सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

घटनेने दिेलेल्या स्वातंत्र्याचा सन्मान करा

  •      
  • गेल्या चार दिवसांपासून देशात घरवापसी, धर्मांतर याबाबत जोरदार  चर्चा आहे. यातून केली जाणारी धार्मिक नेत्यांची विधाने ही संतापजनक आहेत तीतकीच ती देशासाठी घातक अशी आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी जाम वैतागले आणि त्यांनी चक्क आपल्याच पाठिराख्यांना राजीनाम्याची धमकी दिली. मोदींच्या या पवित्र्यामुळे सगळ्यांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. कारण गुजरातचे मुख्यमंत्री असताना सतत होणारी टिका, केंद्रातील विरोधी सरकार असतानाही केलेली कामगिरी पाहता मोदी हे कधी वैतागत नसावेत असा सगळ्यांचा समज होता. पण केंद्राची सत्ता मिळाल्याहर सहा महिन्यांच्या आता राजीनाम्याची धमकी देण्याची वेळ त्यांच्यावर आली यातून त्यांना आतून किती विरोधकांना तोंड द्यावे लागत आहे याची कल्पना यावी.
  • नरेंद्र मोदी सरकारला लोकसभेत बहुमत असले, तरी वारंवार मोदी सरकार गोत्यात येत आहे. या अवस्थेमुळेच लोकसभेची कार्यक्षमता कमी होत आहे. याला नरेंद्र मोदींच्या कंपूतील लोकांची वक्तव्ये आणि कृती दोन्ही जबाबदार आहेत. साध्वीपुराण आणि त्यांचे माफीनाट्य संपतेना संपते तोच गेल्या आठवड्यात दोन गोष्टींमुळे अडचण निर्माण झाली.  यातील पहिली गोष्ट म्हणजे गांधींचा खून करणार्‍या नथुराम गोडसेचा उदो उदो करणारे भाजप खासदारांचे अनावश्यक स्टेटमेंट. 
  • हा साधू खासदार ज्याने नेता व्हायचे ठरवले आहे, तो म्हणाला की, बंदूक चालवण्यात हुशार असलेली एक व्यक्ती ज्याने नि:शस्त्र वृद्ध माणसावर गोळी चालवली तो देशभक्त होता.  खरं तर हे विधान निरर्थक आहे. अशा विधानांमुळे संसदेचे कामकाज थांबू शकते याची तुम्हाला कल्पना होती, तर मग असे वक्तव्य जाहीररीत्या करायची काय गरज होती? या वक्तव्यामुळे खरोखरीच संसदेचे कामकाज ठप्प झाले. युपीए सरकारच्या काळात विरोधात असलेल्या भाजपने सातत्याने काम बंद पाडले आता तीच गोष्ट काँग्रेस करत आहे. संसदेचे कामकाज करण्यासाठी सत्तांतर झालेले असताना या पद्धतीत बदल होणे आवश्यक होते. अशावेळी संसदेत कोणी काय बोलावे यावर मोदींनी बंधने घालण्याची आवश्यकता आहे. आपल्या खासदारांनी चुकीची विधाने करायची आणि मोदींनी त्यावर निवेदन करायचे यावरच सगळा वेळ वाया जाणार का?
  •       वादग्रस्त वक्तव्ये करणार्‍या आपल्या एका मंत्र्याने त्याचे शब्द मागे घ्यावेत, असे  मोदींनी ठामपणे सांगितले. तथापि, दुसर्‍या एका अशाच वादग्रस्त घटनेत सरकारने शरणागती पत्करली असल्याचे दिसले नाही. हे प्रकरण धर्मांतराविषयी होते. 
  • खरं तर हा असा मुद्दा आहे की ज्याने भारतीय जनता पक्षाला नेहमी त्रासले आहे. अनेकदा हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर किंवा ख्रिश्चन धर्मात सामील होणे याबद्दल कायम भाजपला चिंता वाटत असते. मात्र, धर्मांतराचे प्रमाण सध्या जरी खूप कमी आहे आणि अशी धर्मांतरे श्रद्धेमुळे नाही, तर लग्नांमुळे होतात. गेल्या आठवड्यात दुसरे पारडे जड झाले होते. कारण मुघल राजधानी असलेल्या आगर्‍यामध्ये मुस्लिम लोकांचे धर्मांतर झाले होते.  
  • बीबीसीने दिलेल्या अहवालानुसार साधारण 250 लोकांनी हवनात सहभाग घेतला. ज्यांचे धर्मांतर झाले, त्यातील अनेक नागरिक हे गरीब असून कचरा उचलण्याचे काम करणारे होते. त्यातील अनेकांनी सांगितले की या कार्यक्रमास उपस्थित राहिल्यास रेशन कार्ड आणि इतर मूलभूत गरजा भागवण्याचे स्थानिक हिंदू कार्यकर्त्याने कबूल केले होते. सलिना नावाच्या एका मुलीने सांगितले की, तो धर्मांतराचा विधी होता याची तिला कल्पनाच नव्हती. विधी चालू असताना अचानक आम्हाला धर्मगुरू करत आहेत तसेच करायला सांगण्यात आले. एका मुस्लिम माणसाला तर देवाची मूर्ती हातात धरण्यास सांगण्यात आले.’  
  • विधी आटोपल्यावर स्थानिक कार्यकर्त्याने आम्हाला सांगितले की, आम्ही सगळे हिंदू झालो आहोत. आम्हाला याचा विरोध करायचा होता; पण आम्हाला रेशन कार्ड आणि इतर गोष्टी मिळणार आहेत म्हणून शांत राहण्यास सांगण्यात आले.’ आपल्याकडे पूर्वी अनेक गरीबांना ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी आशाच प्रकारे शिक्षण, पैसा, कपडे, औषधपाणी देण्याच्या आमिषाने बाटवल्याचे प्रकार घडलेले आहेत. तोच प्रकार जर भारतातील हिंदू संघटना करत असतील तर त्याच्याकडे टीट फॉर टॅट म्हणून पाहणार का? माणूस म्हणून मदत करा, घर वापसी किंवा धर्मांतर करण्याची प्रथा सुरू करू नका. सलिनाने जरी असे सांगितले असले तरी दुसरी एक जण मुमताज मात्र म्हणाली की कुणीही आमच्यावर जबरदस्ती करून कार्यक्रमाला बसवले नाही. इथे सारे स्वखुशीने गेले होते. हा राजकीय बाजार थांबला पाहिजे. खरं म्हणजे हिंदू हा धर्म इतका सोपा आणि साधा आहे की त्या धर्मात येण्यासाठी कधीही दिक्षा घ्यावी लागत नाही, कसलाही विधी नसतो. माणूस जन्माला येतो तो हिंदू म्हणूनच येत असतो. जन्माला आल्यानंतर त्याच्यावर संस्कार करून त्याला कोठल्या ना कोठल्या धर्माची दिक्षा दिली जाते. आई बापाचा एक धर्म आहे म्हणून तो धर्म आपला आहे असा तो चिकटला जातो.
  •  पण भारतात घडलेल्या या प्रकाराने उर्दू प्रसारमाध्यमे यावर चिडली.
  • अचानक विरोधक संसदेत आक्रमक झाले. या धर्मांतरामुळे आपणही त्रासून गेल्याचे व हे प्रकार थांबले पाहिजेत, असे उत्तर भाजपनेही संसदेत दिले. मात्र, ही चर्चा भरकटत गेली. पण विरोधक हा मुद्दा जितका ताणून धरतील, तितकेच भाजपला आपले मूळ वक्तव्य अधिक जोरकसपणे मांडण्यास बळ मिळत जाईल.
  •   भाजपने अशी भूमिका जाहीर केली की, सगळी धर्मांतरे वाईट आहेत आणि यावर राज्याचे नियंत्रण हवे, अगदी धर्मस्वातंत्र्यावर गदा आली तरीही. भाजपच्या या भूमिकेवर विरोधकांनी अधिक रान पेटवणे शहाणपणाचे ठरणार नव्हते. 
  •     याबाबत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते दाखले देतात ते महात्मा गांधींचे. महात्मा गांधी म्हणतात, ‘एखाद्याने दुसर्‍याचे केलेले धर्मांतर यावर माझा विश्वास नाही. माझा प्रयत्न ती व्यक्ती ज्या धर्मातील आहे त्या धर्माचे परिपूर्ण पालन तिने करावे यावर राहील. सर्व धर्मांची शिकवण सलोख्याने स्वीकारली पाहिजे.’
  • धर्मांतराविषयी बोलताना महात्मा गांधी अजून एके ठिकाणी म्हणाले की, ज्यांनी धर्मांतर केले आहे त्यांनी ते संपूर्णपणे स्वीकारायला हवे. ‘चुकीच्या हेतूने केलेली एक कृतीदेखील पूर्ण धर्म शिकवणीला विषाच्या थेंबाप्रमाणे बाधक ठरू शकते. गुलाबाला काही जगाला उपदेश करायची गरज नाही. त्याचा सुवास आपोआप पसरतो. हा सुवास हाच त्याचा संदेश आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक आयुष्याचा सुगंध हा गुलाबापेक्षा सुंदर आणि सूक्ष्म असतो.’
  • भारतीय संविधानाने धर्मांतराविषयीचा वाद कायद्याने निकालात काढला आहे. कलम 25ने सर्व भारतीयांना आपल्याला हवा तो धर्म स्वीकारण्याची, त्याची शिकवण अमलात आणण्याची, त्याचा प्रसार करण्याची संपूर्ण मुभा दिली आहे.
  •  भारतीय उपखंडात भारत हाच इतका उदार धर्मविषयक कायदा करणारा देश आहे आणि ही गोष्ट सरकारवर हल्ले चढवताना विरोधकांनी लक्षात घ्यायला हवी.  पुन्हा अशी स्थिती निर्माण होता कामा नये, ज्यामुळे कायद्याची पुस्तके उघडायला लागून सर्व घटनेचा अन्वयार्थ शोधत बसावे लागेल.
  •        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  मे महिन्यामध्ये केंद्रात सरकार स्थापन केले. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये काही राज्यांमध्ये विधानसभांच्या पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये उत्तर प्रदेशचाही समावेश होता. मुस्लिम युवक हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याशी लग्न करतात व त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडतात, असा आरोप करत संघ परिवाराच्या काही लोकांनी उत्तर प्रदेशमध्ये या निवडणुकांच्या आधी जोरदार प्रचार सुरू केला. मुस्लिम युवकांकडून हिंदू धर्मातील मुलींना फसवण्याच्या कथित घटनांना संघ परिवाराने ‘लव्ह जिहाद’ असे नाव दिले होते. लव्ह जिहादचे प्रकरण जोरकसपणे लावून धरल्यानंतरही उत्तर प्रदेशातील विधानसभा पोटनिवडणुकांत भाजपला हवे तसे यश मिळू शकले नव्हते. 
  •   आग्रा येथे रा. स्व. संघ परिवाराने काही मुस्लिमांचे धर्मांतर केले. त्या घटनेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरही पडसाद उमटले. ख्रिसमसच्या पहिल्या दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी धर्मांतराचे काही सोहळे आयोजण्याचे प्रयत्न संघ परिवाराकडून सुरू होते. त्या सोहळ्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. 
  • बळजोरीने किंवा आमिष दाखवून जी धर्मांतरे केली जातात, त्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने अशा धर्मांतरांच्या विरोधात 10 जुलै 2013 रोजी एक कायदा अमलात आणला. ज्यांना आपला धर्म बदलायचा आहे, त्या व्यक्तींची धर्मंातरासाठी रीतसर परवानगी घेणे या कायद्याने बंधनकारक करण्यात आले आहे. धर्मांतर करण्याच्या विरोधात एकट्या मध्य प्रदेशनेच नव्हे, तर ओडिशा, गुजरात, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आदी राज्यांनीही असा कायदा केला आहे. याच कायद्याचा फॉर्म्युला डोळ्यासमोर ठेवून भाजपने राष्ट्रीय स्तरावरही धर्मांतराविरोधातच कायदा करण्याची भाषा संसदेत केली आहे. पण कोणताही धर्म हा आपल्या मनाने स्विकारायचा आहे, त्यावर कोणतीही जबरदस्ती असता कामा नये. त्यासाठी धार्मिक स्वातंत्र्य असलेच पाहिजे. घटनेने आपल्याला ते दिलेले आहे. त्याचा सन्मान सर्वांनी केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: