शनिवार, ३ जानेवारी, २०१५

अच्छे दिन आणण्याची जबाबदारी अरविंद पंगारिया यांच्यावर

फक्त एकट्या आपल्यावरच सार्‍या कार्याची मदार आहे, अशा भावनेने काम करा. भावी पन्नास शतके तुमच्या कार्याकडे डोळे लावून बसली आहेत. भारताचे भवितव्य तुमच्यावर अवलंबून आहे. कंबर कसून कामाला लागा.                                                                                        - स्वामी विवेकानंद..................................................
  • केंद्र सरकारच्या निर्णयानुसार नियोजन आयोगाच्या बरखास्तीनंतर स्थापन झालेल्या नव्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्स्फार्मिंग इंडिया’ (नीती) या देशाचा चौफेर विकास घडवण्यासाठी स्थापन झालेल्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ अरविंद पंगारिया यांची नियुक्ती झाली आहे. अरविंद पंगारिया हे केवळ या नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत असे नाही तर ते खर्‍या अर्थांनी नरेंद्र मोदींचा थिंक टँक म्हणून काम करत आलेले आहेत.  मोदींच्या जडणघडणीत आणि निर्णयक्षमतेत त्यांचा हातभार फार मोठा आहे. मोदींचे नियोजन ज्यांनी केले, मोदींची नीती ज्यांनी ठरवली त्यांनाच या नीती आयोगाचे उपाध्यक्षपद दिले गेले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशाच्या विकासासाठी अशा माणसांचा सल्ला घेणे योग्य आहे हे मोदींचे धोरण यातून दिसून येते. त्यामुळे आपल्याला वरच्या शिखरावर नेणार्‍या थिंक टँकच्या या व्यक्तिला योग्य पद देण्याची जबाबदारी नरेंद्र मोदींनी पार पाडली आहे.
  • भारतीय-अमेरिकन  अर्थशास्त्रज्ञ असलेले पंगारिया आशिया विकास बँकेचे माजी प्रमुखही होते. अमेरिकेतल्या मेरी लँड विद्यापीठातल्या कॉलेज पार्कमध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक, कोलंबिया विद्यापीठात भारतीय अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, विश्व व्यापार संस्था आणि व्यापार विकास संस्था, संयुक्त राष्ट्र संघाच्या विविध आर्थिक संस्थांतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. 
  • अमेरिकेतल्या प्रिंन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात संशोधन करून पीएच.डी. मिळवलेल्या पंगारिया यांनी अर्थशास्त्रविषयक दहा पुस्तकांचे लेखन आणि संपादनही केले आहे. विकासाच्या दिशेने भारतीय अर्थव्यवस्था, एका क्षितिजाकडून दुसर्‍या क्षितिजाकडे, यासह त्यांची अनेक पुस्तके आणि शेकडो संशोधन लेख प्रसिद्ध झाले आहेत.
  •  नवभारत टाइम्स, हिंदू, फिनान्शियल टाइम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, द हिंदू, इंडिया टुडे आणि आऊटलूक या नियतकालिकातही त्यांनी अर्थशास्त्र विषयक नियमित स्तंभ आणि लेख लिहिलेले आहेत. देशातल्या आणि परदेशातल्या अनेक उपग्रह वाहिन्यांवर त्यांचे अर्थविषयक कार्यक्रमही झाले आहेत. इंडिया पॉलिसी फोरम या नियतकालिकाचे ते संपादकही होते. अमेरिकेतल्या अनेक उद्योगांचे आणि संस्थांचे ते आर्थिक सल्लागारही होते. अशा या विद्वान आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला हे पद देवून नरेंद्र मोदींनी त्यांचा उचीत गौरव केलेला आहे.
  • भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाच्या उमेदवारीसाठी निवड केली, तेव्हा पंगारिया हे त्यांचे प्रमुख सल्लागारही होते. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मोदींनी तीन लाख किलोमीटरचा प्रवास केला आणि पाचशे पन्नास जाहीर सभातून भाषणेही केली. त्या भाषणातले ‘अच्छे दिन आने वाले हैं।’ यासह अनेक महत्त्वाची वाक्ये पंगारिया यांनीच ठरवलेली होती आणि ती जनतेच्या मनात ठसली. त्यामुळेच देशाची अर्थनीती ठरविण्यासाठी जे नियोजन करावे लागणार आहे त्यासाठी अरविंद पंगारिया यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. मोदींच्या तोंडून आणि जाहीरातीतून अच्छे दिन आनेवाले है असे वदवणारे पांगारिया आता स्वत: त्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
  • परिस्थितीवर उत्स्फूर्तपणे तोडगा काढण्याची क्षमता या पांगारियांमध्ये आहे. प्रतिस्पर्ध्याकडून उलटवलेला चेंडू कसा फिरवायचा याचा मुत्सद्दीपणा पांगारियांमध्ये आहे. त्यामुळेच निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींच्या नियोजनात त्यांचा भाग हा अनमोल ठरला होता. विरोधकांवर कुरघोडी करण्याचे आणि जिंकण्याचे मर्मभेदक हत्यार केव्हा कसे उपसायचे याचे मार्गदर्शन पांगारिया यांनी केले होते. मोदी हे चहा विकणारे आहेत, अशी टवाळी काँग्रेसवाल्यांनी केली, तेव्हा मोदी यांचे देशातल्या काही ठिकाणी चहापानाचे कार्यक्रम पंगारिया यांनीच घडवून आणले. चाय पे चर्चा करून संपूर्ण देशभर नरेंद्र मोदींनी जो संवाद साधला तो पंगारियांची कमाल कल्पना होती.
  • ‘ मेक इन इंडिया’ ही जगभरातील दौर्‍यांमध्ये नरेंद्र मोदींनी दिलेली हाक प्रत्यक्षात आणण्यासाठी, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी पंगारिया सज्ज झाले आहेत. आजपर्यंत आपण मेड इन यूएसए, मेड इन जपान, मेड इन कोरिया, मेड इन चायना अशा वस्तू घेत आलो. पण आता परकीय गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणूक करा आणि मेड इन इंडिया प्रॉडक्ट विका असे आव्हान मोदींनी केले त्यामागची दूरदृष्टी अरविंद पंगारिया यांची होती. त्यामुळे हे सत्यात आणण्यासाठी मोदींनी पंगारियांची नियुक्ती या उपाध्यक्षपदावर केली असेल तर ते निश्‍चितच स्वागतार्ह आहे. मेक इन इंडियासाठी ते फार महत्त्वाचे आहे. नव्या रोजगार निर्मितीसाठी मेक इन इंडिया ही हाक फार महत्त्वाची आहे.
  • ‘स्वच्छ भारत’ या संकल्पनेमागे फार मोठा अर्थ आहे. देश स्वच्छ दिसला तर त्याची आंतरराष्ट्रीय ख्याती वाढेल. परदेशी पर्यटक आकर्षिले जातील. त्याचप्रमाणे गुंतवणूकदारही येथे गुंतवणूक करतील. देशात अस्वच्छता असणे हे देशाला मारक असते. हा अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. कारण ओसंडून वाहणार्‍या कचराकुंड्या, अस्वच्छता यामुळे साथीचे रोग फैलावतात. त्यामुळे कचर्‍याचे नियोजन त्याचा निचरा करणे ही मूलभूत गोष्ट आहे. त्यामुळे मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर सर्वात प्रथम स्वच्छतेची हाक दिली. त्यामध्ये अरविंद पंगारिया यांच्याकडून पाठपुरावा करण्याची क्षमता होती. त्याचे चांगले परिणाम आज दिसत आहेत. स्वच्छतेसाठी पक्षिय मतभेद विसरून सर्वजण रस्त्यावर उतरले ही विकासाची नीती ठरविण्यामागे अरविंद पंगारिया आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे अच्छे दिन आनेवाले है हे वाक्य खरे होण्यास हरकत नाही.  
  • ‘जनतेचे सरकार’, ‘सत्ता जनतेच्या हाती’ या संकल्पनेचा अर्थशास्त्रीयदृष्ट्या पाठपुरावा करण्यातही पंगारिया आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदावर झालेली नियुक्ती ही मोदींनी केलेली उतराई असली तरी देशासाठी ती हितावह आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
  •  राजस्थानात 1952 मध्ये जन्मलेल्या पंगारिया यांना देशाच्या ग्रामीण आणि शेतीच्या समस्या, कोरडवाहू शेतकर्‍यांची दुखणी चांगलीच माहिती आहेत. आता विकेंद्रीत विकासाचा नवा प्रयोग नीती आयोगा मार्फत यशस्वी करायची जबाबदारी त्यांच्यावर आहे. 1950 साली स्थापन झालेल्या नियोजन आयोगाने गेल्या चौसष्ठ वर्षात काहीच केले असे नाही. पण या देशाला केंद्रीकरणापासून हा आयोग रोखू शकला नव्हता. देशभरातून रोजगारासाठी लोंढे मुंबईकडे येतात. बेंगलोरकडे जातात. पण प्रत्येक राज्यात रोजगार निर्मिती, उद्योगधंदे याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे देशाचा विकास हा असमतोल विकास झाला. एकाच देशात प्रगत आणि अप्रगत, विकसीत आणि अविकसीत असे चित्र दिसू लागले. देशाचा काही भाग हा 21 व्या शतकात तर काही भाग हा 18 व्या शतकात अशी विषमता निर्माण झाली. हा विकासाचा असमतोल दूर करण्याचा प्रयत्न अरविंद पंगारिया करतील हीच अपेक्षा आहे. थोडक्यात काय तर अच्छे दिन आणण्याची जबाबदारी पंगारियांच्या डोक्यावर आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: