गुरुवार, ५ नोव्हेंबर, २०१५

हा विषय चघळून भाजपला फायदाच होईल

नरेंद्र मोदी विरोधाची लाट एकाएकी कशी काय निर्माण झाली असा प्रश्‍न सर्वांना पडलेला असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रिय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी यावर आपले मत प्रदर्शित केले आहे. भाजपच्या संघर्षाच्या काळात अध्यक्षपद भूषवून कोणत्याही लाटेविना नायडूंनी पक्ष सांभाळला होता. त्यामुळे त्यांच्या मताला निश्‍चितच वजन आहे.     नायडू म्हणतात, केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून असहिष्णुता वाढीला लागल्याचा आरोप करून काही साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार परत केले आहेत. पण याआधी अशा घटना घडल्या, तेव्हा ते गप्प का होते? पंतप्रधान व देशाला बदनाम करण्याच्या या मोहिमेतून त्यांना काय साध्य करायचे आहे? हा प्रश्‍न निश्‍चितच विचार करण्यासारखा आहे. नायडू हे काही उथळ वक्तव्य करणारे भाजपचे नेते नाहीत. पण या देशात अस्थिरता आहे असा संदेश जगभर जाण्यासाठी काही शक्ती कामाला लागल्या आहेत काय याचा शोध घ्यावा लागेल. म्हणूनच मोदी यांच्या असण्याचा कोणाकोणाला त्रास होणार आहे त्यांचा शोध घ्यावा लागेल.     भा रत हा सहिष्णू देश आहे की नाही, असा मुद्दा सध्या उपस्थित केला जात आहे. आपला देश हा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या चार महत्त्वाच्या धर्मांचे उगमस्थान आहे. आपल्या संस्कृतीत सहिष्णूता आणि सर्वसमावेशकता नसती, तर हे शक्य झाले नसते. सध्या ही सहिष्णूता लोप पावत चालली असल्याची अफवा पसरवली जात आहे. सामान्यांमध्ये उगाच भिती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यामध्ये डाव्या शक्ती अग्रेसर आहेत ही दुर्दैवाची बाब आहे. म्हणजे डाव्या पक्षांनी सरकारच्या चुकीच्या धोरणावर रस्त्यावर उतरणे आवश्यक आहे. महागाई विरोधात रस्त्यावर येणे गरजेचे आहे. सरकारला धारेवर धरणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न समोर आणणे आवश्यक आहे. याकडे दुर्लक्ष करून फक्त मोदींना टार्गेट करणे हा सुपारीबाजपणा म्हणावा लागेल.     जायचं तर पूर्ण मुळाशी जावू ना. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशावर कोणी सत्ता गाजवली? जवळपास साठ वर्षांपासून केंद्रात आणि बहुतांश राज्यांतही कॉंग्रेस पक्ष सत्तेत होता. आपल्या मातीत रुजलेला सहिष्णूताभाव मोदी सरकारच्या केवळ दीड वर्षांच्या कालावधीत दिसेनासा करणे शक्य आहे काय? सध्या जे होत आहे ते कॉंग्रेस सरकारच्या काळात झाले नाही काय? हा सवाल निश्‍चितच बिनतोड आहे. डाव्या पक्षांना आणि तथाकथित साहित्यिक आणि पुरस्कार परत करणार्‍यांना याचे उत्तर द्यावे लागेल. केवळ प्रसिद्धीचा स्टंट करण्यासाठी मोदींना बदनाम करू नका. मोदींना बदनाम करून काही साध्य होणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.पंधरा वर्षांपूर्वी घडलेल्या गोध्रा प्रकरणावरून नंतरच्या चार निवडणुकीत मोदींना टार्गेट करून बदनाम करण्याचा प्रयत्न कॉंग्रेस आणि कॉंग्रेसधार्जिण्या डाव्या पक्षांनी केला. काय परिणाम झाला? मोदींच्या हातून सत्ता काढून घेणे जमले नाही. उलट ते देशाचे नेते झाले. डावे पक्ष मात्र आपली कुठलीच सत्ता टिकवू शकले नाहीत. प. बंगालमधून डाव्यांना मतदारांनी धडा शिकवला हे विसरून चालणार नाही. याचे कारण सामान्यांच्या प्रश्‍नांवर बोलणे, संघर्ष करणे हा डावा विचार आहे. परंतु आत्ताचे डावे पक्ष हे भांडवलदारांचे बटीक झाल्याप्रमाणे वागत आहेत. त्यामुळे मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव केला जात आहे. व्यंकय्या नायडूंनी केलेले विधान अतिशय महत्त्वाचे आहे.  ते म्हणतात, स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या ‘व्होट बँके’च्या राजकारणामुळे अनेक वर्षे जातीय हिंसाचार होत राहिला आहे. त्याचा ‘पॅटर्न’ बनून गेला. त्या सरकारच्या काळात अशा घटना निवडणुकांच्या कालावधीत हमखास होत. अशा परिस्थितीत कोणी पुरस्कार परत केले नाहीत. त्यामुळे सहिष्णुता हा शब्द अत्यंत पोकळ करण्याचे काम या विचारवंत म्हणवणार्‍या ना डाव्या ना उजव्या अशा मधल्या लोकांनी चालवला आहे.  आज या देशाची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित होत आहे. देशाला जगभर सन्मान, ओळख मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार भारतात पाय ठेवत आहेत. संस्थेमागून संस्था भारताला वरचा दर्जा देत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची देशात आणि जगभरात प्रशंसा होत आहे. पंतप्रधानांची व सरकारची वाढती लोकप्रियता काही राजकीय विरोधकांना पचवता येत नाही. ते गोष्टी कुठच्या कुठे नेऊन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. राज्य सरकारच्या निष्क्रियतेचे खापर ते केंद्र सरकारच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. हे या मागचे कारण आहे.आज दादरी हे निमित्त झाले आहे. दादरीची घटना घडली, त्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष सत्तेत आहे. साहित्यिक कलबुर्गी यांची हत्या झाली, त्या कर्नाटकाची सूत्रे कॉंग्रेसकडे आहेत. एवढेच नव्हे, तर डॉ. दाभोलकर यांची हत्या महाराष्ट्रात कॉंग्रेस सरकार असताना झाली, तरीही विरोधक केंद्र सरकारवर आरोप करत आहेत. त्यामुळे चर्चेत नसलेले लेखक चर्चेत राहण्यासाठी सुपारी घेवून हे पुरस्कार परत करण्याचे नाटक करत आहेत काय असा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. दादरी प्रकरणावरून रान उठवल्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होणार आहे. गोध्रा प्रकरणावरून बदनाम करूनही मोदींना गुजरातमध्ये रोखता आले नव्हते. आता आगामी उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत या दादरीचे भांडवल केले तर समाजवादी, कॉंग्रेस आणि त्यांच्या पिल्लावळीला त्याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. तेव्हा खरोखरच भाजपला रोखायचे असेल तर हा विषय आता इथेच थांबलेला बरा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: