गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचे प्रकार थांबवा

धर्म ही अशी वस्तू आहे की जिच्यामुळे पशूचे मनुष्यात आणि मनुष्याचे ईश्‍वरात रूपांतर होते. - स्वामी विवेकानंद---------------------------
  • झी मराठी वाहिनीवर 15 जुलै 2013 पासून सुरू झालेली होणार सून मी या घरची ही मालिका काही काळ लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्याचा लाभ घेण्यासाठी या मालिकेत कथानकात बदल करून ती वाढवण्याचे प्रकार निर्मात्यानी केले. आता पुन्हा कथानकात रंजकता आणण्यासाठी म्हणून नवे जे उद्योग या मालिकेने केले आहेत त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करण्याचा प्रकार होत असल्याने ही मालिका आता थांबवण्याची गरज आहे.
  • घरातील सगळी दुरावलेली नाती जवळ केल्यावर जान्हवीची भूमिका संपली होती आणि ते सुखाने नांदू लागले अशा सुखांतिकेत ती मालिका मागच्या वर्षी संपवायला हवी होती. घरातल्या सगळ्यांची मने जिंकल्यानंतर  ते कथानक संपले होते. परंतु पुन्हा काही काळ राहण्यासाठी म्हणून जान्हवीला अ‍ॅक्सीडेंट केला आणि तीची स्मृती घालवली. आता स्मृती घालवल्यानंतर सगळे बरे होईल अशी अपेक्षा असताना ती मालिका तिथेच संपण्याची गरज होती. परंतु पुन्हा श्री जान्हवीला मूल होईपयर्ंंत ही मालिका वाढवण्याचा आणि त्याच्या टायटलसाँगमध्ये बदल करून नवा अध्याय सुरू करण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी सुरू केला. पण यात फारसा वेळकाढूपणा करता येत नाही म्हटल्यावर नवा प्रकार सुरू केला आहे. हा प्रकारच अत्यंत घातक आहे. तो म्हणजे हिंदू दहशतवाद किंवा धार्मिक दहशतवाद. त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालण्याची गरज आहे.
  • गोखले उद्योग समूह केक आणि बिस्किटाचे नवे प्रॉडक्ट लाँच करतो आणि त्याला विघ्नेश्‍वर हे नाव देतात. त्यामुळे धर्मचैतन्य या हिंदुत्ववादी संघटनेचे गुंड, राजकारणी लोक आंदोलन करतात, तोडफोड करतात, जाळपोळ करतात, तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न करतात असे कथानक गेल्या आठवड्यात दाखवले आहे. पण यामुळे हिंदुत्ववादी संघटनांना विशेषत: शिवसेना, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू एकता, सनातन प्रभात, हिंदू जनजागरण समिती अशा संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न  या मालिकेतून केला आहे. या संघटनांप्रमाणेच धर्मचैतन्य नावाची एक काल्पनिक संघटना आहे असे भासवून त्या संघटना कशाप्रकारे धार्मिक दहशतवाद माजवतात हे अतिशय भडकपणे या मालिकेतून दाखवले आहे. केक हा पदार्थ परदेशी आहे, इंग्रजांचा आहे आणि त्याला गणपतीचे नाव दिल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना दुखावली असे दाखवून हिंदू संघटना किती हलक्या कानाच्या, कमकुवत विचारसरणीवर आहेत हे दाखवण्याचे काम या मालिकेतून होत आहे.
  • कोणत्याही प्रॉडक्टला हिंदू देवदेवतांची नावे दिली म्हणून या महाराष्ट्रात आंदोलन पेटले आहे असे आजपर्यंत कधीही झालेले नाही. आज महाराष्ट्रात अनेक ढाबे, बिअर बार, परमीट रूम अशी आहेत की त्यांना देवतांची नावे दिलेली आहेत. लांब कशाला पनवेल ते गोवा महामार्ग क्रमांक 17 वर असलेल्या अनेक दारूची विक्री होणार्‍या हॉटेलना साई हे नाव आहे. अनेक ढाबे, हॉटेल, पब यांना हिंदू देवी देवतांची नावे दिलेली आहेत. या विरोधात कधीही हिंदुत्ववादी संघटना पेटून उठल्या नाहीत. कधीही यावरून महाराष्ट्रात तोडफोड झालेली नाही. दरवर्षी साजरा केल्या जाणार्‍या दिवाळी या सणात फटाक्यांची आतषबाजी हा अविभाज्य भाग असतो. त्यामध्ये लक्ष्मीचे चित्र असलेले फटाके बिनधास्तपणे उडवले जातात. लक्ष्मी बॉम्ब नावाने हे फटाके उडवले जातात. त्यावर बंदी घाला मागणी करूनही ती आजवर घातली गेली नाही. शिवकाशीतून तयार होणार्‍या फटाक्यांमध्ये हे फटाके सर्वाधिक खपतात.  पण यावरून कधीही आंदोलन झालेले नाही. हिंदू धर्म हा सहिष्णूतेचे प्रतिक आहे. तरीही होणार सून मी या घरची या मालिकेच्या निर्माता, दिग्दर्शकांनी हिंदू संघटनेला धार्मिक दहशतवादी दाखवण्याचा बिभत्स असा प्रयत्न केलेला आहे.
  • या मालिकेत ज्याप्रमाणे धर्मचैतन्य संघटनेच्या नेत्याचे रूप दाखवले आहे, त्याचा पेहेराव दाखवला आहे तो प्रकार म्हणजे शिवसेना, सनातन प्रभात, बजरंग दल अशा अनेक हिंदुत्ववादी संघटना ज्याप्रमाणे पोषाख घालतात तसा पोषाख या नेत्याचा दाखवला आहे. त्यामुळे या संघटनाही अशाच प्रकार दहशत माजवतात, खंडणी गोळा करतात असा संदेश या मालिकेतून जात आहे. त्यामुळे हिंदू संघटनांना बदनाम करणार्‍या या मालिकेवर तातडीने बंदी घातली पाहिजे अशीच मागणी आता करावी लागेल. कोणत्या आधारावर या मालिकेच्या लेखक, दिग्दर्शकांनी अशा संघटनांची मानसिकता तपासली याचा खुलासा त्यांना करावा लागेल.  कोणती तार्कीक सुसंगती या मालिकेने लावली आणि हिंदू दहशतवाद, धार्मिक दहशतवादाचे चित्र उभे केले? यामुळे वर उल्लेख केलेल्या संघटना बदनाम होताना दिसत आहेत. अशा प्रकारे चुकीचे संदेश देण्यास भाग पाडून मालिकांचा दुरूपयोग जाहीरातदारांकडून होत आहे काय याचा तपास करावा लागेल.
  • सध्या भारतीय राजकारण हे भांडवलदारांना पोषक असे चालले आहे. यामध्ये मूठभर लोकांचा लाभ कसा होईल याचा विचार केला जात आहे. परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वाटेल ती तडजोड करताना दिसत आहेत. त्यांच्या या मार्गात स्वदेशी विचारांना प्रेरणा देणार्‍या हिंदुत्ववादी संघटना अडसर ठरत आहेत. त्यामुळे जनमत आपल्या बाजूने करण्यासाठी भांडवलदारांचे पक्ष हिंदू संघटनांना दहशतवादी ठरवण्याचा प्रयत्न करत असतील तर हे अत्यंत घातक आहे. टिव्हीवरील मालिकांमधून वैचारीक विष पेरण्याचे काम गेली पंधरा वर्ष सातत्याने सुरु आहे. महिलांना खलनायक, व्हँप ठरवून घराघरात सासू सुनांचे संघर्ष पेटतील असे वातावरण या मालिकांमुळे निर्माण झाले आहे. प्रत्येक मालिकेत  सासू सुनांच्या कुरघोड्या, कट कारस्थान, शह काटशह इतक्या भयानक प्रकारे दाखवला जातो की भारताच्या एकत्र कुटुंब पद्धतीत कलह माजवून कली घुसवण्याचा प्रकार केला गेला. आज महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात अशा मालिकांमुळे व्यसनी झालेले नागरिक घराघरात दिसत आहेत. या मालिकांनी माणसांना दूर नेण्याचे काम केले आहे. सामान्य, मध्ममवर्गिय माणसे या मालिकांमध्ये इतकी गुरफटली आहेत की बंद दरवाजा संस्कृती निर्माण करण्याचे काम यांनी केले आहे. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती पुसण्याचे काम या मालिकांमधून होताना दिसत आहे. सामान्य माणसांना ग्राहक करण्याचे आणि त्यांच्या खिशातील पैसा काढून घेण्याचे काम या मालिकांमुळे होताना दिसते आहे. या मालिकांच्या वेळेत घरात कोणी पाहुणा आला तर त्या प्रेक्षकांना सहन होत नाही. त्या वेळेत एखादा फोन आला तर तो उचलला जात नाही, इतके व्यसन या मालिकांचे लावले  गेले आहे. जेवणाच्या वेळेत या मालिका असतात. त्यावेळी स्वयंपाकघरात गृहीणीचा वेळ जावू नये म्हणून पिझ्झा, बर्गर आणि काय काय पार्सल मागवून घरातली जेवणाची वेळ काढण्याची प्रथा सुरू झाली आहे. डायनिंग हॉलमध्ये जेवणारी माणसे दिवाणखान्यात टिव्हीपुढे आली आहेत. त्यामुळे अशा लोकांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या मनात विष कालवण्यासाठी कथानकात वाटेल ते बदल केले जात आहेत. आज  हिंदुत्ववादी संघटनांना बदनाम करून कोणत्याही फालतू कारणांनी हिंदू संघटना दहशतवाद माजवतात असा चुकीचा संदेश ही मालिका देत आहे. आज बाजारात असलेल्या असंख्य खाद्यपदार्थांच्या प्रॉडक्टला देवी देवतांची नावे आहेत. यावरून या देशात कधीही आंदोलने झालेली नाहीत, दहशतवाद माजवला गेलेला नाही. प्रत्येक देवस्थानच्या ठिकाणी प्रसादासाठी तेथील खाऊचे पुडे असतात त्यावर त्या देवाचे नावच असते. महालक्ष्मी, ब्रम्हचैतन्य, श्रीराम, साईप्रसाद अशा नावाने तेथील खाद्यपदार्थ विकले जातात. कधीही त्यामुळे आंदोलने झालेली नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे दहशतवाद हिंदू संघटना माजवतात असे दाखवून हिंदू संघटनांना बदनाम करण्याचा प्रयत्न थांबला पाहिजे. त्याचा जाहीर निषेध व्हायला पाहिजे. परकीय प्रायोजक मिळवण्यासाठी भारतीय संस्कृतीला बदनाम करण्याचे प्रयत्न थांबवले पाहिजेत. धर्म हा माणसाला ज्ञानी करण्यासाठी असतो. त्यामुळे कोणाला त्रास देण्याचा प्रश्‍न होत नाही. माणसाचे ईश्‍वरात रूपांतर करण्याची ताकद ही धर्मात असते. पण धर्म हा माणसाला पशू बनवतो, हिंस्त्र बनवतो असे दाखवून होणार सून मी या घरची मालिकेने स्वामी विवेकानंदांच्या विचारांचाही अपमान केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: