स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या साठ वर्षात सहिष्णूता हा शब्द आपल्या देशात कधी माहितही नव्हता. पण गेल्या सहा वर्षात आणि त्यापेक्षा गेल्या सहा दिवसात देशभरातील वृत्तवाहिन्यावर या शब्दावरून जो वादंग चालला आहे त्यावरून या देशातील नागरिकांइतकी सहिष्णूता कोणत्याच देशात नसेल. वाहिन्यांवरून आपली मते लादणारे अँकर, वृत्त निवेदक आणि एखाद्याला टार्गेट करणारी पत्रकारीता पाहिल्यावर या देशातील नागरिकांच्या सहनशक्तीला सलाम केला पाहिजे. कोण म्हणतो या देशातील नागरिक सहिष्णू नाहीत? वायफळ आणि कोणत्याही निष्कर्षाविना होत असलेल्या वाहिन्यांवरच्या चर्चा, संदर्भहिन मालिका, कथानक महिनोंमहिने पुढे न सरकणार्या मालिका आणि विविध वाहिन्यांवरील तोच तो पणा सहन करणारे प्रेक्षक पाहिल्यावर या देशातील सहिष्णूता संपली आहे असे बिल्कूल वाटत नाही.आता प्रश्न निर्माण होतो तो अमिर खान याच्या वक्तव्याने चाललेल्या सहिष्णूतेचा वाद. पण आपल्याकडे सहिष्णूतेचा आधार घेणार्या आणि न घेणार्या सगळ्याच राजकीय पक्षांना कधी अमिर खान, कधी सलमान खान, कधी शाहरुख खान या खानावळीत भोजन करून आपली पोळी भाजयला आवडते. उलट ज्याप्रकारे सोशल मिडीया आणि वृत्तवाहिन्यांमधून याबाबत एरंडाचे गुर्हाळ चालवले आहे त्यावरून राजकीय पक्षांची सहिष्णूता आता संपली आहे असे दिसते. या देशातील प्रसारमाध्यमे अनेक वेळा भुई धोपटण्याचे काम सतत करत असतात. जेव्हा मूळ प्रश्न बाजूला टाकायचा असतो तेव्हा उपप्रश्नाला जास्त महत्त्व येते. मग आमीर खानचे निवेदन हा मुख्य मुद्दा बनतो. मग त्याच्या भोवती कॅमेरे फिरत राहतात. त्याचे निवेदन हाच मुख्य विषय बनतो. कोणत्याही बाजूने का होईना आमीर खानला प्रसिद्धी मिळत गेली. त्याला झोडपणार्यांनी झोडपले. त्याची बाजू घेणार्यांनी बाजू घेतली. यात मुख्य प्रश्न बाजूला पडून आमीरचे निवेदन हाच देशाचा जणू मुख्य प्रश्न बनला. इतके महत्त्व देशभरातल्या वृत्तपत्रांनी आणि वाहिन्यांनी त्याला दिले. सोशल मिडीयावर तर हा उत्साह उतू जावू लागला.A ‘सहिष्णुता-असहिष्णुता’ यावर कितीही वाद होऊ शकला आणि सरकारला जेवढा द्यायचा आहे तेवढा दोष दिला तरी कोणत्याही परिस्थितीत या देशातल्या कोणीही ‘मी देश सोडून जातो,’ असे म्हणणे कधीही समर्थनीय नाही. असे काय कोणी अमिरला केले होते की हा देश सोडून जावेसे वाटले? सरकारला आरोपिच्या पिंजर्यात उभे करण्यासाठी निमित्त हवे आहे. नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तर आम्ही देश सोडून जावू म्हणणारे अनेक विद्वान या देशात अजूनही आहेत. तेव्हा किती आकांड तांडव केले होते आणि कॉंग्रेसचे समर्थन या तथाकथीत अर्थतज्ज्ञांनी केले होते. कोणी देश सोडून गेले नाही. पण मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधी पक्षांनी आणि मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी हातात आयते आलेले कोलित पकडण्यासाठी सत्ताधार्यांनी आमिरखानला महत्त्व दिले. आमिर खान आपल्या वाहिनीवर येवून बोलला तर फुकटात आपला टीआरपी वाढेल म्हणून वाहिन्यांना आनंद झाला. पण या वादात देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. तरीही नागरिकांनी कसलीही तक्रार केली नाही. कारण इथला सामान्य नागरिकच सहिष्णू आहे. सहिष्णूता संपुष्टात आणली आहे ती राजकीय नेत्यांनी. सहिष्णूता संपुष्टात आलेली आहे ती वाहिन्यांची. स्पर्धेत आपल्या पुढे कोणी गेले तर आपले कसे व्हायचे या भितीच्या पोटी ही सहिष्णूता संपुष्टात आली. याचे खापर मात्र फोडले गेले ते नागरिकांच्या सहिष्णूतेवर. या देशाएवढा सुंदर देश जगात कुठचाही नाही, ही भावना प्रत्येक भारतीयाने मनात बाळगलीच पाहिजे. ज्या अत्यंत असहिष्णू घटना देशात घडत आहेत, त्याबद्दलचा उद्रेक व्यक्त करताना आमीरने त्याच्या पत्नीची जी भावना सांगितली असेल ती खरी असो किंवा खोटी असो, तशी भावना व्यक्त करणे चुकीचे आहे. हा तोच आमिर आहे का जो रॉंग नंबर म्हणून पीकेमध्ये लोकांच्या डोळ्यात अंजन घालत होता. आमीरच्या निवेदनाचा विपर्यास झाला, असे तो म्हणतो आहे. त्याचे ते म्हणणे स्वीकारले पाहिजे. त्याला कोणीतरी हे बोलायला भाग पाडले असेल असेही असेल.आमीर खान आणि त्याचे निवेदन हा महत्त्वाचा प्रश्न नसून या देशात गेल्या काही महिन्यांत अत्यंत टोकाचे असे असहिष्णू वातावरण तयार केले जात आहे हा आहे. हे वातावरण तयार करण्याचे काम राजकीय नेते आणि प्रसारमाध्यमे करत आहेत. अशा प्रसारमाध्यमांना अडवले नाही तर पुन्हा आणीबाणी आणावी लागेल असे चित्र आहे. जे विचार आम्हाला पटत नाहीत त्या विचाराशी विचाराने वाद करण्याची कुवत संपल्यामुळे ते विचार व्यक्त करणा-यांना संपवायचे, हाही एक प्रकारचा खुनशी प्रवृत्तीचा पायंडा अतिशय मिजाशीत पडत आहे. अनेक वृत्तवाहिन्यांनी २४ तास सलग दोन दिवस आमीर खान पुरवला. मूळ प्रश्न आमीर नसून ही असहिष्णू प्रवृत्ती देशात ज्या पद्धतीने वाढत आहे, हा आहे. या असहिष्णुतेविरोधात देशभरातल्या साहित्यिकांनी आपले पुरस्कार परत केले. म्हणजे सहिष्णूता या लोकांची संपुष्टात आली. पण देशातील नागरिक सहिष्णू नाहीत असे वातावरण तयार केले गेले. कोण सहिष्णू नाही हे यातून स्पष्ट झाले आहे.
शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०१५
कोण म्हणतो या देशातील सहिष्णूता संपली?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा