शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०१६

९ ऑगस्ट. क्रांति दिन.

   ९ ऑगस्ट. आज क्रांति दिन. या क्रांतिनंतर भारताला स्वातंत्र्य मिळाले. अर्थात त्यापूर्वी अनेक क्रांतिची बंड आणि उठाव या देशात ब्रिटीशांविरोधात झाला होता. अनेकांनी हौतात्म्य पत्करले. अनेकांनी आपले रक्त सांडले तर अनेकजण हसत हसत फासावरही गेले. या सगळ्यामुळे ब्रिटीशांना भारतातून घालवायचे आहे हा पाया भक्कम झाला होता. त्यानंतर आजच्या भाषेत बोलायचे तर ९ ऑगस्ट क्रांति दिनामुळे विनींग शॉट मारला. या क्रांतीनंतर मिळालेल्या स्वातंत्राचे कौतुक करताना दे दी हमे आजादी बिनाण खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुने कर दिया कमाल, असे गौरवगीत गायले जाते. पण रक्त सांडल्यामुळेच हे स्वातंत्र्य मिळाले आहे आणि अहिंसेच्या उपासकांना त्यामुळेच ६० वर्ष राज्य करता आले, हे विसरून चालणार नाही.   १८५७ चे बंड, वासुदेव बळवंत फडके यांची क्रांती, लोकमान्यांची गर्जना, भगतसिंगांचा एल्गार यानंतर गांधीयुगाला प्रारंभ झाला आणि स्वातंत्र्य मिळाले नाही तर आणखी रक्तपात होईल, आणखी लोक फासावर जातील हे शहाणपण कॉंग्रेसला सुचले होते हे वास्तव आहे. त्यामुळे असहकार आंदोलन, सत्याग्रह अशा आंदोलनांचे फटके मारण्यास सुरूवात झाली.  या क्रांतिला अर्थातच दुसर्‍या महायुद्धाची पार्श्‍वभूमी आहे. सगळै जग युद्धासाठी एकवटल्यावर जिथे राज्य करतो तिथली मानसिकता समजून घेणे इंग्रजांना रास्त वाटले. नंतरच्या जागतिक व अंतर्गत घटनांचा, जागतिक युद्धाची परिस्थिती, ब्रिटिश सरकारची विधाने व भारतामधील व बाहेरील अनुकूल व प्रतिकूल टीकाटिप्पणी यांचा अंतर्भाव आहे. त्याचाही गांभीर्याने विचार केला.  त्यातून इंग्रजांनी भारतावरील आपले राज्य तातडीने संपुष्टात आणण्याची गरज आहे. हे भारताच्या व जगाच्या दृष्टीने गरजेचे आहे. ते पुढे चालू ठेवणे भारताला अध:पतित व दुबळे करण्यासारखे व भारताला स्वत:च्या संरक्षणासाठी जगातील स्वातंत्र्यासाठीच्या सहभागासाठी असमर्थ करणे आहे. हे पटवता आले. भारतातील ब्रिटिश सत्तेची समाप्ती हा महत्त्वाचा व तातडीचा प्रश्न आहे, यावर युद्धाचे भवितव्य अवलंबून आहे आणि साम्राज्यवाद, नाझीवाद व फॅसिझमविरुद्धच्या संघर्षातील, स्वातंत्र्याच्या आंदोलनातील सर्व शक्तींचे भवितव्यही अवलंबून आहे. हे केवळ युद्धाच्या भवितव्याशी निगडित नसून सर्व दडपलेली व अंकित मानव जात दोस्त राष्ट्रांच्या संयुक्त आघाडीकडे आकर्षित होईल. त्यामध्ये भारतही असेल आणि या राष्ट्र समूहांना नैतिक व स्फूर्तिजन्य लौकिक असे जगाचे नेतृत्व मिळेल. भारतीय पारतंत्र्य हे ब्रिटिश साम्राज्याचे प्रतीक राहिले तर तो साम्राज्यावरील कलंक आहे. राष्ट्र समूहाच्या भवितव्यावर प्रतिकूल परिणाम करणारा ठरेल, हे पटवणे शक्य झाले. ब्रिटीशांनी ओळखले होते की, आजचा हा धोका भारतातील साम्राज्यवादाची समाप्ती व भारतीय स्वातंत्र्याची गरज अधोरेखित करतो. त्याचा नेमका फायदा कॉंग्रेसने उठवला आणि ब्रिटीशांना चले जाव चा आदेशच सोडला. स्वातंत्र्याची ज्योतच तमाम भारतीय जनतेचा उत्साह व शक्ती निर्माण करू शकेल व ती युद्धाचे स्वरूपच बदलून टाकेल. म्हणून अखिल भारतीय कॉंग्रेस समितीने कळवले की, ब्रिटिश सत्तेने भारतातून निघून जावे म्हणून पुनश्च सर्व ताकदीने मागणी करत आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या घोषणेनंतर एक हंगामी सरकार स्थापन केले जाईल आणि भारत संयुक्त राष्ट्र समूहाच्या स्वातंत्र्याच्या संघर्षामधील सर्व संकटांच्या व सामूहिक कृतीमध्ये सहभागी असेल. हंगामी सरकार देशातील सर्व पक्ष व संघटनांच्या सहकार्याने बनेल. जनतेच्या सर्व विभागांतील प्रतिनिधी असलेले असे ते संयुक्त सरकार असेल. त्याचे प्राथमिक कार्य भारतावरील आक्रमणाचा लष्करी व अहिंसात्मक शक्तीने मुकाबला करून भारताचे संरक्षण करणे हे राहील आणि ते मित्रराष्ट्रांच्या सहकार्याने केले जाईल.  भारतातील शेतीमध्ये, कारखान्यांमध्ये व इतरत्र श्रम करणार्‍या जन विभागाच्या प्रगतीसाठी हे सरकार कटिबद्ध राहील. कारण भारताची सत्ता खर्‍या अर्थाने याच जनतेची आहे. हंगामी सरकार घटना समितीची योजना तयार करेल व जनतेच्या सर्व विभागांना मान्य होईल अशी राज्यघटना ही समिती तयार करेल. ती घटना कॉंग्रेसच्या मतानुसार संघीय स्वरूपाची असेल. यामध्ये राज्यांना शक्यतो स्वायत्त अधिकार दिले जातील आणि उर्वरित अधिकार राज्यांना दिले जातील.  स्वतंत्र हिंदुस्थान जनतेच्या संघटित इच्छाशक्तीने परकीय आक्रमणाचा परिणामकारक मुकाबला करण्यास समर्थ राहील, असे ठणकावून सांगण्यात आले. भारताचे स्वातंत्र्य इतर आशियाई राष्ट्रांच्या स्वातंत्र्याची नांदी आहे. यामध्ये बर्मा, मलाया, इंडोचायना, डच, ईस्ट इंडिया, इराण आणि इराक या राष्ट्रांनासुद्धा स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. त्याचसोबत आज जपानच्या ताब्यातील राष्ट्रे भविष्यामध्ये इतर कोणत्याही वसाहतवादी राष्ट्राच्या अंकित राहता कामा नयेत, यासाठीही या आंदोलनाने वाचा फोडली होती. मागील वीस - पंचवीस वर्षांच्या काळामध्ये शांततापूर्ण लढ्यातून जी अहिंसक ताकद निर्माण झालेली आहे तिचा उपयोग करण्याची वेळ आलेली आहे. हा लढा म. गांधींच्या नेतृत्वाखाली चालेल म्हणून समितीने गांधीजींना विनंती केली की, त्यांनी लढ्याचे नेतृत्व व मार्गदर्शन करावे.  या लढ्यात येणारी संकटे व कष्ट यांना धैर्याने व चिकाटीने तोंड द्यावे, गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकजुटीने उभे राहावे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शिस्तबद्ध सैनिक म्हणून त्यांचे आदेश पाळावेत, या उद्देशाने या ऑगस्ट क्रांतिचा पाया घातला गेला. अहिंसा हा लढ्याचा पाया आहे हे लक्षात ठेवून काम करण्याचे यासाठी नेमलेल्या समितीने ठरवले होते. स्वातंत्र्यासाठी लढणा-या प्रत्येक भारतीयाने स्वत:च मार्गदर्शक बनावे व खडतर मार्गावरून मार्गक्रमण करावे, जो स्वातंत्र्याप्रत पोचणार आहे. यासाठी केलेला छोडो भारतचा ठराव हाच क्रांति दिन आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: