‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ अशी आपल्याकडे एक म्हण आहे. यातील साधी राहण्याची पद्धत म्हणजे काय याचे नेमके उत्तर देण्यासाठी एकमेव व्यक्ती या देशात होती, ती म्हणजे जॉर्ज फर्नाडिस. राजकीय किंवा कामगार नेते म्हणून ख्याती झाली तरी अत्यंत साधेपणाने आणि सर्वाबरोबर मिळून मिसळून राहिलेले व्यक्तिमत्त्व आणि गर्दी न टाळता गर्दीतून व्यासपीठावर येणारे सामान्यांतील असामान्य असे व्यक्तिमत्त्व म्हणजे कामगार नेते जॉर्ज फर्नाडिस. ‘अरे आवाज कुणाचा..’ या घोषवाक्याला ‘कामगारांचा..’ असे बिनधास्त उत्तर देणारे देशातील कामगार चळवळीचे अध्वर्यू आणि अघोषित ‘बंदसम्राट’ अशी जॉर्ज फर्नाडिस यांची ख्याती होती. देशाचे माजी संरक्षणमंत्री म्हणूनही ओळख असलेल्या जॉर्ज फर्नाडिस यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनामुळे बंद सम्राटाचा आवाज थांबला असेच म्हणावे लागेल.फर्नाडिस यांच्या निधनामुळे देशातील कामगारांसाठी प्राणपणाने झुंजणारा योद्धा हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काही मोजक्या लोकनेत्यांमध्ये जॉर्ज फर्नाडिस हे अग्रणी होते. संपूर्ण देशाचे समाजकारण आणि राजकारण त्यांनी व्यापून टाकले होते. जॉर्ज फर्नाडिस हे बालपणापासूनच चळवळ्या व बंडखोर स्वभावाचे होते. या स्वभावामुळेच पाद्री होण्यासाठी ख्रिस्ती सेमिनारीमध्ये दाखल करण्यात आलेल्या जॉर्ज यांनी तिथून पळ काढला. पुढे ते कामगार चळवळीत सक्रिय झाले. १९७४ च्या रेल्वे संपापासून जॉर्ज ख-या अर्थाने कामगार नेते म्हणून उदयास आले. आणीबाणीच्या काळात त्यांच्यातील लढवय्या नेता संपूर्ण देशाने पाहिला. आणीबाणीच्या काळात पोलिसांना गुंगारा देण्यासाठी दाढी राखून आणि पगडी घालून शीख सरदाराचा वेष धारण करण्याची कल्पकता त्यांनी दाखवली होती. त्यांच्यातील मुत्सद्दीपणा इतका होता की, अटकेनंतर तुरुंगात ते कैद्यांना भगवद्गीतेचे श्लोक म्हणून दाखवायचे.आपण सर्वधर्मसमभावाचे आहोत हे त्यांनी अत्यंत सहजपणे दाखवून दिले होते. आणीबाणी उठल्यानंतर जॉर्ज यांनी तुरुंगात असतानाच बिहारमधील मुझफ्फरपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली आणि विक्रमी मतांनी विजय मिळवला. त्या काळात काँग्रेसला हरवून सत्तेवर आलेल्या जनता पार्टीच्या सरकारमध्ये ते उद्योगमंत्री होते. जनता पार्टीमध्ये फूट पडल्यानंतर जॉर्ज यांनी समता पार्टीची स्थापना करून सक्रिय राजकारण सुरू केले. अर्थात, राजकारण करत असतानाही कामगारांशी असलेली नाळ त्यांनी कधी तोडली नाही. कामगारांसाठी ते अखेपर्यंत लढत राहिले. त्यांचे राजकारण कधी कामगारहिताच्या आड आले नाही. केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या आघाडी सरकारमध्ये जॉर्ज यांच्या समता पक्षाचा समावेश होता. या सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. भाजपशी जवळीक साधण्याच्या त्यांच्या निर्णयावर टीकाही झाली. मात्र, ते डगमगले नाहीत. संरक्षणमंत्री म्हणून त्यांनी भारतीय जवानांच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतले होते. जॉर्ज त्यांच्या आक्रमक, लढाऊ भाषणांमुळे आणि त्यांच्या जनमानसाला सरळ भिडण्याच्या कसबामुळे ते लोकप्रिय होते. त्यांची वैचारिक बैठक ही समतेची होती. पण त्यांनी त्याचे कधी फाजील प्रदर्शन केले नव्हते. मी समतावादी आहे, मी समाजवादी आहे, मी निधर्मी आहे असा पोकळ देखावा न करता सामान्यपणे त्यांनी तसे वागून दाखवले होते हेच त्यांचे मोठेपण होते.समाजवादी हे विशेषण सर्वसाधारण विचारी व भावनाशील सर्व नागरिकांना लागू होऊ शकेल, एवढे समता नावाचे मूल्य गेल्या पन्नास वर्षात त्यांनी रुजवले होते. जॉर्ज फर्नाडिस यांची संसदेतील भाषणे हा फार मोठा अभ्यासाचा ठेवा आहे. आजकाल संसद बंद पाडून, कामकाज बंद पाडून अडवणूक करण्याच्या प्रवृत्तीत विरोधात राहून कामे कशी करायची असतात, विरोधकांचा धाक कसा असतो आणि अभ्यासपूर्ण संसदेत कसे बोलायचे असते हे जॉर्ज फर्नाडिस यांच्या संसदेतील कामगिरीवर नजर टाकल्यास दिसून येते. संसदेतील त्यांची तडफ, बेधडक वृत्तीच आपल्याला संमोहित करून जाते. कष्टकरी, पददलित जनांबद्दल त्यांना फार कळवळा होता. त्यांनी ते आपल्या कृतीतून दाखवून दिले होते. जॉर्ज फर्नाडिस हे व्ही. पी. सिंग यांच्या सरकारमध्ये १९८९ ते १९९० दरम्यान रेल्वे मंत्री होते. त्यावेळी ते खंबीरपणे कोकण रेल्वे झालीच पाहिजे या मताशी ठाम राहिल्यानेच ख-या अर्थाने कोकण रेल्वेच्या कामाला सुरुवात झाली. त्यामुळे ख-या अर्थाने कोकण रेल्वेचे निर्माते असे त्यांचे वर्णन करावे लागेल. ते रेल्वेमंत्री असताना अनेक मंत्रालयांनी कोकण रेल्वे प्रकल्पाला विरोध केला होता. विरोध करणा-यांमध्ये अर्थ मंत्रालयाबरोबरच इतर मंत्रालयांचाही समावेश होता.मात्र फर्नाडिस यांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता हा प्रकल्प एकहाती पूर्ण केला. त्यांनीच श्रीधरन यांची नियुक्ती करत कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी वेगळ्या महामंडळाची निर्मिती केली. त्या माध्यमातून प्रकल्प पूर्ण केला. त्यामुळे मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नाडिस ही नावे कोकण रेल्वेच्या इतिहासात कायम अजरामर राहणार आहेत. १९७७च्या जानेवारीत इंदिरा गांधींनी मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक घेण्याचे जाहीर केले. जानेवारीअखेरीस देशभरातील निरनिराळ्या जेलमध्ये असलेले सर्व विरोधी पक्षनेते व कार्यकर्त्यांना मुक्त करण्यात आले होते. पण बडोदा डायनामाइट प्रकरणात आरोपी असल्यामुळे जॉर्ज फर्नाडिस यांना मात्र सरकारने शेवटपर्यंत सोडले नाही. जयप्रकाश नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय झाला.
गुरुवार, ३१ जानेवारी, २०१९
‘बंद सम्राटा’चा आवाज थांबला!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा