सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

फक्त काळजी घ्या आणि तसे वागा

आज जागतीक एडस दिन साजरा होत आहे. एकेकाळी एडस, एचआयव्ही म्हटले की फार मोठी भीती आणि घृणा मनात निर्माण व्हायची. काहीतरी अघटीत, अनैसर्गिक आणि नैतिक असा हा रोग आहे अशा प्रकारे भीती निर्माण होवून एडसग्रस्तांकडे पाहण्याची प्रथा होती. पण गेल्या दहा बारा वर्षात याबाबत दृष्टीकोन बदलला आहे. एडसचा रूग्ण असलेल्या घरातील कुटुंबांना वाळीत टाकण्यापर्यंत प्रकार या समाजात घडले होते. हा प्रकार आता राहिलेला नाही. आता त्याची भीती गेली आहे. पण त्याची सतत जनजागृती होणे मात्र आवश्यक आहे.   भारतात १९८६ साली पहिला एच.आय.व्ही. एड्सचा पहिला रुग्ण आढळला. तेव्हापासून देशात एच.आय.व्ही./एड्स या आजारावर नियंत्रण व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. २१ व्या शतकात पदार्पण करत असताना नेमकी काय परिस्थिती असेल याबाबत तेव्हा चिंता व्यक्त होत होती.  एचआयव्ही/एड्स हा आजार विषाणूमुळे होतो. आज तरी या आजारावर कुठलीही लस किंवा प्रभावी औषध उपलब्ध नाही. या आजाराचा विषाणू एकदा का शरीरात घुसला तर त्याला उपचार व लस देऊन बाहेर काढू शकेल अशी कोणतेही प्रभावी औषध आणि उपाय योजना यंत्रणा नाही. यासाठी या आजाराला रोखण्यासाठी संपूर्ण जगभर जनजागृती करुन समुपदेशनाद्वारे जनजागृती केली जाते. यात सरकारला यशही तेवढेच आलेले आहे. आता  एचआयव्ही/एड्स या आजाराची संख्या शुन्यावर आणण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. एकेकाळी देविचा रोग जसा या देशातून हद्दपार केला तसाच एडस घालवण्याचे चाललेले प्रयत्न हे स्वागतार्ह आहेत.        भारतात व महाराष्ट्रात या रोगाचा प्रसार झपाट्याने होत गेल्याने प्रतिबंधात्मक व्यापक मोहिम राबवून शासनस्तरावर जनजागृती, रक्ताची सुरक्षितता, रोग सर्व्हेक्षण, स्वयंसेवी/सामाजिक संस्था मार्फत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले आहे. जेणे करुन या रोगाचा झपाट्याने असुरक्षित लैगिंक संबंध, देहविक्री करणारे महिला/पुरूष, ट्रक ड्रायव्हर्स, सुयावाटे मादक पदार्थाचे सेवन करणारे लोक इ.मार्फत रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून जनजागृती व व्यापक मोहिम राबविली जाते. आज कोणत्याही रूग्णालयात खाजगी अथवा सार्वजनिक असो कसल्याही आजारावर शस्त्रक्रिया किंवा उपचार करण्यापूर्वी मोफत एचआयव्ही टेस्ट केली जाते. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे फार मोठी जनजागृती आणि एचआयव्ही बाधीत रूग्णांवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले आहे.        एचआयव्ही/एड्स या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यत्वे समाजामध्ये आजाराविषयी असलेले समज-गैरसमज, या रोगाचा प्रसार कशामुळे होतो याचे प्रबोधन, हा आजार नियंत्रित करण्यासाठी देण्यात येणारे शिक्षण व समुपदेशन, शासन स्तरावर राबविलेली मोहिम व जनजागृती, एचआयव्ही/एड्स संक्रमित झाल्यानंतर रुग्णाचे मानसिक संतुलन व्यवस्थित राहण्यासाठी करण्यात येणार समुपदेशन व योग्य उपचार पध्दत, या रोगाचा प्रसार वाढू नये यासाठी कर्मचारी (म.रा.ए.नि.) स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत राबविलेली मोहिम, ऐच्छिक रक्तदानाला प्रोत्साहन देणे, इ. सर्व बाबी आजार रोखण्यासाठी केल्या जात आहेत.   हा आजार एक सामाजिक प्रश्न बनत चालला आहे. या रोगाचा प्रार्दूभाव झालेल्या रुग्णांमध्ये वय वर्षे १८ ते ४० वयोगटातील संख्या जास्त आहे. हा वयोगट देशाच्या उत्पादकता व औद्योगिक विकासाला कारणीभूत आहे. या वयोगटातील रुग्णांची संख्या वाढत गेल्यास देशाचा औद्योगिक विकास थांबेल. उत्पादकता कमी झाली तर संपूर्ण देशाची आर्थिक घडी विस्कटल्याशिवाय राहणार नाही. कौटुंबिक स्तरावर घरातील कमावती व्यक्ती बाधित झाल्यास संपूर्ण कुटूंबावर आणि पर्यायाने समाजावर त्याचे विपरीत परिणाम होतात. यासाठी शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना आयोजित रक्तदान शिबीर, मेडिकल कॅम्प, औद्योगिक/व्यापारी, सामाजिक स्वयंसेवी संस्था, शासनस्तरावर जनजागृतीपर जाहिरात, महाराष्ट्र एड्स नियंत्रण कर्मचारी यांच्यामार्फत रुग्णालयात जनजागृती केली जाते.        आजची युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती असल्याने युवकांमध्ये व युवकांमार्फत समाजात जनजागृती केली जाते. या रोगातील विषाणू रोग प्रतिकार शक्तीवर आक्रमण करुन रोग प्रतिकार शक्ती कमी करते. बरीच वर्षे एचआयव्ही प्रभावाखाली राहिल्यामुळे (६ ते १० वर्षे) शरीर अनेक प्रकारच्या आजारांना बळी पडते. या अवस्थेला एड्स म्हणतात. जेव्हा शरीरातील सीडी-४ पेशींना कमकुवत करतो, कमी करतो तेव्हा आपल्या शरीरातील आजाराविरुध्द लढण्याची क्षमता कमी होते. एचआयव्ही/एड्स लागण झालेल्या व्यक्तीला शरीरातून काढू शकेल अशी कोणतेही औषध, शस्त्रक्रिया, इतर वैद्यकीय उपचार पध्दती उपलब्ध नाही. त्यामुळे एचआयव्ही/एड्स लागण झालेल्या व्यक्ती अनेक आजारांना बळी पडतात. या रोगाबाबत गैरसमजही भरपूर होते.       दैनंदिन जीवनात सर्वसाधारण संपर्कातून एचआयव्ही एड्स चा प्रसार होत नाही. डास चावल्याने, संसंर्गिक व्यक्तीबरोबर एकत्र जेवल्याने, एकच शौचालय वापरल्याने, संसंर्गिक व्यक्तीस स्पर्श केल्याने, हस्तादोंलन, मिठी मारणे, घाम किंवा अश्रुमुळे, खोकला, शिंका इ. मुळे आजार पसरत नाही. त्यामुळे अशा व्यक्तिंकडे तिरस्काराने पाहू नये. सामान्य रूग्णांप्रमाणेच त्यांनाही वागणूक मिळणे अपेक्षित आहे. थोडीशी काळजी घेतल्याने या रोगापासून आपल्याला दूर राहता येवू शकते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: