प्रशांत ठाकूर यांनी मतदारांची फसवणूक केली
लोभाने ग्रस्त झालेला मासा खाण्यालायक वस्तुने झाकलेल्या लोखंडाचा गळ गिळून टाकतो. अशावेळी त्याचा काय परिणाम होणार आहे याचा तो विचारही करत नाही. त्यामुळे तो स्वत:चे नुकसान करून घेतो. -विदूरनीती
6 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून खारघर टोलनाका अचानक सुरू झाला. नोव्हेंबर महिन्यापासून हा टोलनाका सुरू होणार याची चर्चा होती. दोन वेळा त्याच्या तारखाही जाहीर केल्या आणि त्या पुढे ढकलल्या गेल्या. पण 6 तारखेच्या मध्यरात्रीपासून अचानक टोलनाका सुरू झाला. ही नवहिंदुत्ववादी भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेलकरांची केलेली फसवणूक आहे. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांनी येत्या काही दिवसात आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
या टोलनाक्याचे राजकारण करून मतदारांची फसवणूक करून पनवेलची निवडणूक प्रशांत ठाकूर यांनी जिंकली होती. यामध्ये जनतेच्या हिताचा कोणताही निर्णय प्रशांत ठाकूर यांना घ्यायचा नव्हता फक्त मागच्या पाच वर्षातील आपली निष्क्रियता झाकण्यासाठी त्यांनी स्टंट केला आणि तो यशस्वी झाला होता. पण खोटं बोलल्यावर ते कधीतरी प्रकट होतेच. त्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यांचा हा खोटेपणा आता उघड झाला आहे.खारघरचा टोलनाका रद्द होणारच अशा गप्पा प्रशांत ठाकूर यांनी केल्या होत्या. पितापुत्रांनी आपल्या कंपनीच्या नोकरांकरवी आंदोलन केले होते. हे आंदोलन काँग्रेसचे आहे असे भासवून तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांचेबरोबर मिटींग लावली आहे असे भासवून दोन दिवसात निर्णय घेणार असे स्वत:च जाहीर करून रस्त्यारव आडवे पडून केलेले बोगस आंदोलन मागे घेतले. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्याबरोबर कसली चर्चाही केली नाही आणि मिटींगही ठरवली नव्हती. पण पृथ्वीराज चव्हाण यांचेशी चर्चा केली अशी खोटी पत्रके, फलक आणि वर्तमानपत्रातून प्रसिद्धी केली. पोस्टरवरील चव्हाण यांच्या फोटोसोबत फोटो काढून त्यांना आपण भेटलो आहोत असा आभास निर्माण केला. पण हे खोटे जेेव्हा उघड झाले तेव्हा आपण आमदारकीचा राजीनामा देणार आहोत, पुन्हा पनवेलची निवडणूक लढवणार नाही अशी थापेबाजी केली. निवडणुका जाहीर झाल्यावर आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीन गडकरींकडून टोलनाका रद्द करणार असे वचन घेवून भाजपमध्ये प्रवेश केला. आता भाजपची सत्ता येईल आणि टोलनाका रद्द होईल असे आमिष मतदारांना दाखवले. परंतु निवडून आल्यावर एकदाही याबाबत भाष्य करण्याचे धाडस प्रशांत ठाकूर यांना झाले नाही. मुळात भाजपमध्ये कसलेही स्थान नसलेल्या प्रशांत ठाकूर यांनी मतदारांची फसवणूक केल्याचे भाजपमध्येही स्पष्ट झाल्यामुळे भाजपचे नेते आणि मुख्यमंत्रीही त्यांना आता बेदखल करत आहेत. परंतु जरा जरी स्वाभीमान आणि प्रामाणिकपणाचे रक्त प्रशांत ठाकूर यांच्या अंगात असेल तर त्यांनी आता ताबडतोब आपल्या आमदारकीचा राजीनामा देवून आपला बाणेदारपणा सिद्ध करून दाखवला पाहिजे. किंबहुना फसवणूक करून आमदार झालेल्या प्रशांत ठाकूर यांना आमदार म्हणवून घेण्याचा कोणताही अधिकार राहिलेला नाही. हा टोलनाका रद्द करण्याची हिंमत आणि ताकद प्रशांत ठाकूर यांच्यात कधीच नव्हती. फक्त त्यांना काँग्रेस सोडण्यासाठी काहीतरी निमित्त हवे होते, त्यासाठी प्रशांत ठाकूर यांनी मतदारांची फसवणूक केली हे यातून सिद्ध झाले आहे. परंतु यातून एक लक्षात घेतले पाहिजे की प्रशांत ठाकूर यांच्या मताला ना काँग्रेसने किंमत दिली ना भाजपने भिक घातली. भाजपला फक्त आपले संख्याबळ वाढवण्यासाठी खोगीरभरतीसाठी लागणारा आमदार अशीच त्यांची गत आहे. भाजपने प्रशांत ठाकूर यांना ज्यापद्धतीने बेदखल करून हा टोलनाका सुरू केला आहे त्यावरून प्रशांत ठाकूर मतदारांचे कोणतेही प्रश्न सोडवू शकतील यावर कोणीही आता विश्वास ठेवणार नाही.मुळात टोलनाका उभा केल्यावर प्रशांत ठाकूर यांनी त्याला विरोध सुरू केला. टोलनाका उभा झाल्यावर विरोध करायचा नसतो तर त्याला विरोध हा ते काम सुरू होण्यापूर्वी करायचा होता. पण जेव्हा सायन पनवेल रस्त्याचे काम बीओटी तत्वावर देण्याचे ठरले तेव्हा पनवेलचे आमदार असूनही प्रशांत ठाकूर गप्प का बसले याचे ते उत्तर देत नाहीत. बीओटीवर काम याचा अर्थ टोल लागणार हे निश्चित होते. त्याचवेळी काँग्रेसचे आमदार असताना, सत्ताधारी पक्षाचे आमदार असताना प्रशांत ठाकूर यांनी या प्रकल्पाला विरोध का केला नाही? हा रस्ता बीओटीवर नाही तर सरकारने बांधावा अशी मागणी प्रशांत ठाकूर यांनी केलेली नव्हती. याचे कारण हे काम आपल्या ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रा. लि. या कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळेल असा त्यांना विश्वास होता. हे काम केवळ ठाकूर इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले नाही त्याचा सूड म्हणून प्रशांत ठाकूर यांनी टोलनाक्याविरोधात आंदोलन सुरू केले. टोलकंपनीला त्यांनी त्यावेळी सांगितलेही होते की मी या मतदारसंघाचा आमदार आहे मला हे काम मिळावे. पण त्या कंपनीने स्पष्ट शब्दात प्रशांत ठाकूर यांना सुनावले होते की आमदाराने मतदारांची कामे करायची असतात, ठेके घ्यायचे नसतात. त्यामुळे पिसाळलेल्या प्रशांत ठाकूर यांनी त्या कंपनीला बघून घेईन, कसा टोलनाका उभा करतो ते अशी धमकीही दिली होती. त्यानंतर टोलनाका उभा राहिल्यावर प्रशांत ठाकूर यांना आंदोलनाची उपरती झाली. पितापुत्र आपल्या कंपनीच्या लोकांना घेवून काँग्रेसचे आंदोलन म्हणून रस्त्यावर आडवे झोपले. पण काँग्रेसने त्यांना काडीचीही किंमत दिली नाही.काँग्रेसला सत्तेवरून घालवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याचा हेतु तेव्हा राज्यातील भाजपचा होता. त्यामुळे अशा निष्क्रिय आणि खोटारड्या लोकांना आपल्या पक्षात घेवून, उमेदवारी देवून संख्याबळ वाढवण्याचा डाव भाजपने केला. पण खारघरचा टोलनाका रद्द करणार म्हणून आपण भाजपमध्ये जात आहोत अशी सहानुभूती प्रशांत ठाकूर यांनी मिळवली. आता दोनच महिन्यात प्रशांत ठाकूर यांचे हे पितळ उघडे पडले आहे. हे रस्त्याचे काम त्यांच्या कंपनीला मिळाले असते तर प्रशांत ठाकूर यांचा त्याला विरोध नव्हता. त्यामुळे अशा स्वार्थी माणसाला, फसवणूक करणार्या माणसाला आमदार म्हणून घेण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. ही व्यक्ती मतदारांची प्रत्येकवेळी फसवणूकच करणार हे यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता पनवेलकरांनी प्रशांत ठाकूर यांचा राजीनामा मागितला पाहिजे.या टोलनाक्याला सर्वात प्रथम विरोध केला तो शेतकरी कामगार पक्षाने. तत्कालीन आमदार विवेक पाटील यांनी अधिवेशनातच स्पष्ट केले होते की खारघरच्या टोलनाक्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येवू शकते. त्याकडे तत्कालीन सरकारने लक्ष दिले नाही. तेव्हा विधीमंडळात असूनही प्रशांत ठाकूर काहीच बोलले नाहीत. शेकापची सत्ता असलेल्या खारघर ग्रामपंचायतीने त्यानंतर या टोलनाक्याला सर्वात प्रथम विरोेध केला. तोपर्यंत प्रशांत ठाकूर झोपेतच होते. पण जेेव्हा आता काँग्रेसची सत्ता येणार नाही याची जाणिव झाली तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे नाटक प्रशांत ठाकूर यांनी केले. टोलनाक्याचे आंदोलन करून काँग्रेस सोडण्यासाठी बहाणा केला. ही मतदारांची केलेली शुद्ध फसवणूक होती. आता निर्लज्जपणे पुढची साडेचार वर्ष गप्प बसतील आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर 2019 मध्ये राजीनामा देण्याचे नाटक करतील. पण यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. प्रशांत ठाकूर यांची नौटंकी सर्वांना समजली आहे. त्यामुळेच खारघर टोलनाक्याबाबत कोणतीही प्रतिक्रीया देण्याचे त्यांनी टाळले आहे. मुळात त्यांच्या परवानगीनेच हा टोलनाका सुरू झालेला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे मतदारांना आपण कोणाला निवडून दिले आहे हे लक्षात आले असेल. माणूस दहावेळा फसवू शकेल पण कधीतरी त्याचा खोटारडेपणा उघड होतोच. त्याप्रमाणे प्रशांत ठाकूर यांचा खोटारडेपणा आता स्पष्ट झालेला आहे. ज्यांनी या टोलनाक्यावरून प्रशांत ठाकूर यांचे हे खोटे राजकारण आहे, नौटंकी आहे हे स्पष्ट केले त्यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्याचे दुष्ट प्रकार प्रशांत ठाकूर यांनी केले. शेकापचे कृ. उ. बाजारसमिती सभापती राजेंद्र पाटील यांनी तर टोलनाका रद्द करून दाखवा तुमचा जाहीर सत्कार करू असे आव्हान दिले होते. पण ते आव्हान न स्विकारता खोटे गुन्हे नोंदवणे, बदनामी करणे असले अपप्रकार प्रशांत ठाकूर यांनी केले. पण आता प्रशांत ठाकूर यांच्या पापाचा घडा भरला आहे. त्यांना आता ना भाजपमध्ये स्थान आहे ना काँग्रेसमध्ये. ना जनतेत त्यांच्याबद्दल कोणाला आदर राहील ना मतदारांमध्ये. कारण सर्वांना समजले आहे की प्रशांत ठाकूर यांनी आपली घोर फसवणूक केलेली आहे.लोभाने आमिष गिळणार्या माशाप्रमाणे प्रशांत ठाकूर यांची अवस्था झालेली आहे. ते स्वत:ही गळाला लागले आणि पनवेलकरांनाही त्यांनी संकटात टाकले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा