मंगळवार, ३ नोव्हेंबर, २०१५

बदल घडवण्यासाठी मोदींना संधी

            देशातील वाढत्या असहिष्णु वातावरणाची देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दखल घेतली. अर्थात यामागचे कारण नेमके वेगळे आहे. भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आल्यापासून मोंदींनी ज्यांच्यावर उपकाराचे ओझे लादून आपल्या म्हणण्याप्रमाणे वागण्यास भाग पाडता येईल असे केलेले नेते म्हणजे अरूण जेटली. त्यामुळे सध्याच्या असहिष्णू स्थितीचे निवारण करण्यासाठी नव्हे तर पक्ष आणि पंतप्रधानांचा बचाव करण्यासाठी अरूण जेटली यांनी आपली वकिली कसब पणाला लावली आहे.      साहित्यिक, कलावंत, इतिहासकार आदी समाजघटक आपापले पुरस्कार परत का करत आहेत? त्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी ‘भाजप आणि पंतप्रधान मोदी हे कॉंग्रेस व डाव्या लोकांच्या वैचारिक असहिष्णुतेचे बळी ठरत आहेत’ अशी आरोळी अरूण जेटली यांनी ठोकली आहे.  देशातील वाढत्या असहिष्णु वातावरणाबद्दल पंतप्रधानांवर होणार्‍या टीकेला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न जेटलींनी सोशल मिडीयावरसुद्धा केला आहे.    अर्थात मोदींचा बचाव म्हणा किंवा समर्थन म्हणा करण्यासाठी पक्षातील कोणीतरी येणे आवश्यक होतेच. नाहीतर मोदींचे सरकार एकखांबी तंबूप्रमाणे  चालले आहे या टिकेला आणखी बळकटी मिळाली असती. त्यामुळे जेटली हे तारणहार म्हणून नाही तर समर्थक म्हणून मोदींच्या मदतीला आले आहेत. तशी मोदींना कोणाचीच गरज नसते. ते आपला किल्ला लढवत असतात.     लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी अर्थ, संरक्षण अशी महत्त्वाची खाती देवून अरूण जेटली यांचा नरेंद्र मोदींनी सन्मान केला होता. त्यामुळे त्याची उतराई होण्याची ही संधी अरूण जेटलींना मिळाली. पक्षातील तसे कोणीच पुढे येत नसताना अरूण जेटलींनी ती संधी साधली. ‘देशविकासासाठी मोदी सर्वतोपरी झटत आहेत; मात्र भाजपची सत्ता येणे ज्यांना मनोमन स्वीकारता आले नाही असे लोक मोदींवर विनाकारण टीका करत आहेत’ असा टोला हाणून जेटलींनी आपले म्हणणे मांडले आहे. म्हणजे लोकशाहीत सर्वांनी केवळ जेटलींचे विचार स्वीकारले पाहिजेत असे त्यांना वाटते का?   भाजप, मोदी आणि या सरकारविरुद्ध विविध समाजघटकांमध्ये नाराजीचा सूर का उमटत आहे?हे जाणून घेणे आज गरजेचे आहे. असे असताना फक्त हल्ला परतवण्यासाठी प्रतिक्रीया देण्याची गरज जेटलींना योग्य वाटली. अरूण जेटली हे अतिशय विद्वान आहेत. भाजपच्या मान्यवरांच्या यादीतील ते आहेत. तरी ते स्वत: किती वेळा जनतेतून निवडून येऊ शकले? हा प्रश्‍न विरोधक आता विचारल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणजे नवजोतसिंग सिद्धू याने राखलेला भाजपचा हक्काचा मतदारसंघ भाजपला जेटलींमुळे गमवावा लागला आहे. असे असूनही त्यांना विद्वत्तेप्रमाणे खाते देण्यात आले आहे. त्या उपकाराची परतफेड करण्याची ही धडपड अरूण जेटलींनी केली यात शंकाच नाही.   सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचवणार्‍या घटना देशात वाढत्या क्रमाने का घडू लागल्या? केंद्रातील काही वाचाळ मंत्री आणि संघ परिवारातील नेते नको तो बकवास करत असल्याचे मंत्री अरूण जेटलींना माहीत नाही का? हा खरा प्रश्‍न आहे. वाचाळ नेत्यांना आपल्या फालतू बडबडीपासून रोखण्यासाठी ना मोदींनी प्रयत्न केले ना जेटलींनी. त्याबद्दल जेटलींसारख्या पंतप्रधानांच्या पूर्ण विश्‍वासातील नेत्याचे गप्प राहणे कोणता संदेश देते?  आज वाढत्या असहिष्णुतेबद्दल सरकारी सन्मान परत करून मूक निषेध व्यक्त करणार्‍यांच्या भावनांची दखल न घेणार्‍या सरकारबद्दल जनतेने कोणत्या रितीने नाराजी व्यक्त करावी? हाच प्रश्‍न निर्माण झालेला आहे. सनदशीर मार्गाने सरकारचा विरोध व्यक्त करणे चूक आहे का? याबद्दल कायदेपंडीत जेटलींनी बोलले पाहिजे. यापूर्वीच्या सरकारबद्दल अशी भूमिका का घेतली नाही, असा सवाल सरकारमधील आणि सरकारचे समर्थकांना पडणे साहजिक आहे. परंतु भाजपला मिळालेली संधी ही कॉंग्रेसच्या पूर्वीच्या सरकारवरच्या नाराजीचाच परिपका होता म्हणूनच अशी भूमिका जनतेने घेतली म्हणून सरकार बनवण्याची संधी भाजपला मिळाली आहे हे या जेटलींसारख्या नेत्यांना समजत नाही का?   भाजपला मिळालेली सत्ता हे काही भाजपवरचे प्रेम किंवा मोदी लाट नव्हती तर कॉंग्रेसवर असणारी ती नाराजी होती. जनतेने काढलेला तो राग होता. पर्याय नसल्यामुळे घडलेले परिवर्तन होते. पण त्याबद्दल जनतेच्या भूमिकेचे कौतुक करण्याऐवजी सत्तेच्या सिंहासनावर बसून जनतेवर टिका करण्याचा प्रकार होताना दिसतो आहे. साहित्यिक किंवा कलाकार आपले पुरस्कार परत करत आहेत ही बाब योग्य की अयोग्य हा मुद्दा वेगळा आहे. पण हे असे का होते आहे याचे आत्ममंथन होणे आज गरजेचे आहे. नरेंद्र मोदी आल्यावर देश बदलेल असे म्हणणे चुकीचेच आहे. किंबहुना नरेंद्र मोदी काय देश बदलणार आहेत हा विचारही चुकीचा आहे. उलट देश बदलला म्हणून मोदी आले हे समजून घेण्याची आज गरज आहे. त्यामुळे याची जाणिव जर जेटलींना झाली तर खूप बरे होईल.आज जेटलींच्या कृतीने त्यांचा लोकशाहीविरोधी चेहरा अधिक चमकू लागला आहे. याच प्रकारे सरकारमधील अन्य जाणते जनतेलाच दूषणे देत राहतील तर २०१९ मध्ये पुन्हा संधी मिळणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: