गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

हेतु शुद्ध नसलेल्या आंदोलनातून काय साधणार?

एकमेकांवर टीका करण्याची वृत्तीच सर्व तंटाबखेड्यांच्या बुडाशी असते. त्या वृत्तीमुळेच सर्व संघटना ढासळून पडते.                          - स्वामी विवेकानंद---------------------------
  • गेल्या चार पाच दिवसांपासून अण्णा हजारे पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात येवू पहात आहेत. विशेषत: किरण बेदी यांना भाजपने मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर तर अण्णा हजारे हवालदिल झाल्याप्रमाणे नव्याने आंदोलनाची भाषा करू लागले आहेत. पुन्हा एकदा रामलिलावर जावून उपोषणाट्य करण्याची त्यांची इच्छा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. वाईट कारभार करून नरेंद्र मोदी यांनी अण्णा यांना आंदोलने करण्याची कितीही संधी दिली तरी अण्णा हजारेंच्या  सातत्याने भूमिका बदलण्यामुळे आता त्यांची अशी आंदोलने यशस्वी होण्याची शक्यता बिल्कूल नाही. 
  •  अण्णा हजारे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी गावाचा केलेला कायापालट हा एक आदर्श प्रकल्प आहे. मात्र, भ्रष्टाचार, लालफितीचा कारभार आदी वाईट गोष्टींपासून देशाला मुक्त करण्यासाठी अण्णा हजारे गेल्या काही वर्षांपासून ज्या रीतीने सामाजिक आंदोलन करीत आहेत ते आदर्शवत नाहीत. ही आंदोलने संपूर्णपणे फसवी आणि भरकटलेली आहेत. दोन वर्षांपूर्वी काँग्रेस विरोधात आंदोलन करणारे  अण्णा हजारे आता मोदी सरकारच्या विरोधात आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पण काँग्रेस विरोधात 2011 मध्ये केलेले त्यांचे आंदोलन, त्यावेळी त्यांना देशभरातून मिळालेला प्रचंड पाठिंबा, त्यावेळी अण्णांनी सादर केलेला परफॉर्मन्स हा एखाद्या अभिनेत्यालाही लाजवणारा असाच होता. परंतु तो केवळ परफॉर्मन्स होता हे लक्षात आल्यावर आता नरेंद्र मोदींच्या विरोधात कितीही आंदोलनास्त्र टाकण्याचा प्रयत्न अण्णांनी केला तरी त्याला पुन्हा प्रतिसाद मिळणार नाही. कारण आता जनता बदलली आहे. जनतेला वास्तव कळलेले आहे.
  • लोकमान्य टिळक, महात्मा गांधी अशा जननेत्यांनी आंदोलन छेडताना कायदेतज्ज्ञांपासून अनेक क्षेत्रांतील मान्यवरांची मजबूत साथ घेतली होती. निश्चित विचारविनिमय करूनच हे नेते आंदोलनाच्या रणमैदानात उतरत. त्यामुळे काही प्रमाणात यश येऊन आंदोलनांचे संतुलनही नीट सांभाळले जात असे. महाराष्ट्रातील युती सरकार असो वा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार, त्यांच्या कारभारातील घोटाळे वेशीवर टांगून अण्णांनी काही मंत्र्यांना घरी बसवले. त्यानंतर लोकपाल विधेयक, माहितीचा अधिकार असे अनेक मुद्दे घेऊन अण्णा हजारे यांनी देशपातळीवर आंदोलन उभारले. पण त्यानंतर लोकपालसाठी त्यांनी जे 2011 मध्ये आंदोलन सुरू केले त्यामध्ये हेतु शुद्ध नसल्याचे स्पष्ट झाल्याने अण्णांचे सहकारीच त्यांना सोडून जावू लागले.
  • लोकपाल विधेयकावर राष्ट्रपतींनी सही करून एक वर्ष झाले, मात्र हे विधेयक अमलात आणण्यासाठी काहीही हालचाल मोदी सरकारने केली नाही. म्हणजेच जनतेला दिलेली आश्वासने मोदी पाळत नाहीत, असा नवा साक्षात्कार अण्णा हजारे यांना आता झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा रामलिला मैदानात उतरण्याची घोषणा अण्णांनी केली आहे.
  • मुळात केंद्रातील काँग्रेसच्या राजवटीत अण्णांचे आंदोलन उभे राहिले त्यामागे रा. स्व. संघाच्या मंडळींचा सहभाग होता हे उघड सत्य आहे. आता नरेंद्र मोदी सरकारविरोधात अण्णा हजारे बोलू लागल्यानंतर संघीय मंडळींची खूपच पंचाईत झाली असणार. अण्णांची सारी वक्तव्ये व आंदोलने ही पोकळ आहेत आहेत हे सर्वांना आता समजले आहे. त्यामुळे त्यांच्या हेतुबाबतच शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे समजा वाईट कारभार करून नरेंद्र मोदी यांनी अण्णा यांना आंदोलने करण्याची कितीही संधी दिली तरी अण्णांच्या सातत्याने भूमिका बदलण्यामुळे अशी आंदोलने यशस्वी होण्याची शक्यता बिल्कूल नाही हे त्रिकालाबाधीत सत्य आहे.
  • लोकपाल विधेयकाबाबत अण्णांनी जेव्हा 2011 च्या ऑगस्टमध्ये आंदोलन सुरू केले तेव्हा संपूर्ण देशाला टोप्या घालण्याचा फंडा अण्णांनी  काढला होता. ज्याच्या त्याच्या डोक्यावर मै अण्णा हूँ अशा अक्षरांच्या टोप्या होत्या. अगदी दारू विक्रेते, बारमधील वेटर यांच्याही डोक्यांवर मै अण्णा हूँ च्या टोप्या होत्या. त्यामुळे दारूबंदीचा मंत्र जपणारे अण्णा यांचे पाठिशी कोणती गँग आहे हे तेेव्हाच स्पष्ट झाले होते. मेणबत्ती घेवून गावागावातून मोर्चे, फेर्‍या काय काढल्या जात होत्या, टोप्या काय घातल्या जात होत्या, पण यासाठी येणारा एवढा कोट्यवधी रूपयांचा खर्च अण्णांनी कोणत्या पैशातून केला होता हे मात्र कोणीच विचारले नाही. अण्णांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल, किरण बेदी, रामदेवबाबा असे सगळे अतीरथी महारथी होते. या सगळ्यांनी आपले उखळ पांढरे करण्यासाठी अण्णांचा वापर केला आणि त्यांना सोडूनही दिले. केजरीवाल यांनी आम आदमी पार्टी काढल्यावर अण्णांचा त्यांना विरोध होता. जर परिवर्तन करायचे असेल तर आपण बाहेरून विरोध करण्यापेक्षा त्या सिस्टिमचा, त्या यंत्रणेचा एक भाग बनले पाहिजे, यंत्रणा आपल्या हातात घेतली पाहिजे या भूमिकेतून केजरीवाल यांनी पक्ष काढला आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अण्णांनी केजरीवाल या आपल्या सहकार्याला का साथ दिली नव्हती?
  • याचे कारण अण्णांना काँग्रेसला दुखवायचे नव्हते. रामलिलेच्या आंदोलनान अण्णांनी वारेमाप घोषणा केली की आगामी उत्तर प्रदेशातील निवडणुकीत काँग्रेस विरोधात प्रचार करणार म्हणून. पण ऐन प्रचाराच्यावेळी अण्णा गायब झाले. दिल्लीतील आंदोलन त्यांनी मुंबईत आझाद मैदानावर हालवले. तेथे त्यांना आजार झाला. म्हणून उपचारासाठी मुंबईतून पुण्यात हालवले. संचेती यांच्या हॉस्पिटलमध्ये हालवले. ही उलटी गंगा का वाहिली याचे उत्तर अण्णांकडे नाही. सगळेजण मुंबईत उपचारासाठी येतात. अटलबिहारी वाजपेयीसुद्धा गुडघ्यावरील उपचारासाठी मुंबईत आले होते. शरद पवार मागच्या महिन्यात पडले आणि त्यांचा पाय फँक्चर झाला तेव्हा दिल्लीतून ते मुंबईत आले. अण्णा ज्यांचे कौतुक करतात त्या आर आर पाटील आबांवरही मुंबईतच उपचार सुरू आहेत. असे असताना आझाद मैदानावरील आंदोलनात तडकाफडकी अण्णांना कोणता आजार झाला होता की त्यामुळे त्यांना मुंबईत उपचार मिळू शकले नसते? संचेतीमध्येच जाण्यामागचे गौडबंगाल काय होते? संचेती आणि भाजप यांचे नाते सर्वांना माहित होते. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाचा हेतु हा शुद्ध आहे असे म्हणता येणार नाही. त्या दरम्यान उत्तर प्रदेेशच्या विधानसभा निवडणुका होत्या. त्यामध्ये काँग्रेसविरोधात आपण प्रचार करू असे अण्णांनी सांगितले होते. पण तेवढे दिवस आजारपण आल्यामुळे ते प्रचाराला उतरले नाहीत. त्यानंतर आजारपणामुळेच अण्णांनी केजरीवाल यांना आशीर्वाद दिला नाही आणि काँग्रेसला आपण विरोध करत आहोत हे दाखवण्याची संधी गमावली. त्यामुळे अण्णा नेमके कोणाचे समर्थक आहेत हे स्पष्ट झाल्याशिवाय आत आण्णांच्या आंदोलनाला फारसे यश येणार नाही. अण्णा हजारे यांनी आपल्या ताकदीचा वापर योग्य ठिकाणी केलेला नाही याची जाणिव आता सर्वसामान्य जनतेला झालेली आहे. काँग्रेस विरोधात प्रचंड संतापाची लाट असताना, ती लाट फुगवण्याचे काम अण्णांनी केले आणि त्याचा फायदा केजरीवाल आणि नरेंद्र मोदी या दोघांनीही घेतला. काँग्रेस विरोधाचा फायदा मोदींनी उठवल्यामुळे अण्णा हे नेमके कोणाचे समर्थक आहेत? ते फक्त विरोधासाठी विरोध करतात का? अशा शंका प्रत्येकाच्या मनात आहेत. परदेशातील काळ्या पैशाबाबत अण्णांनीच आवाज उठवला. रामदेवबाबांनी त्यासाठी आंदोलने केली. सत्तेवर आल्यावर आपण त्याबाबत पावले उचलत आहोत असे मोदींनी दाखवले. पण नंतर त्याबाबत काहीच झाले नाही. त्यामुळे ही आंदोलने अशा विशिष्ठ लोकांना सत्तेवर आणण्यासाठी धूळफेक करण्यासाठी आहेत काय असा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे आता इथून पुढे कोणतेेही आंदोलन करताना अण्णांना अगोदर जनतेचा विश्‍वास मिळवावा लागेल. नाहीतर अण्णा हजारे हे भांडवलदार पक्षांचे प्रतिनिधी म्हणून, त्यांच्या पापाकडे दुर्लक्ष करण्यासाठी जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेले अस्त्र आहे हे जनतेला पटल्याशिवाय राहणार नाही.
  •  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: