- 2014 या वर्षाला आज आपण निरोप देत आहोत. या वर्षाने प्रचंड काही घडामोडी घडवल्या आहेत. भारतातील प्रत्येकाच्या स्मरणात राहिल असे हे वर्ष. कोणी चांगल्या कारणाने तर कोणी वाईट कारणाने हे वर्ष लक्षात ठेविल. पण या वर्षात बरेच काही घडले आहे. ते लक्षात ठेवूनच उद्या आपल्याला नवीन वर्षात पदार्पण करायचे आहे.
- भारतीय लोकशाही याच वर्षात एका परिवर्तनाच्या नव्या उंबरठ्यावर आली. दशकानुदशके या देशाची सत्ता एका विशिष्ठ घराण्याबोवती फिरत राहिली, भ्रष्टाचाराने माखलेल्या काँग्रेसच्या ताब्यात राहिली आणि देश विकासापासून दूर राहिला होता. स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाणारा काँग्रेस कार्यकर्ता, सामान्य माणसाला त्रासदायक ठरत होता. या त्रासातून मुक्त करण्याचा पर्याय भारतीय लोकांना यावर्षी सापडला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा उदय याच 2014 या वर्षात झाला. या देशाचा पंतप्रधान होण्यासाठी गांधी हे नाव असावे लागते, गांधी नेहरू घराण्याशी संबंध असावा लागतो हा दशकानुदशकांचा समज यावर्षी मतदारांनी खोटा ठरवला. एका सामान्य गरीब कुटुंबातील माणूसही या देशाचा पंतप्रधान होवू शकतो हे जगाला दाखवून देण्याचे काम भारताने यावर्षी केले आहे. एक चहा विकणारा, ध्येयवेडा माणूस आपल्या नियोजनाच्या जोरावर संपूर्ण देशाची सत्ता स्पष्ट बहुमतासह एकहाती मिळवू शकतो हे या वर्षाने सिद्ध करून दाखवले आहे. गेली पंचवीस वर्ष आघाडीच्या सरकारचा फॉर्म्युला भारतीय लोकशाहीने स्विकारला होता. कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता नाही हे पक्क झालेले असतानाच आघाडी करून निवडणुका लढवूनही भाजपला स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतके संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे स्थिर सरकारचा कौल लोकशाहीने यावर्षी दिला आहे. आघाडीमुळे सगळ्यांना सांभाळून घेताना, सरकार अस्थिर होवू नये म्हणून काही महत्त्वाचे निर्णय सरकारला घेता येत नव्हते. तसे निर्णय घेण्याची ताकद आता मोदी सरकारला 2014 या वर्षाने दिली आहे. त्यामुळे काही करून दाखवण्यासाठी सगळा विरोध झुगारून मतदारांनी मोदींच्या हातात सत्ता दिली. एकहाती सत्ता दिली आहे, काहीतरी वेगळे करून दाखवा. अशी संधी पुन्हा येणार नाही. या संधीचे सोने केले नाहीत तर 2019ला पुन्हा मतदार संधी देणार नाहीत, या जाणिवेसह मोदींचे सरकार सत्तेवर आले हे 2014 चे खास वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.
- राष्ट्रीय पातळीवर घडलेल्या महत्त्वाच्या घटनांमध्ये आणखी एका गोष्टीचा उल्लेख करावा लागेल तो म्हणजे भारताची मंगळयान ही मोहीम यावर्षी यशस्वी झाली. खगोल शास्त्रात भारतीय तंत्रज्ञान किती उच्च आहे हे जगाला दाखवून देणारी ही मोहीम 2014 या वर्षाची देणगी आहे.
- 2014 या वर्षात महाराष्ट्रातील अनेक बर्या-वाईट घटनांनी काही शिकवण दिली. यापैकी चांगल्या गोष्टी आपण निश्चितच पुढे घेऊन जाणार आहोत. त्याबरोबरच वाईट घटनांच्या अनुभवातून लागलेली ठेच, झालेल्या चुकांची पुनरावृत्ती न करता त्यापासून मिळालेल्या धड्यांपासून शिकवण घेत नवीन वर्षात प्रगतीकडे वाटचाल करता येईल अशी घटना घडली. ती म्हणजे माळीण दुर्घटना. 30 जुलै या दिवशी माळीण येथे डोंगराने आख्खे गाव गिळले. निसर्गालाच आव्हान देण्याची प्रवृत्ती माणसांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यांत्रिकीकरणाच्या युगात निसर्गाकडे किंवा नैसार्गिक स्रोताकडे दुर्लक्ष करण्याची किंवा त्यावर कुरघोडी करण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे. हे पाप आपल्याच मुळावर उठणार यात शंका नाहीच. नेमके तसेच घडले. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरपासून जवळच असलेलं आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं माळीण हे छोटंसं गाव रात्रीतून डोंगराच्या मलब्याखाली गडप झालं. या दुर्घटनेत 151 आबालवृद्धांना आपले प्राण गमवावे लागले, तर 40 हून अधिक घरे जमीनदोस्त झाली. मुसळधार पावसामुळे दरड कोसळून डोंगराच्या पायथ्याशी राहणार्या निष्पाप ग्रामस्थांचा बळी गेला. आपत्कालीन पथक व एनडीआरएफच्या 400 जवानांनी अहोरात्र बचावकार्य करत 38 जणांचे प्राण वाचवले. मात्र अनेक संसाराची माती झाली. वृक्षतोड, डोंगरांचे उत्खनन यामुळे मोठमोठे डोंगर कमकुवत होत गेले आणि त्याखाली एक गाव होत्याचे नव्हते झाले हे 2014 ने पहायला लावले.
- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका ही 2014 ची फार मोठी देणगी आहे. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे हा समज खोटा ठरवणारा कौल या निवडणुकीत महाराष्ट्राला मतदारांनी दिला. गेली पंधरा वर्षे महाराष्ट्रात सत्तेला चिकटून बसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला हादरा देत मतदारांनी राज्यात सत्तांतर घडवून आणले. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले. ही राजकीय उलथापालथ ऐतिहासिक ठरली. तरीही सत्तेसाठी वाटेल ते करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांनी भाजपला स्पष्ट बहुमतापासून दूर ठेवले. शिवसेनेचा त्यावर अंकुश ठेवण्याचे कसब मतदारांनी केले. काँग्रेसच्या भ्रष्ट लोकांना नाकारायचा इरादा मतदारांनी केला होता. पण भाजपने अशाच लोकांना आपल्या पक्षात स्थान देवून उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. प्रशांत ठाकूर यांच्यासारख्या काँग्रेसच्या भ्रष्ट आणि मतदारांची फसवणूक करणार्या व्यक्तिला भाजपने पक्षात स्थान दिले. उमेदवारी दिली. ही फसवणूक भाजपने केली ती 2014 या वर्षातच. सायन पनवेल महामार्गाच्या कामाचा ठेका मिळाला नाही म्हणून टोलनाक्याविरोधात आंदोलन करणार्या आणि काँग्रेसचा राजीनामा देणार्या प्रशांत ठाकूर यांना पुढचे ठेके देण्यासाठी भाजपने आपल्या पक्षात घेतले. येत्या 9 जानेवारीपासून खारघरचा टोलनाका सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत मतदारांची फसवणूक करून पनवेलची आमदारकी मिळवणार्या भाजपचा बुरखा घातलेल्या आमदारांचे खरे स्वरूप आता जनतेपुढे येणार आहे. हे 2014 नेच दाखवून दिले. सत्तेचा गैरवापर करून, पोलिसांना हाताशी धरून खोटे गुन्हे नोंदवण्याचे प्रकार प्रशांत ठाकूर यांनी काँग्रेस राजवटीत केले हे जनतेला समजले ते 2014 या वर्षातच. त्यामुळेच जनता नाकारणार या भितीपोटी त्यांनी भाजप स्विकारला आणि नवहिंदुत्ववादी म्हणून समोर आले. हे नवहिंदुत्व किती दिवस टिकणार याचा विचार करण्याची संधी पनवेलकरांना दिली ती याच वर्षाने.
- 2014 या वर्षात राज्यात प्रथमच भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्याने आजवर पश्चिम महाराष्ट्र व मुंबईकडे केंद्रित झालेला सत्तेचा केंद्रबिंदू आता मराठवाडा व विदर्भ या मागास भागाकडे सरकला आहे. सत्तेच्या मस्तीत वावरणार्या व जनतेच्या प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करणार्या राज्यकर्त्यांना उशिरा का होईना अखेर जनतेनेच सत्तेवरून पायउतार केले. कोणत्याही गोष्टींत अतिरेक झाला की त्याची हीच गत होते. त्याचप्रमाणे विकासाचे स्वप्न पाहणार्यांना व सामान्य नागरिकांप्रती आस्था ठेवण्याचा संकल्प करणार्यांना उशिरा का होईना यशाची संधी मिळतेच हे या वर्षाने दाखवून दिले.
- महाराष्ट्राचे पुरोगामीत्व या वर्षाने दाखवून दिले. एक फार मोठे परिवर्तन या वर्षात राज्यात घडले. ते म्हणजे विठ्ठल-रुक्मिणीच्या पूजेसाठी बहुजन, महिला पुजारी यांना संधी मिळाली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून बडवे-उत्पातांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हद्दपार व्हावे लागले. त्यानंतर मंदिर समितीने श्री विठ्ठलाच्या पूजेसाठी बहुजन समाजातील, तर श्री रुक्मिणीच्या पूजेसाठी महिला पुजार्यांची नियुक्ती केली. जातीपातीचा नव्हे, देव श्रद्धेचा भुकेला असतो. मात्र वर्षानुवर्षे स्पृश्य-अस्पृश्याचे भांडवल करून दुर्बल समाजावर झालेला अन्याय कधी ना कधी दूर होतच असतो. सामाजिक सलोख्याच्या विचाराने घेतलेल्या परिवर्तनवादी निर्णयाचे स्वागतच होते. महाराष्ट्राने यातून आपले पुरोगामीपण सिद्ध करून दाखवले.
- 2014 या वर्षात शेतकरी कामगार पक्षाने शेतकर्यांचा खरा हितचिंतक कोण आहे हे सिद्ध करून दाखवले. मराठवाड्यातील शेतकर्यांवर आसमानी संकट कोसळले असताना त्यांना मदत करण्यासाठी अहवाल आणि पाहणीत गुरफटलेल्या सरकारला शेकापने आपल्या कृतीतून चपराक लगावली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना फार मोठी मदत करण्याचे काम शेकापक्षाने केले आहे. एकीकडे सरकारकडून छोट्या रकमेचे आणि चुकीच्या तारखांचे चेक देवून शेतकर्यांची चेष्टा केली जात असताना रोख मदत देवून शेतकर्यांना कर्जमुक्त करण्याचे काम शेकापक्षाने केले आहे, ते 2014 वर्ष शेकापने अखेरच्या टप्प्यात जिंकले आहे असेच म्हणावे लागेल.
- पण एकंदर हे वर्ष राजकीय, धार्मिक, सामाजिक परिवर्तनाने गाजले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या वर्षाला कधीच विसरता येणार नाही. एका बेसावधक्षणी मागे गेलेले आता सावध झाले आहेत आणि सावधपणे आपले साध्य साधायचा संकल्प मागे पडलेल्यांनी या वर्षात केला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४
परिवर्तनाचे वर्ष
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा