्धी नवनीत राणांची झाली. हे नको ते चित्र उभे राहिले. प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची आवश्यकता नसते. टक्कर मोठ्यांशी दिली, तर त्यात मोठेपण दिसते. ती संधी गमावली असे वाटत आहे.

भारतरत्न पांडुरंग वामन काणे


महामहोपाध्याय डॉ. पांडुरंग वामन काणे यांना भारत सरकारचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार साधारण साठ वर्षांपूर्वी म्हणजे १९६३ साली मिळाला. कोकणातील पेढे परशुराम, तालुका चिपळुण, जिल्हा रत्‍नागिरी इथे त्यांचा ७ मे, १८८० ला जन्म झाला होता, तर आजच्या दिवशी १८ एप्रिल, १९७२ ला त्यांचे निधन झाले. आजवर दिलेल्या भारतरत्न पुरस्कारप्राप्त मान्यवरांपैकी अनेकांची माहिती नव्या पिढीला नाही. कोकणातील या व्यक्तिमत्वाला तो पुरस्कार मिळाला होता त्याची माहिती नव्या पिढीला असणे आवश्यक आहे. पां. वा. काणे हे भारतीय कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक होते.


कोकणातील वेदशास्त्रपारंगत व विद्वत्तेची मोठी परंपरा असलेल्या अशा मध्यमवर्गीय कुटुंबात काणे यांचा जन्म झाला. त्यांचे पणजोबा उत्तम ज्योतिषी आणि पंचांगकर्ते, तर आजोबा वैदिक पंडित, ज्योतिषी आणि उत्तम वैद्य होते. वडील वामनरावांना वेद, उपनिषदे, भगवद्गीता यांचे सखोल ज्ञान होते. महत्त्वाचा असा ऋग्वेद तर त्यांचा तोंडपाठ होता. वामनराव पुढे वकिलीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, न्यायालयात इंग्रजीतून कामकाज करणारे पहिलेच वकील ठरले, म्हणजे परंपरागत भारतीय ज्ञान आणि आधुनिक इंग्रजी भाषेतील कायद्याचे ज्ञान असा मिलाफ असलेले असे त्यांचे वडील वामनराव! डॉ. पां. वा. काणे यांचे आजोबा म्हणजे आईचे वडीलही वैदिक पंडित आणि वैद्यकीचे उत्तम ज्ञान असलेले असे होते.

पां. वा. काणे यांना अमरकोशातील सर्व श्लोक लहानपणीच तोंडपाठ होते. लहान वयातच त्यांनी विविध नियतकालिकांतून आधी मराठीतून आणि नंतर इंग्रजीतून लेखन सुरू केले. त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्तेचा आलेख सतत वरच चढत गेला. बी. ए. आणि संस्कृतमधून एम. ए. करतानाच त्यांनी अनेक विषयांमध्ये संशोधन सुरू केले. संस्कृत, मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांबरोबरच त्यांनी फ्रेंच आणि जर्मनसह अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. अशा रितीने त्यांनी अतिशय मेहनतीने स्कॉलरशीप मिळवत आणि एकीकडे शिकवत राहून खूप विद्या संपादन केली. संस्कृत भाषेवर अतिशय प्रेम, त्यामुळे बी. ए.ला संस्कृतमध्ये सर्वप्रथम आले. त्याबद्दल त्यांना भाऊ दाजी पारितोषिक मिळाले होते. मग एल्‌‍ा.एल.बी. झाले. नंतर वेदांत पारितोषिकासह ते मुंबईच्या विल्सन महाविद्यालय येथून एम. ए. झाले. त्यानंतर हिंदू-मुसलमान कायदा घेऊन एल्‌ा.एल.एम. झाले. या परीक्षेत त्यांना व्ही. एन. मंडलिक सुवर्ण पदक मिळाले.


काणेंनी १९०४ साली रत्‍नागिरी जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरुवात केली. नंतर ते एल्फिन्स्टन हायस्कूल, मुंबई येथे नोकरीवर होते. मुंबईच्याच गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्येसुद्धा त्यांनी शिकवले होते. मुंबई विद्यापीठाचे ते १९४७ ते १९४९ दरम्यान कुलगुरू होते.

प्राचीन संस्कृत वाङ्‌मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाºया गोष्टींमधून काणे यांनी धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास नावाचा ग्रंथ प्रसिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला. १९४२ साली त्यांना 'महामहोपाध्याय' ही पदवी मिळाली. 'हिस्ट्री आॅफ संस्कृत पोएटिक्स' हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. भारत रामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे ग्रंथ त्यांच्या महत्त्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. प्राचीन भाषा, वाङ्‌मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र, पुराणे आणि मिमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.


प्राचीन ज्योतिषशास्त्र, खगोलविद्या, योगशास्त्र, पुराणे, टीका आणि मिमांसा, सांख्य तत्त्वज्ञान, महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास, कौटिल्याचे अर्थशास्त्र, गणित, धर्मशास्त्र, मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास, काव्यशास्त्र, नाट्यशास्त्र, अशा असंख्य विषयांवर त्यांनी सुमारे ४० ग्रंथ, ११५ लेख, ४४ पुस्तक परिचय/परीक्षणे लिहिली आहेत. यावरून त्यांच्या ज्ञानाचा आवाका आणि प्रचंड विस्तार लक्षात येतो.

ब्रिटिशांनी येथे आपले बस्तान बळकट करतानाच इथल्या संस्कृती, विद्या, ग्रंथ, प्रथा, समाज, रूढी यांची कुचेष्टा सुरू केली. मिशनºयांनी हिंदू धर्माची विविधांगी टिंगल सुरू केली. त्यामध्ये त्यांनी इथल्या काही तथाकथित विद्वानांनाही सामील करून घेतले. इंग्रजीतील एखादी कविता ही संपूर्ण संस्कृत काव्यापेक्षा श्रेष्ठ आहे, असे अत्यंत उर्मट उद्गार मेकॉलेसारख्या अधिकाºयाने काढले होते. लॉर्ड कर्झनने, तर भारतीयांना सत्य म्हणजे काय याची कल्पनाच नसल्याची दर्पोक्ती केली होती. डॉ. काणे या सर्व गोष्टींनी व्यथित झाले होते. १९२६ मध्ये त्यांनी व्यवहारमयुख हा ग्रंथ प्रसिद्ध केला. त्यावेळी केलेला अभ्यास, जमविलेली कागदपत्रे आणि अन्य साधने, आजवरचे धर्म आणि कायदा यांचे ज्ञान अशा भक्कम तयारीनिशी त्यांनी भारतीय धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यास सुरुवात केली. इंग्रज आणि इतर युरोपीय देशांना कळावे म्हणून त्यांनी हा परिपूर्ण इतिहास इंग्रजीत लिहिला. सुमारे ७००० पाने आणि ५ खंडांमध्ये त्यांनी लिहिलेला हा इतिहास आजही जागतिक पातळीवर अचूक आणि प्रमाण म्हणून मानला जातो.


समाजसुधारणा आणि पुरोगामी विचारांचा पुरस्कार हे सुद्धा डॉ. काणेंची वैशिष्ट्ये होती. भारतीय कायदे आणि रुढींचा अभ्यास असलेल्या डॉ. काणेंनी तत्कालीन अनिष्ट चालींविरुद्ध आवाज उठवला होता. विधवांना केस कापून टाकण्याची सक्ती करणे, अस्पृश्यता यांसारख्या रुढींना त्यांनी तीव्र विरोध केला. एका केस न काढलेल्या विधवेला पंढरपुरात विठ्ठलाची पूजा करण्याचा अधिकार मिळावा यासाठी त्यांनी तिचे वकीलपत्र घेतले होते. आंतरजातीय विवाह, विधवा विवाह, तसेच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला; पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रिय असणाºया काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. सन १९५३ ते १९५९ या काळात पां. वा. काणे यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. पां. वा. काणे यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली, तसेच १९६० साली पुणे विद्यापीठाने सुद्धा सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली. काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना १९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला. ते राष्ट्रपतींनी निवडलेले असे राज्यसभेचे खासदार झाले.

काणे यांना १९६३ साली भारतरत्‍न हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 'हिस्ट्री आॅफ धर्मशास्त्र'च्या पाच खंडांपैकी चौथ्या खंडाला १९६५ मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. डॉ. काणे मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचे फेलो होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या नियामक मंडळावर त्यांनी काम केले. 'महाराष्ट्र साहित्य परिषदेचे' उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ काम केले. 'लंडन स्कूल आॅफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज' या संस्थेने त्यांना फेलोशिप दिली.


महामहोपाध्याय पां. वा. काणे यांना सन १९६३मध्ये भारताचा भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देण्यात आला. भारतात २०१९ सालापर्यंत ४५ व्यक्तींना भारतरत्न हा सन्मान देण्यात आला.

प्रफुल्ल फडके/संस्कृती


9152448055\\

अखंड भारताचा विचार


सरसंघचालक मोहन भागवत यांनी हरिद्वारमधील एका कार्यक्रमात येत्या वीस-पंचवीस वर्षांत अखंड भारताची निर्मिती होईल आणि आपण सर्वांनी प्रयत्न केले, तर येत्या पंधरा वर्षांतच अखंड भारत निर्माण होऊ शकेल, अशी भविष्यवाणी केल्याने देशात तो चर्चेचा विषय ठरला आहे. सरसंघचालकांच्या वक्तव्याचा अनेकांनी उहापोह करून सोयीचा अर्थ काढला; पण त्यामागचा विचार समजून घेण्याची गरज आहे. आज भारताच्या सर्व छोट्या-मोठ्या शेजारी देशांना चीनने आपल्या विळख्यात अडकवले आहे. चिनी ड्रॅगन त्यांना गिळंकृत करताना दिसत आहे. पाकिस्तान, म्यानमार, नेपाळ या देशांबाबत ते लक्षात आले नाही, तरी श्रीलंकेची परिस्थिती आज ज्याप्रकारे झाली आहे, त्यानंतर या सर्व देशांना कोणत्या तरी आधाराची गरज आहे. या संकटातून मुक्त व्हायचे आहे. अशा परिस्थितीत भारत हा या देशांचा आधार असणार आहे. अशा अर्थाने अखंड भारत हा सर्व शेजारी देशांना तारक ठरेल आणि चिनी विळख्यातून सोडवले हा अभिप्रेत अर्थ आहे.


अर्थात अखंड भारताचे स्वप्न संघ सुरुवातीपासूनच पाहत आला आहे. संघशाखेवर जी भारतमातेची प्रतिमा पूजली जाते, ती प्राचीन अखंड भारताचीच असते. त्यामुळे त्यांनी तसे वक्तव्य केले, तर ते काही विसंगत नाही; पण भागवत यांच्या विधानाचा शब्दश: अर्थ न लावता भारतीय विचार, भारतीय धोरण या अर्थाने भारताची बलाढ्यता याचा विचार करण्याची गरज आहे. १९९१च्या जागतिकीकरणानंतर असाही देशांच्या भूभाग आणि सीमा यांना काही अर्थ राहिलेला नाही. एखादा देश काबीज करणे म्हणजे प्रत्यक्ष सीमेत प्रवेश करणाची गरज नाही. आज आपण आपल्या देवधर्मापासून ते खाद्यसंस्कृतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी चिनी आक्रमण झालेले पाहतो. आपल्या वापरायच्या वस्तू, धर्म, संस्कृती, खाद्य संस्कृती सगळ्यावर चीनने आक्रमण केले आहे. असे असताना आपण शिल्लक राहतोच कुठे? अशा परिस्थितीत चीनला लांब ठेवून आत्मनिर्भर होऊन या शेजारी देशांपर्यंत भारताच विचार पोहोचवणे महत्त्वाचे आहे.

पण सरसंघचालकांच्या तोंडी हे विधान आल्याने आणि सध्या केंद्रामध्ये संघाच्या प्रभावाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार आणि नरेंद्र मोदींचे नेतृत्व असल्याने या विधानाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. अखंड भारत निर्मिती म्हणजे एक भौगोलिक प्रदेश, एक संविधान, एक राष्ट्रचालक अशा प्रकारचा विशाल भारतीय उपखंड बनेल, असा भागवंतांच्या म्हणण्याचा शब्दश: अर्थ काढायची गरज नाही. एकेकाळी भारताच्या भौगोलिक सीमा अशा व्यापक होत्या. आजचा अफगाणिस्तान तेव्हाचा कंधार देश होता. अठराव्या शतकापर्यंत तो भारताचाच भूभाग मानला जायचा. ड्युरंड रेषेने तो प्रदेश भारतापासून अधिकृतपणे वेगळा केला, तो ब्रिटिशांनी आणि तोही अगदी अलीकडे १८९३ साली. पाकिस्तानची निर्मिती १९४७ साली झाली, तर बांगलादेशची १९७१ च्या युद्धाअंती. आजच्या नेपाळवरही कधीकाळी किराताचे शासन होते. श्रीलंका एकेकाळी सिंहलद्वीप होती आणि रामायणाचा तो भाग, तर सर्वज्ञात आहेच. आजचा म्यानमार पूर्वी ब्रह्मदेश म्हणून ओळखला जायचा आणि १९३७ साली ब्रिटिशांनी तो भारतापासून वेगळा पाडला. भूतान मौर्यकाळामध्ये भारताचा भाग होता. आसामच्या कामरूप राज्याचाही तो कधीकाळी भाग होता. भारताचे सांस्कृतिक धागेदोरे असे शोधायला गेले, तर थेट इंडोनेशियापर्यंत जाऊन भिडतील; पण आज रशिया ज्याप्रमाणे युक्रेनला जोडायला निघाला आहे, त्याप्रमाणे आपल्याला जोडून घेईल, असा चुकीचा अर्थ काढण्याची गरज नाही. येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये भारताची स्थिती एवढी बळकट होईल की, आजूबाजूचे हे जे सगळे देश आहेत, जे कधीकाळी याच भारतभूमीचा भाग होते, ते भारताच्या प्रभावाखाली येणे पसंत करतील. आपल्या आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर भारताकडे हे शेजारी देश आशेने पाहात असल्याचे स्पष्ट दिसून येते आहे. श्रीलंका दिवाळखोरीत निघालेला आहे. चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेली आहे. पाकिस्तानमध्ये राजकीय अस्थिरतेचे पर्व आले आहे. सत्तेवरून दूर जाताना इम्रान खानलाही भारताचे गुणगान करावेसे वाटले. पाकिस्तानमधील बलुचिस्तानसारख्या भागातील नागरिक भारताच्या प्रगतीकडे डोळे विस्फारून पाहत असतात. भारताने येत्या वीस ते पंचवीस वर्षांमध्ये स्वत:चा उत्कर्ष साधला, तर निश्‍िचतच आजूबाजूच्या या देशांना भारताचे सख्य हवेहवेसे वाटेल. आजवर त्यांना चीनचे वाटत आले होते. चीनने भारताभोवतीच्या देशांभोवती आपले जाळे विणायला अनेक वर्षांपूर्वीपासून सुरुवात केलेली आहे. ती जागा भारताला घ्यावी लागेल. चीनच्या या वर्चस्ववादी भूमिकेचा फुगा श्रीलंकेतील सद्यपरिस्थितीने फोडलेला आहे; पण भारताची चौफेर प्रगती जर येत्या काळात होऊ शकली, तर चीनच्या पंखांखालून हे देश निश्‍िचत बाहेर पडू शकतील आणि सर्वत्र अखंड भारताचा विचार दिसेल, असा तो अर्थ आहे.


प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याची गरज नसते. कधी देश म्हणून नाही राष्ट्र म्हणून विचार करावा लागतो. देश म्हणजे सीमेच्या आत येतो. तर राष्ट्र म्हणजे विचार असतो. भारत हा देश आहे, तर हिंदू राष्ट्र हा विचार असतो. भारताचा वा विचार अखंड हिंदुस्थानात पोहोचवणे हे त्यामागचे वास्तव आहे.

रविवार, १७ एप्रिल, २०२२

गोंदणे (टॅटू)


युवकांमध्ये शरीराच्या दृश्य भागावर कुठे तरी गोंदून घेण्याची फॅशन आहे. आयपीएलमध्ये खेळणारे बहुतेक खेळाडू कुठे तरी टॅटू काढत असतात. त्या टॅटूलाच आपल्याकडे गोंदवणे म्हणतात. चित्रपटसृष्टीतही या गोंदवण्याला फार महत्त्व आहे. ताटातूट झालेले भाऊ-भाऊ, माय-लेक ओळख पटवण्यासाठी हे गोंदवलेले चिन्ह फायटिंगच्यावेळी कपडे फाटून समोर आल्यावर अरे आपण भाऊ-भाऊ आहोत, असे म्हणून मिठी मारायचे आणि क्लायमॅक्सकडे वळायचे तंत्र या गोंदण्यामुळे सापडले होते. दीवारमधील अमिताभ बच्चनच्या हातावरील मेरा बाप चोर हैं, हे गाजलेले गोंदवलेले होते. तर, फटाकडीमधील सुषमा शिरोमणीची इंदी हे दंडावर गोंदवलेले नाव भाऊ-बहिणीला एकत्र आणते. आजकाल त्याला टॅटू म्हणत असले आणि मोठमोठ्या शहरातून असे टॅटू स्टुडीओ लोकप्रिय होत असले, तरी ही एक जागतिक पारंपरिक कला आहे.


शरीरावर चित्राकृती किंवा चिन्हे उठविण्याकरिता टोचून घेण्याची क्रिया म्हणजे गोंदणे. गोंदण्याप्रमाणे जखमा करून व्रण उठविण्याचाही एक प्रकार आहे. गोंदण्याची प्रथा केव्हा व कशी सुरू झाली, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि कपड्याचा वापर सुरू होण्यापूर्वी सौंदर्यदृष्टीने शरीर रंगविण्याची पद्धत असावी अथवा काम करीत असताना चुकून केव्हा तरी शरीराच्या एखाद्या भागाला जखम झाली असावी व तीत नकळत रंगद्रव्य मिसळून तो व्रण कायम झाला असावा. यातूनही गोंदण्याची कल्पना निर्माण झाली असावी. अतिभौतिक शक्तीच्या भीतीपोटीही गोंदण्याची कला उदयास आली असावी व त्याद्वारा संबंधित व्यक्तीचे रक्षण होत असावे, अशी कल्पना हर्बर्ट स्पेन्सरने सुचविली आहे.

नॉइबुर्गर माक्स याच्या मते वैद्यकाच्या एखाद्या प्रक्रियेतून हा प्रकार सुरू झाला असावा. जमातीचे किंवा विजयाचे चिन्ह म्हणूनही गोंदणे सुरू झाले असावे. काही मानवशास्त्रज्ञ गोंदण्याचा संबंध देवादिकांना करण्यात येणाºया रक्ताच्या अभिषेकाशी जोडतात. इतर काहींच्या दृष्टीने स्त्रियांच्या सहनशक्तीची कसोटी पाहण्याकरिता योजिण्यात आलेल्या प्रथेचे हे अवशिष्ट रूप आहे.


गोंदण्यासाठी निरनिराळ्या देशांत निरनिराळी साधने वापरली जातात. झाडांचे वा माशांचे काटे, हाडे, शिंपले इ. नैसर्गिक अणकुचीदार साधनांपासून ते आधुनिक काळातील साध्या किंवा विजेवर चालणाºया सुयांपर्यंत अनेक साधनांचा गोंदण्याकरिता उपयोग करण्यात येतो. शरीरावर सुईसारख्या तीक्ष्ण हत्याराने टोचून त्यात रंगद्रव्ये, तसेच कोळशाची पूड घालतात. त्यामुळे गोंदण्याला निळसर रंग येतो. काही ठिकाणी चाकूने जखमा करून त्यात रंगद्रव्ये घालून त्यावर ठराविक झाडांच्या सालीची राख वा कोळशाची पूड घालतात.

बोर्निओतील जमातींत चित्राचा ठसा काजळी व उसाच्या रसाच्या मिश्रणात बुडवून तो शरीरावर उठवतात. जपानी लोक गोंदण्याकरिता निरनिराळ्या आकारांच्या चार सुया वापरतात. भारतात स्त्रीचे दूध किंवा कारल्याचा रस, गोडेतेल व काजळ एकत्र खलून ते मिश्रण गोंदण्यासाठी वापरतात. सुईचे टोक या मिश्रणात बुडवून टोचून टोचून गोंदण्याची क्रिया करतात. गोंदणे पूर्ण झाल्यावर त्यावर एरंडेल व हळदीच्या मिश्रणाचा लेप लावतात. अलीकडे गोंदण्याचे रासायनिक मिश्रण तयार मिळते व गोंदण्याची क्रियाही यंत्राच्या साहाय्याने करता येते.


काही जमातींत गोंदणे व लग्न यांचा संबंध दिसून येतो. सॉलोमन बेटावरील जमातींत चेहºयावर व छातीवर गोंदून घेतल्याशिवाय मुलगी विवाहास योग्य ठरत नाही. आॅस्ट्रेलियन आदिवासी लग्नापूर्वी तरुण मुलीच्या पाठीवर भीतीदायक स्वरूपाचे गोंदण करतात. तैवानमधील जमातीचे लोक लग्नापूर्वी मुलीचा चेहरा गोंदतात. न्यू गिनितील पापुअन जमातीत अविवाहित मुलींच्या सर्व शरीरावर गोंदण्यात येते. फक्त चेहरा मात्र लग्नाच्या वेळी गोंदून सुशोभित करण्यात येतो. आसाममधील नागा जमातीत गोंदल्यानंतरच तरुण युवक लग्नास योग्य समजण्यात येतो.

गोंदण्याचे निरनिराळे प्रकार आढळतात. त्याचप्रमाणे शरीराच्या कपाळ, गाल, हनुवटी, छाती, स्तन, दंड, मनगट इ. निरनिराळ्या भागांवर गोंदण करण्यात येते. टिंबांच्या आकृती, विशिष्ट चिन्हे, मोर, मत्स्य, कोल्हा, अस्वल इत्यादींची चित्रे स्वस्तिक, देवाचे तसेच आदरणीय किंवा आवडत्या व्यक्तीचे नाव, तुळशी-वृंदावन, हनुमान, महादेवाची पिंड, इतर देवांचा चेहरा इ. प्रकार गोंदणात दिसून येतात.


क्वचित एखादा अपवाद वगळता गोंदण्याची प्रथा कमी अधिक प्रमाणात साधारणत: सर्वत्र दिसून येते. ईजिप्तमध्ये केलेल्या उत्खननावरून इ. स. पू. २००० वर्षांपूर्वीच्या ममींवर गोंदण्याच्या निळ्या खुणा आढळून आल्या आहेत. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत ही कला अत्यंत प्रगतावस्थेत होती, असे दिसून आले आहे. जपानी लोकांतही ही कला विशेष समृद्ध झाली आहे.

बायबलच्या जुन्या कराराने गोंदणे निषिद्ध ठरविले आहे. मुहंमद पैगंबरानेही त्यास मनाई केली आहे. वैदिक वाङ्‌मयात गोंदण्याचा उल्लेख आढळत नसला, तरी हिंदू समाजात गोंदण्याची प्रथा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. शिक्षा म्हणून गुन्हेगाराच्या कपाळावर गोंदून त्याची धिंड काढण्यात येत असे. गुन्हेगार, राजकीय कैदी यांची ओळख पटण्याकरिता त्याचप्रमाणे गुन्हेगारांना परस्परांची ओळख देण्याकरिता गोंदण्याचा अवलंब केला जाई. वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीनेही गोंदण्याचा उपयोग करण्यात येतो. सौंदर्यवर्धन हा तर गोंदण्याचा मुख्य उद्देश आहे.


पन्नास वर्षांपूर्वी गोंदण्याची कला मागे पडली होती; पण टॅटूच्या निमित्ताने ती पुन्हा विकसीत झाली आणि तरुणांमध्ये तिचे आकर्षण वाढलेले दिसते. त्याचे चित्र आयपीएलमधील खेळाडूंमध्ये दिसते.

प्रफुल्ल फडके/संस्कृती


9152448055\\