गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

एस एम देशमुख यांचे म्हणणे १०० टक्के सत्य. पण...


  •  निखिल वागळेंच्या ट्विटला महत्व देत एस. एम. देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या भावना शंभर टक्के सत्य आहेत. त्या जाहीरपणे व्यक्त करण्याचे धाडस त्यांनी दाखवले याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल. ते अभिनंदनास पात्र ठरतात. पण..
  • अठरा वर्ष कृषीवलमध्ये संपादक म्हणून काम करत असताना त्यांना याची जाणिव कधी झालेली नव्हती. कृषीवल सोडल्यानंतर त्यांना हे चटके जाणवू लागले आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
  • कृषीवल हा पेपर स्वातंत्र्यपूर्व काळापासून चळवळीचा पेपर आहे. शेतकर्‍यांचे आंदोलन करून ब्रिटीशांच्या काळात शेतकर्‍यांचा संप घडवणार्‍या ना. गो. पाटील यांचा वारसा असलेला तो पेपर आहे. त्यामुळे भांडवलदारांविरोधात लढण्याचे बळ आणि डावा विचार एस. एम. देशमुख यांच्या विचारात घुसला तो तेथूनच. निखिल वागळे हेही डाव्या विचारांचेच पत्रकार. परंतु आयबीएन लोकमत नावाचे भूत त्यांच्या अंगात संचारले आणि त्यांना सगळेच तुच्छ दिसू लागले. मीठ आणि साखर एकाच भावाने ते तोलू लागले. नको त्या शक्तींना मोठे करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या  आकांडतांडवाकडे सगळे जग विचार म्हणून नाही तर करमणूक म्हणून पाहू लागले. त्या काळात त्यांनी काहीच माया कमवली नव्हती काय? पण हे भूत डोक्यावरून उतरले आणि मी मराठीचे वास्तव लोकांना समजल्यावर करून करून भागले अन देवपूजेला लागले अशी त्यांची अवस्था आहे. मी मराठीच्या मालकाने कोट्यावधींची माया कमवून, लोकांना फसवले आणि तुरुंगात जाण्याची वेळ आली तरी आपले तत्वज्ञान सांगत बसलेल्या वागळेंना मालकाच्या डोळ्यातील मुसळ दिसले नाही. त्यामुळे प्रामाणिक पत्रकारीतेच्या गप्पा त्यांनी कराव्यात म्हणजे एकप्रकारे विनोदच आहे.
  • आता तोच मुद्दा घेऊन एस एम देशमुख दळण दळत आहेत. पण एस एम देशमुख यांच्याकडे अनेक वर्ष संघटनेचे पद आहे. ते मुख्य आहेत. महाराष्ट्रभर त्यांना सगळे लोक ओळखतात. त्यांनी पत्रकारांच्या लेखण्या बोथट होऊ दिल्याच कशा? असा प्रश्‍न पडतो. आज उचलबांगडी झाल्यावर आणि कसलेच पद नसल्यावर, कोणत्याही माध्यमाचा आधार नसल्यावर द्राक्ष आंबट झाली आहेत. पण तेंव्हाच जर आपल्या विचारांचे पत्रकार घडवले असते तर मजिठीया आयोगाच्या अंमलबजावणीबाबत फार मोठे आंदोलन उभे राहिले असते.
  • मकर्स नावाची एक इंग्रजी कविता होती. या कवितेत दहा लोक गटार साफ करण्यासाठी खाली उतरलेले असतात. घाणीत, दलदलीत, चिखलात उभे राहून  ते नाला साफ करत असतात. मेन होलमधून दहा जण ते बघत असतात. खालचे सफाई कामगार म्हणत असतात, किती सुखी आहेत हे लोक? निवांतपणे उभे राहून आहेत. आमच्या वाट्याला मात्र ही घाण साफ करण्याची वेळ आली आहे. त्याचवेळी वरचे लोक म्हणत असतात, किती भाग्यवान आहेत हे लोक? त्यांना किमान गटारं साफ करायची तरी संधी मिळाली आहे. आम्हाला तेही नाही. आम्ही बेरोजगार आहोत.
  • आज पत्रकारांची अशी स्थिती आहे, एस.एम. आपण गटारात आहोत पण गटाराबाहेरून डोकावणारे आपल्या कामावर डोळा ठेवून आहेत. त्यांना या गटाराची चिंता नाही. जाणिव नाही. त्यामुळे ते जोपर्यंत येण्यास तयार आहेत तोपर्यंत आपल्या भोवतीचा गाळ दूर होणार नाही. तुम्ही काम केले नाहीत, तर दुसरे करायला तयार आहेत. हे अत्यंत घाणेरडे चित्र आहे. बोगारवेशीत किंवा लालबत्तीच्या प्रकाशातून हिंडणार्‍या गिर्‍हाईकाला अनेक पर्याय असतात आणि त्यांच्याबाबत प्रेमही नसते तसलाच हा प्रकार आहे. हा थांबवण्याचा प्रकार आपण करू शकतो काय?
  • जेव्हा कृषीवलसारखी संघटनात्मक पत्रकारीता आपल्या ताब्यात होती तेव्हा सुरक्षित वातावरणात आपण हे करू शकला असता. भांडवलदारी प्रवृत्तीला रोखण्याचा प्रकार करू शकला असता. पण तेव्हा संधी असूनही लेखणी कधी टोकदार केली नाही. लेखणीच्या जोरावर जे करता येणे शक्य होते त्याऐवजी मोर्चे, मानवी साखळ्या काढत बसलात. मोर्चे काढायला तुम्हाला वेळ आहे हे दिसल्यावर लेखणीवर दुसर्‍या कोणी ताबा घेतला तर दु:ख करून कसे चालेल? एस. एम., तुमचे दु:ख शंभर टक्के सत्य आहे. पण जोपयर्ंत सगळे संपादक, पत्रकार संपावर जात नाहीत, काम बंद पाडत नाहीत तोपर्यंत हे शक्य होणार नाही. आणि कोणी सोडून गेल्याने कोणाचे काही काम थांबत नाही हे ही तितकेच खरे. भांडवलदार मालकांच्या हातात गेलेली लेखणी एवढी लाचार आहे की वाटेल ते लिहिण्यास ते तयार होतील. पण प्रामाणिक पत्रकारीतेचा हवाला तुम्ही निखिल वागळेंच्या साक्षीने दिला आहे, तो तितका खरा आहे काय? हे सगळ्यांना विचारा आणि यावर चर्चा सुरू करा. आम्ही पाठीशी आहोतच.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: