भारतीय जनता पक्षाची वाटचाल ही कॉंग्रेसच्या किंवा अंदाधुंदी असलेल्या पक्षांच्या दिशेने होताना दिसते आहे. हे अपेक्षित असे नसले तरी अपरिहार्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे. याचे कारण २ वर्षांपूर्वी मोदी आणि भाजप याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्याचबरोबर कॉंग्रेसला नाकारायचे म्हणून भाजपला संधी निर्माण झाली होती. भाजपचा विजय हा मोदींच्या चेहर्याने असला तरी कॉंग्रेसला नाकारण्याची तयार झालेली मानसिकता यात फार मोठी महत्वाची होती.
पण त्याचाच अर्थ भाजपने समजावून घेतला नाही आणि आता कॉंग्रेसच्या पावलावर पाऊल टाकत हा पक्ष जाताना दिसतो आहे. नेत्यांमधील ताळमेळ नसणे, कोणीही काहीही बरळणे आणि नकारात्मक बाजू स्पष्ट होत जाणे याचा फटका आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपला बसला तर आश्चर्य वाटायला नको.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा भाजपाला मिळवून देण्यात अमित शहा यांचा मोठा हातभार होता. कारण हा माणूस नेमून दिलेले काम नेमके पार पाडण्यात वाकबगार आहे. पण कुठले काम आणि कसे करायचे, त्याचे डावपेच आखण्याची त्याच्यात कुवत नाही. लोकसभेत किंवा उत्तरप्रदेशात मोदींना प्रचंड प्रतिसाद मिळाला, त्याचे पहिले कारण अन्य पक्षातली अंधाधुंदी हेच होते. दुसरे कारण मोदींच्या मागे जनमानसात प्रचंड सदिच्छा होत्या. अशा सदिच्छांचा वापर करून कुठलाही पक्ष आपली जनतेतील पकड भक्कम करीत जातो. त्याला अन्य पक्षांच्या विनाशाचे मनसुबे करण्याची गरज नसते. त्यांच्यात फ़ाटाफ़ुट घडवण्याचेही कारण नसते. पण आपली लोकप्रियता खूप वाढली आणि उत्तर प्रदेशवर आपली पकड आली आहे असा समज भाजपने करून घेतला. पण उत्तर प्रदेशात जे सामाजिक, आर्थिक परिवर्तन घडवण्याची सुरूवात होणे गरजेचे आहे त्याला भाजपने हात घातला नाही. त्यामुळे सध्याच्या समाजवादी पार्टीच्या सरकारच्या अपयशाचे खापर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माथ्यावर फुटणार असे दिसते. याकडे भाजपने लक्ष दिले नाही. त्यामुळे भाजप ही कॉंग्रेसच्याच पावलावर पाऊल ठेवून वागते आहे असे दिसते.
२०१४ मध्ये लोकांना कॉग्रेसी अराजकाचा कंटाळा आला होता. अन्य कुठला पक्ष त्यातून पर्याय देत नव्हता. तो पर्याय म्हणून भाजपा व मोदी पुढे सरसावले, त्याचे लोकांनी बाहू पसरून स्वागत केले होते. त्याचा अर्थ कॉग्रेस पक्षाला संपवणे किंवा देशाच्या कानाकोपर्यात प्रत्येक पातळीवर भाजपाचीच एक हाती सत्ता प्रस्थापित करणे; अशी लोकांची अपेक्षा नव्हती. भाजप अध्यप अमित शहांना ही दुसरी बाजू कधीच कळली नाही. म्हणून पक्षाध्यक्ष होताच त्यांनी देशात सर्वत्र आपलाच पक्ष असावा आणि अन्य कुठल्या पक्षाला पाय ठेवायलाही जागा नसावी, अशी स्वप्ने पडू लागली. त्यातून त्यांनी एकपक्षीय राजवटीचा कार्यक्रम हाती घेतला. शत प्रतिशत भाजप हे स्वप्न भाजपेयींना दाखवण्यास सुरूवात केली.
‘पंचायत टू पार्लमेन्ट’ सर्व सत्ता भाजपाला. त्यासाठी देशातलाच नव्हेतर जगातला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी शहांनी सदस्य मोहिम राबवली. मित्र पक्षांना दुखावून पळवून शत्रू गोटात धाडले किंवा शत्रू म्हणून उभे केले. याचा अर्थ आपला पक्ष कशामुळे जिंकला, त्याचा शहांना कधी विचारच करावा असे वाटले नाही.
आपण एकूण मतदानातील ३१ टक्के मते मिळवली आणि तेवढ्या मतांवर आपले बहूमत मिळवणे अशक्य आहे, हे शहांना नक्कीच कळू शकले असते. पण १२ टक्के मित्रपक्षांच्या मतांमुळे भाजपाला २८२ इतका बहूमताचा पल्ला गाठता आला. तसे नसते तर भाजपा १५०-१८० पर्यंत येऊन थबकला असता. सहाजिकच आपल्या मागे ज्या शुभेच्छा गोळा झाल्या आहेत, त्याचा पाया भक्कम करून जिथे खुप मागे पडलो, अशा राज्यात पक्ष विस्ताराची मोहिम शहांनी हाती घ्यायला हवी होती. पण आपण करु ते प्रमाण असा भ्रम अमित शहांना निर्माण झाला. आपणच किंगमेकर आहोत असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे फ़क्त सहा महिन्यात त्यांनी हरयाणा व महाराष्ट्रात दोन मित्रांना दुखावले आणि विरोधात उभे केले. त्याचा तात्कालीन लाभ मिळाला आणि काही महिन्यांनी बिहार दिल्लीत त्याचा जबरदस्त फ़टकाही बसला. मग नवे मित्र गोळा करून आसाममध्ये सत्तेपर्यंत मजल मारावी लागली. त्यांना त्यावेळी कॉग्रेसमुक्त भारतची नशा इतकी भिनली होती, की भाजपायुक्त भारत करण्याच्या नादात अनेक भाजपावाले मिळेल त्याला शत्रू बनवायला धडपडू लागले. कालांतराने बाहेर कोणी शत्रू राहिला नाही असे वाटू लागले, मग घरातच एकमेकांना शत्रू ठरवून उरावर बसण्याला वेग येत असतो. गुजरातमध्ये तेच होताना दिसते आहे. पंधरा वर्षापुर्वी़च्या दंगलीत मुस्लिम विरोधात जो दलित समाज भाजपाशी एकरूप झालेला होता, त्याला झोडपण्यापर्यंत मजल गेली. आधीच पटेल समाज केशूभाईंना बाजूला पडावे लागल्याने नाराज होता, त्यात दलितांची भर घालण्याचे काम उतावळ्यांनी पार पाडले. आज गुजरात धुमसतो आहे, त्याला शत-प्रतिशतची मस्ती कारणीभूत झाली आहे. आपल्याला कोणी प्रतिस्पर्धी नाही आणि असलाच तर त्याला शिल्लक ठेवायचा नाही, अशा मस्तवालपणातून गुजरात गडबडला आहे. तोच प्रकार सातत्याने होत गेला तर कॉंग्रेसच्या वाटेवर भाजप आहे यावर शिक्कामोर्तब होईल. शरद पवारांनी २० वर्षांपूर्वी म्हणजे ते कॉंग्रेसमध्ये असताना बोलून दाखवले होते की, कॉंग्रेसचा पराभव विरोधक नाही तर कॉंग्रेसचे लोकच करतील. तसाच भाजपचा पराभव त्यांचे मित्र आणि स्वकीय करतील याची जाणिव मोदी शहांनी ठेवावी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा