मोठमोठी कार्ये साधतात ती दृढनिश्चय, असीम धैर्य आणि पराकाष्ठेचे प्रयत्न यांच्या बळावरच.-स्वामी विवेकानंद
..................................................6 जानेवारी हा दिवस दरवर्षी पत्रकार दिन म्हणून आपल्याकडे साजरा केला जातो. या दिवसामागे बाळशास्त्री जांभेकरांचा नेमका काय संबंध आहे आणि या दिवसाचे महत्त्व काय आहे हे समजावून घेणे आवश्यक आहे.बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म 20 फेब्रुवारी 1812 रोजी महाराष्ट्रातील सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पोंभुर्ले गावी झाला. बालपणी त्यांनी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास केला होता. त्यानंतर इ.स. 1825 साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमावले. होते.बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. पत्रकारांनी बहुभाषा पंडित असले पाहिजे, अनेक भाषांचा अभ्यास केला पाहिजे हे त्यांच्या वागणुकीतून दिसून येते. बाळशास्त्री जांभेकर यांना फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून मानसन्मान झाला होता. हे जांभेकरांचे मोठेपण नव्या पिढीने समजावून घेतले पाहिजे. त्यांच्यात पांडित्य आणि अध्यापनपटुत्व या गुणांचा मिलाफ होता. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण लिहीण्याबोलण्याइतपत बाळशास्त्रींचा अभ्यास होता, अधिकार होता. आज प्रत्येक पत्रकाराने अशी अभ्यासू वृत्ती ठेवली तर या देशाचे खूप चांगले होईल. नरेंद्र मोदींच्या अगोदर पत्रकार अच्छे दिन आणू शकतील.गणित व ज्योतिष यांतही बाळशास्त्री जांभेकर हे पारंगत असल्यामुळे त्यांची कुलाबा वेधशाळेच्या संचालकपदी नियुक्ती झाली होती. याशिवाय त्यांना रसायनशास्त्र , भूगर्भशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यायशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र या विषयांचे उत्तम ज्ञान होते. पत्रकारांना जास्तीत जास्त विषयांची माहिती असली पाहिजे, त्यााने जिज्ञासू असले पाहिजे हे बाळशास्त्रींच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येते. इ.स. 1834 साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. प्राचीन लिप्यांचा अभ्यास करून त्यांनी कोकणातील शिलालेख व ताम्रपट यांचे शोधनिबंध लिहिले. मुद्रित स्वरूपातील ज्ञानेश्वरी त्यांनीच प्रथम वाचकांच्या हाती दिली. त्यामुळे आजच्या वारकरी सांप्रदायाच्या, ठिकठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होण्याच्या वारकर्यांच्या चळवळीला बळ यामुळेच मिळाले आहे.मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकवताना, समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत होत्या. हे अस्वस्थपण निर्माण होणे हे पत्रकाराच्या जन्माचे डोहाळे असतात. लेखणीच्या जोरावर अनेक समस्यांवर तोडगा काढता येतो हे पत्रकारांनी दाखवून द्यायचे असते. त्यामुळे याच काळात बाळशास्त्रींच्या मनात पत्रकारीतेची बीजे रोवली गेली. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवले की, केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत. त्यानंतर श्रीपती शेषाद्री नावाच्या एका मुलाला त्यांनी योग्य मार्ग दाखवला. मात्र लवकरच समाजाचे प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद कुंटे आणि भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले. 6 जानेवारी 1832 रोजी दर्पणाचा पहिला अंक प्रकाशित झाला. म्हणून आजचा दिवस हा मराठी पत्रकारीतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे पहिले वृत्तपत्र. जांभेकरांच्या दर्पण या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला. दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. 1840 साली सुरू केले. ‘दिग्दर्शन’ मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र तसेच भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित करत. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी 5 वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदि विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.गंथालयांचे महत्त्व ओळखून ‘बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. ‘एशियाटिक सोसायटी’ या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. 1845 साली काढली. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात ते हिंदुस्तानी भाषेचे अध्यापन करत. जांभेकर यांच्या प्रकाशित साहित्यकृतींमध्ये ‘नीतिकथा’, ‘इंग्लंड देशाची बखर’, ‘इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप’, ‘हिंदुस्थानचा इतिहास’, ‘शून्यलब्धिगणित’ या ग्रंथांचा समावेश आहे. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले.
रविवार, ४ जानेवारी, २०१५
समाजसुधारणेची बीजे बाळशास्त्रींनी रोवली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा