गुरुवार, ४ डिसेंबर, २०१४

बूड सलामत तो खुर्ची पचास

  • सत्तेमध्ये शिवसेनेला सहभागी होण्यास भाग पाडून देवेंद्र फडणवीस सरकारने आपले बूड स्थिर करून घेतले.स्थिर सरकार असणे  हे महाराष्ट्रासाठी ठीक झाले आहे. अल्पमतातील सरकार चालविणे अशक्य असल्याची कबुली फडणवीस यांनी जाहीरपणे दिली होती. तेव्हापासून शिवसेनेची आक्रमक भूमिकाही नरम होऊ लागली होती. त्यामुळे दोघांचे लवकरच पुन्हा जुळणार हे जनतेने ओळखले होते. जनतेच्या मताची बूज राखावी हे शहाणपण दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दाखविले. भाजप व सेनेतील भांडणापेक्षा भाजपच्या काही अतिशहाण्या नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर सुरू केलेला घरोबा पाहून जनतेचा तीव्र अपेक्षाभंग झाला होता. ही चूक दुरूस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पण त्याचबरोबर अतिमहत्वाकांक्षा दाखवणार्‍या शिवसेनेच्या वाघाचे मांजरही करून टाकले आहे. 
  • निवडणुकीत जनतेचा सर्वाधिक राग राष्ट्रवादी काँग्रेसवर होता. निकालातून ते स्पष्ट झाले होते. प्रचारात भाजपचे लक्ष्य राष्ट्रवादी काँग्रेस होते. तरीही निवडणूक निकालानंतर, केवळ शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी भाजपमधील धंदेवाईक नेत्यांनी राष्ट्रवादीबरोबर सूत जमविण्यास सुरुवात केली. त्याची तीव्र प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटली. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार तरले तरी जनतेमध्ये त्याला किंमत राहणार नाही हे भाजपमधील फडणवीस, तावडे, पंकजा मुंडे अशा नेत्यांना पटले होते. राज्यात युतीचे सरकार यावे, असा निकालाचा अन्वयार्थ असल्याचे फडणविसांनी म्हटले आहे. स्वच्छ चारित्र्याचा मुख्यमंत्री व्हावा, असा निकालाचा एक अर्थ होता. तो जाणून मोदींनी फडणवीस यांची निवड केली होती. पण युतीचे राज्य हा निकालाचा अन्वयार्थ मोदी आणि अमित शहा यांच्या लक्षात आला नव्हता. 
  • देवेंद्र फडणवीस यांना पाण्यात पाहणार्‍या पक्षातील काही नेत्यांनी निकालाचा चुकीचा अर्थ काढला. सेनेवर तलवार चालविण्यास सुरुवात केली. एकनाथ खडसे तर संपूर्ण शिवसेनेवर टिका करू लागले. जे काम विरोधी असलेल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवार करत होते त्याला खतपाणी घालण्याचे काम एकनाथ खडसे यांच्यासारख्या नेत्याकडून होत होते. भाजप शिवसेनेमधील दरी वाढवण्याचे काम ते करू लागले होते. देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अल्पमतात रहावे, ते अस्थिर असवे या हेतुने खडसेंचे राजकारण चालले होते. आपल्याला मुख्यमंत्री केले नाही त्या सूडातून त्यांचे कृत्य होत होते. पण ते महाराष्ट्राच्या हिताचे नव्हते. शिवसेनेच्या अरेला कारे होत युतीचे गाडे जागीच बसले. ते पुन्हा उभे करण्यासाठी देवेंद्रांना बरीच फडणविशी करावी लागली. फडणवीस यांची शिष्टाई कामी आली व सेना सत्तेमध्ये सहभागी होण्यास तयार झाली.
  • खडसेंनी अगदी सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेला  डिवचण्यास सुरूवात केली होती. की जेणेकरून शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातच बसेल. त्यासाठी सगळ्या मराठी शाळांमधून उर्दु विषय सक्तीचा करावा असे वक्तव्य केले. त्यावर शिवसेना बरोब्बर रिअ‍ॅक्ट झाली. त्यानंतर रामदास कदम आणि एकनाथ खडसे यांचे द्वंद्वयुद्ध चालत राहिले. खडसेंच्या राजीनाम्यापर्यंत रामदास कदम गेले. रामदास कदम हे तसे वाचाळच. पण त्याच्यापुढे एकनाथ खडसे दोन पावले जावून महाराष्ट्राला सत्तेवर असलेला भाजप परिपक्व नाही हे दाखवून देण्यात गुंतले होते. ज्या  सामान्य जनतेने भाजपला सत्तेपर्यंत नेले होते, त्या भाजपच्या नेत्यांकडून होत असलेले हे चाळे पाहून सामान्य जनताही त्रस्त झाली होती. अवघ्या महिनाभरात या सरकारवर राग चढू लागला होता. हे हितावह नाही हे फडणवीस यांनी ओळखले. कारण या अस्तनीतल्या निखार्‍यांचा फायदा शरद पवार केव्हा उठवतील आणि सगळे खाक करून टाकतील याची खात्री नव्हती. साहजिकच थोडे नमते घेवून, थोडे आक्रमक होवून शिवसेनेला आपल्या बरोबर घेणे कसे आवश्यक आहे हे त्यांनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले. शिवसेनेचा सत्तेत सहभाग करून घेवून स्थिर सरकारसाठी भक्कम पाय रोवले.
  • ही शिष्टाई करताना देवेंद्र फडणवीस यांनी चातुर्यही दाखविले. दुष्काळासह महाराष्ट्रातील बर्‍याच प्रश्नांवर फडणविसांवर टीका होत आहे. मात्र, प्रशासकीय अनुभवात कमी असलो तरी राजकीय चातुर्यात आपण कमी नाही हे त्यांनी यातून दाखवून दिले. युती ही केवळ सरकारपुरती मर्यादित न ठेवता शहर व जिल्हा पातळीवरही ती कायम ठेवण्याचा निर्णय शिवसेनेच्या गळी उतरवण्यात आला आहे. त्यासाठी विधानसभेतील मतसंख्येनुसार जागावाटपाचे सूत्र ठरविण्याच्याही हालचाली आहेत. यावरून वाद होणार असले तरी युती सर्व स्तरांवर कायम ठेवण्याचा फडणविसांचा आग्रह चाणाक्षपणा दाखविणारा आहे. युतीचा पाया  व्यापक होईल. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीमधील भांडणाचा लाभ घेण्याची संधी मिळेल. मुख्य म्हणजे सर्वाधिक ठिकाणी सत्तेमध्ये वाटा मिळविता येईल. भाजप हा शहरी चेहरा असलेला पक्ष आहे. महाराष्ट्राची सत्ता टिकवायची असेल आणि दीर्घकाळ राज्य करायचे असेल तर ग्रामीण भागात रूजले पाहिजे याची जाणिव फडणवीसांना झाली.  महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदींच्या घोषणेला उपयुक्त ठरेल, अशी ही कृती आहे. भाजपचा विस्तारही त्यातून साधता येईल. 
  • नैसर्गिक मित्र म्हणून सेनेला सर्व स्तरांवर बांधून घेण्याचा हा प्रयत्न आहे. पक्षातील फूट टाळण्यासाठी शिवसेनेलाही याचा उपयोग असल्यामुळे स्थानिक कुरबुरीपलीकडे यावर वाद झाला नाही. फडणवीस सध्या पक्षांतर्गत व पक्षाबाहेरील वर्तुळात घेरले गेले आहेत. शिवसेनेशी चांगले जुळले तर पक्षातील त्यांचे स्थान भक्कम होईल, हे त्यांनी ओळखले आहे. तरीही शिवसेनेच्या अधिन आपण जाणार नाही हेही त्यांनी दाखवून दिले आहे.
  • सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने  मुख्य प्रश्न सरकार तडफेने चालविण्याचा आहे. भाजप वाढतो की शिवसेना बसते, भाजपने चातुर्य दाखविले की शिवसेनेने लोटांगण घातले हे विषय माध्यमांना चर्वण करण्यासाठी ठीक असले तरी जनतेला त्यामध्ये रस नाही. जनतेचे लक्ष सरकारच्या कारभाराकडे असेल. सरकारचे बूड स्थिर नसल्यामुळे फडणवीस यांना सध्या फार काही करता येत नव्हते. पण आता ती सबब सांगता येणार नाही. फडणवीस यांचा कारभार अजून दिसला नसला तरी त्यांच्या धोरणामध्ये स्पष्टता असल्याचे जाणवते. प्रश्न अंमलबजावणीचा आहे. तेथे भाजप व सेनेतील मंत्र्यांनी साथ दिली पाहिजे.  हे करत असताना हेकेखोर नेत्यांच्या जिभेला आवर घालावा लागेल. खडसेंना खडसावून मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात करून दिली. पण वेळ आली तर सेनेच्या मंत्र्यांनाही काही खडे बोल सुनवावे लागतील. 
  • पंधरा वर्षांनंतर सत्ता हाती आल्यामुळे कानात वारे भरल्याप्रमाणे काही सेना नेत्यांचा वारू उधळू शकतो. त्याला लगाम घालण्यात फडणवीस यांची कसोटी आहे. इथे उद्धव ठाकरे यांचीही जबाबदारी वाढते. बाळासाहेब ठाकरेंच्या काळात कमळाबाईला चिमटे काढण्यात मातोश्री धन्यता मानत होती.  पण ते बाळासाहेबांच्या बाबतीत ठिक होतं. अन्य कोणी तसा प्रकार करू नये. बाळासाहेबांना ते शोभत होतं. कारण त्यांची मते ही स्पष्ट होती. हाच प्रकार पुन्हा झाल्यास 1999मध्ये युती सरकारचे जे झाले तेच या बहुमतातील सरकारचे होईल. सरकार उत्तम चालावे व महाराष्ट्रातील जगणे अभिमानास्पद व्हावे इतकीच जनतेची इच्छा आहे. ही इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव यांच्याकडेही जाते.
  • उपमुख्यमंत्रीपद शिवसेनेला देणार नाही. या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री नसेल हे स्पष्टपणे सांगून फडणवीस यांनी स्थिर सरकारसाठी फक्त मुख्यमंत्री असला पाहिजे हे दाखवून दिले आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री हे सोयीचे मंत्रिपद आहे. ते घटनात्मक नाही. पण विश्‍वास दाखवण्यासाठी केलेली ती सोय आहे. असे सोयीचे राजकारण आपण करणार नाही. केवळ उपमुख्यमंत्री म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे महत्वाचे खाते असे दिखावूपणाचे खाते निर्माण करणार नाही हे स्पष्ट करून सरकारच्या स्थैर्याला महत्त्व दिले आहे. आवाजी बहुमताने स्थिर झालेल्या सरकारमध्ये अरे आवाज कुणाचा, शिवसेनेचा हा आवाज आता घुमू लागला आहे. पण स्वकीय आणि मित्र पक्षांचे घोंगडे विणण्याचे काम फडणवीसांन फत्ते केले आहे. सर सलामत तो पगडी पचास अशी आपल्याकडे म्हण आहे. ती म्हण फडणवीसांनी नव्याने करून दाखवली आहे. बूड सलामत तो खुर्ची पचास  हे समिकरण रूजवले आहे. राज्यात सत्ता स्थिर केली तर स्थानिक पातळीवर सत्ता मिळवणे सोपे जाईल. भाजप केंद्रात आणि राज्यात रूजला तरी पालिका, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समिती या स्तरावर तो रूजलेला नाही. त्यासाठी बूड स्थिर करून घेण्याचे काम फडणवीसांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: