- संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण होत असतानाच नव्या दहशतवादाची बिजे भारतात सापडतात. 26/11 च्या हल्ल्याला जेमतेम 6 वर्ष पूर्ण झाली असतानाच भारतात आता नव्याने दहशतवादाचा शिरकाव होत असल्याचे दिसून येणे हे अत्यंत घातक आहे. अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या कारवाया व इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया (इसिस) या दहशतवादी संघटनेच्या कारवाया यांची तुलना गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय माध्यमातून बरीच गाजली होती. याचे कारण इसिसने आपली अल कायदापेक्षा वेगळी कट्टर, कडवी प्रतिमा जगासमोर आणताना मानवतेला काळिमा फासला जाईल अशाप्रकारे नृशंस हत्याकांडे घडवून आणली होती. हा प्रचार त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत कौशल्याने जगभरात पसरवला होता. आपल्या विचारधारांना जगभरातून पाठिंबा मिळावा, शिकलेल्या तरुणांनी आपल्या बाजूने उभे राहावे म्हणून त्यांना भुलवणारे मूलतत्त्ववादी साहित्य, त्यावरील चर्चा, हिंसक कृत्ये इसिसने अत्यंत खुबीने सोशल मीडियातून प्रसारित केली होती. सोशल मिडीयाच्या माध्यमातून हे सुरू असलेले युद्ध अत्यंत धोकादायक असे आहे. त्यावर व्यक्त होणारी मते, त्याला काही विशिष्ठ वर्गाचा मिळणारा प्रतिसाद हे नव्या पिढीला भडकवणारे आणि नवे दहशतवादी तयार करणारे प्रकार आहेत.
- पश्चिम आशियातील जी काही इस्लामी राष्ट्रे आपापसात 50-60 वर्षे सातत्याने संघर्ष करताहेत त्यांना इसिसच्या अशा अमानुष कृत्यांचा धूडघूस बघायला मिळाला तो सोशल मीडियामुळेच. शनिवारी बंगळुरूमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या व आयटी क्षेत्रातील मेहंदी मसूर बिश्वास या भारतीय तरुणाला झालेली अटक हे आपल्याकडील उदाहरण आहे. पण असे तरूण तयार होतात ही फार चिंतेची बाब आहे.
- मेहदी 2003 पासून सोशल मीडियातून विविध इस्लामी दहशतवादी संघटनांशी संपर्क साधून होता असे दिसून आले आहे. तो इसिससाठी काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. 2008 मध्ये ट्विटर भारतात आल्यानंतर मेहदीने आपल्या अकाउंटमधून इसिसच्या कट्टर धर्मांधतेला खतपाणी घालण्यास सुरुवात केली. तो इसिसच्या सनातनी, धर्मांध व कट्टर भूमिकेचा जगभर प्रसार करण्यासाठी एक माध्यम म्हणून काम करत होता. तो ब्लॉगही चालवत होता. त्यामध्ये प. आशियातील विविध जिहादी गटांमध्ये चर्चा समाविष्ट केली जात असे.
- सोशल मीडिया हे माध्यम जगाशी क्षणात संपर्क साधत असल्याने मेहदीने अत्यंत खुबीने आपल्या अकाउंटद्वारे सनातनी विचार पसरवण्यास सुरुवात केली होती व त्याला त्याच्याच भूमिकेचे समर्थन करणारे हजारो फॉलोअर्सही मिळू लागले. बंगळुरू पोलिसांचे असे म्हणणे आहे की, मेहदीने प्रत्यक्ष दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतलेला नसला तरी इसिसच्या कट्टर, सनातनी विचारांचा प्रचार व प्रसार करण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिसांनी त्याच्यावर भारताच्या मित्र देशांविरोधात युद्ध पुकारल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
- मेहदीने मात्र भारताविरुद्ध कोणतीही माहिती पसरवलेली नाही असे जबानीत म्हटले आहे. त्यामुळे पोलिसांच्या दृष्टीने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे आहे. कारण न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होईल तेव्हा पोलिसांना धार्मिक विचार व सनातनी विचार यांच्यातला भेद कौशल्याने मांडावा लागेल. आपली यंत्रणा इथेच बर्याचवेळा कमी पडते. राजकीय दबावाने किंवा धार्मिक संघटनांच्या दबावाने यंत्रणेला मोकळेपणाने काम करायला मिळत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिस यंत्रणेला स्वायत्तता असणे गरजेचे आहे. त्यांना दबावाखाली काम करायला लागता कामा नये.
- पण या निमित्ताने एक गोष्ट पुढे आली की, आपली अंतर्गत सुरक्षा अजून आपणच गांभीर्याने घेतलेली नाही. ब्रिटनमधील चॅनल-4 या मीडिया ग्रुपने इसिसचे ट्विटर अकाउंट बंगळुरूमधून चालवले जात असल्याची माहिती जाहीर केल्यानंतर आपले पोलिस सतर्क झाले. तोपर्यंत आपल्याकडे कुठलीही हालचाल झालेली नव्हती. ब्रिटनच्या चॅनेल 4 ने सांगितल्यावर पोलिसांनी मेहदीला अटक केली.
- या घटनेचा एक अर्थ असा काढला जाऊ शकतो की आपल्या पोलिसांना सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी बरेच मूलभूत प्रशिक्षण देण्याची गरज आहे. सायबर गुन्हेगारी रोखण्यात आणि त्यावरच्या गुन्हेगारांना पकडण्यात आपली यंत्रणा अजूनही कमजोर आहे हे यातून दिसून आले आहे. अशा तर्हेचा पहिला मेसेज किंवा अशा तर्हेचे कामकाज सुरू असल्याचे समजायला इतके दिवस का जावे लागतात? जर समजा ब्रिटनकडून ही माहिती मिळाली नसती तर आपण गप्पच बसलो असतो का? कोणीतरी सांगितल्याशिवाय आपण आपली तपासाची यंत्रणा का सुरू करत नाही? आपण होवून यासाठी पुढाकार घेणारी यंत्रणा आमच्याकडे नाही काय?
- केंद्रात यूपीए सरकार असताना भाजप नेहमीच अंतर्गत सुरक्षेविषयी तावातावाने बोलत होता. पण आता सत्ता आल्यानंतर त्यांना सोशल मीडियातून पसरवल्या जाणार्या सनातनी, कट्टरतावादी प्रचारयंत्रणेला आळा घालण्यासाठी नवी यंत्रणा उभी करावी लागणार आहे. देशाच्या सीमेवरचा धोका परतवून लावण्यासाठी लष्कर व इतर यंत्रणा काम करतात. पण त्यांच्या माध्यमातून अंतर्गत सुरक्षेचे प्रश्न सुटू शकणार नाहीत. त्यामुळे अंतर्गत सुरक्षेबाबत एक व्यापक धोरण आणावे लागेल.
- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या देशातील गुप्तहेर यंत्रणा ही अधिक सक्रीय करण्याची गरज आहे. पूर्वी सीआयडी ही यंत्रणा अत्यंत सक्षम होती. सीआयडी पोलिसांची ही कार्यक्षमता आजकाल फक्त सोनी टिव्हीवरील मालिकेपुरतीच राहिलेली आहेे. सीबीआय ही यंत्रणा फक्त राजकीय गुन्हेगारी आणि भ्रष्टाचार दडपण्यासाठी तपास करणारी यंत्रणा बनली आहे. स्कॉटलंड यार्ड नंतर मुंबई पोलिस सर्वात कार्यक्षम असणारी यंत्रणा ही जगभरातील ख्याती होती. आज याच पोलिसांचे वाभाडे सोशल मिडीयावरून काढले जात आहेत. जंगलातील सिंह पकडण्यासाठी तीन देशातील पोलिस जातात आणि त्यात भारताचे पोलिस काय करत असतात यावरचा विनोद सातत्याने फेसबुकवरून फिरवला जात आहे. त्याचा नेमका बोध आम्ही काय घेणार आहोत?
- गेल्या चार वर्षांत जगाचे राजकारण इतके वेगाने बदलत आहे की या काळात प्रतिगामी-सनातनी विचारसरणींचा एकाएकी उद्रेक होऊन व त्यांच्या हातात फेसबुक, ट्विटर, यूट्यूबसारखी माध्यमे हाती पडल्याने कट्टरवादी संघटनांना अधिक बळ मिळण्यास सुरुवात झाली. या संघटनांनी ते विरुद्ध आपण अशी मांडणी जोरकसपणे केली. प्रत्येक धर्म, जातिसमूह, वंश यांच्या अस्मिता चुचकारण्याचे प्रयत्न सोशल मीडियात दिसू लागले. मध्यंतरी ब्रुकिंग इन्स्टिट्यूट या संस्थेने इसिस या संघटनेच्या वाढत्या प्रसाराबाबत प्रसिद्ध केलेल्या अहवालात इसिसच्या वाढत्या प्रसाराला सोशल मीडिया जबाबदार असल्याचे निरीक्षण मांडले होते. त्यात तथ्य आहे. जो कट्टर, धार्मिक विचार अल कायदा पसरवू शकली नाही तो विचार इसिसने पसरवला आहे ही अधिकच चिंतेची बाब आहे. इस्लामी स्टेट, त्यांचे स्वतंत्र लष्कर व नोकरशाही आणि त्यांचे तत्त्वज्ञान अशी विचारसरणी इसिस आहे. त्यांच्या एकांगी व हिंसक तत्त्वज्ञानाला केवळ प. आशियातील देश नव्हे तर ब्रिटन, अमेरिका व काही युरोपीय देशांमधील तरुण बळी पडले हे दिसून आले आहे. मेहदी अशाच चुकलेल्या तरुणांपैकी एक आहे. त्याने प्रत्यक्ष दहशतवादी कारवायांमध्ये भाग घेतलेला दिसत नसला तरी आपली अंतर्गत सुरक्षा सतर्क नाही हे या निमित्ताने दिसून आले. मेहदीला पकडल्यानंतर लगेच त्याच्या प्रतिक्रीया माध्यमातून येवू लागल्या आहेत त्याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे. आपली यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे.
शनिवार, २० डिसेंबर, २०१४
सोशल मिडीया आणि सुरक्षायंत्रणेचे वाभाडे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा